निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदार फायनान्स कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार क्रमांक 1व 2 टाटा मोटर्स फायनान्स यांच्या कडून दिनांक 10/1/2002 रोजी इंडिका कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते. सदर कर्जाची त्याने नियमित परतफेड केली त्यानुसार त्याने शेवटचा हप्ता दिनांक 5/11/2004 रोजी भरला. त्यानंतर त्याने गैरअर्जदार फायनान्स कंपनीकडे बेबाकी प्रमाणपत्राची मागणी केली परंतु अनेक वेळा मागणी करुनही गैरअर्जदार फायनान्स कंपनीने त्यास बेबाकी प्रमाणपत्र दिले नाही व त्यास उडवा उडवीची उत्तरे दिली. शेवटी त्याने फायनान्स कंपनीकडे कर्ज खाते उता-याची प्रत मागितली असता फायनान्स कंपनीने त्यास कर्जखाते उतारा दिला व त्याच्याकडे रु 13225/- बाकी असल्याचे सांगितले. सदर बाब धक्कादायक होती. त्याने कर्जाची नियमित परतफेड केली होती परंतु फायनान्स कंपनीने त्याची फसवणूक केली म्हणून त्याने फायनान्स कंपनीकडून रु 1,00,000/- नुकसान भरपाई दिनांक 5/11/2004 पासून व्याजासह मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार फायनान्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी तक्रारदारास रु 3,00,823/- कर्ज दिले होते. सदर कर्जाची त्याने 3 वर्षात परतफेड करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदाराने कर्जाची नियमित परतफेड केली नाही व त्याच्याकडे अद्याप रु 13222.19 बाकी आहेत म्हणून तक्रारदाराला बेबाकी प्रमाणपत्र मिळू शकत नाही. तक्रारदाराची तक्रार तथ्यहीन आहे म्हणून तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद व कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. तक्रार मुदतीत आहे काय? नाही. 2. गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी आहे काय? मुद्दा उरत नाही. 3. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 व 2 :- दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड पंडीत एस.एम. व गैरअर्जदार टाटा फायनान्सच्या वतीने अड तानवडे व्ही.एस. यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्याने गैरअर्जदाराकडून कार खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची संपुर्ण परतफेड केलेली असून त्याने कर्ज परतफेडीपोटी शेवटचा हप्ता दिनांक 5/11/2004 रोजी भरला होता व त्यानंतर त्याने वेळोवेळी गैरअर्जदार फायनान्स कंपनीकडे बेबाकी प्रमाणपत्राची मागणी केली पंरतु फायनान्स कंपनीने त्यास बेबाकी प्रमाणपत्र दिले नाही म्हणून त्याने फायनान्स कंपनीकडून रु 1,00,000/- दिनांक 5/11/2004 पासुन 18 टक्के व्याजासह नुकसान भरपाई म्हणून मिळावेत अशी मागणी केली आहे. युक्तीवादादरम्यान गेरअर्जदार फायनान्स कंपनीच्या वतीने असा मुद्दा उपस्थित करण्यात आला की, जर तक्रारदाराने दिनांक 5/11/2004 रोजी कर्जाची संपूर्ण परतफेड केली असेल तर त्यास ही तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक 5/11/2004 रोजी घडलेले असल्यामुळे ही तक्रार मुदतबाहय ठरते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार जर त्याने दिनांक 5/11/2004 रोजी कर्ज परतफेडीचा शेवटचा हप्ता दिनांक 5/11/2004 रोजी भरला असेल तर त्यास गैरअर्जदार फायनान्स कंपनीकडून बेबाकी प्रमाणपत्र मागण्याचा अधिकार त्याचवेळी प्राप्त झाला होता म्हणजेच त्यास ही तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक 5/11/2004 रोजीच घडलेले आहे. कलम 24-अ ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार तक्रारदाराने ही तक्रार दोन वर्षाच्या आत म्हणजे दिनांक 4/11/2006 पूर्वीच या मंचात दाखल करणे आवश्यक होते. परंतु त्याने ही तक्रार अत्यंत विलंबाने दिनांक 16/4/2010 रोजी दाखल केली आहे. म्हणून ही तक्रार मुदतबाहय असल्याविषयी कोणतीही शंका उरत नाही. गैरअर्जदार फायनान्स कंपनीने तक्रारदाराकडे अद्याप रु 13222/- थकबाकी असल्याचे म्हटले आहे; अशा परिस्थितीत जर तक्रारदाराला असे वाटत असेल की त्याच्याकडे कोणतीही बाकी नाही तर तक्रारदाराने दिवाणी न्यायालयात तो गैरअर्जदाराने दर्शविलेली थकबाकी भरण्यास जबाबदार नल्याचे घोषीत करुन मिळणेसाठी दिवाणी दावा दाखल करणे योग्य ठरते. म्हणून मुद्दा क्र 1 व 2 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधिताना आदेश कळविण्यात यावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |