सौ.मंजुश्री खनके, सदस्या यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 04/07/2014)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा आहे की, वि.प. बांधकाम करणारे व जमिनीचा विकास करुन प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे आहेत. तक्रारकर्त्याने वि.प.च्या मौजा कोलार, प.ह.क्र.75, ख.क्र.237, प्लॉट क्र. 50, एकूण क्षेत्रफळ 1615 चौ.फु. हे दोन प्लॉट्स रु.96,900/- मध्ये खरेदी करण्याकरीता दि.06.06.2008 रोजी करारनामा केला. बयानादाखल रु.22,500/- तक्रारकर्त्याने वि.प.ला दिले व उर्वरित रक्कम रु.3,100/- हप्त्याप्रमाणे देण्याचे उभय पक्षात ठरले. त्यानुसार रक्कम तक्रारकर्त्याने वि.प.ला दिली. तक्रारकर्त्याने नियोजित कालावधीत रक्कम दिलेली असतांना व विक्रीच्या वेळी द्यावयाची रक्कम अदा करावयास तयार असतांनाही वि.प. तक्रारकर्त्याला त्याचे वारंवार मागणी करुनही संबंधित प्लॉट्सचे विक्रीपत्र करुन देत नव्हता. म्हणून तक्रारकर्त्याने मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन दोन्ही प्लॉट्सचे विक्रीपत्र करुन द्यावे किंवा वि.प. त्याकरीता असमर्थ असतील तर अदा केलेली संपूर्ण रक्कम व्याजासह परत करावी, त्रुटीपूर्ण सेवेकरीता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केल्या.
2. तक्रारकर्त्याची तक्रार मंचासमोर दाखल झाल्यानंतर वि.प.ला नोटीस बजावण्यात आली. वि.प.क्र. 1 व 2 ला नोटीस मिळाल्याची पोच अभिलेखावर दाखल असल्याने नोटीसची बजावणी होऊनही वि.प.क्र. 1 व 2 गैरहजर असल्याने मंचाने प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला व प्रकरण युक्तीवादाकरीता नेमण्यात आले. तक्रारकर्त्याचा युक्तीवाद मंचाने ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे व शपथपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ काढण्यात आलेले मुद्दे व निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.क्र.1 व 2 ने अनुचित व्यापारी प्रथेचा व सेवेचा
अवलंब केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता प्रार्थनेप्रमाणे दाद मागण्यास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
-कारणमिमांसा-
3. मुद्दा क्र. 1 नुसार – वि.प. हे बिल्डर्स असून त्यांचा डेव्हलपर्सचा व्यवसाय असल्याने तक्रारकर्तीने त्यांचेकडून प्लॉट घेण्याचे ठरविले व करारनाम्यानुसार ठरलेल्या रकमेचा भरणा वेळोवेळी केला. बयाना पत्रानुसार बयानादाखल एकूण रु.22,500/- दिल्याचे बयानापत्रावरुन निदर्शनास येते. बयानापत्राप्रमाणे उर्वरित रक्कम प्रत्यक्ष विक्रीपत्र करतांना देण्याचे ठरलेले होते. तक्रारकर्त्याने तक्रारीत किंमतीबाबत संपूर्ण रक्कम वि.प.ला अदा केल्याचे नमूद केले आहे, त्यामुळे प्रत्यक्ष तक्रारकर्त्याने एकूण किती रक्कम वि.प.ला अदा केली याबाबी स्पष्ट होण्याकरीता मंचाने बयानापत्र व दाखल पावत्यांचे प्रतीचे अवलोकन केले असता, बयानापत्राप्रमाणे व हप्त्याच्या दाखल पावत्यांच्या प्रतींवरुन एकूण रक्कम रु.93,800/- भरल्याचे मंचाचे निदर्शनास येते. परंतू तक्रारकर्त्याने विक्रीपत्र करुन देण्याची विचारणा केली असता वि.प.ने नंतर करुन देऊ असे सांगून टाळाटाळ केली. म्हणून तक्रारकर्त्याने पत्र पाठविले व त्यात विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केली. परंतू आजपर्यंत वि.प.ने तक्रारकर्त्यास विक्रीपत्र करुन दिलेले नाही. यावरुन वि.प.ने तक्रारकर्त्याकडून जवळपास किंमतीबाबत जास्तीत जास्त रक्कम घेऊन विक्रीपत्र करुन न देणे म्हणजेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला असून वारंवार विनंती करुनही विक्रीपत्र करुन देण्यास टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी केलेली आहे, म्हणून तक्रारकर्ता हा मुद्दा क्र. 1 नुसार प्रार्थनेतील मागणीप्रमाणे प्लॉटचे विक्रीपत्र करुन मागण्यास किंवा ते शक्य नसल्यास वि.प.ला दिलेली रक्कम व्याजासह परत मागण्यास पात्र आहे.
4. तक्रारकर्त्याने सदर प्रकरणी प्लॉटचे विक्रीपत्र करुन मिळण्याचे किंवा आजच्या बाजारभावाप्रमाणे विवादित प्लॉटची किंमत मिळावी अशी मागणी केली आहे. परंतू तक्रारकर्त्याने तक्रारीत प्लॉटच्या किंमतीबाबत उभय पक्षात ठरलेली संपूर्ण रक्कम दिल्याचे जरी नमूद केले असले तरी ते सिध्द करण्याकरीता कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. मंचासमोर उपलब्ध कागदपत्रांप्रमाणे तक्रारकर्त्याने वि.प.ला रु.78,300/- दिल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत मिळण्याकरीता पात्र नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. एकतर तक्रारकर्त्याने उर्वरित रक्कम भरुन विक्रीपत्र करुन घेऊ शकतो अथवा भरलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यास पात्र असू शकतो.
उपरोक्त निष्कर्षावरुन व सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.ला आदेश देण्यात येतो की, त्याने मंचाचे आदेशानुसार तक्रारकर्त्याकडून उर्वरित रक्कम घेऊन विवादित प्लॉटचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याला करुन द्यावे.
किंवा
वि.प. जर प्लॉटचे विक्रीपत्र करुन देण्यास असमर्थ असतील तर तक्रारकर्त्याने वि.प.कडे भरलेली रक्कम रु.93,800/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने दि.22.07.2010 पासून प्रत्यक्ष अदाएगीच्या दिनांकापर्यंत द्यावी.
3) वि.प.ने तक्रारकर्त्यास मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाईदाखल रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
4) वि.प.क्र. 1 व 2 ने सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावी.