आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा श्रीमती आर. डी. कुंडले 1. तक्रार – ट्रॅक्टर कमी क्षमतेचा देऊन किंमत जास्त घेतली व आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन करून दिले नाही त्याबद्दल दाखल आहे. 2. विरूध्द पक्ष क्र. 1 स्थानिक विक्रेते आहेत व विरूध्द पक्ष क्र. 2 हे उत्पादक आहेत. 3. तक्रारकर्त्याला 35 एच. पी. चा ट्रॅक्टर खरेदी करावयाचा होता. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी आयशर 312 सुपर डीआय हा 35 एच. पी. चा असल्याचे सांगितले म्हणून दिनांक 13/06/2008 रोजी किंमत रूपये 4,38,990/- देऊन खरेदी केला. 4. खरेदीकरिता बँक ऑफ इंडिया, लाखांदूर कडून कर्ज घेतले. त्याकरिता विरूध्द पक्ष क्र. 1 विक्रेते यांनी दिनांक 25/09/2008 रोजी कोटेशन दिले. त्यातही उपरोक्त वर्णित ट्रॅक्टर 35 एच.पी. चा असल्याचे नमूद केले. ट्रेलर, नांगर व केजव्हील इत्यादी मिळून एकूण किंमत रू. 5,96,490/- चे कोटेशन विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी दिले. यातच आर.टी.ओ. पासिंग व विम्याचा अंतर्भाव होता असे तक्रारकर्ते म्हणतात. दिनांक 14/11/2008 रोजी तक्रारकर्त्याला कर्ज मंजूर झाले. आर.टी.ओ. पासिंग व विम्याबद्दल तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र. 1 ला वारंवार विचारणा केली. ऑगस्ट 2008 मध्ये विमा काढून दिला परंतु आर.टी.ओ. पासिंग करून दिले नाही. 5. ट्रॅक्टरचा शेतीसाठी वापर करतांना त्याची ताकद कमी पडत असल्याचे तक्रारकर्त्याच्या लक्षात आले. जमिनीत रोवल्यानंतर पहिल्या किंवा दुस-या गिअरमध्ये तो उठत नव्हता. त्यासाठी लोडिंग गिअरचा वापर करावा लागत होता. लोडिंग गिअर ट्रेलर जोडून त्यात पूर्ण माल भरल्यावरच लावावयाचा असतो तसेच चिखलणीच्या वेळी ट्रॅक्टर पुढे न सरकता जागीच उभा राहतो व चाके जागच्या जागीच फिरतात. यावरून क्षमता (एच.पी.) कमी असल्याचा संशय आला म्हणून तक्रारकर्त्याने या ट्रॅक्टरबद्दल तांत्रिक माहिती गोळा केली. 6. दिनांक 01/09/2010 रोजी महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, नागपूर यांना विचारणा केली असता त्यांनी आयशर 312 सुपर डीआय हा ट्रॅक्टर 35 एच.पी. चा नसून 30 एच.पी. चा असल्याचे सांगितले. किमतीबाबत त्यांच्याकडून कोटेशन घेतले असता किंमत रू. 3,80,200/- आहे हे समजले. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर 35 एच.पी. चा समजून किंमत रू. 4,38,990/- मोजली, परंतु तो 30 एच.पी. चाच निघाला व त्याची किंमतही कमी असल्याचे आढळून आले. यावरून फसवणूक झाल्याचे तक्रारकर्त्याच्या लक्षात आले. 7. तक्रारकर्त्याने यासंदर्भात अधिक वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आयशर 312 चा परिक्षण अहवाल प्रत्यक्ष ट्रॅक्टर नगर, बुधनी, मध्यप्रदेश येथील केंद्रीय कृषि मशिनरी प्रशिक्षण आणि परिक्षण संस्था येथे जाऊन प्राप्त केला व तेथील अधिका-यासोबत चर्चा केली. तेव्हा त्याला समजले की, आयशर 312 या ट्रॅक्टरचे मे-2003 च्या परिक्षणानुसार हा ट्रॅक्टर 29.5 एच.पी. चा आहे. पुढे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र. 2 उत्पादक यांच्या वेबसाईटला भेट देऊन आयशर 312 चे तांत्रिक विवरण मिळविले. त्यात ट्रॅक्टरची क्षमता 30 एच.पी. असल्याचे नमूद आहे. हा दस्त रेकॉर्डवर दाखल आहे. 8. विरूध्द पक्ष क्र. 1 ने याच ट्रॅक्टरला कागदोपत्री 35 एच.पी. दाखवून तक्रारकर्त्याची दिशाभूल केली व किंमतही जास्त घेतली. या बाबी विरूध्द पक्ष क्र. 1 च्या सेवेतील गंभीर त्रुटी ठरतात तसेच विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे सिध्द होते. ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. पासिंग करून देण्याची जबाबदारी कायद्यानुसार (M.V. Act) विरूध्द पक्ष क्र. 1 ची आहे. त्याबद्दल लागणारी रक्कमही विरूध्द पक्ष क्र. 1 ने स्विकारलेली आहे. त्यांना वारंवार विचारणा, विनंत्या करूनही आर.टी.ओ. पासिंग करून दिले नाही ही बाब सुध्दा विरूध्द पक्ष क्र. 1 च्या सेवेतील त्रुटी ठरते. दिनांक 17/10/2010 रोजी यासंबंधाने विरूध्द पक्ष क्र. 1 व तक्रारकर्त्याचा मुलगा यांचे भांडण झाले. त्याचे पर्यवसान तक्रारकर्त्याच्या मुलाने विरूध्द पक्ष क्र. 1 विरूध्द पोलीस केस करण्यात झाले. तक्रारीचे कारण दिनांक 01/09/2010 रोजी जेव्हा ट्रॅक्टर 35 एच.पी. चा नसून 30 एच.पी. चा आहे हे समजले त्या दिवशी घडले. तक्रारकर्त्याची मागणी शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रू. 1,00,000/-, सेवेतील त्रुटी व फसवणूक याबद्दल रू. 2,50,000/-, किमतीतील फरकाचा परतावा याबद्दल रू. 73,290/- अशी आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत एकूण 09 कागदपत्रे दाखल केली आहेत. पुढे तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर सुध्दा दाखल केले आहे. त्यानुसार खरेदीपूर्वी 5 महिने आधीपासून ट्रॅक्टर तक्रारकर्त्याला वापरण्यास दिला होता हे विरूध्द पक्ष क्र. 1 चे म्हणणे तक्रारकर्त्याने अमान्य केले आहे. तांत्रिक बाबी तक्रारकर्त्याला समजत नाहीत. विरूध्द पक्ष क्र. 1 चे हे म्हणणे की, तक्रारकर्त्याने रू. 55,000/- हातउसणे घेतले हे तक्रारकर्त्याला अमान्य आहे. त्यासंबंधी विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेले दस्तऐवज क्रमांक 1, 2, 3 हे खोटे व बनावट आहे असे तक्रारकर्ते प्रतिउत्तरामध्ये म्हणतात. या दस्तावरील सह्या हा वादाचा विषय आहे. 9. आर.टी.ओ. पासिंगची जबाबदारी तक्रारकर्त्याने घेतल्याबद्दलचा दस्त विरूध्द पक्ष क्र. 1 ने दाखल केला आहे. तो दस्त सुध्दा तक्रारकर्ते अमान्य करतात. प्रतिउत्तरामध्ये पुढे तक्रारकर्ते म्हणतात की, उत्पादक म्हणून विरूध्द पक्ष क्र. 2 यांची जबाबदारी आहे म्हणून त्यांना सुध्दा या प्रकरणात जोडले आहे. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ तक्रारकर्त्याने खालील केस लॉ दाखल केले आहेत. 1. 2004 (4) Civil LJ 156 2. 2005 (1) CPR 105 10. विरूध्द पक्ष क्र. 1 चे उत्तर रेकॉर्डवर आहे. त्यांना ट्रॅक्टर खरेदी मान्य आहे. परंतु ही खरेदी व्यावसायिक उद्देश समोर ठेवून केली म्हणून तक्रारकर्ता ग्राहक ठरत नाही तसेच तक्रार मुदतबाह्य आहे आणि सदर प्रकरणात साक्ष पुराव्याची गरज असल्याने हा वाद दिवाणी कोर्टात चालण्यासारखा असल्याने मंचाला याबाबत अधिकारक्षेत्र नाही याप्रमाणे आक्षेप घेतलेला आहे. दिनांक 13/06/2008 रोजीची ट्रॅक्टर विक्री ते मान्य करतात. दिनांक 25/09/2008 च्या कोटेशन मधील किमतीमध्ये आर.टी.ओ. पासिंगच्या रकमेचा उल्लेख नाही असे विरूध्द पक्ष क्र. 1 म्हणतात. ट्रॅक्टर 35 एच.पी. चाच आहे आणि शेती कामासाठी सक्षम आहे. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी आहे असे विरूध्द पक्ष क्र. 1 म्हणतात. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र. 1 कडून रू. 55,000/- हातउसणे घेतले होते. ते परत करावे लागू नये म्हणून खोटी तक्रार दाखल केली आहे. रक्कम घेतल्याबद्दलचा दस्त विरूध्द पक्ष क्र. 1 ने दाखल केला आहे. त्यात आर.टी.ओ. पासिंग स्वतः तक्रारकर्ते करून घेणार होते असा उल्लेख आहे. तक्रारकर्त्याने आर.टी.ओ. पासिंग मुद्दाम करून घेतली नाही आणि ट्रॅक्टर विनापरवाना चालवित आहे. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर ट्रॅक्टरचा विमा काढून दिला आहे त्याची प्रत रेकॉर्डवर आहे. तसेच पासिंग करिता लागणारी संपूर्ण कागदपत्रे तक्रारकर्त्याला दिली आहेत त्याबद्दलचा दस्त रेकॉर्डवर आहे. क्षमतेबाबतची सर्व विधाने विरूध्द पक्ष क्र. 1 अमान्य करतात. महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, नागपूर यांची आयशर 312 ट्रॅक्टरची किंमत रू. 3,80,200/- या ठिकाणी ग्राह्य धरता येणार नाही. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याची फसवणूक केली नाही, त्यांची सेवेतील त्रुटी नाही. तसेच आर.टी.ओ. पासिंग अभावी तक्रारकर्त्याला ट्रॅक्टर वापरता येत नाही हे विरूध्द पक्ष क्र. 1 अमान्य करतात. तक्रारकर्ता ट्रॅक्टरचा नियमित वापर करतो असे ते म्हणतात. तांत्रिक दोष असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला नाही. यासंबंधाने विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी उत्तराच्या परिच्छेद 8, पान क्र. 7 वर विवेचन केले आहे. विरूध्द पक्ष क्र. 1 म्हणतात की, यासंबंधाने तज्ञाची साक्ष आवश्यक आहे. किमतीबाबत विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी प्रचलित दराप्रमाणे निविदा दिली. त्यात अतिरिक्त भार आकारण्यात आला नव्हता. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी एकूण 22 दस्त दाखल केले आहेत व 3 केस लॉ दाखल केले आहेत. विरूध्द पक्ष क्र. 1 यांची मागणी तक्रार खर्चासह (Exemplary cost) खारीज करावी अशी आहे. 11. विरूध्द पक्ष क्र. 2 उत्पादक यांचे उत्तर रेकॉर्डवर आहे. त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतांना सदर तक्रार मंचासमोर चालू शकत नाही असे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टरच्या उत्पादन दोषाबद्दल काहीही म्हटलेले नाही, त्यामुळे विरूध्द पक्ष क्र. 2 ची कोणतीही जबाबदारी नाही. डीलर म्हणजेच विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्या कोणत्याही कृत्याची जबाबदारी विरूध्द पक्ष क्र. 2 वर येत नाही. ग्राहकांशी विरूध्द पक्ष क्र. 2 चा प्रत्यक्ष संबंध येत नाही. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे-8 यांनी सप्टेंबर 2004 मध्ये आयशर 312 या ट्रॅक्टरचा इंजिन पॉवर 23.50 KW असल्याचे नमूद केले आहे. अश्वशक्तीमध्ये तो मोजल्यास 34.9 P.S. येते. (35 P.S. – S.A.E. Range) हे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी व निराधार असल्याने ती खर्चासह खारीज करण्याची विनंती विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी केली आहे. त्यांनी 3 दस्त जोडले आहेत व नंतर दिनांक 28/02/2011 रोजी प्राईस लिस्ट दाखल केली. त्यानुसार किंमत रू. 4,38,990/- असल्याचे नमूद केले आहे. ट्रॅक्टरची किंमत नोव्हेंबर 2008 मध्ये रू. 3,88,290/- इतकी होती त्याबद्दलचा दुसरा एक दस्त रेकॉर्डवरील पान क्र. 157 वर दाखल आहे. 12. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा लेखी युक्तिवाद रेकॉर्डवर दाखल आहे. मंचाने दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रांचे तसेच केस लॉ चे अवलोकन केले. मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणेः- 13. सदर प्रकरणात विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी घेतलेले प्राथमिक आक्षेप जसे व्यावसायिक उद्देश, मुदत, दिवाणी वाद आणि तक्रार चालू शकत नाही (Tenability) इत्यादी हे मंच फेटाळते कारण सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेची प्रकरणे मंचासमोर चालतात. 14. सदर प्रकरणात विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी कमी क्षमतेचा म्हणजेच 35 ऐवजी 30 एच.पी. चा ट्रॅक्टर देऊन व किंमत जास्त घेऊन तक्रारकर्त्याची फसवणूक केली काय हा मुद्दा प्रामुख्याने मंचाच्या विचारार्थ आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवज 1 या बॅंकेला सादर केलेल्या दस्तऐवजामध्ये 35 एच.पी. असे लिहिले आहे. दस्तऐवज 2 हे बिल आहे. यावर 35 एच.पी. नमूद आहे. दस्तऐवज 4 हे कोटेशन असून यावर 35 एच.पी. नमूद आहे. परंतु दस्त 5 नेटवरील माहितीनुसार याच ट्रॅक्टरची एच.पी रेंज 30 दाखविली आहे. तसेच दस्त 6 उत्पादक कंपनीचा दस्त असून यामध्ये 30.5 एच.पी. नमूद आहे. दस्त 8 केंद्रीय कृषि मशीनरी प्रशिक्षण एवम् परिक्षण संस्थान, ट्रॅक्टर नगर, बुधनी, मध्यप्रदेश यांनी आयशर 312 च्या व्यावसायिक परिक्षण रिपोर्टमध्ये याची क्षमता 29.5 एच.पी. एवढी दिली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याला देण्यात आलेला ट्रॅक्टर हा विरूध्द पक्ष यांनी कागदोपत्री जरी 35 एच.पी. चा दर्शविला असला तरी प्रत्यक्षात अधिकृत कागदपत्रान्वये त्याची क्षमता 30 एच.पी. च्या आसपास म्हणजे कमी आहे. ही बाब विरूध्द पक्ष क्र. 1 च्या सेवेतील त्रुटी ठरते असा मंचाचा निष्कर्ष आहे. 15. किमतीबाबतही विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याची दिशाभूल केल्याचे लक्षात येते. दस्त 7 महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांच्यानुसार आयशर 312 ची किंमत रू. 3,81,200/- एवढी दर्शविली आहे. सन 2008 मध्ये याची नक्की किती किंमत होती याबद्दल तक्रारकर्त्याने प्राईस लिस्टची मागणी केली ती रेकॉर्डवर आहे. तक्रारकर्त्याकडून विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी किमतीपोटी रू. 4,38,990/- घेतलेली आहे. तक्रारकर्त्यानुसार किमतीतील फरक रू. 58,790/- आहे. तक्रारकर्त्याने किंमत व क्षमता याबद्दल महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाकडील दस्तांचा हवाला दिला. परंतु हे मंडळ किंमत ठरविणारे सक्षम अधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांनी नमूद केलेल्या किमतीच्या आधारावर तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा विचार करता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. किंमत उत्पादक म्हणजेच विरूध्द पक्ष क्र. 2 ठरवितात. त्यांच्या प्राईस लिस्टनुसार ती किंमत रू. 4,38,990/- नमूद आहे. रेकॉर्डवरील दस्त तपासले असता ही किंमत आयशर 312 ची नसून पी. रेकार्डो सुपर डीआय ची आहे. सबब मंच ती ग्राह्य मानत नाही. विरूध्द पक्ष क्र. 2 च्या दिनांक 08/03/2011 च्या दस्तानुसार किंमत रू. 3,87,951/- (नोव्हेंबर 2008 मध्ये) दर्शविली आहे ती मंच ग्राह्य मानते (रेकॉर्ड पेज 157). फरक रू. 51,039/- एवढा येतो विरूध्द पक्ष क्र. 1 यांचा भर दिनांक 13/06/2008 च्या करारपत्रावर आहे. यानुसार तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष क्र. 1 ने रू. 55,000/- हातउसणे दिले. याच करारपत्रात पुढे ट्रॅक्टर व ट्रॉलीची आर.टी.ओ. पासिंगची जबाबदारी तक्रारकर्त्याची राहील असे नमूद आहे. यावरून आर.टी.ओ. पासिंगची जबाबदारी विरूध्द पक्ष क्र. 1 ची नाही असे ते म्हणतात. 16. मोटार व्हेईकल ऍक्टनुसार कोणतेही वाहन आर.टी.ओ. पासिंग केल्याशिवाय विकता येत नाही. त्यामुळे उपरोक्त करार व पावती दस्त 2 व 3 हे कायद्यातील तरतुदीला छेद देणारे असल्याने कायदेशीर ठरत नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. वाहन आर.टी.ओ. पासिंग न करता विकणे गैरकायदेशीर आहे हीच बाब विरूध्द पक्ष क्र. 1 च्या सेवेतील त्रुटी ठरते असा देखील मंचाचा निष्कर्ष आहे. ट्रॅक्टरच्या क्षमतेबद्दल विरूध्द पक्ष क्र. 1 ने SAE Standard संबंधी तांत्रिक स्वरूपाचा विवेचनात्मक दस्त 8 दाखल केला आहे. तो तज्ञाच्या मदतीशिवाय समजू शकत नाही. विरूध्द पक्ष क्र. 2 आपल्या उत्तरात (पान क्र. 2) म्हणतात की, आयशर 312 ट्रॅक्टरला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन यांनी प्रमाणित केल्यानुसार इंजिन पॉवर 23.50 K.W. म्हणजेच 34.9 H.P. आहे. हा दस्त तपासला असता PTO Power 21.70 K.W. दाखविली आहे (डॉक्युमेंट 1 रेकॉर्ड पेज 107) यावरून क्षमतेबद्दल शंका येते. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी दाखल केलेल्या दस्त 11 व 17 रेकॉर्ड पेज 78 व 88 नुसार आयशर 312 ट्रॅक्टरची क्षमता 30.5 एवढीच दर्शविली आहे. मंच ते ग्राह्य मानते. युक्तिवादाच्या दरम्यान तक्रारकर्त्याच्या वकिलांनी केजव्हील कल्टीवेटरच्या किमतीचा परतावा याबद्दल ते आग्रह धरत नाही असे सांगितले. यासंबंधाने मंचाला तक्रारीत pleading आढळले नाही. तसेच युक्तिवादाच्या दरम्यान तक्रारकर्त्याच्या वकिलांनी विरूध्द पक्ष क्र. 1 व तक्रारकर्ता यांच्या रू. 55,000/- हातउसणे घेण्याच्या दस्तावरील सह्या तक्रारकर्त्याच्या आहेत किंवा नाहीत हे ते नक्की सांगू शकत नाही म्हणून त्यावर finding दिले नाही तरी चालेल असे सांगितले. उपरोक्त विवेचनावरून या मंचासमोर ट्रॅक्टरची क्षमता व किंमत या दोन्ही संबंधाने तक्रारकर्त्याची फसवणूक झाली आहे असा निष्कर्ष मंच नोंदविते. सबब आदेश. आदेश तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. विरुद्ध पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याला किमतीतील फरकाची रक्कम रू. 51,039/- द्यावी. (पहा आदेश पॅरा. 15). 2. तक्रारकर्त्याला या प्रकरणाचा शारीरिक व मानसिक त्रास झाला त्याबद्दल विरुद्ध पक्ष क्र. 1 यांनी रू. 5,000/- इतकी नुकसानभरपाई तक्रारकर्त्याला द्यावी. 3. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याला ट्रॅक्टरची आर.टी.ओ. पासिंग स्वखर्चाने करून द्यावी. 4. सदर तक्रारीचा खर्च म्हणून विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याला रु. 2,000/- द्यावेत. 5. विरूध्द पक्ष क्र. 2 यांच्या सेवेत त्रुटी नसल्याने त्यांच्याविरूध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 6. विरुद्ध पक्ष क्र. 1 यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत करावे.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |