निकालपत्र
( पारीत दिनांक :19/11/2013 )
( द्वारा मा. सदस्य श्री.मिलींद आर.केदार)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अतंर्गत तक्रार खालीलप्रमाणे दाखल केली आहे.
1 तक्रारकर्ता हा मौजा-तिरोडा. तह. कारंजा (घाडगे), जि. वर्धा येथील रहिवासी असून त्याचा शेतीचा व्यवसाय आहे. तक्रारकर्त्याच्या नांवे 7 एकर शेती असून तो स्वतः शेती करतो व शेती हे उपजीविकेचे साधन असल्याचे त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
सन 2011 च्या रब्बी हंगामात तक्रारकर्त्याने 3 एकर मध्ये वेर्स्टन-51 या भूईमूग बियाण्याचा पेरा घेतला. तक्रारकर्त्याने सदर बियाणे विरुध्द पक्ष 1 यांच्याकडून रुपये 14,760/- ला खरेदी केले. भुईमुगाच्या 20 कि.ची एक थैली याप्रमाणे 9 थैल्या दि. 13.01.2011 रोजी खरेदी केल्या. तक्रारकर्त्याने सदर बियाणे त्याच्या नांवे असलेल्या शेता मध्ये पेरले. सदर बियाण्याची निर्मिती विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी केल्याचे तक्रारकर्त्याने नमूद केले. तक्रारकर्त्याने नमूद केले की, तो विरुध्द पक्ष 1 व 2 चा ग्राहक आहे. पेरणीच्या वेळी संपूर्ण प्रक्रिया करुन व आवश्यक मशागत करुन त्यानी भुईमुगाची पेरणी केली. सदर बियाण्याची पेरणी केल्यानंतर उगवण झाल्यानंतर शेंगा लागल्या नाहीत त्यामुळे तक्रारकर्त्याने कृषि अधिकारी, पंचायत समिती कारंजा यांच्याकडे तक्रार केली. तक्रारकर्त्याने नमूद केले की, दि. 16.05.2011 रोजी पेरणी केल्यानंतर सुध्दा परिपक्व कालावधी पूर्ण झाल्यानंतर अतिशय कमी भुईमुंगाच्या शेंगा लागल्या. तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन कृषि अधिकारी, पंचायत समिती, कारंजा यांनी शेतात भेट दिली व पाहणी केली. त्यांनी पुढे असे नमूद केले की, विरुध्द पक्ष यांना त.क.यांनी कळविल्यानंतर सुध्दा तक्रारकर्त्याच्या शेताला भेट दिली नाही. कृषि अधिकारी पंचायत समिती कारंजा यांनी प्राथमिक अहवाल जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती वर्धा यांच्याकडे चौकशीकरिता पाठविला. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीने दि. 31.05.2011 ला तक्रारकर्त्याच्या शेताला भेट दिली व पाहणी करुन अहवाल सादर केला. तक्रारकर्त्याने असे नमूद केले की, विरुध्द पक्ष यांनी सदोष बियाणे दिल्यामुळे तक्रारकर्त्याचे/ शेतक-याचे नुकसान झाले. याबाबत त्यांनी विरुध्द पक्ष यांना नोटीस बजाविली. विरुध्द पक्ष यांचे सदोष बियाण्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झाले. त्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना पाठविलेल्या नोटीसचे विरुध्द पक्ष यांनी उत्तर दिले व त्यामधील सर्व तथ्य नाकारले. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, विरुध्द पक्ष यांनी सदोष बियाणे दिल्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झाले. विरुध्द पक्षाने सेवेत त्रृटी दिली त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर प्रकरण मंचासमोर दाखल केले असून नुकसान भरपाई म्हणून रु.2,46,000/- व त्यावर 10% व्याज , मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रुपये25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये7,000/-ची मागणी केली आहे.
2 विरुध्द पक्ष 1 व 2 यांना सदर तक्रारीची नोटीस मंचामार्फत बजाविण्यात आली. विरुध्द पक्ष 1 व 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त झाली. विरुध्द पक्ष 1 यांना नोटीस प्राप्त होऊन ही मंचासमक्ष हजर न झाल्याने मंचाने दि. 05.01.2012 रोजी विरुध्द पक्ष 1 विरुध्द एकतर्फी प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
3 विरुध्द पक्ष 2 यांनी सदर प्रकरणामध्ये खालीलप्रमाणे उत्तर दाखल केले. विरुध्द पक्ष 2 यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले की, ते नामवंत बियाणे उत्पादन व विक्री करणारी कंपनी असून भुईमूंग वेर्स्टन-51 या बियाण्यांची शासनाच्या प्रयोग शाळा सेक्टर 15, गांधीनगर, गुजरात येथे चाचणी केल्यानंतर विक्रीसाठी खुले केले. महाराष्ट्र राज्या मध्ये विक्री परवाना घेण्यापूर्वी हा चाचणी अहवाल व इतर दस्ताऐवज दिल्यानुसार महाराष्ट्र शासनाने सदर बियाणे महाराष्ट्रात विकण्याबाबतची परवानगी दिली. विरुध्द पक्ष 2 यांनी पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्ता यांनी कंपनीने दिलेल्या (वि.प.क्रं. 2) सल्ल्याप्रमाणे बियाण्याची पेरणी व इतर काळजी न घेतल्यामुळे नुकसान संभवू शकते. बियाण्याची उगवणबाबत अनेक गोष्टी जसे जमीनीचा पोत व गुणवत्ता/जमिनीचा प्रकार, हवामान, वातावरणातील आर्द्रता, तापमान, खते, औषधांचा व पाण्याचा योग्य वापर, पेरणी पूर्वी केलेली मशागत या सर्व बाबींचा योग्य वापर करण्याची गरज आहे ते केल्याशिवाय योग्य उत्पादन मिळत नाही. त्यांनी पुढे नमूद केले की, तक्रारकर्ता /शेतकरी याने स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारकर्ता यांच्याकडे फक्त 7 एकर शेती आहे व त्यात सुध्दा 3 एकर मध्ये पेरणी केली हे म्हणणे मान्य नाही. तक्रारकर्ता हा व्यापारी तत्वावर शेती करतो, त्यामुळे तो ग्राहक संज्ञेत बसत नाही. त्यांनी पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्याने पंरपरागत पध्दतीने पेरणी केली व ओळी मधील अंतर अतिशय जास्त होते त्यामुळे सुध्दा उत्पादनावर परिणाम होऊ शकते. विरुध्द पक्ष यांनी सर्व आक्षेप नाकारले असून तक्रारकर्त्याची तक्रार ही काल्पनिक असून योग्य पुराव्या अभावी खारीज करण्याची विनंती केलेली आहे.
4 सदर प्रकरणामध्ये मंचाने उभय पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद दि. 20.03.2013 रोजी ऐकून घेण्यात आला. उभय पक्षांचे कथन, पुरावा व दाखल केलेले दस्ताऐवज याचे अवलोकन केले असता मंचाच्या समक्ष खालील बाबी विचारार्थ उपस्थित झाल्या.
कारणे व निष्कर्ष
5 तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष 1 यांच्याकडून वेर्स्टन -51 या जातीचे भुईमुंगाचे20 कि. प्रति. बॅग याप्रमाणे 9 बॅग खरेदी केल्या हे दर्शविण्याकरिता तक्रारकर्त्याने पान क्रं. 14 वर दस्ताऐवज क्रं. 2 मध्ये विरुध्द पक्ष 1 यांचे बिल दाखल केले आहे. तसेच पान क्रं. 15, 16, 17, 18 व 20 वर सदर बियाण्याच्या आवेष्टनाच्या झेरॉक्स प्रत (Lable) दाखल केले आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 कडून बियाणे खरेदी केले होते व सदर बियाण्याची निर्मिती विरुध्द पक्ष 2 यांनी केली होती. विरुध्द पक्ष 1 यांनी या प्रकरणात कोणताही आक्षेप नोंदविला नाही. तसेच विरुध्द पक्ष 2 यांनी सदर बियाण्याची निर्मिती त्यांनीच केल्याचे आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.
6 विरुध्द पक्ष 2 यांनी आपल्या लेखी उत्तरात असा आक्षेप घेतला की, तक्रारकर्ता हे व्यापारी तत्वावर शेती करतात परंतु सदर बाब स्पष्ट करणारी अथवा सिध्द करणारा कोणताही पुरावा त्यांनी मंचासमक्ष दाखल केला नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या 7/12 च्या उतारा मध्ये शेतक-याचे/तक्रारकर्त्याचे नांव नमूद आहे. यावरुन भूमापन क्रं. 18/2, मौजा-तिरोडा, ता. कारंजा, जि. वर्धा येथील शेत हे तक्रारकर्त्याच्या नांवे असून सदर शेती ही तक्रारकर्त्याच्या उपजीविकेकरिता आवश्यक साधन असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्ष 1 व 2 यांचे ग्राहक संरक्षण कायद्याच्या व्याख्येनुसार ग्राहक ठरतात असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
7 तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले की, त्यांनी 3 एकर शेतामध्ये भुईमुगाची पेरणी केली. सदर बाब विरुध्द पक्ष 2 यांनी माहिती अभावी अमान्य केली. एवढीच बाब आपल्या उत्तरातील परिच्छेद क्रं. 3 मध्ये नमूद केली आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या 7/12 उतारामध्ये सुध्दा भुईमुंगाच्या पिकाची नोंद असून तक्रारकर्त्याने दाखल जिल्हास्तरीय तक्रार निवारण चौकशी समिती / कृषि विकास अधिकारी, जि. वर्धा यांच्या अहवालामध्ये सुध्दा तक्रारकर्त्याने 3 एकर मध्ये भुईमूग पेरणी केली होती याबाबतचा स्पष्ट उल्लेख आहे. सदर अहवाल मंचासमक्ष तक्रारकर्ता यांनी पान क्रं. 23 दस्ताऐवज 6 वर दाखल केला आहे. या दोन्ही पुराव्यांचा विचार करता ही बाब सिध्द होते की, तक्रारकर्त्याने 3 एकर शेतीमध्ये भुईमुगाची पेरणी केली होती.
तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून खरेदी केलेले वेस्टर्न 51 या जातीचे बियाणे सदर शेतामध्ये पेरणी केले होते ही बाब सुध्दा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या अहवालावरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्याकडून खरेदी केलेल्या वेस्टर्न 51 जातीचे बियाणे त्यांच्या शेतात पेरणी केले होते व सदर पेरणी 3 एकरात केली होती ही बाब सुध्दा स्पष्ट होते.
8 तक्रारकर्त्याने तक्रारीत आक्षेप घेतलेला भुईमूग परिपक्व झाल्यानंतर सुध्दा भुईमुंगाच्या पिकाला अतिशय कमी शेंगा लागल्या. तक्रारकर्त्याने याबाबतची तक्रार दि. 16.05.2011 रोजी विरुध्द पक्ष 1 कारंजा यांच्याकडे केली. सदर बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्ताऐवज क्रं. 4 पान नं. 21 वरुन स्पष्ट होते असे असतांना ही विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी कोणतीही तसदी घेतली नाही किंवा या प्रकरणामध्ये यापूर्वी काहीही नमूद केले नाही व मंचासमोर उपस्थित झाले नाही. विरुध्द पक्ष 1 यांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करुन विरुध्द पक्ष 2 यांना कळविणे गरजेचे होते व तसे कळविले की नाही याबाबतचा कोणताही पुरावा विरुध्द पक्ष 1 यांनी मंचासमक्ष दाखल केले नाही. तक्रारकर्ता यांनी कृषि अधिकारी पंचायत समिती कारंजा यानां सुध्दा याबाबतची तक्रार केली व त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व पाहणी नुसार त्यांनी आपला प्राथमिक अहवाल कृषि विकास अधिकारी, जि. वर्धा यांना सादर केला. ही बाब सिध्द करण्याकरिता तक्रारर्त्याने दस्ताऐवज क्रं. 5 पान क्रं. 22 वर दाखल केले. सदर अहवालाचे निरीक्षण केले असता कृषि अधिकारी पंचायत समिती कारंजा यांनी दि. 21.05.2011 रोजी सदर अहवाल कृषि विकास अधिकारी, जि. वर्धा यांनी सादर केल्याचे स्पष्ट होते. त्या अहवालामध्ये त्यांनी प्राथमिक पाहणी केल्याचे स्पष्ट होते व जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती मार्फत चौकशी करण्याबाबत सुचविल्याचे सुध्दा स्पष्ट होते. त्यानुसार जिल्हास्तरीय तक्रार निवारण चौकशी समितीने तक्रारकर्त्याच्या शेताची पाहणी केली ही बाब दस्ताऐवज क्रं. 6 पान क्रं. 23, 24, चे अवलोकन केले असता स्पष्ट होते.सदर समितीच्या अहवालावर अध्यक्ष व सदस्यांच्या सहया आहेत. समितीच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, तपासणी व पाहणीच्या वेळी श्रीरामजी धांदे, प्रोप्रा. श्रीराम ऍग्रो सेंन्टर, कारंजा, विरुध्द पक्ष 1 हजर होते व त्यांच्या समोरच तपासणी करण्यात आली. तक्रारकर्त्याने दस्ताऐवज क्रं. 6 वर समितीचे तपासणी करीत असल्याचे छायाचित्र दाखल केले. विरुध्द पक्ष 1 यांनी सदर अहवाल बाबत कोणताही आक्षेप घेतलेला नाही. विरुध्द पक्ष 2 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये त्यांना सदर पाहणीच्या वेळी कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती असे नमूद केले आहे. परंतु त्यांनी त्याबाबतचा कोणताही आक्षेप तक्रारीमध्ये उत्तर दाखल करण्यापूर्वी जिल्हास्तरीय तक्रार निवारण चौकशी समिती समोर घेतल्याचे नमूद केले नाही किंवा त्याबाबत दस्ताऐवज सुध्दा दाखल केले नाही. विरुध्द पक्ष 1 यांना सदर तपासणीची नोटीस प्राप्त झाली होती अशा परिस्थितीत विरुध्द पक्ष 1 हे विरुध्द पक्ष 2 यांच्या बियाण्याची विक्री करतात ही बाब स्वयंस्पष्ट आहे. विरुध्द पक्ष 1 यांनी विरुध्द पक्ष 2 यांना तपासणीच्या वेळ बाबतची सूचना देणे गरजेचे होते. ती सूचना विरुध्द पक्ष 1 यांना विरुध्द पक्ष 2 यांनी दिली की नाही याबाबतचा खुलासा विरुध्द पक्ष 1 च करु शकतात असे असतांना विरुध्द पक्ष 1 यांनी मंचासमक्ष आपले कोणतेही म्हणणे सादर केले नसल्यामुळे विरुध्द पक्ष 1 यांना विरुध्द पक्ष 2 यांनी कळविले होते की नाही याबाबत निष्कर्ष काढणे अशक्य आहे. परंतु विरुध्द पक्ष 1 यांची जबाबदारी कळविण्याची होती व ते विरुध्द पक्ष 2 यांचे प्रतिनिधी स्वरुपात बियाण्याची विक्री करतात ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे विरुध्द पक्ष 2 यांना नोटीस मिळाली नव्हती एवढेच कारण ग्राहय धरता येत नाही. या उलट विरुध्द पक्ष 2 यांनी आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने परंपरागत पध्दतीने पेरणी केली ही बाब परिच्छेद क्रं. 5 मध्ये नमूद केली आहे जर विरुध्द पक्ष 2 यांना पेरणी बाबत काहीही माहीत नव्हते तर त्यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये सदर बाब कशी नमूद केली. यावरुनच विरुध्द पक्ष 2 यांना प्रकरणाची जाणीव असून सुध्दा ते प्रत्यक्ष भेट देण्यापासून व तक्रारकर्त्याच्या शेतातील पाहणी करण्याचे टाळाटाळ करीत होते ही बाब लक्षात येते.
9 विरुध्द पक्ष 2 यांना नोटीस बजाविणे ही बाब तक्रारकर्त्याच्या कार्यक्षेत्रात येत नाही. त्यामुळे सदर आक्षेप या तक्रारीमध्ये विचारात घेण्यासारखा नाही. कारण शेतीची पाहणी संबंधी नोटीस देण्याचा अधिकार जिल्हास्तरीय तक्रार निवारण चौकशी समितीस आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाचे याबाबतचे आक्षेप नाकारण्यात येते.
जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समिती मध्ये अध्यक्ष, श्री. आर.के.गायकवाड हे होते. त्यांची स्वाक्षरी अहवालावर आहे. त्यांनी आपल्या उलट तपासणीच्या उत्तरामध्ये स्पष्ट केले की, भुईमुंगाच्या पिकाची सर्वसाधरण माहिती असून तपासणीच्या वेळी कृषि विद्यापीठाचे तज्ञांनी पाचारण केले व त्यानुसार डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठ अकोला यांचे प्रतिनिधी एम.के. राठोड तपासणीच्या वेळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या माहिती तपासणीचा मुद्दा क्रं. 12 मध्ये नमूद केले की, संबंधित शेतक-याने कंपनीचे वाणाचे संबंधित लॉटचे बियाणे जिल्हयात तपासणी करिता उपलब्ध न झाल्याने नमुना घेवून तपासणी करता आली नाही. परंतु अशा परिस्थितीत क्षेत्रीय तपासणीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात व त्या आधारे निष्कर्ष काढल्याचे त्यानी नमूद केले. त्यांनी तपासणी अहवालात काळजीपूर्वक व बरोबर असल्याचे नमूद केले आहे. विरुध्द पक्ष 2 यांनी आपल्या उत्तरात मशागतबाबत व पेरणीबाबत कोणतीही माहिती नाही असा आक्षेप घेतलेला आहे परंतु जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समिती अहवालात नमूद केले आहे की, थायरमची बीज प्रक्रिया तक्रारकर्त्याने केली असून स्प्रिकंरणे पाणी दिले तसेच तणनाशकाची फवारणी केली व घ्यावयाची सर्व काळजी तक्रारकर्त्याने / शेतक-याने घेतलेली आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी घेतलेला आक्षेप अमान्य असून जिल्हास्तरीय तक्रार निवारण चौकशी समिती मध्ये तज्ञांनी दिलेला अहवाल हे ग्राहय धरण्यात येते. The Indian evidence Act Section 45 नुसार Opinion of expert या कलमचा विचार करता तज्ञांनी दिलेला अहवाल यातील (Facts)मुद्दे ग्राहय धरणे आवश्यक वाटते. त्यानुसार मंचाने जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचा अहवाल ग्राहय मानून त्याबाबत विरुध्द पक्ष 2 यांनी केलेले सर्व आक्षेप हे परिस्थितीची संपूर्ण पाहणी न करता केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ते सर्व आक्षेप अमान्य करण्यात येते.
10 जिल्हास्तरीय तक्रार निवारण चौकशी समितीने रॅन्डम पध्दतीने तपासणी केल्याचे आपल्या अहवालात नमूद केले. यामध्ये त्यांनी नमूद केले की, पिकाची कायिक वाढ (Vegetative Growth ) प्रमाणा पेक्षा जास्त झालेली आहे असे नमूद केले आहे. सदर अहवालामध्ये उगवण समाधानकारक झाल्याचे सुध्दा नमूद आहे. यावरुन शेतक-यांनी मशागत योग्य प्रकारे केल्याचे स्पष्ट होते.परंतु सदर घडन भुईमुंगाच्या शेंगाची सरासरी कमी प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले आहे ही बाब बियाण्याच्या सदोषामुळे झाल्याचे स्पष्ट होते. यापूर्वी विरुध्द पक्ष 2 यांनी घेतलेले सर्व आक्षेप अकारण असून कोणत्याही तज्ञांशी सुसंगत नसल्याने नाकारण्यात येते. विरुध्द पक्ष यांनी बियाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली नसल्यामुळे बियाणे सदोष असा निष्कर्ष काढणे योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचा ......................
I (2012) CPJ 1 (SC)
National Seeds Corporation Ltd. Vs. M. Madhusudhan Reddy & Anr.
या निकालपत्रानुसार तज्ञांचा अहवाल हा मुख्य पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येते असे सर्वोच्च न्यायालयाचे मत असल्यामुळे मंच या निष्कर्षाप्रत पोहचतो की, सदोष बियाण्यामुळे तक्रारकर्ता/शेतक-याचे नुकसान झालेले आहे.
11 तक्रारकर्ता यांनी 3 एकर मध्ये बियाण्याची पेरणी केली होती ही बाब सुध्दा दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले की, त्यानां 60 ते 70 क्विंटल भुईमुगाच्या पिकाचे नुकसान झाले ही बाब तक्रारकर्त्याने परिच्छेद क्रं. 6 मध्ये नमूद केली आहे. त्या परिच्छेद 6 ला उत्तर देतांना विरुध्द पक्ष 2 यांनी त्याच्या उत्तरातील परिच्छेद 8 मध्ये याबाबतची कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही कारण त्याच्या वकिलानी तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसच्या उत्तरात याबाबत स्पष्ट खुलासा केल्याचे म्हटले आहे. मंचाने याकरिता अड. शिरीष वेलणकर यांनी पाठविलेल्या परिच्छेद 6 च्या उत्तराचे अवलोकन केले असता त्यामध्ये सुध्दा किती उत्पादन होऊ शकते याबाबतचा कोणताही खुलासा केलेला नाही. विरुध्द पक्ष 2 द्वारे निर्मित बियाणे, एक एकरात किती उत्पादन देते व योग्य मशागत केल्यावर किती उत्पादन देऊ शकते याबाबतचा उल्लेख सुध्दा विरुध्द पक्ष 2 यांच्या वकिलांनी पाठविलेल्या नोटीसच्या उत्तरामध्ये नमूद नाही किंवा विरुध्द पक्ष 2 यांनी मंचासमक्ष दाखल केलेल्या उत्तरात सुध्दा त्याबाबत कुठेही उल्लेख नाही. फक्त तक्रारकर्त्याने केलेली मागणी नाकारणे व त्याकरिता कोणतेही स्वयंस्पष्ट पुरावा न देणे या उपस्थित कारणावरुन तक्रारकर्त्याने केलेले कथन चुकिचे आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.
12 मंचासमक्ष डॉ. शिवाजीराव ठोंबरे यांचे भुईमूग ही पुस्तक व भुईमूग लागवड प्रक्रिया नावाचे दुसरे पुस्तक असे दोन पुस्तके माहितीकरिता दाखल केली. त्याचे सुक्ष्म निरीक्षण व वाचन केले असता तक्रारकर्त्याच्या 3 एकरातील 60 क्विंटल पिकाचे नुकसान झाले असे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने रब्बी हंगामात रु.4100 ते 4300 एवढा भाव प्रति. क्विंटल होता असे आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्याकरिता तक्रारकर्त्याने मंचासमक्ष कृषि उत्पन्न बाजार समिती काटोल येथे बळवंत रामकृष्णाजी धोटे- अडते यांच्याकडे ज्ञानेश्वर धोटे यांनी विकलेल्या भुईमूग माल विक्रीची हिशोब पट्टी दाखल केली आहे. त्यामध्ये रु.4100/- प्रति. क्विंटल भाव होता असे नमूद आहे व त्यासंबंधी प्रतिज्ञालेख सुध्दा ज्ञानेश्वर धोटे यांचे दाखल केले आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती काटोल यांचे कृषि मालाचे कमीत कमी व जास्तीत जास्त भाव वाढीचे पत्र माहे जुन-2011 ते जुलै-2011 असे भाव दिलेले आहे. या दोन्ही भावाचा विचार करता शेतकरी/तक्रारकर्त्यास किमान भाव जरी मिळाला असता तर ज्ञानेश्वर धोटे यांच्याप्रमाणे 4100/- रु. भाव मिळाला असता त्यामुळे सरासरी प्रमाणे 4100/- रु.प्रति.क्विं. ग्राहय धरण्यास काहीच हरकत नाही असे मंचाचे मत आहे. यानुसार तक्रारकर्ता 60 क्विंटलचे रु.2,46,000/- एवढी रक्कम सहजासहज मिळाली असती, यावरुन तक्रारकर्त्याचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते व ते मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सदर रक्कम तक्रारकर्त्यास सन 2011 मध्ये मिळाली असती, त्यामुळे त्यावर 8% दराने व्याज मिळण्यास सुध्दा तक्रारकर्ता पात्र ठरतो. सदर रक्कम विरुध्द पक्षानी आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत तक्रारकर्त्यास न दिल्यास तक्रारकर्ता 10% दराने व्याजसह रक्कम मिळण्यास पात्र राहील असे मंचाचे मत आहे.
तक्रारकर्त्याने शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- ची मागणी केली आहे. सदर रक्कम अवाजवी आहे असे मंचाचे मत आहे. परंतु तक्रारकर्त्यास झालेल्या नुकसानी बाबतची कोणतीही तसदी विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी घेतली नाही. त्याबाबत कोणतीही सहानुभूती दर्शविली नाही व नाईलाजास्तव तक्रारकर्त्यास मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रास झाला याकरिता तक्रारकर्ता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 3000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
सबब आदेश पारित करण्यात येतो की,.................
// आ दे श //
1. तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष 1 व 2 यांच्या सदोष बियाण्यामुळे तक्रारकर्त्याचे झालेले नुकसान रु.2,46,000/- व त्यावर तक्रार दाखल दिनांकापासून म्हणजेच दिनांक 21.10.2011 पासून द.सा.द.शे.8% दराप्रमाणे पूर्ण रक्कम अदा होईपर्यंत व्याजासह द्यावे.
3 विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 10000/- (रुपये दहा हजार) व तक्रार अर्जाचा खर्च रु.3000/-(रुपये तीन हजार) द्यावे.
4 विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्यावरील आदेशाचे पालन, आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसात करावे, अन्यथा उपरोक्त कलम 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक 21/10/2011पासून पूर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे.10% प्रमाणे व्याज द्यावे लागेल, याची नोंद घ्यावी.