(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदारांनी सामनेवाले नं. 1 भागीदारी संस्थेच्या मौ. घोटसाई, सर्व्हे नं. 36, हिस्सा नं. 4A, ता. कल्याण, जि. ठाणे येथील मिळकतीतील बांधकाम प्रोजेक्टमध्ये 350 चौ.फुट क्षेत्रफळाची (1 BHK) सदनिका रक्कम रु. 2,80,000/- किमतीची सदनिका विकत घेण्याचे ता. 24/02/2013 रोजी निश्चित केले.
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे ता. 24/02/2013 रोजी सदर सदनिकेच्या खरेदीपोटी रु. 11,111/- बुकींगची रक्कम भरणा केली. व त्यानंतर वेळोवेळी काही रकमा सामनेवाले यांचेकडे जमा केल्या. अशा प्रकारे तक्रारदार यांनी ता. 24/02/2013 ते ता.14/04/2013 या कालावधीत सामनेवाले यांचेकडे सदनिका खरेदीपोटी एकुण रक्कम रु. 1,40,111/- जमा केले व उर्वरित रक्कम रु. 1,39,889/- सदनिकेचा ताबा घेतांना द्यावयाचे ठरले होते.
3. तक्रारदार यांनी सदर सदनिका खरेदीपोटी रक्कम रु. 1,40,111/- जमा करुनही सामनेवाले यांनी नोंदणीकृत सदनिका खरेदीखत करार केला नाही. तथापी ता. 29/05/2013 रोजी नोटरी समक्ष सदनिका खरेदी खत करार केला आहे. सामनेवाले यांनी सदर करारानुसार ता. 28/11/2013 पर्यंत सदनिकेचा ताबा देण्याचे मान्य व कबुल केले होते. सामनेवाले यांनी करारामध्ये नमुद केल्यानुसार विहीत मुदतीत तसेच अद्याप पर्यंतही सदनिकेचा ताबा दिलेला नाही.
4. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदनिकेचा ताबा अथवा सामनेवाले यांचेकडे सदनिकेपोटी जमा असलेल्या रकमेची मागणी केली असता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर रकमेचे चेक दिले तथापी सदर चेक न वटता “insufficient amount” या शे-याने परत आले. यावरुन सामनेवाले यांचेकडुन तक्रारदार यांना सदर रक्कम परत मिळण्याची शक्यता राहली नाही.
5. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना 16 जुन 2015 मध्ये वकीलामार्फत कायदेशिर नोटिस पाठवली. सदर नोटिस सामनेवाले नं. 2 यांना प्राप्त झाली असून सामनेवाले नं. 1 यांची नोटस “left” या शे-यासह परत आली आहे. सामनेवाले तर्फे नोटिसीला उत्तर नाही तसेच नोटसीप्रमाणे सदनिका ताब्यात देण्याची कार्यवाही सामनेवाले यांनी केली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन सदर सदनिकेचा ताबा अथवा सदनिका खरेदी पोटी जमा असलेली रक्कम परत मिळण्यासाठी प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली आहे.
6. सामनेवाले यांनी लेखी कैफियत विहीत मुदतीत दाखल न केल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण लेखी कैफियती शिवाय पुढे चालविण्याबाबत आदेश मंचाने पारित केला.
7. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचे सखोल वाचन केले यावरुन मंच खालील निष्कर्ष काढत आहे.
1. | सामनेवाले यांना तक्रारदारांनी चाळीतील खोली खरेदीपोटी रक्कम अदा करुनही सदनिका खरेदी कराराप्रमाणे विहीत मुदतीत सदनिकेचा ताबा अथवा सामनेवाले यांचेकडे जमा असलेली रक्कम परत न देऊन त्रुटीची सेवा दिल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे का? | होय |
2. | तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत का? | होय |
3. | अंतिम आदेश? | निकालाप्रमाणे |
8. कारणमिमांसा
अ) तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे ता. 29/03/2013 रोजीच्या करारानुसार मौ. घोटसाई, ता. कल्याण, जि. ठाणे येथील सर्व्हे नं. 36, हिस्सा नं. 4A येथील मिळकतीत विकसित केलेल्या चाळ इमारतीमध्ये 350 चौ.फुट क्षेत्रफळाची खोली / सदनिका (1BHK) रक्कम रु. 2,80,000/- किमतीची विकत घेण्याचे निश्चित केल्याची बाब स्पष्ट होते. सदर कराराची प्रत मंचात दाखल आहे.
ब) तक्रारदार यांनी सदर सदनिका खरेदीपोटी सामनेवाले यांचेकडे रक्कम रु. 1,40,111/- भरणा केल्याबाबतच्या पावत्या मंचात दाखल आहेत. तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. सामनेवाले तर्फे आक्षेप दाखल नाही.
क) वरील परिस्थितीनुसार तक्रारदारांचा पुरावा मान्य करण्यास कोणतीही कायदेशिर अडचण दिसुन येत नाही. तक्रारदारांनी सदनिकेच्या ताब्याची मागणी केलेली असल्यामुळे तक्रार मुदतबाह्य ठरत नाही.
ड) सामनेवाले यांनी सदनिका खरेदी पोटी रु. 1,40,111/- एवढी रक्कम स्विकारुनही सदनिकेचा खरेदी करार नोंदणीकृत करुन सदनिकेचा कायदेशीर ताबा नोटरी समोर केलेल्या करारामध्ये नमुद केलेल्या सोई व सुविधासह दिलेला नसल्याचे तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन स्पष्ट होते.
इ) तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदनिका खरेदी पोटी रक्कम अदा करुनही सदनिकेचा ताबा न दिल्यामुळे तक्रारदारांना निश्चितच मानसिक त्रासास तोंड द्यावे लागले. तसेच प्रस्तुत प्रकरण दाखल करणे भाग पडले आहे. सामनेवाले यांची सेवेतील त्रृटी तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन स्पष्ट झाली आहे. सबब सामनेवाले यानी तक्रारदारांना करारनाम्यामध्ये नमुद केलेल्या सोई व सुविधासह सदनिकेचा ताबा देणे अथवा सामनेवाले यांनी सदनिका खरेदी पोटी स्विकारलेली रक्कम व्याजासह परत करणे न्यायोचित आहे. तसेच नुकसान भरपाई पोटी रक्कम रु. 20,000/- तक्रारीचा खर्च रु. 10,000/- देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
9. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1) तक्रार क्र. 856/2015 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या सदनिका खरेदी पोटी संपुर्ण रक्कम स्विकारुनही अद्याप पर्यंत सदनिकेचा कायदेशिर ताबा न देवुन अथवा सदनिकेपोटी घेतलेली रक्कम परत न करुन त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तकरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मौ. घोटसाई, सर्व्हे नं. 36, हिस्सा नं. 4A, ता. कल्याण, जि. ठाणे येथील 350 चौ.फुट (बिल्टअप) क्षेत्रफळाची (1 BHK) सदनिकेची खरेदी खताची नोंदणी करुन सदनिकेचा कायदेशीर ताबा सोयी सुविधांसह ता. 31/05/2017 पर्यंत द्यावा तसे न केल्यास ता. 01/06/2017 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत प्रत्येक महिन्याकरीता रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावे. तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा प्राप्त झाल्यानंतर पुढील 30 दिवसात सदनिकेची उर्वरित रक्कम रु. 1,39,889/- (अक्षरी रुपये एक लाख एकोनचाळीस हजार आठशे एकोणनव्वद फक्त) सामनेवाले यांना तक्रारदार यांनी अदा करावी.
अथवा
3) सामनेवाले यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांनी सदनिका खरेदीपोटी जमा केलेली रक्कम रु. 1,40,111/- (अक्षरी रुपये एक लाख चाळीस हजार एकशे अकरा फक्त) ता. 29/03/2013 पासून ता. 31/05/2017 पर्यंत द.सा.द.शे 12% व्याजदराने तक्रारदारांना परत द्यावी. सदर रकमा विहीत मुदतीत अदा न केल्यास ता. 01/06/2017 पासून संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे 18% व्याजदराने द्यावे.
4) सामनेवाले यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना नुकसान भरपाईची रक्कम रु. 20,000/- (रु. वीस हजार फक्त) व तक्रार खर्चाची रक्कम रु. 10,000/- (रु. दहा हजार फक्त) ता. 31/05/2017 पर्यंत द्यावेत. सदर रकमा विहीत मुदतीत अदा न केल्यास ता. 01/06/2017 पासून संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे 9% व्याज दरासहीत द्याव्यात.
5) आदेशाच्या प्रती उभय पक्षकाराना विनाविलंब, विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.
6) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.