आदेश (दिः 11/04/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारकर्त्याचे म्हणणे थोडक्यात खालील प्रमाणे- विरुध्द पक्ष ट्रॅवल एजंट आहेत. तक्रारकर्ता व त्याच्या पत्नीने विरुध्द पक्ष 1 च्या द्वारे दि.15/04/2009 रोजी अमेरिकेला जाण्यासाठी विमानाची दोन तिकीटे विकत घेतली. विरुध्द पक्ष 1 ने त्यावेळेस रु.45,900/- रकमेचे 2 स्वतंत्र कोरे धनादेश सह्या करुन देण्यास सांगितले. याप्रमाणे त्याने दि.17/04/2009 तारीख टाकुन 130 मि. डोंबिवली शाखेचे 983275, 983276 या क्रमांकाचे धनादेश त्याला दिले. विरुध्द पक्ष 1 ने त्याला सांगितले की मुख्य एजंट विरुध्द पक्ष 2 द्वारा पुढील कारवाई पुर्ण केली जाईल. त्याने दिलेले धनादेश विरुध्द पक्ष 2 ने वटवले व रक्कम त्यांच्या खात्यात गेली. विरुध्द पक्ष 2 ने त्याला प्रतिसाद दिला नाही व विरुध्द पक्ष 1 उपलब्ध होत नव्हता. दि.25/05/2009 रोजी त्याने विश्नुनगर पोलिस स्टेशन डोंबिवली येथे विरुध्द पक्ष 1 चे विरुध्द फिरियाद नोदविली. रक्कम विरुध्द पक्षाला होऊनही विमानाची तिकिटे न मिळाल्याने नाईलाजास्तव त्याने दुसरीकडुन परत दोन तिकीटे विकत घेतली. वकीलामार्फत विरुध्द पक्ष 2 ला दि.10/09/2009 रोजी नोटिस पाठविण्यात आली, त्याला उत्तर आले नाही. त्यामुळे प्रार्थनेत नमुद केल्यानुसार .. 2 .. (तक्रार क्र. 748/2009) विरुध्द पक्ष 2 ने त्याला 18% व्याजासह रु.91,800/- परत करण्याचा मंचाने आदेश पारित करावा तसेच नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मंजुर करावा असे त्यांचे म्हणणे आहे. निशाणी 2 अन्वये तक्रारीचे समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र 3(अ) ते (फ) अन्वये दस्तऐवज दाखल करण्यात आलेत यात प्रामुख्याने विरुध्द पक्ष 1 कडे विमानाची टिकीटे बुकींग केल्याचा कागद रु.45,900/- चे 2 धनादेश, एफ.आय.आर, नवी इंटरनॅशनल यांचे कडुन घेतलेली टिकीटे, दि.10/09/2009 ची नोटिस, व पोस्टाची पावती यांच्या प्रतींचा समावेश आहे.
2. विरुध्द पक्ष 2 ने निशाणी 11 अन्वये अपला लेखी जबाब दाखल केला, तसेच प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यांचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- त्यांचा तक्रारीशी काहीही संबंध नाही. तक्रारकर्ता त्यांचा ग्राहक नाही. त्यांना तक्रारीसंदर्भात काहीही कल्पना नाही. त्याचे 8 वर्षापासुन विरुध्द पक्ष 1 सोबत व्यावसाईक संबंध होते. त्यांना विरूध्द पक्ष 1 कडुन 13,46,629/- घ्यावयाचे होते. ही रक्कम तो हळुहळु विरुध्द पक्ष 2 ला टप्याटप्याने देत असे. विरुध्द पक्ष 1 ने 45,900 चे 2 धनादेश त्यांना दिले. ही रक्कम विरुध्द पक्ष 1 कडुन वसुल करावयाचे रकमेत समायोजित करण्यात आली. विरुध्द पक्ष 1 च्या इतर व्यवहाराबद्दल त्यांना कल्पना नव्हती. तक्रारकर्त्याने संपुर्ण व्यवहार विरुध्द पक्ष 1 सोबत केलेला आहे. त्याचेशी विरुध्द पक्ष 2 चा संबंध नाही. तक्रारकर्त्याच्या नोटिसला त्यांनी जबाब पाठविला होता. सदर तक्रार अयोग्य असल्याने खर्चासह मंचाने खारीज करावी. जबाबासोबत दि.28/11/2009 ची नोटिसीच्या जबाबाची प्रत जोडली आहे. विरुध्द पक्ष क्र.2 ने दि.16/03/2010 रोजीचा वसुल करावयाच्या रकमेचा खातेउतारा दाखल केला. 3. मंचाने विरुध्द पक्ष 1 ला पाठविलेली नोटिस बजावणी न होता परत आल्याने वृत्तपत्रात जाहीर नोटिस प्रसिध्द करण्याचा निर्देश दिला. त्यानुसार दैनिक वार्ताहर व दैनिक पुण्य नगरी या वृत्तपत्रात नोटिस दि.08/09/2010रोजी प्रसिध्द करण्यात आली. मात्र विरुध्द पक्ष 1 हजर झाला नाही. त्यामुळे त्यांचे संदर्भात मंचाने एकतर्फी सुनावणी घेतली.
4. तक्रारकर्ता तसेच विरुध्द पक्ष 2 यांचे म्हणणे मंचाने एकले. तसेच त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. त्या आधारे सदर तक्रारीचे निराकर्णार्थ खालील मुद्दांचा मंचाने विचार केला- मुद्दा क्र. 1- विरुध्द पक्ष सदोष सेवेसाठी जबाबदार आहे काय ? उत्तर – होय. मुद्दा क्र. 2 - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडुन विमान तिकीटाचा परतावा, नुकसान भरपाई व न्यायीक खर्च मिळण्यास पात्र आहे काय? होय. उत्तर – होय. .. 3 .. (तक्रार क्र. 748/2009) स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1- मुद्दा क्र. 1 चे संदर्भात विचार केले असता असे स्पष्ट होते की, विरुध्द पक्ष क्र. 2 हे मुंबई येथील ट्रॅवल एजंट आहेत आणि त्यांच्या वतीने विरुध्द पक्ष 1 हा डोंबिवली येथे सब एजंट म्हणुन काम करत होता. विरुध्द पक्ष 2 ने आपल्या लेखी जबाबात परिच्छेद 6 मध्ये नमुद केले की, विरुध्द पक्ष 1 व 2 यांचे 8 वर्षांपासुन व्यवसायाचे संबंध होते व त्या व्यवहारातुन विरुध्द पक्ष 2 ला विरुध्द 1 कडुन रक्कम रु.13,46,629/- घ्यावयाची होती. थोडक्यात विरुध्द पक्ष 1 हा विरुध्द पक्ष 2 साठी डोंबिवली येथे स्थानिक एजंट या नात्याने काम करीत होता. तक्रारकर्त्याने यापुर्वी अनेकदा विरुध्द पक्ष 1 मार्फत विमानाची तिकीटे घेतली होती. अमेरिकेत सुनेला व नाताला भेटण्यासाठी जाण्याकरिता विरुध्द पक्ष 1 कडुन त्यांनी तिकीटे बुक केली होती. विरुध्द पक्ष 1 ने त्याची पावती निशाणी 3अ व 3ब त्याला दिली. तसेच दोन तिकीटांचे प्रत्यक्ष 45,900/- चे दोन धनादेश दिले. या धनादेशावर विरुध्द पक्ष 2 चे नाव टाकुन विरुध्द पक्ष 1 ने धनादेशाद्वारे रक्कम विरुध्द पक्ष 2 कडे जमा केली. म्हणजेच विरुध्द पक्ष 2 ला विरुध्द पक्ष 1 द्वारा तक्रारदाराने दिलेली 2 धनादेशाची दोन टिकीटांसाठीची रक्कम एकुन रु.91,800/- प्राप्त झाली. प्रत्यक्षात आगाऊ टिकीट मागणी नोंदवुनही विरुध्द पक्ष 1 ने अधीकृत टिकीटे तक्रारदाराला दिली नाहीत व तो फरार झाला. विरुध्द पक्ष 2 कडे तक्रारकर्त्याने संपर्क साधला असता त्यांनी आपले हात झटकले. एवढी मोठी रक्कम देऊनही शिवाय प्रवासाची तारीख जवळ येऊनही टिकीटे मात्र तक्रारकर्त्याच्या हातात आली नाही व शेवटी त्याला निरुपायास्तव नव्याने टिकीटे विकत घ्यावी लागली त्याची प्रत त्यांनी जोडली आहे. मंचाच्या मते विरुध्द पक्ष 1 व 2 हे दोघेही तक्रारकर्त्याला सदोष सेवा दिल्याबाबत ग्राहक कलम 2(1)(ग) अन्वये निश्चितपणे जबाबदार आहेत. आगाऊ टिकीट नोंदणीची पावती देऊनही व धनादेश स्विकृत करुनही विरुध्द पक्ष 1 ने त्याला टिकीटे दिली नाही. रु.91,800/- एवढी मोठी रक्कम धनादेशाद्वारे मिळाल्यानंतर व तक्रारकर्त्याने वस्तुस्िथती निदर्शनास अणल्यानतरही विरुध्द पक्ष 2 ने त्याला तिकिटे दिली नाहीत या कारणामुळे विरुध्द पक्ष 1 व 2 दोघेही जबाबदार आहेत असे या मंचाचे ठाम निष्कर्ष आहे. स्पष्टिकरण क्र. 2 - मंचाच्या मते रु.91,800/- ही दोन टिकीटांची रक्कम विरुध्द पक्ष 1 च्या मार्फत चेक द्वारा विरुध्द पक्ष 2 च्या खात्यात जमा झाली. ही बाब विरुध्द पक्ष 2 ने मान्य केलेली आहे मात्र ही रक्कम तक्रारकर्त्याच्या टिकीटाची नसुन विरुध्द पक्ष 1 कडुन वसुल करावयाचा रकमेतील आहे असे त्यांचे म्हणणे आहे. मंचाच्या मते विरुध्द पक्ष 1 व 2 यांचे 8 वर्षाचे व्यवसायिक संबंध होते त्यामुळे धनादेशाखालील सही विरुध्द पक्ष 1 ची नाही हे विरुध्द पक्ष 2 ला निश्चितपणे माहीत होते. तसेच ही बाब वकीलामार्फत पाठविलेल्या नोटिसीद्वारे व तक्रारकर्त्याने प्रत्यक्ष भेटून विरुध्द पक्ष 2 च्या निदर्शनास आणुन दिली होती याची दखल घेणे आवश्यक होते. तक्रारकर्त्याची एवढी मोठी रक्कम विरुध्द पक्ष 2 ला मिळालेली असुन देखील दुसरीकडुन तिकीटे घ्यावी लागली न्यायाच्या दृष्टिने विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या .. 4 .. (तक्रार क्र. 748/2009) तक्रारकर्त्यास रक्कम रु.91,800/- ही रक्कम दि.17/04/2009 ते आदेश तारखेपर्यंत द.सा.द.शे 12% दराने परत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विरुध्द पक्षाच्या सदोष सेवेने तक्रारकर्त्याचे केवळ आर्थिक नुकसान झाले असे नसुन त्यांना मोठया प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. आपण फसविल्या गेलो अशी त्याची भावना झाली अगदी वेळेवर त्याला पर्यायी व्यवस्था करणे भाग पडले त्यामुळे ते विरुध्द पक्षाकडुन असुविधा, मनस्ताप यासाठी नुकसान भरपाई रु.20,000/- मिळणेस पात्र आहे. तसेच त्यांच्या योग्य मागणीची दखल विरुध्द पक्षांनी न घेतल्याने सदर तक्ररकर्ता न्यायिक खर्च रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत.
5. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- आदेश 1) तक्रार क्र.748/2009 मंजुर करण्यात येते. 2) आदेश तारखेचे 2 महिन्याचे आत विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारकर्त्यास खालील रक्कम द्यावी. अ) तिकीट परतावा रक्कम रु.91,800/- (रु. एक्याण्णव हजार आठशे फक्त) दि.17/04/2009 ते आदेश तारखेपर्यंत द.सा.द.शे 12% दराने व्याजासह परत करावी. ब) मानसिक त्रासाकरिता रक्कम रु.20,000/- (रु.वीस हजार फक्त) द्यावे. क) न्यायिक खर्चाचे रक्कम रु.5,000/-(रु. पाच हजार फक्त) द्यावे. 3)विहित मुदतीत उपरोक्त आदेशाचे पालन विरुध्द पक्षानी न केल्यास तक्रारकर्ता उपरोक्त संपुर्ण रक्कम विरुध्द पक्ष 1 व 2 यांचे कडुन वैयक्तिक व संयुक्तरित्या आदेश तारखेपासुन ते रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे 18% दराने व्याजासह वसुल करण्यास पात्र राहतील.
दिनांक – 11/04/2011 ठिकाण - ठाणे (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |