-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
( पारित दिनांक-10 ऑगस्ट, 2016)
01. नमुद दोन्ही तक्रारदारांनी मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केलेल्या तक्रारी हया जरी वेगवेगळया दाखल केलेल्या असल्या तरी दोन्ही तक्रारींमधील विरुध्दपक्ष हे एकच आहेत आणि तपशिलाचा थोडाफार भाग वगळता ज्या कायदे विषयक तरतुदींचे आधारे हया तक्रारी निकाली निघणार आहेत, त्या कायदे विषयक तरतुदी सुध्दा दोन्ही तक्रारींमध्ये एक सारख्याच आहेत आणि म्हणून आम्ही दोन्ही तक्रारीं मध्ये एकत्रितरित्या निकाल पारीत करीत आहोत.
02. दोन्ही तक्रारीं मधील मजकूर थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) ही एक बांधकाम करणारी कंपनी असून, विरुध्दपक्ष क्रं-2) आणि क्रं-3) हे त्या कंपनीचे भागीदार आहेत व सक्रीय संचालक आहेत आणि कंपनीच्या प्रत्येक कृतीसाठी ते सारखेच जबाबदार आहेत. विरुध्दपक्षाचे मौजा मकरधोकडा, तहसिल उमरेड, नागपूर ग्रामीण येथे ले-आऊट टाकलेले आहे. दोन्ही तक्रारदारांनी विरुध्दपक्षाचे सदर ले आऊट मधील भूखंड खरेदी करण्याचे करार खालील प्रमाणे केलेत-
ग्राहक तक्रार क्रं-CC/15/288 मधील तक्रारकर्ता खुशाल पिता बालगोविंद दिघोरीकर याने विरुध्दपक्षाशी मौजा मकरधोकडा, तहसिल उमरेड, नागपूर ग्रामीण, खसरा क्रं-62 या प्रस्तावित लेटाऊट मधील भूखंड क्रं-86, एकूण क्षेत्रफळ 2996.26 चौरसफूट एकूण किंमत रुपये-1,49,813/- मध्ये खरेदी करण्याचा करार दिनांक-19/05/2008 रोजी केला. सदर करारनाम्यावर विरुध्दपक्ष क्रं-1) भागीदारी फर्म तर्फे तिचे भागीदार विरुध्दपक्ष क्रं-2) आणि विरुध्दपक्ष क्रं-3) यांच्या स्वाक्ष-या आहेत.
तर ग्राहक तक्रार क्रं-CC/15/289 मधील तक्रारकर्ती श्रीमती संध्या अविनाश सावरकर हिने विरुध्दपक्षाशी मौजा मकरधोकडा, तहसिल उमरेड, नागपूर ग्रामीण, खसरा क्रं-62 या प्रस्तावित लेटाऊट मधील भूखंड क्रं-01, एकूण क्षेत्रफळ 2166.03 चौरसफूट एकूण किंमत रुपये-1,08,301/- मध्ये खरेदी करण्याचा करार दिनांक-21/05/2008 रोजी केला. सदर करारनाम्यावर विरुध्दपक्ष क्रं-1) भागीदारी फर्म तर्फे तिचे भागीदार विरुध्दपक्ष क्रं-2) आणि विरुध्दपक्ष क्रं-3) यांच्या स्वाक्ष-या आहेत.
उभय तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, भूखंड कराराचे वेळी विरुध्दपक्षां तर्फे असे सांगण्यात आले की, त्यांनी संपूर्ण शेतजमीनीचे संदर्भात विविध सरकारी कार्यालया कडून ना-हरकत-प्रमाणपत्रे प्राप्त केलीत.
ग्राहक तक्रार क्रं-CC/15/288 मधील तक्रारकर्ता खुशाल पिता बालगोविंद दिघोरीकर याने करारातील भूखंडापोटी दिनांक-19/05/2008 ते 26/10/2010 या कालावधीत करारा प्रमाणे भूखंडाची संपूर्ण रक्कम विरुध्दपक्ष भागीदारी फर्म मध्ये जमा केली व विरुध्दपक्ष फर्म कडून पावत्या प्राप्त केल्यात.
तर ग्राहक तक्रार क्रं-CC/15/289 मधील तक्रारकर्ती श्रीमती संध्या अविनाश सावरकर हिने करारातील भूखंडापोटी दिनांक-21/05/2008 ते 19/07/2010 या कालावधीत करारा प्रमाणे भूखंडाची संपूर्ण रक्कम विरुध्दपक्ष भागीदारी फर्म मध्ये जमा केली व विरुध्दपक्ष फर्म कडून पावत्या प्राप्त केल्यात.
उभय तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, त्यांनी रकमा भरल्या नंतर वेळोवेळी विरुध्दपक्षांच्या भेटी घेऊन भूखंडाचे विक्रीपत्र/ताबा व मोजमाप करुन देण्याची मागणी केली असता त्यांनी ले-आऊट अकृषक आणि नगररचनाकार यांची ले-आऊट नकाशास मंजूरी करता काही तांत्रिक अडचण आलेली आहे व त्यांचे कडून मंजूरी प्राप्त होताच भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देण्यात येईल असे सांगितले. विरुध्दपक्षांचे या आश्वासनांवर तक्रारदार वाट बघत बसले. विरुध्दपक्षांचा ले-आऊट मधील जमीनी संबधाने स्पष्ट मालकी हक्क दिसून येत नाही, यावरुन विरुध्दपक्षांनी तक्रारदारांची फसवणूक केल्याची बाब स्पष्ट होते. म्हणून दोन्ही तक्रारदारांनी
विरुध्दपक्षांना दिनांक-23/07/2015 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची मागणी केली परंतु नोटीस मिळूनही विरुध्दपक्षांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही वा उत्तरही दिले नाही. म्हणून शेवटी त्यांनी प्रस्तुत तक्रारी मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रकारच्या मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी, दोन्ही तक्रारदारांना त्यांच्या त्यांच्या भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून, भूखंडाचे मोजमाप व ताबा देण्याचे आदेशित व्हावे.
(2) विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी, उभय तक्रारदार यांना भूखंडाच्या संपूर्ण रकमा अनुक्रमे रुपये-1,49,813/- आणि रुपये-1,08,301/- आणि सदर रकमांवर अनुक्रमे दिनांक-19/05/2008 आणि दिनांक-21/05/2008 पासून 24% दराने व्याज देण्याचे आदेशित व्हावे.
(3) विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांना उभय तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-1,00,000/- तसेच नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी रुपये-1,00,000/-, तक्रारखर्च म्हणून प्रत्येकी रुपये-10,000/- आणि नोटीस खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-3000/- देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांना मंचाचे मार्फतीने तक्रारनिहाय रजिस्टर पोस्टाने नोटीसेस पाठविण्यात आल्यात. तक्रारदारांचे वकीलांनी विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांना स्वतंत्ररित्या मेसर्स वैभवलक्ष्मी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, कार्यालय पत्ता-208, सत्सम अपार्टमेंट, दुसरा माळा, वर्धा रोड, नागपूर या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविल्या बाबत रजिस्टर पोस्टाच्या 03 पावत्यांच्या प्रती तक्रारनिहाय अभिलेखावर दाखल केल्यात. तसेच पोस्ट विभागाचे विरुध्दपक्षाचे नोटीस संबधाने तक्रारनिहाय पोस्टाच्या “Truck Report” च्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये विरुध्दपक्षास दिनांक-14/12/2015 रोजी “Article Delivered” शेरे नमुद आहेत. यावरुन विरुध्दपक्षांना मंचाच्या नोटीस तामील झाल्याची बाब सिध्द होते परंतु अशा नोटीस तामील होऊनही विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) तर्फे कोणीही मंचा समक्ष उपस्थित झाले नाही म्हणून दोन्ही तक्रारीं मध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांच्या विरुध्द तक्रारी एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक-16 फेब्रुवारी, 2016 रोजी पारीत केला.
04. दोन्ही तक्रारदारांनी तक्रारी प्रतिज्ञालेखावर दाखल केल्यात. सोबत तक्रारनिहाय नि.क्रं-3) वरील दस्तऐवजाचे यादी प्रमाणे भूखंड विक्री करारनाम्याच्या प्रती, विरुध्दपक्ष फर्म मध्ये भूखंडापोटी रकमा भरल्या बाबत पावत्यांच्या प्रती, ले-आऊट नकाशा, विरुध्दपक्षांना पाठविलेल्या कायदेशीर नोटीसच्या प्रती, नोटीस मिळाल्या बाबत पोस्टाच्या पोच प्रती अशा दस्तऐवजांच्या प्रतींचा समावेश आहे. दोन्ही तक्रारदारांनी तक्रारनिहाय लेखी युक्तीवाद दाखल केलेत.
05. दोन्ही तक्रारीं मध्ये तक्रारदारां तर्फे वकील श्री सी.डी.बोकडे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकला. विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांचे विरुध्द एकतर्फी आदेश पारीत झालेला आहे. तक्रारदारां तर्फे दाखल लेखी युक्तीवाद आणि दस्तऐवजांचे अवलोकन केले व त्यानुसार मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06 ग्राहक तक्रार क्रं-CC/15/288 मधील तक्रारकर्ता खुशाल दिघोरीकर आणि ग्राहक तक्रार क्रं-CC/15/289 मधील तक्रारकर्ती श्रीमती संध्या अविनाश सावरकर यांनी विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांचे सोबत मौजा मकरधोकडा, तहसिल उमरेड, नागपूर ग्रामीण, खसरा क्रं-62 या प्रस्तावित लेटाऊट मधील अनुक्रमे भूखंड क्रं-86, एकूण क्षेत्रफळ 2996.26 चौरसफूट एकूण किंमत रुपये-1,49,813/- आणि भूखंड क्रं-01 एकूण क्षेत्रफळ 2166.03 चौरसफूट एकूण किंमत रुपये-1,08,301/- मध्ये खरेदी करण्याचे करार अनुक्रमे दिनांक-19/05/2008 आणि दिनांक-21/05/2008 रोजी केल्याचे दाखल करारनाम्याच्या प्रतीवरुन सिध्द होते. सदर करारनाम्यांवर विरुध्दपक्ष क्रं-1) भागीदारी फर्म तर्फे तिचे भागीदार विरुध्दपक्ष क्रं-2) आणि विरुध्दपक्ष क्रं-3) यांच्या स्वाक्ष-या आहेत. विरुध्दपक्ष क्रं-1) ही भागीदारी फर्म असून तिचे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-2) आणि क्रं-3) यांनी भूखंड विक्रीचे करारनाम्यावर स्वाक्ष-या केलेल्या असल्यामुळे भागीदारी फर्म आणि तिचे तर्फे तिचे भागीदार म्हणून विरुध्दपक्ष क्रं-2) आणि क्रं-3) यांनी फर्मचे वतीने केलेल्या करारासाठी सर्व विरुध्दपक्ष हे सारखेच जबाबदार आहेत.
07. दोन्ही तक्रारदारांच्या तक्रारी या प्रतिज्ञालेखांवर दाखल आहेत. दोन्ही तक्रारदारांनी आप-आपल्या तक्रारीत नमुद केले की, भूखंड कराराचे वेळी विरुध्दपक्षां तर्फे असे सांगण्यात आले की, त्यांनी संपूर्ण शेतजमीनीचे संदर्भात विविध सरकारी कार्यालया कडून ना-हरकत-प्रमाणपत्रे प्राप्त केलीत, यावर त्यांनी विश्वास ठेऊन भूखंडाचे करारनामे केलेत व करारनाम्या नंतर दोन्ही तक्रारदारांनी भूखंडाच्या मासिक किस्ती पोटीच्या रकमा या विरुध्दपक्ष फर्म मध्ये जमा केल्यात व पावत्या प्राप्त केल्यात. त्यांनी रकमा भरल्या नंतर वेळोवेळी विरुध्दपक्षांच्या भेटी घेऊन भूखंडाचे विक्रीपत्र/ताबा व मोजमाप करुन देण्याची मागणी केली असता त्यांनी ले-आऊट अकृषक आणि नगररचनाकार यांची ले-आऊट नकाशास मंजूरी करता काही तांत्रिक अडचण आलेली आहे व त्यांचे कडून मंजूरी प्राप्त होताच भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देण्यात येईल असे सांगितले. विरुध्दपक्षांचे या आश्वासनांवर तक्रारदार वाट बघत बसले. तसेच तक्रारदारांचा असाही आरोप आहे की, विरुध्दपक्षांचा ले-आऊट मधील जमीनी संबधाने स्पष्ट मालकी हक्क दिसून येत नाही,
08. उभय तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीतील आरोपाचे अनुषंगाने विरुध्दपक्षांना मंचा समक्ष आपली बाजू मांडण्यासाठी रजिस्टर पोस्टाने तक्रारनिहाय नोटीस पाठविण्यात आली. विरुध्दपक्षांना मंचा तर्फे पाठविलेल्या नोटीस दिनांक-14/12/2015 रोजी मिळाल्या बाबत (“Article Delivered”) तक्रारदारांनी पोस्टाच्या ट्रॅकींग रिपोर्टच्या प्रती अभिलेखावर दाखल केल्यात. यावरुन विरुध्दपक्षांना मंचाच्या नोटीस तामील झाल्याची बाब सिध्द होते परंतु अशा नोटीस तामील होऊनही विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) तर्फे कोणीही मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी उत्तरही सादर केले नाही म्हणून दोन्ही तक्रारीं मध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांच्या विरुध्द तक्रारी एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक-16 फेब्रुवारी, 2016 रोजी पारीत केला. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांना मंचा तर्फे त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देऊनही ते मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी आपली बाजू मांडलेली नाही वा दोन्ही तक्रारदारांनी तक्रारीत केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. दोन्ही तक्रारदारांच्या तक्रारी या प्रतिज्ञालेखावर दाखल असल्यामुळे त्यांचे म्हणणे मान्य करण्या शिवाय पर्याय नाही.
09. दोन्ही तक्रारदारांचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी वकीलांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांना दिनांक-23/07/2015 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची मागणी केली परंतु नोटीस मिळूनही विरुध्दपक्षांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही वा उत्तरही दिले नाही. आपले या म्हणण्याच्या पुष्टयर्थ त्यांनी कायदेशीर नोटीसची प्रत तसेच नोटीस मिळाल्या बाबत पोस्टाच्या पोच प्रती पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत.
10. ग्राहक तक्रार क्रं-CC/15/288 मधील तक्रारकर्ता खुशाल पिता बालगोविंद दिघोरीकर याने करारातील भूखंडापोटी दिनांक-19/05/2008 ते 26/10/2010 या कालावधीत एकूण रक्कम रुपये-1,42,980/- विरुध्दपक्ष भागीदारी फर्म मध्ये जमा केल्या बाबत विरुध्दपक्ष फर्म कडून प्राप्त पावत्यांच्या प्रती पुराव्या दाखल सादर केल्यात. भूखंडाची एकूण किंमत रुपये-1,49,813/- असून त्यापैकी तक्रारकर्त्याने रुपये-1,42,980/- रक्कम जमा केल्याच्या पावत्यांच्या प्रती पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केलेल्या असल्याने तक्रारकर्त्याला अद्दापही भूखंडापोटी रुपये-6833/- एवढी रक्कम विरुध्दपक्षाला देणे आहे.
11. तर ग्राहक तक्रार क्रं-CC/15/289 मधील तक्रारकर्ती श्रीमती संध्या अविनाश सावरकर हिने करारातील भूखंडापोटी दिनांक-19/05/2008 ते 19/07/2010 या कालावधीत एकूण रक्कम रुपये-1,08,300/- विरुध्दपक्ष भागीदारी फर्म मध्ये जमा जमा केल्या बाबत विरुध्दपक्ष फर्म कडून प्राप्त पावत्यांच्या प्रती पुराव्या दाखल सादर केल्यात. भूखंडाची एकूण किंमत करारा प्रमाणे रुपये-1,08,301/- एवढी असल्याने तक्रारकर्तीने भूखंडाची संपूर्ण किंमत अदा केल्याची बाब उपलब्ध पावत्यांच्या प्रतीं वरुन सिध्द होते.
12. अशाप्रकारे दोन्ही तक्रारदारांनी वेळोवेळी करारातील भूखंडापोटी संपूर्ण रक्कम विरुध्दपक्ष फर्म मध्ये जमा केल्याची बाब पुराव्या दाखल विरुध्दपक्ष फर्म तर्फे निर्गमित पावत्यांच्या प्रतींवरुन सिध्द होते. परंतु विरुध्दपक्षा तर्फे भूखंडाच्या मोबदल्या पोटी रकमा प्राप्त होऊनही दोन्ही तक्रारदारांना करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र आज पर्यंत नोंदवून न दिल्याने दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब सिध्द होते. सद्द परिस्थितीत ले-आऊट शासना कडून मंजूर झाले किंवा नाही ही बाब विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांचे अनुपस्थितीमुळे मंचा
समोर आलेली नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी करारातील भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्यांचे नावे नोंदवून द्दावे तसेच करारा नुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्काचे रकमेचा भरणा दोन्ही तक्रारदारांनी सहन करावा तसेच भूखंडाचे विकास शुल्काचे रकमेचा भरणा दोन्ही तक्रारदारांनी करावा. विरुध्दपक्षानीं करारातील परिच्छेद क्रं-3) मध्ये मान्य केल्या नुसार खरेदीच्या दिनांका पर्यंत ज्या जमीनीवरील सर्व कराचे रकमेचा भरणा करावा. काही तांत्रिक अडचणींमुळे विरुध्दपक्षाचे वादातीत ले-आऊटला मंजूरी मिळणे शक्य नसल्यास त्या परिस्थितीमध्ये उभय तक्रारदारांनी भूखंडाच्या पोटी भरलेल्या एकूण रकमा शेवटचा हप्ता जमा केल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.18% दराने व्याजासह त्या-त्या तक्रारदारांना परत कराव्यात. तसेच दोन्ही तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-20,000/- आणि तक्रारीचे खर्चा बद्दल प्रत्येकी रुपये-5000/- विरुध्दपक्षांनी अदा करावेत.
13. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही दोन्ही तक्रारींमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(01) ग्राहक तक्रार क्रं-CC/15/288 आणि क्रं- CC/15/289 मधील तक्रारदारांची विरुध्दपक्ष क्रं-1) भागीदारी फर्म व फर्म तर्फे भागीदार विरुध्दपक्ष क्रं-2) व विरुध्दपक्ष क्रं-3) यांचे विरुध्दच्या तक्रारी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येतात.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी ग्राहक तक्रार क्रं- CC/15/288 मधील तक्रारकर्ता श्री खुशाल दिघोरिकर याला दिनांक-19/05/2008 रोजीच्या भूखंड विक्रीच्या करारा प्रमाणे मौजा मकरधोकडा, तहसिल उमरेड, नागपूर ग्रामीण, खसरा क्रं-62 या लेटाऊट मधील भूखंड क्रं-86, एकूण क्षेत्रफळ 2996.26 चौरसफूट या भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र एकूण भूखंडाची किंमत रुपये-1,49,813/- पैकी त्याने जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,42,980/- वजा जाता उर्वरीत राहिलेली रक्कम रुपये-6833/-(अक्षरी उर्वरीत रक्कम रुपये सहा हजार आठशे तेहतीस फक्त) त्याचे कडून स्विकारुन, नोंदवून द्दावे. करारा नुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्काचे रकमेचा भरणा तसेच भूखंडाचे विकास शुल्काचे रकमेचा भरणा तक्रारकर्त्याने सहन करावा तसेच विरुध्दपक्षांनी भूखंडाचे मोजमाप करुन ताबा व ताबापत्र तक्रारकर्त्यास द्दावे.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी ग्राहक तक्रार क्रं- CC/15/289 मधील तक्रारकर्ती श्रीमती संध्या अविनाश सावरकर हिला दिनांक-21/05/2008 रोजीच्या भूखंड विक्रीच्या करारा प्रमाणे मौजा मकरधोकडा, तहसिल उमरेड, नागपूर ग्रामीण, खसरा क्रं-62 या लेटाऊट मधील भूखंड क्रं-01 एकूण क्षेत्रफळ 2166.03 चौरसफूट या भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र तिचे कडून करारा प्रमाणे भूखंडाची संपूर्ण किंमत रुपये-1,08,300/- विरुध्दपक्षानां प्राप्त झालेली असल्याने नोंदवून द्दावे. करारा नुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्काचे रकमेचा भरणा तसेच भूखंडाचे विकास शुल्काचे रकमेचा भरणा तक्रारकर्तीने सहन करावा तसेच विरुध्दपक्षांनी भूखंडाचे मोजमाप करुन ताबा व ताबापत्र तक्रारकर्तीस द्दावे.
(04) विरुध्दपक्षाचे ले-आऊटला काही तांत्रिक कारणास्तव शासना कडून मंजुरी मिळणे शक्य नसल्यास अशापरिस्थितीत ग्राहक तक्रार क्रं- CC/15/288 मधील तक्रारकर्ता श्री खुशाल दिघोरिकर याने भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,42,980/-(अक्षरी रुपये एक लक्ष बेचाळीस हजार नऊशे ऐंशी फक्त) शेवटचा हप्ता जमा केल्याचा दिनांक-26/10/2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.18% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी तक्रारकर्त्यास परत करावी.
(05) विरुध्दपक्षाचे ले-आऊटला काही तांत्रिक कारणास्तव शासना कडून मंजुरी मिळणे शक्य नसल्यास अशापरिस्थितीत ग्राहक तक्रार क्रं- CC/15/289 मधील तक्रारकर्ती श्रीमती संध्या अविनाश सावरकर हिने करारातील भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,08,300/-(अक्षरी रुपये एक लक्ष आठ हजार तीनशे फक्त) शेवटचा हप्ता जमा केल्याचा दिनांक-19/07/2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.18% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी तक्रारकर्तीस परत करावी.
(06) दोन्ही तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-20,000/- (अक्षरी प्रत्येकी रुपये विस हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल प्रत्येकी रुपये-5000/-(अक्षरी प्रत्येकी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्षांनी अदा करावेत.
(07) सदर निकालपत्रातील आदेशाचे अनुपाल विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(08) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.
(09) दोन्ही तक्रारीं मध्ये एकत्रितरित्या निकाल पारीत करण्यात आला असल्याने निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार क्रं-CC/15/288 मध्ये लावण्यात यावी व निकालपत्राची प्रमाणित प्रत ग्राहक तक्रार क्रं-CC/15/289 मध्ये लावण्यात यावी.