-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
( पारित दिनांक-27 नोव्हेंबर, 2016)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-3) विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली त्याने विरुध्दपक्षां कडून विकत घेतलेल्या WiFi Hub मध्ये निर्माण झालेल्या दोषा संबधाने नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून त्याने विरुध्दपक्षां विरुध्द दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला या कारणावरुन तक्रार दाखल केली आहे. विरुध्दपक्ष हे टेलीकॉमची सेवा खरेदीदारांना देतात. विरुध्दपक्ष क्रं-1) ही टेलीकॉम कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2) हे विरुध्दपक्ष क्रं-1) कंपनीचे डिलर आहेत. विरुध्दपक्ष क्रं-2) श्री जसविंदरसिंग हे तक्रारकर्त्या कडे नोव्हेंबर-2011 च्या पहिल्या आठवडयात आले व त्यांनी “TATA PHOTON 3 G” बद्दल माहिती दिली व त्यांनी दिलेल्या माहिती वरुन तक्रारकर्त्याने एक “WiFi Hub” ज्याचा क्रमांक-9225509233 असा असून तो रुपये-6500/- एवढया किंमतीत दिनांक-15/11/2012 रोजी विकत घेतला व पावती प्राप्त केली.
तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, जेंव्हा पासून त्याचा “WiFi Hub” बसविण्यात (Installed) आला, तेंव्हा पासूनच तो काम करत नाही, त्याची इंटरनेटची स्पीड सुध्दा कमी होती व त्यावर वेबपेज अपलोड होत नव्हते, त्याने ही गोष्ट विरुध्दपक्ष क्रं-1) कंपनीकडे वारंवार तक्रारी करुन सांगितली. दिनांक-04/12/2012 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) कंपनी तर्फे तांत्रिक कर्मचा-याला तक्रारकर्त्या कडे पाठविले, त्यावेळी तक्रारकर्त्या कडील इडीपी मॅनेजर श्री हेमंत कुंभारे यांची त्यांनी भेट घेतली व “WiFi Hub” ची तपासणी केली व दोष दुर करण्याचे आश्वासन देऊन ते निघुन गेले परंतु त्यानंतर तक्रारकर्त्या कडे कोणीही आले नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने
दिनांक-04/12/2012 आणि दिनांक-11/12/2012 रोजीची पत्रे विरुध्दपक्षाकडे पाठविलीत तसेच वेळोवेळी दुरध्वनीव्दारे पाठपुरावा केला परंतु विरुध्दपक्षा कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना दिनांक-09/01/2013 रोजीची कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी
केली परंतु कोणताही प्रतिसाद मिळाल्या नसल्याने शेवटी मंचात प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्दपक्षा विरुध्द खालील मागणी केली-
तक्रारकर्त्याने वायफाय हब संबधाने भरलेली रक्कम रुपये-6500/- तसेच शारिरीक मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- आणि कायदेशीर खर्च रुपये-20,000/- असे मिळून एकूण रुपये-51,500/- नुकसानभरपाई विरुध्दपक्षाकडून मिळावेत अशी मागणी केली.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनीने आपले लेखी उत्तर नि.क्रं 8 वर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात नमुद केले की, त्यांची कंपनी “TATA PHOTON 3 G WIFI HUB” ची निर्मिती करते आणि त्यांची कंपनी ही एक ख्यातीप्राप्त आहे, त्यांचे जवळपास 5.00 लक्ष पेक्षा जास्त ग्राहक विदर्भात आहे आणि तक्रारकर्ता वगळता अन्य कोणा ग्राहकाची त्यांचे विरुध्द एकही तक्रार नाही. तक्रारकर्त्याने कनेक्शन हे मेसर्स सेंट्रल केबल्स लिमिटेड या नावाने घेतलेले आहे अणि तक्रार ही श्री गोविंददास जी.डागा, जे मेसर्स सेंट्रल केबल्सचे संचालक आहेत यांनी दाखल केलेली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याने जी सेवा घेतलेली आहे, ती व्यवसायिक कारणासाठी घेतलेली असल्याने ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार ग्राहक सज्ञेत बसत नाही, त्यामुळे तक्रार खारीज व्हावी. तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने मंचा समोर अलेला नाही. तक्रारकर्ता हा व्यवसायिक आहे, त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. त्यांचे तांत्रिक व्यक्ती कडून आलेल्या स्थळ निरिक्षण अहवाला प्रमाणे तक्रारकर्त्या कडे 5.51 Mbps एवढी डाऊनलोड स्पीड होती. तक्रारकर्त्याची तक्रार आल्या नंतर विरुध्दपक्ष कंपनीचे तांत्रिक अभियंता श्री ललीत भोयर यांनी तक्रारकर्त्याचे व्यवसायाचे ठिकाणी भेट दिली आणि श्री हेमंत यांची भेट घेऊन “3G NET WORK & SPEED”तपासणी केली, त्यावेळी नेटवर्क हे चांगल्या स्थितीत आणि “3G DONGLE” चांगले काम करीत असल्याचे दिसून आले आणि तेथे 5.51 Mbps एवढी डाऊनलोड स्पीड मिळत होती. तक्रारकर्त्याचा ‘3G SIM CUSTOMER DIVICE ZTE AC 30 3G WI-FI HUB” चांगला कार्य करीत होता, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी असा उजर विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी तर्फे घेण्यात आला.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) यांनी नि.क्रं-9 प्रमाणे लेखी उत्तर दाखल केले, त्यांचे लेखी उत्तरा नुसार ते केवळ “TATA PHOTON 3 G WIFI HUB” विक्रेता आहेत, त्यामुळे त्यांची यामध्ये काहीही जबाबदारी येत नाही, त्यांनी कोणताही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. या प्रकरणामध्ये जी काही जबाबदारी येते ती विरुध्दपक्ष क्रं-1) कंपनीची येते. विरुध्दपक्ष क्रं-2) हे कुठलीही सेवा देण्यास बाध्य नाहीत. तक्रारकर्त्याने दिनांक-04/12/2012 आणि दिनांक-11/12/2012 रोजीच्या पत्रांव्दारे केलेली तक्रार त्यांना प्राप्त झालेली नाही. त्यांचे विरुध्द तक्रारीचे कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारकर्त्याचा “WiFi Hub” चालू असल्यामुळे तक्रार खारीज व्हावी असा उजर विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता तर्फे घेण्यात आला.
05. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचे उत्तर आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन खालील प्रमाणे मंचाचा निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता करण कॉम्युनिकेशन, गोकुलपेठ, नागपूर यांचे कडून दिनांक-15/11/2012 रोजीचे बिला प्रमाणे “ सेंट्रल केबल लिमिटेड” या नावाने “3G WIFI HUB” QTY-1, रुपये-6500/- मध्ये विकत घेतल्याची बाब दाखल दस्तऐवज क्रं-1 वरील बिला वरुन सिध्द होते व ती बाब विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांना सुध्दा मान्य आहे.
07. तक्रारकर्ता सेंट्रल केबल लिमिटेड तर्फे तिचे संचालक श्री गोविंद डागा यांनी, विरुध्दपक्ष क्रं-1) कंपनीचे मॅनेजर, टाटा टेली कॉम्युनिकेशन, सिव्हील लाईन्स, नागपूर यांना दिनांक-04/12/2012 रोजी दिलेल्या पत्रात नमुद केले की, “TATA PHOTON 3 G WIFI HUB” ची इंटरनेट स्पीड खूपच हळू असून वेब पेज लोड होत नाही आणि तो पूर्णपणे निरुपयोगी आहे, सदर पत्र त्याच दिवशी पोस्टाव्दारे पाठविल्याची पोस्टाची पावती प्रत जोडलेली आहे.
08. त्यानंतर तक्रारकर्त्या तर्फे श्री गोविंद डागा यांनी दिनांक-11/12/2012 रोजी मॅनेजर, टाटा टेली कॉम्युनिकेशन, सिव्हील लाईन्स, नागपूर यांचेकडे पुन्हा रजिस्टर पोस्टाने पत्र देऊन वरील प्रमाणे तक्रार नोंदविली व योग्य प्रतिसाद न मिळाल्याने सेवा खंडीत करुन रक्कम परत करण्याची मागणी केली व सोबत पुराव्या दाखल पोस्टाची पावती प्रत दाखल केली.
09. त्यानंतर तक्रारकर्ता सेंट्रल केबल्स लिमिटेड तर्फे तिचे संचालक श्री गोविंददास डागा यांनी वकीला मार्फतीने दिनांक-9.01.2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांना कायदेशीर नोटीस पाठविली, ज्याची प्रत अभिलेखावर दाखल केलेली असून, दोन्ही विरुध्दपक्षांच्या रजिस्टर पोच अभिलेखावर दाखल आहेत.
10. तक्रारकर्ता सेंट्रल केबल्स लिमिटेड तर्फे तिचे संचालक श्री गोविंददास डागा यांचे तक्रारी प्रमाणे त्यांनी विकत घेतल्या पासून दुसरे दिवसा पासूनच “TATA PHOTON 3 G WIFI HUB” ची इंटरनेट स्पीड खूपच हळू असून वेब पेज लोड होत नाही. या संबधाने उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे पत्रव्यवहार/कायदेशीर नोटीस पाठवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेवटी तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द दाखल केली.
11. याउलट विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनीचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ता फर्मची तक्रार आल्या नंतर विरुध्दपक्ष कंपनीचे तांत्रिक अभियंता श्री ललीत भोयर यांनी तक्रारकर्त्याचे व्यवसायाचे ठिकाणी भेट दिली आणि श्री हेमंत यांची भेट घेऊन “3G NET WORK & SPEED”तपासणी केली, त्यावेळी नेटवर्क हे चांगल्या स्थितीत आणि “3G DONGLE” चांगले काम करीत असल्याचे दिसून आले आणि तेथे 5.51 Mbps एवढी डाऊनलोड स्पीड मिळत होती. तक्रारकर्त्याचा ‘3G SIM CUSTOMER DIVICE ZTE AC 30 3G WI-FI HUB” चांगला कार्य करीत होता,
12. तक्रारकर्त्या कडील “TATA PHOTON 3 G WIFI HUB” विरुध्दपक्ष क्रं-1) कंपनीचे म्हणण्या प्रमाणे चांगले कार्य करीत होता तर तक्रारकर्त्याला पत्रव्यवहार/नोटीस आणि शेवटी ही तक्रार ग्राहक मंचात दाखल करण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता. तक्रारकर्ता फर्म “ सेंट्रल केबल लिमिटेड” यांनी, विरुध्दपक्ष क्रं-1) कंपनी निर्मित “3G WIFI HUB” QTY-1, रुपये-6500/- मध्ये विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांचे कडून दिनांक-15/11/2012 रोजी विकत घेतला आणि तो व्यवस्थित
काम करीत नसल्याने जवळपास 24 दिवसांनी प्रथम तक्रार दिनांक-04/12/2012 रोजी आणि त्यानंतर दिनांक-11/12/2012 रोजी विरुध्दपक्षाकडे तक्रार देण्याचे प्रयोजन नव्हते व शेवटी कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दिनांक-9.01.2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. कोणताही ग्राहक कोणा विरुध्द विनाकारण तक्रार करण्याचे कोणतेही प्रयोजन दिसून येत नाही. तक्रारकर्त्याने रजिस्टर पोस्टाने पाठविलेली कायदेशीर नोटीस मिळाली नसल्याचे विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांनी लेखी उत्तरात नमुद केले, जेंव्हा की ती नोटीस दोन्ही विरुध्दपक्षांना मिळाल्याची लेखी पोच उपलब्ध आहे.
13. विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनीचा असाही आक्षेप आहे की, तक्रारकर्ता ही सेंट्रल केबल लिमिटेड ही एक फर्म असून तिचे वतीने संचालक श्री गोविंददास डागा यांनी ही तक्रार मंचा समक्ष दाखल केलेली आहे आणि बिल हे सेंट्रल केबल लिमिटेड फर्मचे नावे असून तक्रारकर्ता फर्मचा वापर हा व्यवसायिक असल्याचे कारणावरुन ही तक्रार ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी मध्ये येत नसून तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक होऊ शकत नाही.
14. मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, “3G WIFI HUB” हा जरी सेंट्रल केबल लिमिटेड या फर्मचे नावे विकत घेतलेला असला तरी सदर “3G WIFI HUB” हा व्यापार करण्यासाठी तक्रारकर्ता फर्मने विकत घेतलेला नाही. जर तक्रारकर्ता फर्मने सदर “3G WIFI HUB” ची पुर्नविक्री (Reselling) करुन नफा कमविला असता तर तो व्यवसायिक कारणासाठी विकत घेतला असे गृहीत धरता आले असते परंतु सदर “3G WIFI HUB” हा फर्मचे दैनंदिन उपयोगासाठी विकत घेतल्याचे तक्रारी वरुन दिसून येते. त्यामुळे “3G WIFI HUB” हा तक्रारकर्ता फर्मने व्यवसायिक उपयोगासाठी विकत घेतल्या बद्दलचा कोणताही पुरावा विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनीने सादर केलेला नसल्याने त्यांचा हा आक्षेप अर्ज फेटाळण्यात येतो.
15. विरुध्दपक्ष क्रं-2) यांचा आक्षेप असा आहे की, ते फक्त विक्रेता असल्याने त्यांची कोणतीही जबाबदारी येत नाही. परंतु हा आक्षेप सुध्दा चुकीचा आहे. निर्माता कंपनीचे दोषपूर्ण उपकरणे विक्री केल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2) हे सुध्दा तेवढेच जबाबदार आहेत.
16. अशाप्रकारे तक्रारकर्ता फर्मला विरुध्दपक्ष क्रं-1) निर्मित दोषपूर्ण “3G WIFI HUB”, विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांनी विक्री करुन दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारकर्त्याला निश्चीतच शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला. नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(01) तक्रारकर्ता श्री गोविंददास गोवर्धनदास डागा, संचालक, सेंट्रल केबल्स लिमिटेड यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) मेसर्स टाटा टेली सर्व्हीसेस महाराष्ट्र लिमिटेड, सिव्हील लाईन्स, नागपूर (“3G WIFI HUB” Manufacturer Company) तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) मेसर्स करण कॉम्युनिकेशन्स, नागपूर ((“3G WIFI HUB” Seller) विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांना आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांचे कडून विकत घेतलेला ‘3G SIM CUSTOMER DIVICE ZTE AC 30 3G WI-FI HUB” याची इंटरनेटची स्पीड कमी असल्याने आणि त्यावर वेबपेज अपलोड होत नसल्याने त्यातील सर्व दोष दुर करुन सदरचे उत्पादनाचे माहितीपत्रकात आश्वासित केल्या प्रमाणे सर्व सोयी व सुविधा उपलब्ध करुन द्दाव्यात व तक्रारकर्त्याचे समाधान झाल्या बद्दल लेखी पोच घ्यावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(1) व (2) यांचे कडून तक्रारकर्त्या कडील “3G WIFI HUB” दुरुस्ती करणे शक्य नसल्यास त्या परिस्थितीत तक्रारकर्त्याने दोषपूर्ण “3G WIFI HUB” पोटी विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांनी दिलेली रक्कम रुपये-6500/-(अक्षरी रुपये सहा हजार पाचशे फक्त) नोटीस दिल्याचा दिनांक-09/01/2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याज यासह येणारी रककम तक्रारकर्त्यास परत करावी.
(04) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्यास द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.