तक्रारदार स्वतः हजर. तक्रारदारानी तक्रार दाखल करण्याकामी युक्तिवाद केला. परंतु तक्रारीमधील सामनेवाला यांचा पत्ता लोअर परेल मुंबई 400030 असा नमूद असून तक्रारीमधील इतर कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रार दक्षिण मुंबई मंचाच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात येत नसल्याचे दिसून येते. सबब तक्रारदारांना योग्य त्या मंचात तक्रार दाखल करावयाची मुभा देऊन भौगोलिक कार्यक्षेत्राअभावी प्रस्तूत तक्रार दाखल करण्याकामीच्या टप्प्यावर असताना निकाली काढण्यात येते. प्रकरणात हाच अंतिम आदेश समजावा. स्वतंत्र टंकलिखीत आदेश पारीत. प्रकरण निकाली.
// तक्रार दाखलकामी आदेश //
द्वारा – श्रीमती. स्नेहा एस. म्हात्रे, अध्यक्षा
तक्रारदाराच्या तक्रारीचे दाखल टप्प्यावर अवलोकन केले असता, तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार सामनेवाला यांचेविरुध्द त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त शुल्काची (Excess amount charged) रक्कम रु. 5,064.20 परत मिळावी. तसेच नुकसानभरपाईची रक्कम रु. 50,000/- मिळावी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- मिळावेत यासाठी दाखल करणेकामी सादर केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारीत नमूद केल्यानुसार, तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून सामनेवाला यांना रक्कम रु. 3,999/- अदा करुन दि. 24/12/2018 ते दि. 03/01/2019 या दहा दिवसांच्या कालावधीसाठी i-rome Plan घेतला होता. परंतु त्यामध्ये दि.24/12/2018 ते दि. 26/12/2018 या तीन दिवसांत नेटवर्कमध्ये अडथळा निर्माण झाल्याने, तक्रारदार त्या प्लॅनच्या सुविधेपासून वंचित राहिले. त्याबाबत तक्रारदारांनी सामनेवाला यांचे एक्झीक्यूटीव्ह श्री. संकेत जकाल यांचेकडे दि. 25/12/2018 रोजी तक्रार केली असता, त्यांनी वर नमूद तीन दिवसांमध्ये नेटवर्क प्रॉब्लेम असल्याचे मान्य केले. तसेच त्या कालावधीतले शुल्कही प्लॅन कार्यान्वित झाल्यापासून (Date of Activation) आकारणार असल्याचे सांगितले. सदरहू तीन दिवसात प्लॅनची सुविधा वापरत नसल्यामुळे तक्रारदाराचे म्हणण्यानुसार, तक्रारदाराचे नुकसान झाले व तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला. तसेच मोबाईल क्रमांक 9821238382 इनव्हॉईस क्रमांक 15MH1907303136 मध्येही सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे नमूद केले आहे. सेवा खंडीत होण्याची भिती दाखवून तक्रारदारास अतिरिक्त बिलाची रक्कम (Excess Billing) भरण्यास जबरदस्ती करण्यात आल्याचे कथन तक्रारदारांनी केले आहे. या कारणास्तव तसेच तक्रार अर्जात नमूद केलेल्या इतर तपशिलासह तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार सामनेवाला यांचेविरुध्द दाखल केली आहे. परंतु तक्रारीमधील सामनेवाला यांचा पत्ता लोअर परेल मुंबई 400030 असा नमूद असून तक्रारीमधील इतर कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रार दक्षिण मुंबई मंचाच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात येत नसल्याचे दिसून येते. सबब तक्रारदारांना योग्य त्या मंचात तक्रार दाखल करावयाची मुभा देऊन भौगोलिक कार्यक्षेत्राअभावी प्रस्तूत तक्रार दाखल करण्याकामीच्या टप्प्यावर असताना निकाली काढण्यात येते. प्रकरणात हाच अंतिम आदेश समजण्यात यावा. प्रकरण निकाली.