::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 31/10/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराने दि. 7/1/13 रोजी गैरअर्जदाराचे दुकानात जावून ट्रॅक्टरची चौकशी केली व त्यावेळी अर्जदाराने युवराज 255 हा ट्रॅक्टरखरेदी करण्याकरीता गैरअर्जदारास 3,00,000/- रु. दिले. गैरअर्जदाराने अर्जदारास रितसर असे लिहून दिले. गैरअर्जदाराने अर्जदाराला 15 दिवसाचे आत ट्रॅक्टरचा ताबा न दिल्यामुळे अर्जदाराने वारंवार तोंडी मागणी केल्यानंतर दि. 2/3/13 रोजी गैरअर्जदाराला मागणीपञ पाठविले. गैरअर्जदाराने अर्जदाराला ट्रॅक्टर देण्याची नियत नसल्यामुळे दि. 14/11/12 रोजी युवराज 215 मॉडेलचे ट्रॅक्टर दिले आहे असे सांगून बुक केलेला ट्रॅक्टर देण्यास टाळाटाळ केली. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, वास्तविक अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दि. 14/11/12 रोजी यूवराज 215 ट्रॅक्टर कधीच खरेदी केले नव्हते. तसेच अर्जदाराचे मालकीचे फिर्याद दाखल पर्यंत कोणतेही युवराज 215 मॉडेलचे ट्रॅक्टर नव्हते म्हणून गैरअर्जदाराने पाठविलेले उत्तर खोटे व बनावटी आहे. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार अर्जदाराचे मिञ असून गैरअर्जदाराचे दुकानाचे उदघाटनाच्या वेळी काढलेला फोटोचा गैरअर्जदाराने दुरुपयोग केला आहे तसेच अर्जदाराने दि. 16/11/12 रोजी किंवा इतर कोणत्याही दिवशी इफको टोकियो इन्शुरन्स कंपनीकडे किंवा कोणत्याही कंपनीकडे ट्रॅक्टरच्या विमाचा प्रस्ताव सादर केलेला नाही. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराला असे लिहून दिले कि, दि. 7/5/13 रोजी अर्जदाराच्या खात्यात 2,90,000/- रु. गैरअर्जदार भरणा करणार परंतु त्याने केले नसल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली म्हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने उर्वरित रक्कम 1,10,000/- रु घेवून युवराज 255 ट्रॅक्टर दयावेअथवा ते शक्य नसल्यास 3,00,000/- रु. व्याजासह गैरअर्जदाराने अर्जदारास परत करावे तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक तसेच तक्रारीच्या खर्च अर्जदारास मिळावा.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्र. 5 वर लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले सगळे आरोप खोटे असून ते गैरअर्जदाराला नाकबुल आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, अर्जदाराने दि. 13/11/12 रोजी बुकींग रक्कम रु. 5,000/- देवून युवराज 215 ट्रॅक्टरचा सौदा केला. गैरअर्जदाराने दि. 14/11/12 रोजी सदर ट्रॅक्टरची डिलेव्हरी अर्जदाराला दिली त्यावेळी अर्जदाराची डिलेव्हरी रजिस्टर मध्ये सही घेण्यात आली तसेच डिलेव्हरी देतांना फोटो सुध्दा काढण्यात आले होते. गैरअर्जदाराने पुढेअसे कथन केले आहे कि, अर्जदार हे गैरअर्जदाराचे मिञअसल्यामुळे अर्जदाराने असे सांगितले कि, उर्वरित रक्कम ते नंतर देतील परंतु अर्जदार त्यानंतर 3 महिण्यापर्यंत गैरअर्जदाराकडे कधीच आले नाही. दि. 23/2/13 ला सदर ट्रॅक्टर 215 अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे सर्व्हिसिंग करीता आणले व सर्व्हिसिंग झाल्यानंतर सदर ट्रॅक्टर शो-रुम मधून नेलेला नाही. अर्जदाराने सदर ट्रॅक्टरचा 3 महिणे 12 दिवसापर्यंत वापर केला व त्या ट्रॅक्टर वर अर्जदाराचे नावाने इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कडून इन्शुरन्स काढलेला आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि अर्जदाराने सदर ट्रॅक्टर बदलवून देण्याकरीता गैरअर्जदाराला विनंती केली. अर्जदाराने सदर ट्रॅक्टर वर बाकी रक्कम 2,74,794/- रु निघत होती म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतलेला ट्रॅक्टर व इतर सामानाचे एकूण रक्कम 2,74,794/- गैरअर्जदाराला परतफेडी मध्ये दिले व उर्वरित रक्कम नविन ट्रॅक्टर 255 च्या बुकींग साठी दिले असे एकूण रु. 3,00,000/- अर्जदाराने गैरअर्जदाराला दिले व विनंती केली कि, उर्वरित रक्क्म नविन ट्रॅक्टर 255 च्या बुकींग अमाऊंट मध्ये जमा करावी. परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराला असे सांगितले कि, जुना ट्रॅक्टर विकण्यास वेळ लागु शकतो तो पर्यंत 255 ची डिलेव्हरी देण्यात येणार नाही त्यावर अर्जदाराने संमती दिली म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने दि. 7/1/13 रोजी गैरअर्जदाराचे दुकानात जावून ट्रॅक्टरची चौकशी केली व त्यावेळी अर्जदाराने युवराज 255 हा ट्रॅक्टर खरेदी करण्याकरीता गैरअर्जदारास 3,00,000/- रु. दिले. ही बाब अर्जदाराने दाखल नि. क्रं. 4 दस्त क्रं. अ – 2 व अ- 3 वर सिध्द होत असल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. अर्जदाराने दाखल नि. क्रं. 4 वर दस्त क्रं. अ – 3 (रशिद दि. 7/1/13) ची पडताळणी करतांना असे दिसले कि, गैरअर्जदाराने अर्जदाराकडून युवराज 255 ट्रॅक्टरचे सौदा करीता अर्जदाराकडून रु. 3,00,000/- घेतले आहे. सदर रशिदवर इतर कोणतीही रक्कमेचा उल्लेख करण्यात आलेला दिसून येत नाही तसेच गैरअर्जदाराने इतर कोणत्याही रकमेचा हिशोब किंवा दि. 7/1/13 चे खाते उतारा सदर प्रकरणात दाखल केलेला नाही म्हणून गैरअर्जदाराचे त्याच्या लेखीबयाणात असे म्हणणे कि, त्या 3,00,000/- मध्ये 2,74,794/- रु. युवराज 215 ट्रॅक्टरची उर्वरित रक्कम समाविष्ठ होती हे मंचाच्या मताप्रमाणे ग्राहय धरण्यासारखे नाही. अर्जदाराने दाखल नि. क्रं. 4 वर दस्त क्रं. 10 वर दाखल ग्राहक पंचायत समक्ष झालेला समझोत्यामध्ये असे दर्शविले आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराने घेतलेले युवराज ट्रॅक्टर 255 वरील रक्कम परत करण्याकरीता अर्जदाराच्या बॅंक खात्यात 2,90,000/- रु. जमा करतील. त्या समझोत्यावर गैरअर्जदाराची सही सुध्दा आहे. सदर झालेल्या समझोत्यावर गैरअर्जदाराने त्याच्यालेखीउत्तरात काहीही खुलासा केलेला नाही उलट गैरअर्जदाराने हे ही मान्य केले आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराला युवराज 255 ट्रॅक्टरची डिलेव्हरी दिलेली नाही. सदर प्रकरणात गैरअर्जदाराकडे युवराज ट्रॅक्टर 215 शो – रुम मध्ये सर्व्हिसिंग करीता आला होता त्यांसदर्भात जॉब कार्ड किंवा दस्ताऐवज प्रकरणात दाखल केलेला नाही. गैरअर्जदाराने यूवराज ट्रॅक्टर 215 ची इन्शुरन्स पॉलिसीचा कोणताही प्रपोझल फॉर्म प्रकरणात दाखल केलेला नाही म्हणून युवराज 215 ट्रॅक्टर चे इन्शुरन्स अर्जदाराने काढलेले आहे हे सिध्द झाले नाही. मंचाच्या मताप्रमाणे अर्जदाराने नि. क्रं. 4 वर दस्त क्रं. अ- 3 मधून असे सिध्द झाले आहे कि अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 3,00,000/- रु. युवराज 255 ट्रॅक्टरची बुकिंग करीता दिले होते व दस्त क्रं. अ- 4 वरुन असे निष्पन्न होते कि, अर्जदाराने वारंवार सदर ट्रॅक्टरची उर्वरित रक्क्म देवून डिलेव्हरी / कब्जा मागितला होता तरी गैरअर्जदाराने अर्जदाराला युवराज 255 ट्रॅक्टरची डिलेव्हरी दिली नसून अर्जदाराप्रति न्युनतापूर्ण सेवा दर्शविली आहे तसेच अनूचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
//अंतीम आदेश//
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराला 3,00,000/- रु. 8 टक्के द.सा.द.शे व्याजासह दि.
07/01/2013 पासून आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावी.
3) गैरअर्जदाराने अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रु. 5,000/-
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावी.
4) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 31/10/2014