(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 28 डिसेंबर, 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारकर्त्याने स्वतःच्या घरातील लोकांची उपजिविका चालविण्यासाठी व स्वतःच्या उपभोगाकरीता विरुध्दपक्षाकडून खालील वर्णन केलेले 60 टन वजनाचे वेट ब्रीज मशीन दिनांक 18.9.2016 ला खरेदी केलेले होते, ते पुढील ‘परिशिष्ट–अ’ प्रमाणे आहे.
‘परिशिष्ट – अ’
अ.क्र. | क्षमता | अकुरेसी | प्लेटफॉर्म | टाईप | किंमत (रुपये) |
1) | 60 टन | 10 कि.ग्रा./5 कि.ग्रा. | 9 एम 3 एम | प्लॅटफॉर्म | 2,71,000/- |
3. विरुध्दपक्ष सदरचे वेट ब्रीज मशीन तक्रारकर्त्याच्या दिलेल्या पत्यावर वाहतुकीव्दारे (ट्रान्सपोटव्दारे) पाठविणार होते. विरुध्दपक्षाने वाहतुकीचा खर्च सुध्दा वरील दिलेल्या वेट ब्रीजच्या एकूण किंमतीमध्ये समायोजीत केले होते. तक्रारकर्तीस विरुध्दपक्षाने वरील खरेदी केलेल्या वेट ब्रीज व वातुकीच्या खर्चासंबंधी पावती दिलेली आहे. तक्रारकर्ता पुढे नमूद करतो की, विरुध्दपक्ष तक्रारकर्तीच्या वरील पत्यावर वेट ब्रीज लावून देणार होते, त्याकरीता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास रुपये 1,00,000/- अग्रीम दिनांक 18.9.2016 ला चेक/धनादेश क्रमांक 807953 पंजाब नॅशनल बँक, खामला ब्रॅन्च व्दारे दिलेले होते. सदर चेक विरुध्दपक्षाने दिनांक 20.9.2016 रोजी वटविला सुध्दा होता. ठरल्याप्रमाणे सदरची रक्कम विरुध्दपक्षास प्राप्त झाल्यापासून ते तक्रारकर्तीच्या वरील पत्यावर नमूद वेट ब्रीज 15 दिवसांत लावून देणार होते व उर्वरीत रक्कम रुपये 1,71,000/- हे वरील नमूद दिलेल्या वेट ब्रीज स्थापीत/ बसवून दिल्यानंतर तक्रारकर्त्यास देणार होते.
4. परंतु, विरुध्दपक्षाने वरील नमूद वेट ब्रीज आजतागायत दिलेल्या तक्रारकर्त्याच्या पत्यावर बसवून दिले नाही किंवा तक्रारकर्त्याच्या पत्यावर सदर वेट ब्रीज मशीन वाहतुकीव्दारे पोहचविली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास दिलेल्या रकमेची म्हणजेच रुपये 1,00,000/- ची रितसर पावती सुध्दा तक्रारकर्त्यास दिलेली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास सदर वेट ब्रीज बसवून देण्यासंबंधी वारंवार विनंती केली. परंतु, विरुध्दपक्षाने कोणत्या-ना-कोणत्या कारणावरुन वेट ब्रीज बसवून देण्यासाठी टाळाटाळ केली. सबब विरुध्दपक्षाची सदरची कृती ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत येत असून विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या दिलेल्या पत्यावर वेट ब्रीज मशीन बसवून न दिल्याने त्यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते व सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द होते. त्यानंतर, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास दिनांक 10.11.2016 ला कायदेशिर नोटीस बजाविली, तरीही विरुध्दपक्षाने सदर वेट ब्रीज तक्रारकर्त्याच्या वरील पत्यावर बसवून दिले नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे वेट ब्रीज मशीन स्थापित करण्याकरीता दिलेली अग्रीम रक्कम रुपये 1,00,000/- ही द.सा.द.शे. 18 % व्याजासह तक्रारकर्त्याचे हातात पडेपर्यंत द्यावे.
2) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या मानिकस, शारिरीक त्रासापोटी रुपये 50,000/-, तसेच नोटीस खर्च रुपये 2,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 10,000/- मागितले आहे.
5. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत दिनांक 12.4.2017 ला मंचात उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती. सदर नोटीस विरुध्दपक्षास दिनांक 20.4.2017 रोजी प्राप्त झाल्याचा अहवाल दाखल आहे. विरुध्दपक्षास नोटीस प्राप्त होऊनही ते मंचात हजर झाले नाही, करीता त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी क्र.1 वर दिनांक 11.7.2017 ला पारीत केला.
6. तक्रारकर्ता तर्फे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारकर्ता तर्फे अभिलेखावर दाखल केलेली तक्रार व दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
7. तक्रारकर्त्याने स्वतःच्या घरातील लोकांची उपजिविका चालविण्यासाठी व स्वतःच्या उपभोगाकरीता विरुध्दपक्षाकडून 60 टन वजनाचे वेट ब्रीज मशीन दिनांक 18.9.2016 ला खरेदी करण्याकरीता विरुध्दपक्षास रुपये 1,00,000/- अग्रीम रक्कम धनादेश क्र.807953 पंजाब नॅशनल बँक, खामला शाखा व्दारे दिला होता. विरुध्दपक्षाने सदर धनादेश दिनांक 20.9.2016 ला वटविला सुध्दा होता. याचाच अर्थ वरील धनादेशाची रक्कम रुपये 1,00,000/- विरुध्दपक्षास मिळाली आहे. त्याची पावती निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.1 वर लावलेली आहे. त्याचप्रमाणे दस्त क्र.2 वर सदर मशीनचे कोटेशन सुध्दा लावलेले आहे व दस्त क्र.3 वर सदर वेट ब्रीज मशीनचे एकूण किंमत रुपये 2,71,000/- मध्ये वाहतुकीचा खर्च (ट्रान्सपोर्टेशन) समाविष्ट केलेला आहे याबाबतचा दस्त दाखल आहे.
8. विरुध्दपक्षास सदर वेट ब्रीज मशीन तक्रारकर्त्याच्या वरील पत्यावर 15 दिवसाचे आत बसवून द्यावयाचे होते. परंतु, विरुध्दपक्षाने आजतागायत ती मशीन बसवून दिलेली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे यासंबंधी वारंवार विरुध्दपक्षाकडे विनंती सुध्दा केली, परंतु त्यांनी कोणत्या-ना-कोणत्या कारणाने टाळाटाळ केली. त्यामुळे, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास दिनांक 10.11.2016 कायदेशिर नोटीस बजाविली. विरुध्दपक्षाने त्याचे देखील उत्तर दिले नाही व सदर वेट ब्रीज मशीन देखील उपरोक्त पत्यावर स्थापित करुन दिले नाही. यावरुन, विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते व सेवेत त्रुटी केली असल्याचे सिध्द होते. करीता, मंच सदर तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास रुपये 1,00,000/- द.सा.द.शे.9% व्याज दराने दिनांक 20.9.2016 पासून येणारी रक्कम तक्रारकर्त्याच्या हातात मिळेपर्यंत द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 28/12/2017