(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 31 जानेवारी 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता यांनी एक LED टी.व्ही. घेण्याची इच्छा असल्या कारणास्तव त्यांनी विरुध्दपक्ष क्र.2 जे सोनी कंपनीचे उत्पादक वस्तु विकणारे डिलर असून, विरुध्दपक्ष क्र.1 हे सोनी कंपनीची टी.व्ही. चे उत्पादक आहे, तसेच विरुध्दपक्ष क्र.3 हे सोनी कंपनीचे सर्व्हीस स्टेशन आहे. तक्रारकर्ता यांनी दिनांक 2.8.2012 रोजी विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडून सोनी LED टी.व्ही. ज्याचा मॉडेल क्रमांक 32 EX 520, सिरीयल नंबर 2449479 रुपये 40,000/- चा चेक व्दारा देवून विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडून विकत घेतला. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी टी.व्ही. चा संच विकत घेतांना टी.व्ही. ची वॉरंटी एक वर्षाची असल्याचे सांगून वॉरंटी कार्ड सुध्दा तक्रारकर्त्याला देण्यात आले. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, त्यादिवशी तक्रारकर्ता यांनी टी.व्ही. चा संच घरी लावून बघितला असता टी.व्ही. आपोआप बंद होत होता व चालू होण्याचे प्रोग्राम व्यवस्थीत काम करीत नव्हते. त्यामुळे, पहिल्यांदाच विरुध्दपक्ष क्र.2 यांना दिनांक 4.8.2012 रोजी विरुध्दपक्ष क्र.2 यांना कळविले व विरुध्दपक्ष क्र.2 यांनी टी.व्ही. संचामधील दोष ताबडतोब काढला जाईल याची सुध्दा हमी दिली. परंतु, 8 दिवसाचा कालावधी लाटून सुध्दा विरुध्दपक्षाकडून कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 ला पुन्हा कळविले की, टी.व्ही. चा संचा हा रिमोर्ट आणि चालू होत नाही तो आपोआप बंद बडतो, परंतु विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्याला सेवा दिली नाही. त्यामुळे, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.3 यांचेशी संपर्क साधला व सांगितले की, टी.व्ही. चा संचा हा खराब आहे व विरुध्दपक्ष क्र.2 च्या सांगण्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दिनांक 17.11.2012 रोजी विरुध्दपक्ष क्र.3 सर्व्हीस स्टेशन याचेकडे दुरुस्ती करण्याकरीता दिले व तो दिनांक 19.11.2012 रोजी विरुध्दपक्ष क्र.3 कडून परत आणल्यानंतर पुन्हा आठ दिवसानंतर त्याच पध्दतीचा दोष टी.व्ही. संचामध्ये दिसून आला. त्याबद्दलची सुचना विरुध्दपक्ष क्र.3 यांना पुन्हा देण्यात आली.
3. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, सदर टी.व्ही. संचाबाबत वारंवार विरुध्दपक्ष क्र.3 व विरुदपक्ष क्र.2 यांना कळवून सुध्दा त्याचेकडून योग्य तो प्रतिसाद आला नाही. त्यांनी टी.व्ही. संच दुरुस्त करुन दिला नाही व त्यातील दोष काढला नाही त्यामुळे तक्रारकता अतिशय संतप्त झाले व त्यांना ञास होऊ लागला. विरुध्दपक्षाची ही कृती सेवेत ञुटी देणारी असून अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करणारी आहे, त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक 7.1.13 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 सोनी टी.व्ही. उत्पादक कंपनी यांना कायदेशिर नोटीस दिला व त्यांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्यांना त्याची तक्रार खोटी आहे असे उत्तर पाठविले, त्यामुळे तक्रारकर्ता नाईलाजास्तव सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केलेली आहे.
1) मा.मंचाने घोषीत करावे की, विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे व सेवेत ञुटी दिलेली आहे.
2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करावे की, तक्रारकर्त्यांनी घेतलेला सोनी टी.व्ही. संच रुपये 40,000/- मध्ये विकत घेतल्याचा दिनांक 2.8.2012 पासून द.सा.द.शे.24 टक्के दराने येणारी रक्कम तक्रारकर्त्याला परत करावी व तसेच विरुध्दपक्ष क्र.2 च्या ताब्यात असलेला टी.व्ही. संच तक्रारकर्त्याला परत करावे. तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांचे कृतिमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 5000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
4. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारीला आपले उत्तर सादर करुन त्यात नमूद केले की, तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडून सोनी टी.व्ही. चा संच विकत घेतला, ही बाब सत्य आहे. परंतु, दिनांक 27.11.2012 रोजी तक्रारकर्त्याची टी.व्ही. संचा बाबतची तक्रार पहिल्यांदा मिळाल्या बरोबर कंपनीचे सर्व्हीस इंजिनियर यांना पाठवून टी.व्ही. संचाची तपासणी करण्यात आली व तसाच दुसरा LED कंपनी संच स्टॅन्डबाय म्हणून तक्रारकर्त्याला देण्यात आला व दिनांक 30.11.2012 ला तक्रारकर्त्याचा टी.व्ही. संच चालू स्थितीमध्ये तक्रारकर्त्याचे घरी देण्यात आला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.3 यांना पुन्हा टी.व्ही. संच नादुरुस्त असल्याबाबत कळविल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी टी.व्ही. संचाची पुन्हा तपासणी केली व तक्रारकर्त्याचा टी.व्ही. संचा दुरुस्त करुन देण्यात आला. परंतु, त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 7.1.2013 रोजी वकीला मार्फत कायदेशिर नोटीस पाठवून टी.व्ही. संच नादुरुस्त असून टी.व्ही. संच बदलवून देण्याकरीता नमूद केले. तक्रारकर्त्याचा टी.व्ही. संच हा दिनांक 2.8.2012 रोजी विकत घेतला असल्या कारणास्तव विरुध्दपक्ष यांना आपल्या कायदेशिर नोटीसचे उत्तरामध्ये नमूद केले की, तक्रारकर्त्याचा टी.व्ही. संच हा वॉरंटी पीरेडमध्ये असून अशापरिस्थितीमध्ये टी.व्ही. संच बदलवून देता येत नाही, परंतु त्यातील दोष मुक्त करता येते. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून मिळालेल्या नोटीसच्या उत्तराला दुर्लक्ष केले, त्यामुळे तक्रारकर्ता हा फक्त ञास देण्याकरीता सदरची तक्रार दाखल केली आहे व तक्रारकर्त्याची तक्रारीमधून जी मागणी आहे ती ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कायद्यामध्ये बसणारी नसून अनावश्यक मागणी आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. त्याचप्रमाणे आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षावर लावलेले आरोप व प्रत्यारोप आपल्या उत्तरात खोडून काढले.
5. तक्रारकर्त्याने तक्रारी बरोबर दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने दिनांक 2.8.2012 चे सोनी LED 32 इंच चा बिल दाखल केलेला आहे व टी.व्ही. संचाचा वॉरंटी कार्ड, तसेच विरुध्दपक्ष यांनी अधिवक्ता मार्फत पाठविलेला दिनांक 7.1.2013 चा नोटीस इत्यादी दस्ताऐवज दाखल केलेले आहे. तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला कायदेशिर नोटीसच्या उत्तराची प्रत दाखल केली आहे.
6. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी सदर प्रकरणात लेखी युक्तीवाद दाखल केले. तसेच दोन्ही पक्षांचा मंचासमक्ष मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. दोन्ही पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापार : होय
प्रथेचा अवलंब किंवा सेवेत ञुटी झाल्याचे दिसून येते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
7. तक्रारकर्त्याची सदची तक्रार ही विरुध्दपक्ष यांचेकडून दिनांक 2.8.2012 रोजी सोनी LED टी.व्ही. मॉडेल क्रमांक 32 EX 520, सिरीयल नंबर 2449479 हा टी.व्ही. चा संच विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडून विकत घेतला. विरुध्दपक्ष क्र.2 हे सोनी उत्पादक वस्तु विकणारा अधिकृत विक्रेता असून ते फक्त सोनी कंपनीच्याच ईलेक्ट्रॉनिक्स वस्तु विकतात. सदरचा टी.व्ही. संच घेतल्यानंतर त्याचदिवशी टी.व्ही. संच चालू करुन पाहिला असता तो अचानक बंद पडायचा. त्याबाबत त्यांनी विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांना सुचीत केले. विरुध्दपक्ष क्र.3 हे सोनी उत्पादक कंपनीचे वस्तुचे सर्व्हीस सेंटर आहे व तक्रार मिळताच विरुध्दपक्ष क्र.3 यांनी कंपनीचे ईलेक्ट्रानिक्स इंजिनियर यांना पाठवून टी.व्ही. संचाची तपासणी केली, परंतु पुन्हा एक-दोन दिवसानंतर त्याच पध्दतीचा दोष दिसून आला. तक्रारकर्त्याने पुन्हा तक्रार करुन टी.व्ही. संच दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्र.3 कडे पाठविला. परंतु, 3-4 दिवस त्याचेकडे ठेवून सुध्दा व तो परत घरी आणल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचा दोष दिसून आला. त्यामुळे तक्रारकर्ता संतप्त होऊन सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
8. विरुध्दपक्षाने आपल्या उत्तरात ही बाब स्पष्टपणे नमूद केली आहे की, जरी तक्रारकर्त्याने सदरचा टी.व्ही. संच विकत घेतलेला आहे तरी त्यामध्ये दोष निर्माण झाल्यास तो दुरुस्ती करण्याची जबाबदारी विरुध्दपक्षाची होती व आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन टी.व्ही. संच तपासणीकरीता विरुध्दपक्ष क्र.3 चे सर्व्हीस इंजिनियरने जावून टी.व्ही. संच दुरुस्त करुन दिला. त्याच प्रकारची पुन्हा तक्रार आल्यानंतर दोन ते तीन दिवस ठेवून विरुध्दपक्ष क्र.3 यांनी पुन्हा दुरुस्त करुन दिला व त्यानंतर लगेच तक्रारकर्ता यांन कायदेशिर नोटीस पाठविला व टी.व्ही. संच बदलवून मागितला. त्या कायदेशिर नोटीसला उत्तर देत स्पष्टपणे नमूद केले की, टी.व्ही. संच हा वॉरंटी पीरेडमध्ये आहे त्यामुळे टी.व्ही. संच दुरुस्तीकरुन देण्यात येतो, परंतु तो बदलवून देता येत नाही, असे नमूद केले होते. परंतु, तक्रारकर्त्याने या बाबीकडे दुर्लक्ष्ज्ञ करुन फक्त ञास देण्याकरीता सदरची तक्रार दाखल केलेली आहे. करीता तक्रारकर्त्याची खोटी तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने सोनी LED टी.व्ही. संच विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडून विकत घेतला व विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी ही बाब नाकारली नाही. तसेच टी.व्ही. संचामध्ये दोष असल्याची बाब सुध्दा विरुध्दपक्षाने नाकारला नाही. विरुध्दपक्षाने असे नमूद केले आहे की, जेंव्हा-जेंव्हा तक्रारकर्त्याने टी.व्ही. संचाबाबत तक्रार केली, तेंव्हा-तेंव्हा त्यांना कंपनीच्या सर्व्हीस सेंटरकडून सेवा देण्यात आली. परंतु, मंचाला असे दिसून येते की, तक्रारकर्त्याची संपूर्णपणे समाधान तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या सोनी LED टी.व्ही. संच हा पूर्णपणे दुरुस्त करुन तक्रारकर्त्याला दिला, याबाबतचे म्हणणे विरुध्दपक्षाने समोर आणले नाही. तसेच, तक्रारदाराने आपल्या तक्रारीत प्रार्थना केली आहे की, सदरचा LED टी.व्ही. संच हा विरुध्दपक्ष क्र.2 यांना दुरुस्तीसाठी दिला असून त्यांनी तो परत करावा. परंतु, विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तरात टी.व्ही. संच हा त्यांचेकडे नाही किंवा आहे याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही किंवा पुरावा सुध्दा अभिलेखावर आणला नाही. यावरुन, असे दिसून येते की, टी.व्ही. संच हा विरुध्दपक्ष क्र.2 कडे आहे व याबाबत तक्रारदाराने दाखल दस्ताऐवजाच्या बिलामधील मागच्या बाजुला विरुध्दपक्ष क्र.2 ने टी.व्ही. संच स्विकारला याबाबत तक्रारदाराचे अधिवक्ता सांगतात व तसे दिसून येते. त्यामुळे, तक्रारदार हा टी.व्ही. संचापोटी दिलेली रक्कम रुपये 40,000/- तक्रारकर्त्याला मिळण्यास पाञ आहे.
करीता, सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याने विकत घेतलेला सोनी LED टी.व्ही. चा संच मॉडेल क्रमांक 32 EX 520, सिरीयल नंबर 2449479 संचापोटी दिलेली रक्कम रुपये 40,000/- द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दराने दिनांक 2.8.2012 पासून मिळणारी रक्कम तक्रारकर्त्याचे हातात मिळेपर्यंत परत करावी.
(3) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 3,000/- व तक्ररीचा खर्च म्हणून रुपये 2000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 31/01/2017