आदेश पारीत व्दाराः श्री. अविनाश वि. प्रभुणे, मा. सदस्य.
सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये विरुद्ध पक्ष यांनी दोषयुक्त वस्तु दिल्यामुळे विरुध्द पक्षांच्या सेवेतील त्रुटिबाबत दाखल केलेली आहे. सदर तक्रारीतील तक्रारकर्त्याचे तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे.
- तक्रारकर्त्याचे कथनानुसार तो वरील नमुद पत्त्यावरील रहीवासी असुन विरुध्द पक्ष हा इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचा विक्रेता आहे. तक्रारकर्त्याने Dell Laptop Model No. 3532 Sr.-B3K3532 B50377406 रु.36,800/- ला दि.31.07.2016 रोजी विकत घेतला व त्याकरीता रु.5,000/- अग्रिम रक्कम दिली. त्यात बिघाड असल्याने दि.01.08.2016 रोजी Dell Laptop परत करुन HP Laptop Model No.15ac120TX Sr.-CND552573C N8M23PAAACJ बदलवुन दिला. तक्रारकर्त्याने रु.5,000/- जमा केले असल्यामुळे उर्वरीत रकमेकरीता बजाज फायनान्स यांचेकडून रु.33,752/- 0% व्याजासह कर्ज घेतले. सदर कर्ज तक्रारकर्ता रु.2,463/- च्या 14 हप्त्यांत परत करणार होता. तक्रारकर्त्याने आजपर्यंत रु.27,167/- 9 हप्त्यांत विरुध्द पक्षास दिले. तक्रारकर्त्यास विरुध्द पक्षाने दिलेल्या HP Laptop मध्ये देखिल बिघाड होता व Window10 ही ऑपरेटींग सिस्टम बनावट होती. तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करुन देखिल विरुध्द पक्षाने HP Laptop दुरुस्त करुन दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने उर्वरीत रक्कम दिली नाही. त्यानंतर दि.27.01.2017 च्या पत्राव्दारे विरुध्द पक्षास HP Laptop नादुरुस्त असल्याचे कळविले. तसेच दि.09.03.2017 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवुन नादुरुस्त HP Laptop बदलवुन देण्याची विनंती केली पण विरुध्द पक्षाने काहीही कारवाई न केल्यामुळे विरुध्द पक्षांनी HP Laptop बदलवुन देण्याचा आदेश व्हावा व नुकसान भरपाई रु.25,000/- 18% व्याजासह देण्याची मागणी केली. तसेच पर्यायी मागणीनुसार तक्रारकर्त्याने जमा केलेली रक्कम रु.27,143/- 10% व्याजासह परत करण्याची मागणी केली. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थीक मनस्तापापोटी रु.50,000/- व तक्रारीचे खर्चाबाबत रु.20,000/- ची मागणी केलेली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत HP Laptop चे बिल, अग्रिम रक्कम रु.5,000/- दिल्याची पावती, बजाज फायनान्स कंपनीचे खाते विवरण, बॅंकेचे खाते विवरण व वकीलामार्फत पाठविला कायदेशिर नोटीस इत्यादी दस्तावेज दाखल केलेले आहेत.
- मंचातर्फे विरुध्द पक्षांना नोटीस बजावण्यात आला असता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची त्रार खोटी व बेकायदेशिर असल्याचे नमुद करुन आवश्यक पक्ष न जोडल्यामुळे सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे. विरुध्द पक्षाने इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या विक्रीचा व्यवसायात असल्याचे मान्य केले आहे परंतु त्यांचेव्दारा विक्री केलेल्या वस्तुंत जर काही बिघाड असल्यास किंवा दोष असल्यास सदर वस्तु ही सर्व्हीस सेंटरला पाठविणे आवश्यक असल्याचे निवेदन दिले. विरुध्द पक्ष कुठलीही सेवा देण्याचे व्यवसायात नसल्याने प्रस्तुत प्रकरणी तक्रारकर्त्याने HP सर्व्हीस सेंटरशी संपर्क साधुन त्यांचेकडे Laptop जमा करणे आवश्यक होते. पण तक्रारकर्त्याने HP कंपनीस प्रतिपक्ष म्हणून तक्रारीत जोडले नाही व प्रस्तुत बिघाडाशी विरुध्द पक्षांचा काहीही संबंध नसल्याने तक्रार खारीज करण्याची मागणी केली.
- विरुध्द पक्षाने परिच्छेद निहाय उत्तर देतांना तक्रारकर्त्याने HP Laptop विकत घेतल्याची बाब मान्य केली पण सदर Laptop खरेदी करतांना तक्रारकर्त्याने कोठलीही रक्कम दिली नसल्याचे नमुद केले. तसेच Laptop चे बिघाडाशी आणि त्याचे दुरुस्तीशी विरुध्द पक्षांचा कुठलाही संबंध नसल्याचे आग्रही निवेदन दिले. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी व बनावटी असुन तक्रारकर्त्याची विनंती Dell कंपनी ऐवजी HP कंपनीचा Laptop बदलवुन देण्यांत आला. तक्रारकर्त्याने पुर्वी Sansui LED TV बजाज फायनान्स कडून कर्ज घेऊन विकत घेतला होता आणि संबंधीचा झालेला व्यवहार तक्रारकर्त्याने HP Laptop वरील व्यवहार दर्शवुन मंचाची फसवणूक करीत असल्याचे निवेदन दिले. विरुध्द पक्ष सॉफ्टवअर विक्रीच्या व्यवसायात नसल्याने तक्रारकर्त्याचे Laptop मधील Windows-10 Operating System Install करुन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच Laptop विकत घेतांना Microsoft Windows चा कायदेशिर सॉफ्टवेअर घेण्याचा सल्ला दिला होता, पण त्याची किंमत जास्त असल्याने तक्रारकर्त्याने बनावटी Windows-10 Operating System Install करुन घेतली. त्यामुळे त्यासंबंधीचा आरोप नाकारुन तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असल्याचे निवेदन दिले. Laptop खरेदी करीता रु.36,800/- संपूर्ण रक्कम तक्रारकर्त्याकडे प्रलंबीत असुन तक्रारकर्त्याने त्याकरीता कुठलेही पैसे दिलेले नाही. तक्रारकर्त्याने वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीसला दि.30.03.2017 रोजी पत्रव्दारे वकीलामार्फत उत्तर देण्यांत आले. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार रु.2,00,000/- चे खर्चासह खारीज करण्याची मागणी केली.
- तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल करुन तक्रारीतील निवेदनाचा पुर्नउच्चार केला व विरुध्द पक्षांचे सल्ल्यानुसार सिल्व्हर सिस्टम, धंतोली येथे HP Laptop दुरुस्ती करीता दिला. त्याकरीता सिल्व्हर सिस्टमने रु.4,000/- चे बिल दिले. विरुध्द पक्षांनी वारंटी कार्ड दिले नसल्याने तक्रारकर्त्यास सदर रक्कम द्यावी लागली, त्यामुळे तक्रार योग्य असल्याचे निवेदन दिले. तक्रारकर्त्याने बजाज फायनान्स कंपनीविरुध्द उमरेड पोलिस स्टेशन येथे एफ.आय.आर. दाखल केल्याचे नमुद केले.
- तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेले निवेदन व दस्तावेज तसेच विरुध्द पक्षांचे लेखीउत्तराचे व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले, तसेच उभय पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकण्यांत आला असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- // निष्कर्ष // -
7. दस्तावेज क्र.1 नुसार तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून HP Laptop रु.36,800/- ला दि.31.07.2016 रोजी घेतला होता. तसेच दस्तावेज क्र.2 नुसार दि.01.08.2016 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास रु.5,000/- दिल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्याने सादर केलेल्या दस्तावेजांनुसार Sansui LED TV रु.36,800/- ला खरेदी केल्याचे दिसते. प्रस्तुत प्रकरणी तक्रारकर्त्याने मुख्यत्वे HP Laptop नादुरुस्त असल्याची तक्रार केली व विरुध्द पक्षाने HP Laptop दुरुस्त करुन देण्याबद्दल किंवा बदलवुन देण्याबद्दल कुठलीही कारवाई न केल्याने प्रस्तुत तक्रार दाखल केल्याचे दिसते. वरील दस्तावेजांनुसार तक्रारकर्ता हा ग्राहक व विरुध्द पक्ष यांच्यात विक्रेता व सेवा पुरवठादार असा संबंध असल्याचे स्पष्ट होते. उभय पक्षांत उद्भवीत असलेल्या वादामुळे प्रस्तुत तक्रार मंचासमोर चालविण्या योग्य असल्याचे मंचाचे मत आहे.
8. तक्रारकर्त्याने दिलेले निवेदन व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता खालिल बाबी निदर्शनास येतात.
I) तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून HP Laptop घेतल्याचे स्पष्ट होत असले तरी त्यात कोणता दोष होता याबद्दल कुठलेही स्पष्ट निवेदन दिलेले नाही. तसेच नादुरुस्त HP Laptop विरुध्द पक्षाकडे दुरुस्तीकरीता केव्हा दिला याबाबत देखिल काहीही निवेदन नाही. तसेच Windows-10 Operating System बद्दल तक्रारकर्त्याने आक्षेप घेतला असला तरी उभय पक्षांत त्याबाबत काय ठरले होते याबद्दल कुठलाही उलगडा दाखल दस्तावेजांवरुन होत नाही. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने HP Laptop उत्पादक HP कंपनी यांना प्रतीपक्ष करणे आवश्यक होते, कारण तक्रारकर्त्याचे निवेदनानुसार HP Laptop वारंटी कालावधीत होता पण तसे केल्याचे दिसत नाही. तक्रारकर्त्याने जर सिल्व्हर सिस्टम, धंतोली यांचेकडे रु.4,000/- Laptop दुरुस्तीकरीता जमा केल्याचे निवेदन दिले असले तरी देखिल दि.23.01.2017 च्या बिलानुसार सदर बिल हे Laptop दुरुस्तीचे नसुननसुन HDD HP 1 TB EXT 8cy6030097 विकत घेतल्याचे दिसते. त्यामुळे त्याबाबतचे तक्रारकर्त्याचे निवेदन संपूर्णपणे चुकीचे असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच तक्रारीसोबत दाखल पृष्ठ क्र.13 चे निरीक्षण केले असता तक्रारकर्त्याचा झालेला व्यवहार हा Sansui LED TV करीता झालेला असल्याचे व त्यासंबंधीचे कर्जाऊ रक्कम परत करण्या संबंधाने असल्याचे स्पष्ट होते. तसेच सदर कर्ज हे बजाज फायनान्स कंपनीकडून घेतल्याचे दिसुन येते, त्यानुसार तक्रारकर्त्याने दि.05.09.2016 नंतर रु.2,412/- अधिक 51/- परत केल्याचे दिसते. तक्रारकर्त्याने बजाज फायनान्स कंपनीचे खाते विवरण जोडले असल्यामुळे बजाज फायनान्स कंपनीचा प्रस्तुत व्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट होते. सदर खाते विवरणामध्ये तक्रारकर्त्याने वेगवेगळे चार कर्ज घेतल्याचे दिसते. तक्रारकर्त्याने तक्रारीत सदर कर्जा विषयी सविस्तर माहीती दिली नसल्याने त्याबाबत कुठलेही निश्चित नोंदविणे मंचास शक्य नाही. तसेच त्यासंबंधी कुठलाही उहापोह करणे मंचास आवश्यक वाटत नाही.
II) Laptop मधील उत्पादीत दोष असल्याबद्दल कुठलाही पुरावा अथवा तज्ञ अहवाल तक्रारकर्त्याने सादर केलेला नाही त्यामुळे तक्रारकर्त्याचे निवेदन मान्य करणे योग्य नसल्याचे मंचाचे मत आहे.
III) वारंटी कालावधीत असलेला HP Laptop चे दोषासंबंधी तक्रारकर्त्याने HP कंपनीशी संपर्क साध्दने आवश्यक होते पण त्या संबंधीचा कुठलाही दस्तावेज तक्रारीत दाखल केला नाही आणि त्याबाबत विरुध्द पक्षास जबाबदार धरणे योग्य नसल्याचे व विरुध्द पक्षांचे सेवेत कोणतीही त्रुटी असल्याचे मंचास आढळून येत नाही.
IV) विरुध्द पक्षातर्फे तक्रारकर्त्याने वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीसला सविस्तर उत्तर पाठविल्याचे दिसते, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास Laptop ची रक्कम दिली नसल्याचे व प्रस्तुत प्रकरण विरुध्द पक्षाविरुध्द विनाकारण दाखल केल्याचे विरुध्द पक्षांचे निवेदन संयुक्तिक असल्याचे मंचाचे मत आहे.
9. त्यामुळे वरील संपूर्ण वस्तुस्थीतीचा विचार करता तक्रारकर्त्याबद्दल सहानुभूती असून देखील तक्रार मान्य करण्यायोग्य नसल्याचे व प्रस्तुत खारीज होण्यास पात्र असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यांत येते.
2. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क देण्यांत यावी.
3. तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
4. तक्रारकर्त्यास तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत परत करावी.