श्रीमती दिप्ती अ. बोबडे, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.च्या कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशाप्रकारे आहे की, वि.प. हा तक्रारीत नमूद पत्यावर राहत असून त्याचा मे. सौरभ मेडीकल अँड जनरल स्टोर्स या नावाने मौदा येथे फार्मसी आहे. त्या फार्मसीचा तो मालक व रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे व त्याचा औषध विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारकर्तीने दिनांक 26.11.2015 ला तिचे रामटेक येथील फॅमीली डॉक्टर डॉ. पोर्णिमा लोधी यांनी दिलेली औषधी व चेह-याला लावावयाचे जेल हे वि.प.च्या औषधी दुकानातून विकत घेतले. त्यावेळी वि.प.ने डॉक्टरांनी दिलेला Aloederm Ointment या क्रीमऐवजी Derobin Ointment हे क्रिम दिले. तक्रारकर्तीने त्याबद्दल विचारले असता वि.प.ने दोन्ही औषधीचे कंटेंट्स एकच आहे फक्त कंपनीचे नाव वेगळे आहेत. त्यामुळे काही एक फरक पडत नाही असे सांगून तक्रारकर्तीस औषधांचे पक्के बिल दिले. परंतू ते क्रीम लावल्यामुळे तक्रारकर्तीच्या चेह-यावर लालसर डाग पडून तिचा चेहरा काळा पडला. तेव्हा स्कीन स्पेशालिस् डॉ. विनय रहांगडाले, भंडारा यांना दाखवले असता त्यांनी सांगितले की, तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या प्रीस्क्रीप्शनमधील Aloederm Ointment याऐवजी वि.प.ने दिलेल्या Derobin Ointment या चुकीच्या औषधीमुळे तुम्हाला रीएक्शन आली. त्यामुळे तुमच्या चेह-यावर लाल डाग पडून चेहरा काळा पडला आहे. अशाप्रकारे वि.प.ने निष्काळजीपणामुळे दिलेल्या चुकीच्या क्रीममुळे तक्रारकर्तीला आपले सौंदर्य गमावून बसावे लागले व तक्रारकर्तीचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले. त्यानंतर तक्रारकर्तीला डॉ. आशुतोष मेहता, स्कीन स्पेशालिस्ट नागपूर यांच्याकडे उपचार घ्यावे लागले. तक्रारकर्तीने दि.28.11.2015 ला पो.स्टे.मौदा येथे वि.प.ची तक्रार केली व दि.29.11.2015 रोजी मा. सहा. आयुक्त, अन्न व औषधी प्रशासक, नागपुर यांच्याकडे वि.प. विरुध्द तक्रार दाखल केली. सहा. आयुक्त, अन्न व औषधी प्रशासक, नागपुर यांनी सर्व चौकशी, पंचनामा करुन वि.प.ला दोषी ठरवून दि.29.01.2016 पासून वि.प.चे औषधी विक्रीकरीता असलेले सर्व परवाने रद्द करण्यात येत असल्याबाबतचे वि.प.ला कळविले. वि.प.ने या आदेशावर अपील दाखल केली. दि.07.01.2016 रोजी मा. राज्यमंत्री, अन्न व औषधी प्रशासन, महाराष्ट्र यांनी वरील आदेशास तात्पुरती स्थगीती दिली. वि.प.ने डॉक्टरांनी दिलेल्या प्रीस्क्रीप्शन मधील औषधाऐवजी दुसरेच औषध देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व त्याच्या सेवेत त्रुटी ठेवली करीता तक्रारकर्तीला ही तक्रार दाखल करावी लागली. तक्रारीत तिने चेहरा विद्रुप झाला, त्याकरीता केलेल्या औषधोपचाराकरीता तिला आलेला खर्चाकरीता रु.3,00,000/- वि.प.ने द्यावे झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाकरीता रु.10,00,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.1,00,000/- वि.प.ने द्यावे अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारीदाखल दस्तऐवज क्र. 1 ते 25 दाखल केले.
3. सदर तक्रारीची नोटीस वि.प.ला पाठविली असता त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. वि.प. हा एक रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे. डॉक्टरांनी सांगितले औषधी देतांना त्याची काय जबाबदारी असते याचे त्याला भान आहे. तक्रारकर्तीला दिलेले Derobin Ointment हे दि.26.11.2015 ला डॉक्टरांच्या प्रीस्क्रीप्शनप्रमाणे दिले होते. तक्रारकर्तीने दस्तऐवज क्र. 1 वर दिलेले प्रीस्क्रीप्शन हे माझ्यासमोर कधीच आणले नव्हते. जर वि.प.ने प्रीसक्रीप्शनशिवाय दुसरे औषध दिले असते तर वि.प.ने औषधांचे बिल दिले नसते. पण इथे वि.प.ने औषधांचे बिल दिलेले आहे. तक्रारकर्तीने सांगितल्याप्रमाणे तिला त्या प्रमाणात क्रीमची रीएक्शन आलेली नाही. Derobin हे क्रीम त्वचेच्या वेगवेगळया विकारांवर उपयोगी असे क्रीम आहे. त्यामुळे ते तक्रारकर्त्याच्या आजारावर पूर्णतः असे उपयोगी नाही असे नाही. त्वचा विकारांवरील औषधीचा काही प्रमाणात रीएक्शन येतात. पण त्या औषधी बंद करताच थांबू पण शकतात. Derobin क्रीममुळे तक्रारकर्तीने सांगितल्याप्रमाणे रीएक्शन येत नाही. उलटपक्षी, तक्रारकर्त्याला दुसरेच मोठया प्रमाणातील त्वचेचे आजार असतील व ती सगळा दोष Derobin क्रीमच्या लावण्यामुळे झाला असे सांगत असेल. तक्रारकर्ती हे सर्व ह्या कारणास्तव करीत आहे की, तिने वि.प.ला मागणी केल्याप्रमाणे वि.प.ने तिला रु.5,00,000/- दिले नाही. तक्रारकर्तीने ही तक्रार वि.प.कडून रु.5,00,000/- उकळण्याकरीताच दाखल केली आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या औषधांच्या बिलावरुन तिला फक्त रु.3772/- एवढाच औषधांचा खर्च आला आहे. परंतू ती तक्रारीत सांगते आहे की, तिला रु.3,00,000/- एवढा उपचाराकरीता औषधांचा खर्च आला. तसेच दि.09.06.2016 चे जे औषधांचे दोन बिल तक्रारकर्तीने दाखल केले ते पूर्णतः चुकीचे आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन हे स्पष्टपणे दिसून येते की, डॉ. रहांगडाले यांनी तिला Derobin ची क्रीमची रीएक्शन आली हे सांगितले नव्हते. त्यानंतर ती जेव्हा डॉ. मेहता कडे दि.25.01.2016 कडे गेली तेव्हा त्यांनी तिला Derobin ची रीएक्शन आहे असे सांगितले. म्हणजेच क्रीम लावल्याच्या दोन महीन्यानंतर. जर तिला Derobin क्रीमची रीएक्शन आली असती तर तिला तसे डॉ. रहांगडाले यांनी लगेच सांगितले असते व तिने ते क्रिम लावणे लगेच बंद करायला पाहिजे होते. पण डॉ.रहांगडाले यांनी तिला Derobin ची रीएक्शन आहे असे सांगितले नाही. तसेच डॉ. रहांगडालेच्या प्रीसक्रीप्शनवर तक्रारकर्त्याचे पेशंट म्हणून नाव हे डॉक्टरांच्या हस्ताक्षरात नाही. यावरुन हे लक्षात येते की, तक्रारकर्तीला Derobin ची क्रीम लावल्यामुळे कुठलीच रीएक्शन आली नाही. उलटपक्षी, तिने खोटी गोष्ट मंचासमोर मांडली आहे. तक्रारकर्तीला त्वचेचा दुसराच भयंकर आजार आहे व त्यासाठी तिला नेहमीच औषधी घ्यावे लागतात. तक्रारकर्तीने दाखल केलेले 22.03.2017 चे डॉ. मेहताचे सर्टीफिकेट हे पूर्णतः तिने सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी बनवून दिले आहे. तेव्हा त्याची तज्ञांच्या हस्ते चौकशी व्हावी असे वि.प.चे म्हणणे आहे. तक्रारकर्तीने खोटी तक्रार दाखल केली असून वि.प.ने ती खारिज करण्याची विनंती केली आहे.
4. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यावर मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकीलांमार्फत ऐकला. तसेच मंचाने दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- नि ष्क र्ष -
5. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 1 वरुन हे दिसून येते की, दि.25.11.2015 ला ती डॉ. पोर्णिमा लोधी यांच्या दवाखान्यात उपचाराकरीता गेली होती व डॉक्टरांनी तिला Tablet 1AL tab-Zintac व Aloederm क्रीम या औषधांचे प्रीस्क्रीप्शन लिहून दिले होते. तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केले की, दुस-या दिवशी म्हणजे दि.26.11.2015 ला ती वि.प.च्या दुकानात वरील प्रीस्क्रीप्शन घेऊन गेली व त्यातील औषधांची मागणी केली . परंतू वि.प. आपल्या उत्तरात या गोष्टीला विरोध करतो की, तक्रारकर्ती ही डॉ. लोधींचे प्रीस्क्रीप्शन घेऊन आली होती. त्याच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्तीने दस्तऐवज क्र. 1 वर जे प्रीस्क्रीप्शन जोडले आहे ते घेऊन ती त्याच्या दुकानात आली नव्हती. तिच्या प्रीस्क्रीप्शनमध्ये Derobin हेच क्रीम होते व तेच क्रीम त्याने तिला दिले. दस्तऐवज क्र. 1 वरचे प्रीस्क्रीप्शन त्याच्यासमोर कधीच आले नाही. तसेच तक्रारकर्तीसुध्दा त्याच्या दुकानात आली नव्हती. सदरचे वि.प.चे म्हणणे मंचास मान्य नाही कारण दस्तऐवज क्र. 1 च्या डॉ. लोधींच्या प्रीस्क्रीप्शनवर Aloederm हे क्रीम स्पष्टपणे लिहून आहे. त्यावर Derobin हे क्रीम लिहिले नाही. डॉक्टरांनी दिलेल्या प्रीस्क्रीप्शनशिवाय दुसरे प्रीस्क्रीप्शन घेऊन कोणीही जाणार नाही. तसेच दस्तऐवज क्र. 22 जे की, स्वतः वि.प.ने मा. सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नागपूर यांना लिहिलेले पत्र आहे. त्यात वि.प.ने स्वतः नमूद केले की, ‘’दि.26.11.2015 ला दुकानात असतांना एक पेशंट औषधींचे प्रीस्क्रीप्शन घेऊन आली व त्यावर डॉक्टरांचे नाव पी. लोधी खाली डॉक्टरांची डीक्री एम बी बी एस व त्यानंतर पेशंटचे नाव पल्लवी चाडे (तक्रारीत नमूद झाडे) व त्याखाली औषधीचे प्रीस्क्रीप्शन लिहिले होते.’’ यावरुन हे स्पष्ट होते की, डॉक्टर लोधीचे प्रीस्क्रीप्शन घेऊन तक्रारकर्ती दि.26.11.2015 ला वि.प.च्या दुकानात गेली होती. पुढे वि.प. म्हणतो की, प्रीस्क्रीप्शनवर Derobin हे ऑईनमेंट लिहून होते. परंतू वि.प.चे हेही म्हणणे मान्य करता येणार नाही कारण ते जर डॉ. लोधीचे प्रीस्क्रीप्शन होते तर डॉ. लोधी यांचे प्रीस्क्रीप्शन दस्तऐवज क्र. 1 वर आहे व त्यामध्ये स्पष्टपणे Aloederm हे क्रीम लिहिले आहे. डॉ. लोधी यांनी श्रीमती धवड औषध निरीक्षक नागपूर यांना दिलेल्या जवाबामध्ये त्यांनी Aloederm हे क्रीम लिहून दिले होते असे नमूद केले (दस्तऐवज क्र. 17). तेव्हा वि.प.चे म्हणणे की, प्रीस्क्रीप्शनवर Derobin ऑईनमेंट लिहून होते व त्याने तेच दिले हे खोटे आहे असे मंचास दिसून येते. यावरुन हे सिध्द होते वि.प.ने तक्रारकर्तीस प्रीस्क्रीप्शनमधील Aloederm ऐवजी Derobin क्रीम दिले होते. तसेच ते वि.प.ने दिलेल्या औषधाचे बिल क्र. SMS2905 (दस्तऐवज क्र. 2) यावरुन ते सिध्द होते.
6. आता मंचासमोर दोन प्रश्न उपस्थित होतात एक हा की, Derobin या क्रीममुळे त्वचेवर रीएक्शन येऊ शकते काय व आल्यास किती प्रमाणात आणि दुसरा प्रश्न हा Derobin क्रीममुळे तक्रारकर्तीस रीएक्शन आली का व किती प्रमाणात.
7. Derobin क्रीममधील Dithranol या content मुळे रुग्णास त्रास झाला असे डॉ. लोधी यांनी श्रीमती धवड औषध निरीक्षक नागपूर यांना दिलेल्या जवाबामध्ये (दस्तऐवज क्र. 17) मध्ये नमूद आहे. तसेच डॉ. आशूतोष मेहता यांनी दिलेल्या दि.25.01.2016 च्या प्रीस्क्रीप्शनमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, “C D due to Derobin” (दस्तऐवज क्र. 9) तसेच दस्तऐवज क्र. 10 जे डॉ. मेहता यांचे सर्टिफिकेट आहे त्यावर त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, तक्रारकर्ती ही त्यांच्याकडे “Contact Dermatitis due to Derobin” साठी उपचार घेत आहे. (म्हणजेच Derobin मुळे आलेल्या रीएक्शनसाठी) तसेच अभिलेखावर दाखल तज्ञ अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, “Any ointment containing chemicals including Derobin can cause drug reaction depending upon the dose and duration of that ointment application.” तसेच, अभिलेखावरील पृष्ठ क्रं.52 व 53 वरील दिनांक 2.12.2015 व 3.12.2015 चे दस्तऐवज क्र.16 जे इंदिरागांधी गव्हरमेंट मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटल, नागपुर येथील डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन आहे. यामध्ये सुध्दा “Reaction of application of Derobin ointment” असे नमुद आहे. वरील तक्रारीत दाखल दस्तऐवजांवरुन हे सिध्द होते की, Derobin या क्रीममुळे त्वचेवर रीएक्शन येऊ शकते.
8. आता दुसरा प्रश्न हा आहे की, Derobin क्रीम लावल्यामुळे तक्रारकर्तीस त्वचेवर रीएक्शन आली का व किती प्रमाणात आली. तक्रारकर्तीने नमूद केले की, क्रीम लावल्यानंतर तिच्या चेह-यावर लालसर डाग पडले, चेहरा काळा पडला व विद्रुप झाला व तिचे कधीही भरुन न येण्यासारखे नुकसान झाले आणि तिचे सौंदर्य कायमचे नष्ट झाले. वि.प.च्या म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्तीचे हे म्हणणे खोटे आहे. Derobin हे क्रीम त्वचा विकारावर औषध आहे. जसे की, Chronic Dermatoses, skin redness, Eczema, Psoriasis etc. सर्वच त्वचा विकारावरील औषधांच्या थोडया प्रमाणात रीएक्शन येतात व ते औषध वापरणे बंद केल्यावर थांबतात. इथे परत एकदा डॉ. लोधी यांनी दिलेला जवाब (दस्तऐवज क्र. 17), डॉ. मेहता यांचे प्रीस्क्रीप्शन (दस्तऐवज क्र. 9) व डॉ. मेहता यांचे सर्टिफिकेट (दस्तऐवज क्र. 10) इंदिरागांधी गव्हरमेंट मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटल, नागपुर येथील डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन (दस्तऐवज क्र.16) या दस्तऐवजांचे मंचाने अवलोकन केले असता असे स्पष्टपणे दिसून येते की, तक्रारकर्तीने Derobin क्रीम लावल्यामुळे तिच्या चेह-यावर रीएक्शन आली व त्याकरीता ती डॉ. मेहता यांचे 25.01.2016 पासून औषध घेत आहे व अजूनही तिचे उपचार सुरुच आहे. म्हणजे साधारणतः तक्रारकर्ती दोन वर्षापासून औषध घेत आहे. ज्याअर्थी, ती इतक्या दिर्घ कालावधीपासून Derobin क्रीमच्या रिएक्शनकरीता औषधे घेत आहे त्यावरुन Derobin क्रीमच्या वापरामुळे तक्रारकर्तीच्या चेह-याला जास्त नुकसान (Damage) झाल्याचे स्पष्ट दिसुन येते. येथे मंचाने सुध्दा Derobin क्रीम बाबत ऑन लाईन सर्च केले असता मंचाला असे निदर्शनास आले की, Derobin क्रीम हे सोरॉयसीस या त्वचा विकारांवरील औषध असुन त्याच्या साईड इफेक्ट संदर्भात त्वचेवर लाल चट्टे पडणे, त्वचा जळून काळी पडणे अशी लक्षणे सांगितली आहे. यावरुन तक्रारकर्तीचे म्हणणे की, Derobin क्रीमच्या वापरामुळे तिच्या चेह-यावर डाग पडले, चेहरा काळा पडला व विद्रृप झाला यामध्ये तथ्य दिसत असुन ते मंचास मान्य करण्यास काहीच हरकत नाही.
9. विरुध्दपक्षाने डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनमधील Aloederm या क्रीम ऐवजी पुर्नतः वेगळे Contents असलेले Derobin हे क्रीम Contents सारखेच आहे फक्त कंपनीचे नाव वेगळे आहे त्याने काहीच फरक पडत नाही असे सांगुन दिले. त्या क्रीमच्या वापरामुळे तक्रारकर्तीच्या चेह-यावर रिएक्शन झाली आणि चेहरा विद्रृप झाला, विरुध्दपक्षाची ही कृती अत्यंत बेजबाबदार व निष्काळजीपणाची आहे. विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला असुन त्याच्या सेवेत त्रृटी ठेवली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्दपक्ष हा रजिस्टर्ड फॉर्मासीस्ट आहे व त्याचा औषधे विक्रीचा व्यवसाय आहे, तेंव्हा ग्राहकांना औषधे देतांना त्याने जागरुक राहीला पाहिजे व त्याचे हे काम अत्यंत जबाबदारीचे आहे. परंतु, सदर प्रकरणातील विरुध्दपक्षाची कृती अत्यंत निष्काळजीपणाची होती. विरुध्दपक्षाच्या निष्काळजीपणामुळे तक्रारकर्तीला शारिरीक, मानसिक त्रास झाला. तिचा चेहरा विद्रृप होऊन कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले करीता तक्रारकर्ती ही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. परंतु येथे एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, तक्रारकर्तीने सुध्दा जेंव्हा विरुध्दपक्षाने प्रिस्क्रीप्शनमधील नमुद क्रीमशिवाय दुसरे क्रीम दिले, तेंव्हा ते तज्ञ डॉक्टरांकडून पडताळून बघायला पाहिजे होते तिच्यावरही ती जबाबदारी होती, यात तक्रारकर्तीचाही Contributory Negligence दिसुन येतो. तेंव्हा तीने विरुध्दपक्षाकडून नुकसान भरपाईकरीता मागणी केलेली रक्कम रुपये 10,00,000/- अवाजवी आहे. झालेल्या त्रासाच्या नुकसान भरपाईकरीता रुपये 1,00,000/- विरुध्दपक्षाकडून मिळण्यास, तसेच तक्रारीचा खर्च मिळण्यास ती पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
10. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्तीने जे औषधांचे बिल अभिलेखावर दाखल केलेले आहे यावरुन तिला फक्त रुपये 3,772/- ऐवढाच खर्च तिला उपचाराकरीता लागला. तीने उपचाराकरीता केलेली रुपये 3,00,000/- मागणी अवाजवी आहे. यावर उत्तर देतांना तक्रारकर्ती म्हणते की, तीने अभिलेखावर काहीच बिल दाखल केलेले आहे. तक्रारकर्ती ही तिच्या त्रासात असल्याने पूर्ण बिले दाखल करु शकली नाही, तिचा उपचार अजुनही सुरुच आहे त्यामुळे तिला पुढेही उपचाराकरीता खर्च येणार आहे. तसेच तिला ब-याचश्या मेडीकल टेस्ट कराव्या लागल्या ज्याचा खर्च हजारो रुपये होता. येथे तक्रारकर्तीने औषध व उपचाराकरीता दाखल केलेले बिल व भविष्यात तिला येणारा खर्च या सर्व गोष्टींचा विचार करुन रुपये 5,000/- उपचाराचा खर्च विरुध्दपक्षाकडून मिळण्यास ती पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
11. विरुध्दपक्षाचे म्हणणे की, तक्रारकर्तीचा पती हा गुंड प्रवृत्तीचा आहे त्याने रुपये 5,00,000/- मागणी विरुध्दपक्षाला केली. परंतु, विरुध्दपक्षाच्या या कथनाचे पृष्ठर्थ्य त्याने कुठलाच पुरावा मंचासमोर सादर केला नाही करीता विरुध्दपक्षाचे हे म्हणणे मंचास ग्राह्य धरता येणार नाही.
वरील निष्कर्षावरुन मंच तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आ दे श -
(1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईकरीता रुपये 1,00,000/- द्यावे, तसेच औषधे व उपचाराकरीता आलेल्या खर्चाकरीता रुपये 5,000/- द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- तक्रारकर्तीस द्यावे.
(4) विरुध्दपक्षाने आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना निकालपत्राची प्रत विनामुल्य देण्यात यावी.