सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 5/2014
तक्रार दाखल दि.03-02-2014.
तक्रार निकाली दि.20-08-2015.
1. श्री. शलाक माधव रड्डी,
2. सौ. मैथीली शलाक रड्डी,
दोघे रा. ‘आनंदवर्षा’ स.नं. 2 ब,
प्लॉट नं. 1, सहयोग को-ऑप.हौसिंग
सोसायटी, गोरखपूर, सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
1. मे. श्रध्दा कन्स्ट्रक्शन्स,
या भागीदारी संस्थेतर्फे भागीदार
श्री. बन्सीलाल किशोरलाल लाहोटी,
रा. घर नं. 762,शनिवार पेठ,
अप्सरा दुकान, खण आळी,सातारा. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.आर.एम.खारकर.
जाबदारातर्फे – एकतर्फा.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. जाबदार हे मे. श्रध्दा कन्स्ट्रक्शनचे भागीदार असून सदर भागिदारी संस्थेचा बिल्डिंग डेव्हलपमेंट व कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. प्रस्तुत भागीदारी संस्थेचे खालील भागीदार आहेत. 1. विष्णूदास लक्ष्मीनारायण लाहोटी 2. रोहीणी प्रभाकर आंबेकर 3. शशिकला पुरुषोत्तम रानडे, 4. विजया वसंत कुलकर्णी 5. बन्सीलाल किसनदास लाहोटी हे सर्व भागीदारांचे मुखत्यार असून त्यांनीच इतर सर्व सदनिकाधारकांची खरेदीखते, मुखत्यारपत्राच्या आधारे करुन दिली आहेत. सि.सं.नं. 119/1, 119/2,119/3,119/4,119/5, शुक्रवार पेठ, सातारा हया मिळकती जाबदार यांचे मालकीच्या होत्या.
प्रस्तुत मिळकतीत जाबदार यांनी निवासी वापरायच्या “यशगंगा अपार्टमेंट ‘अ’ व यशगंगा अपार्टमेंट ‘ब’ ” या इमारती संदर्भात बांधकाम पूर्णत्वाचा दाखला सातारा नगरपरिषदेने दि.11/1/1989 रोजी क्र.शासन/शवि./1-1396 ने अदा केलेला आहे. तक्रारदार नं. 1 व 2 यांनी जाबदार यांच्याकडून ‘यशगंगा अपार्टमेंट ब’ या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील दर्शनी भागातील उत्तर बाजूचा दक्षिणाभिमुखी फ्लॅट तिचा हल्लीचा नवा नंबर 5 ब असून त्याचे क्षेत्रफळ 650 चौ.फूट यासोबत टेरेस, जिने अपार्टमेंट सभोवतालची मोकळी जागा इ. सर्व सामाईक सुविधा वापरण्याच्या हक्कासह खरेदी केली आहे. सदर खरेदी घेतले सदनिकेचे व्यतिरिक्त तक्रारदाराने सदर ‘यशगंगा अपार्टमेंट ब’ या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्कींगमधील उत्तरेकडील पूर्वेकडून दुसरे पार्कींगचे क्षेत्र 6 मीटर x 2.5 मी. जाबदारकडून खरेदी केले आहे. प्रस्तुत सर्व मिळकतीची खूषखरेदीखत किंमत रक्कम रु.1,65,000/- अशी ठरविणेत आली असून प्रस्तुत सर्व रक्कम तक्रारदाराने जाबदाराला अदा केली आहे. प्रस्तुत सदनिका व पार्कींगचे क्षेत्र खरेदीपोटी संपूर्ण रक्कम मिळालेच्या मोबदल्यात ‘नो डयूज’ प्रमाणपत्र दि.5/5/1989 रोजीचे पत्राने जाबदाराने तक्रारदार क्र. 1 चे नावे अदा केले आहे. तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी दि. 30/3/1999 रोजी अँनेनस्टी स्कीम खाली जाबदारबरोबर प्रस्तुत मिळकतीचे नोंदणीकृत साठेखत करारनामा करण्यात आला. त्यावेळी ‘यशगंगा अपार्टमेंट’’अ’ व ‘यशगंगा अपार्टमेंट’ ‘ब’ यातील सर्व सदनिकांची विक्री झालेनंतर सोसायटी स्थापन करुन देतो असे आश्वासन साठेखतावेळी जाबदार यांनी दिले होते. सबब तक्रारदाराने नोंदणीकृत साठेखत करुन सदनिका प्रत्यक्ष ताब्यात/कब्जात घेतली. त्यावेळीपासून प्रस्तुत मिळकत तक्रारदार हे मालकी हक्काने कब्जे वहिवाटीत रहात आहेत. तद्नंतर इमारतीच्या बांधकामातील त्रुटी व अभावांमुळे, सेवा व सुविधांच्या अभावामुळे इमारतीतील सर्व सदनिकाधारकांनी जाबदार यांच्याविरुध्द राज्य ग्राहक न्यायमंचात ग्राहक तक्रारी दाखल केल्या होत्या. सर्व ग्राहक तक्रारीच्या न्यायनिवाडयानंतर जाबदाराने तक्रारदार व्यतिरिक्त इतर सर्व सदनिकाधारकांची नोंदणीकृत खरेदीपत्रे करुन दिलेली आहेत. मात्र जाणूनबुजून तक्रारदाराचे सदनिकेचे खरेदीपत्र करुन दिले नाही व सेवात्रुटी दिली आहे. तक्रारदाराने जाबदार यांना भेटून वारंवार खूषखरेदीपत्र करुन देणेची विनंती केली. परंतू प्रत्येक वेळेस जाबदाराने नुसते आश्वासन दिले. परंतू अद्यापपर्यंत जाबदाराने तक्रारदाराचे सदनिकेचे व पार्कींगचे खुषखरेदीपत्र करुन दिलेले नाही. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली असलेने जाबदाराला दि.13/12/2013 रोजी रजि.पोष्टाने नोटीस पाठवली. परंतू सदर नोटीस तक्रारदाराने घेतली नाही. ’अनक्लेम्ड’ या शे-याने परत आली आहे. जाबदार हे जाणूनबुजून तक्रारदाराचे खरेदीपत्र करुन देणेस टाळाटाळ करत आहोत. सबब तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांनी तक्रारदार यांना वादातील मिळकतीचे खूषखरेदीपत्र (नोंदणीकृत) करुन द्यावे. तसेच अर्जाचा खर्च जाबदारकडून मिळावा ही विनंती केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 व 3 कडे अँफीडेव्हीट, नि. 6 चे कागदयादीसोबत नि. 6/1 ते नि. 6/10 कडे अनुक्रमे सदनिकेचे नोंदणीकृत साठेखत, सि.स.नं.191/1 ते 191/5, शुक्रवार पेठ, सातारा यांचा एकत्रीत काढलेला सिटी सर्व्हेच्या नकाशाची प्रत, मालमत्तापत्रक, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, जाबदाराने तक्रारदाराला दिलेली पावती, जाबदाराने तक्रारदाराला दिलेले ‘नोडयूज’ प्रमाणपत्र, जाबदार यांना तक्रारदाराने पाठवलेली नोटीस, नोटीसची रजि.पावती, नोटीस ‘अनक्लेम्ड’ शे-याने परत आलेला लखोटा नि. 10 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 12 सोबत नि. 12/1 कडे खरेदी करारपत्र, नि. 12/2 कडे खूषखरेदीपत्र (शिवाजी सकुंडे यांचे), नि.17 कडे मे. मंचाने जाबदाराला पाठवले नोटीसची पोहोचपावती, नि. 18 कडे परत आलेला नोटीसचा लखोटा, नि. 19 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. जाबदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्जाची मे. मंचाची रजि.नोटीस लागू होवूनही प्रस्तुत जाबदार मे. मंचात हजर राहीलेले नाहीत व म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब जाबदारविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झाला आहे. जाबदाराने प्रस्तुत कामी तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब तक्रार अर्जातील तक्रारदाराने नमूद केलेली कथने योग्य व खरी आहेत असे गृहीत धरणे न्यायोचीत होईल व त्यामुळे तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेली मागणी योग्य आहे या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे.
5. प्रस्तुत कामी वर नमूद सर्व कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवाद यावरुन प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे. मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी जाबदार यांचेकडून सि.स.नं. 119/1,119/2,119/3, 119/4,119/5, शुक्रवार पेठ,सातारा या मिळकतीवर जाबदाराने ‘यशगंगा अपार्टमेंट ब’ या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील दर्शनी भागातील उत्तर बाजूचा दक्षिणाभिमुखी फ्लॅट त्याचा नवा नंबर 5 ब असून क्षेत्रफळ 650 चौ. फूट यासोबत टेरेस, जिने व अपार्टमेंट सभोवतालची मोकळी जागा इ. सर्व सामाईक सुविधा वापरण्याच्या हक्कासह खरेदी केली आहे व सदनिकेबरोबरच प्रस्तुत अपार्टमेंट मधील इमारतीच्या तळमजल्यावरील पार्कींगमधील उत्तरेकडील पूर्वेकडून दुसरे पार्कींगचे क्षेत्र 6 मीटर x 2.5 मी. जाबदार यांचेकडून खरेदी केले आहे. प्रस्तुत सर्व मिळकतीची खूषखरेदी किंमत रक्कम रु.1,65,000/- (रुपये एक लाख पासष्ट हजार फक्त) तक्रारदाराने पूर्णपणे अदा केली आहे व जाबदाराने तक्रारदाराला ‘नो-डयूज’ सर्टिफिकेट दिले आहे. तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी दि.30/03/1999 रोजी अँमेनस्टी स्किमखाली जाबदारबरोबर प्रस्तुत मिळकतीचे नोंदणीकृत साठेखत/करारनामा करण्यात आला. प्रस्तुतचे साठेखत मूळ प्रत तक्रारदाराने नि. 12/1 कडे दाखल केले आहे. सबब तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत हे निर्विवाद सिध्द होत आहे. तसेच प्रस्तुत जाबदार नोटीस लागू होऊनही याकामी हजर झालेले नाहीत त्यामुळे जाबदार यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. जाबदार क्र. 1 व 2 यांनी प्रस्तुत इमारतीमधील इतर फ्लॅट धारकांना खूषखरेदीपत्रे करुन दिली आहेत. परंतू प्रस्तुत तक्रारदार यांना जाबदाराने जाणूनबुजून खूषखरेदीपत्र करुन दिलेले नाही तर तक्रारदाराने वारंवार विनंती केली असता मुद्दामहून टाळाटाळ करत आहेत ही बाब सेवेतील त्रुटीच ठरते. याकामी जाबदार नोटीस लागू होवूनही हजर झाले नाहीत किंवा त्यांचे म्हणणेही दाखल केलेले नाही. यांनी तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही सबब तक्रारदाराने केलेली विनंती मान्य करणे न्यायोचीत होणार आहे. तसेच तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथने बरोबर आहेत असे गृहीत धरणे मे. मंचास वाटते. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराकडून प्रस्तुत सदनिकेची खरेदीची सर्व रक्कम स्विकारुन तक्रारदाराला ‘नो-डयूज’ चे पत्र दिलेले आहे. प्रस्तुत पत्र नि. 6/10 कडे दाखल आहे. यासर्व बाबींची तक्रारदार यांनी पूर्तता केली असतानाही जाबदाराने तक्रारदार यांना जाणीवपूर्वक वादातीत सदनिकेचे खरेदीपत्र करुन देणेस टाळाटाळ केली आहे ही सेवात्रुटीच आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब आम्ही वरील मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे. वरील सर्व बाबींचा तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करता प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदार क्र. 1 व 2 यांना तक्रार अर्जात नमूद तक्रारदाराचे ‘यशगंगा ब’ या अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील दर्शनी भागातील उत्तर बाजूचा दक्षिणाभिमूखी फ्लॅट नवा नंबर 5 ब क्षेत्रफळ 650 चौ. फूट तसेच इमारतीच्या तळमजल्यावरील पार्कींग मधील उत्तरेकडील पूर्वेकडून दुसरे पार्कींगचे क्षेत्र 6 मीटर X 2.5 मी.यांचे खूषखरेदीपत्र तक्रारदार यांना करुन देणे न्यायोचित होणार आहे.
7. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार क्र. 1 व 2 यांना ‘यशगंगा ब’ या अपार्टमेंटमधील
पहिल्या मजल्यावरील दर्शनी भागातील उत्तर बाजूचा दक्षिणाभिमुखी फ्लॅट
नवा नंबर 5 ब चे तसेच तळमजल्यावरील पार्कींगमधील उत्तरेकडील पूर्वेकडून
दुसरे पार्कींगक्षेत्र 6 मीटर X 2.5 मी. याचे नोंदणीकृत खूषखरेदीपत्र करुन
द्यावे.
3. तक्रार अर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त)
अदा करावेत.
4. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांचे आत
करावे.
5. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
7. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 20-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.