उभय पक्षकार गैरहजर. श्री.ग.ल.चव्हाण, सदस्यानुसार दिलेले निकालपत्र. ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे. 1. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी की, सामनेवाले हे इमारत बांधकामामधील विकासक आहेत. सामनेवाले यांना साई सदन (श्री.पंडीत सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित ) या इमारतीचा पुर्नविकास करण्यासाठीचे काम देण्यात आले होते. त्यांच्या या नियोजित बांधकामामधील साई सदन 6 वा मजला, येथील सदनिका क्र.603 ही तक्रादार याने त्यांचे नांवे सामनेवाले यांचेकडे नोंदणी केली होती. सदनिकेची जागा 225 चौरस फु ट येवढी होती. याकरीता तक्रारदाराने सामनेवाले यांचेशी दिनांक 15/01/2003 चा सदनिका खरेदी विक्रीचा करारनामा केला. करारनाम्यानुसार सदनिकेची खरेदीची किंमत 5 लाख येवढी ठरली होती. सामनेवाले यांनी प्रस्तुत प्रकरणी मोफा कायद्यातील तरतुदींचा भंग केलेला असून त्यांनी वरील करारनाम्यानुसार सदनिकेचा ताबा तक्रारदाराला देण्यासाठी हेळासांड व हलगर्जीपणा केलेला असून त्यांनी करारानुसार व करारनाम्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे संबंधित सदनिकेचा ताबा तक्रारदाराला अद्याप दिलेला नाही. यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता असून त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे की, सदनिका खरेदीचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी 2.60 लाख येवढे एल.आय.सी.कडून कर्ज घेतले. आणि ही घेतलेल्या कर्जाची रक्कम सामनेवाले यांना दिली. ही रक्कम असुरक्षित झाल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. तक्रार अर्जात नमुद केल्याप्रमाणे दिनांक 15/01/2003 रोजी सदनिका खरेदी विक्रीचा लेखी करारनामा झाल्यानंतर व तक्रारदाराने त्यासाठी एल.आय.सी.कडून घेतलेल्या गृह कर्जाची रक्कम 2.60 लाख सामनेवाले यांना सुपुर्द केल्यानंतर मोफा कायद्यातील तरतुदीनुसार नमुद केलेल्या कालावधीमध्ये सामनेवाले विकासक यांनी साई सदन मधील सदनिका क्रमांक 603 चा ताबा तक्रारदाराला द्यायला हवा होता परंतू अद्याप हा ताबा तक्रारदाराला देण्यात आला नाही. यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. याप्रकरणी सातंत्याने पत्र व्यवहार केला, अर्ज विनंत्या, केल्या. प्रस्तुत प्रकरणी सामनेवाले यांच्याकडे पाठपूरावा केला. परतु सामनेवाले यांचेकडून तक्रारदाराला काही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे तक्रारदाराला मानसिक त्रास व शाररिक त्रास सहन करावा लागला. सामनेवाले यांना पुरेसी रक्कम देऊन देखील सदनिकेचा ताबा न दिल्यामुळे या प्रकरणी न्याय मिळावा या हेतुने तक्रारदार हिने प्रतिज्ञापत्रासह/पडताळणी प्रमाणपत्रासह तक्रार अर्ज दिनांक 28/06/2006 रोजी या मंचासमोर दाखल करुन खालील प्रमाणे विनंत्या केल्या आहेत. 1. सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे व त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे घोषित करावे. 2. सामनेवाले यांचेशी झालेल्या लेखी करारानुसार सदनिका किंमत रु.5 लाख, नोंदणी मुद्रांक शुल्क व अनुषंगीक संकीर्ण खर्चाची रक्कम रु.15000/- परत मिळावेत व या रक्कमेवर 18 दराने सामनेवाले यांचेकडून व्याज मिळावे. 3. सामनेवाले यांच्याकडून मानसिक त्रास, छळ यापोटी रु.7 लाख व आकस्मित खर्चापोटी रु.8 लाख मिळून रक्कम रु.15 लाख मिळावेत. 4. सामनेवाले यांच्याकडून या अर्जाचा खर्च व इतर दाद मिळावी. 2. सामनेवाले क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठवून देखील ते या मंचासमोर उपस्थित राहीले नाहीत किंवा त्यांनी म्हणणे दाखल केले नाही म्हणून दिनांक 07/06/2007 रोजी सामनेवाले क्र.1 व 2 यांचे विरुध्द एकतर्फी आदेश पारीत करण्यात आला. 3. सामनेवाले क्र.3 ते 7 यांनी संयुक्तीकरित्या त्यांचे म्हणणे दाखल केले व तक्रार अर्जातील सर्व आरोप नाकारले. तक्रार अर्ज खोटा, बिन बुडाचा, गैर समजुतीवर आधारलेला, व बेकायदेशीर असल्यामुळे तो पूर्णतः नाकारण्यात यावा असे सामनेवाले यांचे म्हणणे असून त्यांचे सेवेत कमतरता नाही किंवा त्यांनी अनुचित प्रथेचा अवलंब केलेला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. सामनेवाले क्र.3 ते 7 यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले क्र.1 ते 4 हे इमारत बांधकामाचे ठेकेदार व विकासक असल्याचे त्यांना मान्य आहे. सामनेवाले क्र.2 ते 7 हे सामनेवाले क्र.1 चे भागीदार नाहीत. तक्रारदाराने तक्रार अर्जात नमुद केलेली सदनिका खरेदी करण्यासाठी त्याची नोंदणी केली होती. हे त्यांनी मान्य केले आहे. परंतु त्यांनी या प्रकरणी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारदाराने सदनिकेची नोंदणी केल्यानंतर एल.आय.सी.कडून 2.60 लाख त्यासाठी घेतल्याचे कैफीयतीत नमुद केलेले आहे, परंतू तक्रारदार हिच्या पतीने म्हणजेच श्री.किशोर अजमेरा यांनी वर नमुद केलेल्या रक्कमेपैकी 2 लाख सामनेवाले यांचेकडून धनादेशाचे परत घेतले व रक्कम रु.70 हजार ही पे ऑर्डरने परत करण्यात आली. तकारदाराने सदनिकेच्या खरेदीपोटी देय असलेली शिल्लक रक्कम सामनेवाले यांना दिलेली नाही त्यामुळे त्यांना सदनिकेचा ताबा दिलेला नाही. तक्रारदाराने सामनेवाले यांना सदनिकेच्या खरेदीची पूर्ण रक्कम अदा केल्याचा कोणताही लेखी पूरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रार अर्जातील मागण्या सामनेवाले यांनी नाकारल्या असून या परिस्थितीत या मागण्या मान्य करण्याचा प्रश्न उदभवत नाही आणि तक्रार अर्ज नाकारण्यात यावा अशी त्यांची विनंती आहे. 4. तक्रार अर्ज, त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रं, लेखी युक्तीवाद, व पुरावा शपथपत्र, इ.कागदपत्रांचे पहाणी व अवलोकन करुन वाचन केले. उभय पक्षकार मागील कित्येक दिवस गैरहजर असल्याचे रोजनाम्यावरुन दिसून आल्याने व तक्रारदाराने त्यांचा लेखी युक्तीवाद या प्रकरणी दाखल केलेला असल्यामुळे सदर तक्रार अर्ज निकालावर घेण्यात आला. त्यानुसार निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1. | तक्रारदार हे सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे व त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असल्याचे सिध्द करतात काय ? | होय. | 2. | तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून करारनाम्यानुसार रक्कम रु.5 लाख 18 व्याज दराने मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय- रु.2.60 लाख अधिक रु.25000/- द.सा.द.शे. 18 दराने परत करणे. | 3. | तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून मानसीक त्रास, छळ, व आकस्मीत खर्चापोटी रु.15 लाख मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय- रु.25,000/- | 4 | तक्रारदार हे सामनेवाले यांना करारनामा नोंदणी, मुद्रांक शुल्क, व अनुषंगीक संकीर्ण खर्चाची रक्कम रु.15,000/- द.सा.द.शे.18 दराने मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. रु.14,820/- 18 व्याज दराने. | 5 | तक्रारदार हे या अर्जाचा खर्च मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय 5 हजार. |
कारण मिमांसा 5. तक्रारदार हिने सामनेवाले यांच्या तत्कालीन साई सदन या इमारतीतील सदनिका क्रमांक 603 खरेदी करण्यासाठी तीच्या नावे सामनेवाले यांचेकडे नोंदणी केली होती. त्याकरीता दिनांक 15/01/2003 रोजी तसा लेखी रितसर करारनामा केला. हा करारनामा दुय्यम निबंधक, अधिकारी यांचेकडे रितसरपणे नोंदणी केला. त्याबाबतची कागदपत्रे तक्रार अर्जासोबत जोडण्यात आली आहेत. तसेच तक्रारदार हिने सामनेवाले यांचेशी केलेल्या खरेदी विक्रीच्या करारनाम्याची प्रत दाखल केलेली आहे. यावर उभय पक्षकारांच्या सहया असल्याचे दिसून येते. तक्रार अर्जात नमुद केल्याप्रमाणे व सामनेवाले क्र.3 ते 7 यांनी कैफीयतीत म्हटल्याप्रमाणे तक्रारदाराच्या सदनिकेची खरेदी किंमत रु.5 लाख येवढी होती. ही सदनिका खरेदी करण्यासाठी तक्रारदार हिने एल.आय.सी.कडून रक्कम रु.2.60 लाख येवढे गृह कर्ज घेतल्या बाबत सामनेवाले यांना मान्य आहे. त्या बाबतची मुळ कागदपत्रं सोबत दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जात नमुद केल्याप्रमाणे रक्कम रु.2.60 लाख ही रक्कम सामनेवाले यांना सदनिका खरेदीपोटी दिल्याचे नमुद केले आहे. त्यानुसार ही रक्कम सामनेवाले यांना मिळाल्याचे त्यांनी त्यांच्या कैफीयतीत तसे नमुद केलेले आहे. याचाच अर्थ तक्रारदाराने एल.आय.सी.कडून घेतलेली रक्कम सदनिका खरेदीपोटी सामनेवाले यांना दिल्याचे दिसून येते. सामनेवाले यांचेशी तक्रारदाराने जो खरेदी विक्रीचा करार केला आहे, त्यामध्ये तक्रारदाराने सामनेवाले यांना रक्कम रुपये 25,000/- दिल्याची नोंद असून ही रक्कम सामनेवाले यांना मिळाल्याचे नमुद केले आहे. हा करार जोंदणीकृत करार असल्याचे दिसून येते. त्यासाठी तक्रार अर्जासोबत जोडलेल्या पावत्या निशाणी "अ" वर आहेत. त्यामध्ये अनुक्रमे रक्कम रु.6010/- व रु.8,810/- मिळून एकूण रक्कम रु.14,820/- त्यांनी मुद्रांक शुल्क व नोंदणीसाठी खर्च केल्याचे दिसून येते. सामनेवाले यांचेशी खरेदी विक्रीचा करार झाल्यानंतर सामनेवाले यांनी मोफा कायद्यातील तरतुदीनुसार खरेदीची रक्कम तक्रारदार यांचेकडून घेतल्यानंतर सदनिकेचे बांधकाम करारनाम्यातील तरतुदीनुसार विहीत कालावधीत करुन तक्रारदाराला सदनिकेचा ताबा देणे आवश्यक होते. सामनेवाले यांचे म्हणणे की, हे बांधकाम अडल्यामुळे कोर्ट केसेस चालु आहेत. व त्यामुळे बांधकाम झाले नाही असे होते तर सामनेवाले यांनी तक्रारदार हिचे पैसे त्याच वेळी व्याजासहीत परत करणे आवश्यक होते. परंतू तशी कृती सामनेवाले यांनी केलेली नाही. ही त्यांच्या सेवेतील कमतरता असल्याचे दिसून येते. तक्रारदाराचे म्हणणे की, त्यांनी तक्रारदार हिच्या पतीला रक्कम रु. 2.60 लाख पैकी 2 लाख धनादेशाने व उर्वरित रक्कम पे ऑर्डरने परत केली. परंतू त्या बाबत कोणताही कागदोपत्री लेखी पुरावा दाखल केला नाही. त्यामुळे ही रक्कम सामनेवाले यांनी परत केली असे म्हणता येत नाही. सदरची रक्कम परत करण्यास सामनेवाले क्र. 1 ते हे जबाबदार आहेत. सामनेवाले क्र.5 व 7 हे सामनेवाले क्र.1 यांचे भागीदार आहेत हे त्यांनी नाकारले आहे, व ही बाब तक्रारदाराने सिध्द केलेली नाही. म्हणून तक्रारदाराने दिलेली रक्कम तिला परत करण्यास सामनेवाले क्र.1 ते 4 यांची जबाबदारी होती. ती त्यांनी पार पाडलेली नाही ही त्यांच्या सेवेत न्यूनता आहे. व त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते. 6. तक्रारदार हिने सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे सिध्द केलेले आहे. तक्रारदार हिने दिनांक 15/01/2003 रोजी सामनेवाले यांचेशी वरील खरेदी विक्रीचा करार केलेला आहे. या नोंदणीकृत करारनुसार साई सदन या इमारतीतील 603 साठी खरेदीची किंमत रु.5 लाख सामनेवाले यांच्याकडून मिळावी अशी त्यांची विनंती आहे. परंतू उपलब्ध कागदपत्रांची पहाणी व छाननी केली असता तक्रारदार हिने सामनेवाले यांना रक्कम रु.2.85 लाख दिलेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हिला सामनेवाले यांच्याकडून एवढीच रक्कम परत मागता येईल. सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी तक्रारदार हिची घेतलेली रक्कम रु.2.85 लाख घेतलेल्या तारखेपासून द.सा.द.शे. 18 व्याज दराने परत करावी असे आदेशीत करणे योग्य राहील. 7. सदनिकेचा खरेदी विक्रीचा करारनामा हा नोंदणीकृत करारनामा आहे. त्यासाठी उपलब्ध दस्तऐवजामध्ये नमुद केल्याप्रमाणे नोंदणी व मुद्रांकन शुल्काची अदा केलेल्या रक्कमेसह एकूण रक्कम रु.14,820/- खर्च केलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार हिला करारानुसार सदनिकेचा ताबा दिलेला नसल्यामुळे ही रक्कम सामनेवाले 1 ते 4 यांनी तक्रारदार हिला व्याजासहीत परत करणे ही त्यांची जबाबदारी आहे. म्हणून सदरहू रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदार हिला व्याजासहीत परत करावी असे आदेशीत करण्यात येते. 8. तक्रारदार हिने सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे सिध्द केले आहे. तक्रारदार हिने नोंदणी केलेली सदनिका तिला मिळालेली नाही, म्हणून तिला मानसिक त्रास झाला हे नाकारता येणार नाही. परंतू तिने नुकसान भरपाईपोटी मागीतलेली रक्कम रु.15 लाख अवास्तव व अवाजवी असल्याचे दिसून येते. त्यामुळे नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.25,000/- सामनेवाले यांनी द्यावे असे आदेशित करण्यात येते. तसेच या अर्जाच्या खर्चापोटी रकक्म रु.5,000/- द्यावेत असेही आदेशीत करण्यात येते. 9. उक्त विवेचन लक्षात घेता तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यासारखा असल्यामुळे या प्रकरणी मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार अर्ज क्र. 290/2006 ही अंशतः मान्य करण्यात येते. 2. सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या तक्रारदार हिला तीच्याकडून घेतलेली रक्कम रु.2.85 लाख परत करावी, व यावर रक्कम घेतलेल्या तारखेपासून रक्कम फीटेपर्यत द.सा.द.शे.18 दराने व्याज द्यावे 3. सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या तक्रारदार हिला मानसिक त्रास, छळ, यापोटी नुकसान भरपाईची रक्कम रुपये 25,000/- द्यावी, व या अर्जाचा खर्च रु.5000/- द्यावा. 4. सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या तक्रारदार हिला करार नोंदणी करण्यासाठी झालेल्या खर्चाची रक्कम रु.14,820/- परत करावी. व त्यावर दिनांक 15/01/2003 ते रक्कम फीटेपर्यत द.सा.द.शे.9 दराने व्याज द्यावे. 5. सामनेवाले क्र.5 ते 7 यांचे विरुध्दची तक्रार रद्द करण्यात येते. त्यांनी या प्रकरणी स्वतः चा खर्च सोसावा. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या. .
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. JUSTICE S P Mahajan] PRESIDENT | |