निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार 1 व 2 यांनी घर खरेदी करण्यासाठी पाहणी केली असता गैरअर्जदार यांनी स्वतः विकसीत करीत असलेल्या शेत गट नं. 30/A/C फ्लॅट नं. 03 उत्तर भागावर शिवराम अपार्टमेंट वाडी (बु) नांदेड ता. जि. नांदेड मधील फ्लॅट नं. 05 दुसरा मजला ज्याचे क्षेत्रफळ 937.28 चौ.फुट ज्याच्या चर्तुःसिमा पूर्वस-फ्लॅट मधील मोकळी जागा व नंतर 30 चौ.फुट रोड, पश्चिमेस- फ्लॅट नं. 06 व सामाईक पाय-या, दक्षिणेस- फ्लॅट मधील मोकळी जागा व फ्लॅट नं. 3 चा उर्वरित भाग, उत्तरेस- फ्लॅट मधील मोकळी जागा व सर्व्हे नं. 30 चा भाग ही जायदाद रक्कम रु. 15,60,000/- मध्ये खरेदी करण्याची सौदाचिठ्ठी गैरअर्जदार यांनी दिनांक 25/03/2011 रोजी दुय्यम निबंधक, नांदेड यांच्या कार्यालयात करुन दिली. ज्याचा नं. 2562/11 असा आहे. कराराच्या वेळी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रक्कम रु. 2,30,000/- नगदी दिले. त्याबद्दल गैरअर्जदार यांनी त्यांच्या वैदयकीय व्यवसायाच्या लेटर पॅडवर स्वतःच्या हस्ताक्षरात रक्कम मिळाल्याचे लिहून दिलेले असून त्याची नोंद खरेदीखतात केलेली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्यावर विश्वास ठेवून सदरील फ्लॅट खरेदी केलेला आहे. गैरअर्जदार यांनी उपलब्ध केलेल्या माहिती पुस्तकानुसार गैरअर्जदार हे पूर्ण सुख सुविधा पुरवतील असे नमूद केले होते. त्याबाबतची रितसर नोंद सौदाचिठ्ठी मधील मुद्दा नं. 7 मध्ये केलेली आहे. त्यानुसार गैरअर्जदाराने अर्जदार यांना माहिती पुस्तीके आधारे डिलक्स फ्लॅटच्या सुविधा देतो म्हणून फसवणूक केली आहे. अर्जदारासोबत सौदाचिठ्ठी झालेली असतांना देखील गैरअर्जदाराने वारंवार तगादा लावून अर्जदारास वेळोवेळी पैसे मागितले व ते न दिल्यास झालेला करार पूर्ण करण्यात येणार नाही असे सांगितले. त्यामुळे अर्जदार यांनी युनियन बँक शाखा आनंदनगर, नांदेड यांच्याकडून गृहकर्ज मंजूर करुन घेतले व त्यानुसार गैरअर्जदार यांना खालीलप्रमाणे रक्कमा दिलेल्या आहेत.
अ. क. | धनादेश क्रमांक | दिनांक | रक्कम |
1. | 609478 | 07.04.2011 | 3,25,000/- |
2. | 609527 | 21.05.2011 | 6,50,000/- |
3. | 556585 | 05.01.2012 | 2,48,000/- |
4. | नगदी | 05.01.2012 | 1,07,000/- |
त्याच काळात खरेदीखत करण्यापूर्वी गैरअर्जदार यांनी अर्जदाराला धमकी देवून चालू बाजार भावाप्रमाणे पैसे न दिल्यास खरेदीखत करुन देण्यात येणार नाही व पैसेही परत करणार नाही असे धमकावल्यामुळे अर्जदाराकडून रक्कम रु. 50,000/- दिनांक 23/10/2011 रोजी व दिनांक 09/11/2011 रोजी रक्कम रु. 1,50,000/- गैरअर्जदाराने अर्जदाराकडून वसूल केले. एवढेच नव्हेतर गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा देना बँक शाखा- मुदखेडचा कोरा चेक सिक्युरीटी म्हणून ठेवून घेतला. गैरअर्जदाराने अर्जदार यांना खरेदी केलेल्या फ्लॅटमध्ये कुठलीही सुविधा माहिती पुस्तीकेनुसार व करारानुसार दिलेल्या नाहीत तसेच करारानुसार ठरलेले बांधकाम त्याचे डिझाईन करुन दिले नाही तसेच रक्कम रु. 2,00,000/- चे काहीही देणे, बयनामा नसतांना घेतलेली वाढीव रक्कम परत करण्याची व घेतलेला कोरा चेक परत देण्याची विनंती केली असता गैरअर्जदाराने अर्जदाराच्या विरुध्द कलम 138 ची केस करतो असे धमकावले. त्यामुळे अर्जदार यांनी दिनांक 04/01/2013 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस पाठवून वाढीव दिलेली रक्कम, कोरा चेक व कोणत्याही न दिलेल्या सुविधांची मागणी केली असता गैरअर्जदार यांनी नकार दिल्याने अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी देवून मानसिक त्रास दिलेला आहे. अर्जदार यांनी घर खरेदी केले परंतू गैरअर्जदार यांच्या अशा व्यवहारामुळे अर्जदारास त्याचा उपभोग घेता आलेला नाही. तसेच अर्जदाराने काढलेल्या बँकेच्या कर्जाच्या हप्त्याचे ओझे अर्जदारास सहन करावे लागले. त्यामुळे सदरील तकार अर्जदाराने दाखल केलेली आहे व तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून वाढीव घेतलेली रक्कम रु. 2,00,000/- 12 टक्के व्याजासह घेतलेल्या तारखेपासून तसेच माहिती पुस्तीकेत नमूद केलेल्या सुविधा व साहित्य फ्लॅटमध्ये पुरविणे किंवा त्याचा पूर्ण खर्च व्याजासह अर्जदारास देणे तसेच अर्जदाराकडून घेतलेला कोरा चेक क्र. 339099 देना बँक शाखा- मुदखेडचा यांना परत करणे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,00,000/-, दावा खर्चापोटी रक्कम रु. 15,000/- इत्यादी बाबींची मागणी अर्जदाराने तक्रारीद्वारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
4. गैरअर्जदार यांनी लेखी जबाबामध्ये अर्जदाराच्या तक्रारीतील संपूर्ण कथन अमान्य केलेले असून गैरअर्जदार यांचे म्हणणे असे आहे की, अर्जदारास सदरील तक्रार दाखल करण्यास काहीही कारण घडलेले नाही. अर्जदार हा ग्राहकांच्या कक्षेत बसत नसल्याने अर्जदाराचा अर्ज कायदेबाहय आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराशी केलेल्या लेखी कराराप्रमाणे जमीन सर्वे नं. 30/1/सी वर अर्जदाराला फ्लॅट बांधून दिलेला आहे. दिनांक 05/01/2012 रोजी फ्लॅटचा रितसर ताबाही अर्जदाराला दिलेला आहे. दिनांक 05/01/2012 पासून अर्जदार फ्लॅटमध्ये वास्तव्य करुन आहे. गैरअर्जदाराने लेखी कराराच्या अटीप्रमाणे संपूर्ण फ्लॅटच्या सुख सुविधा अर्जदाराला दिलेल्या आहेत.
5. अर्जदाराने गैरअर्जदाराच्या येणे असलेल्या रक्कम रु. 1,00,000/- संबंधी धनादेश क्र. 339099 दिनांक 15/12/2012 चा देना बँक शाखा मुदखेडचा दिलेला होता. सदर रक्कम बुडविण्याच्या उद्देशाने व सदरील रक्कमेबाबत न्यायालयात दाद मागू नये या दुष्ट बुध्दीने अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराविरुध्द फौजदारी न्यायालयात एससीसी क्र. 710/2013 साईराज बिल्डर्स विरुध्द सौ. मिरा शिवराज जाधव ही तक्रार दाखल केलेली असून सदर तकार ही कलम-138 नि.ई. अॅक्ट प्रमाणे फौजदारी न्यायालय, नांदेड येथे विचाराधीन आहे. अर्जदारास सदरील तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही कारण नाही. अर्जदाराने सदरील फ्लॅटचा उपभोग घेत असतांना तब्बल एका वर्षानंतर सदरील तक्रार दाखल केलेली असून गैरअर्जदार यांनी मानसिक त्रास दिलेला आहे त्यामुळे अर्जदाराची तक्रार फेटाळून लावावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
7. अर्जदार यांनी दाखल केलेल्या सौदाचिठ्ठीचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याशी फ्लॅट नं. 5 एकूण क्षेत्रफळ 937.28 चौ.फुट शिवराम अपार्टमेंट वाडी (बु) नांदेड मध्ये रक्कम रु. 15,60,000/- मध्ये खरेदी करण्याचा करार दिनांक 25/03/2011 रोजी केलेला असल्याचे नोंदणीकृत सौदाचिठ्ठीवरुन निदर्शनास येते. सदर सौदाचिठ्ठीमध्ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दिनांक 25/03/2011 पर्यंत रक्कम रु. 2,30,000/- दिलेले असून गैरअर्जदारास सदरील रक्कम प्राप्त झालेली आहे. गैरअर्जदार यांनी सदरील रक्कम दिनांक 20/01/2011 रोजी प्राप्त झालेली असल्याबद्दलची पावती अर्जदार यांना दिलेली आहे. दिनांक 05/01/2012 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदरील फ्लॅट चे खरेदीखत करुन दिलेले असून सदरील खरेदीखत हे नोंदणीकृत आहे. खरेदीखताचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रक्कम रु. 15,60,000/- पूर्णपणे दिलेली असल्याचे दिसून येते. सदरील विक्रीखताच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये गैरअर्जदार यांनी रक्कम रु. 15,60,000/- वसूल झालेले असून वसुली रक्कमेबाबत कोणत्याच प्रकारची तक्रार राहिलेली नाही, असे नमूद केलेले आहे. यावरुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना कराराप्रमाणे संपूर्ण रक्कम दिलेली असल्याचे दिसून येते. अर्जदार यांनी तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्याकडून जास्तीची वसूली केलेली रक्कम रु. 2,00,000/- तसेच सिक्युरीटीबाबत अर्जदार यांच्याकडून घेतलेला कोरा धनादेश परत करण्याची मागणी केलेली आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्र क्र. 3 चे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून दिनांक 23/10/2011 रोजी रु.50,000/- नगदी, दिनांक 09/11/2011 रोजी रु.1,50,000/- घेतलेले असून त्याच्या पावत्या अर्जदारास दिलेल्या आहेत. वरील दोन्हीही पावत्यावरुन गैरअर्जदार यांना अर्जदाराने रक्कम रु. 2,00,000/- करार रक्कमेशिवाय अतिरिक्त दिलेले असल्याचे स्पष्ट होते. सौदाचिठ्ठी दिनांक 25/03/2011 रोजी झालेली असून विक्रीखत हे दिनांक 05/01/2012 रोजी झालेले आहे. सौदाचिठ्ठीमध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून रक्कम रु. 2,30,000/- प्राप्त झालेले असल्याचे मान्य केलेले असून विक्रीखतामध्ये अर्जदाराकडून गैरअर्जदार यांना रक्कम रु. 15,60,000/- प्राप्त झालेले असल्याचा तपशील, दिनांकासह नमूद केलेला आहे. सदर विक्रीखताचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दिनांक 23/10/2011 व 09/11/2011 रोजी दिलेल्या रक्कमांचा उल्लेख केलेला नाही. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून रक्कम रु. 2,00,000/- करार रक्कमेपेक्षा जास्तीची घेतलेली असल्याचे सिध्द होते. गैरअर्जदार यांनी लेखी जबाबामध्ये सदरील रक्कम जास्तीची कशासाठी घेतली याचे कुठलेही कारण नमूद केलेले नाही त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून करार किंमतीपेक्षा रक्कम रु. 2,00,000/- जास्तीचे घेतलेले असल्याचे सिध्द होते. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना कोरा धनादेश क्र. 339099 सिक्युरीटी म्हणून देना बँक शाखा मुदखेडचा दिलेला असल्याचे कथन केलेले आहे त्यावर गैरअर्जदार यांनी अर्जदाराने सदरील धनादेश येणे रक्कमेबाबत दिलेला होता असे लेखी जबाबामध्ये परिच्छेद क्र. 17 मध्ये नमूद केलेले आहे परंतू गैरअर्जदार यांचे हे कथन चुकीचे आहे कारण गैरअर्जदार यांनी दिनांक 05/01/2012 रोजी करुन दिलेल्या विक्रीखतामध्ये अर्जदाराने संपूर्ण रक्कम दिलेली असल्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर अर्जदाराकडून गैरअर्जदार यांना कोणतीही रक्कम येणे नव्हती असे असतांना दिनांक 15/12/2012 रोजी अर्जदार हा गैरअर्जदार यांना रक्कम रु. 1,00,000/- कशासाठी देईल, याचा अर्थबोध होत नाही. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून कोरा धनादेश सिक्युरीटी म्हणून घेतलेला असल्याचे दिसून येते. सदरील धनादेश दिल्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार हा सदरील धनादेशाचा गैरवापर करेल या भितीपोटी देना बँक शाखा मुदखेड यांच्या शाखा अधिका-याला सदरील धनादेशाचे पेमेंट करु नये असा विनंती अर्ज दिलेला होता परंतू गैरअर्जदार यांनी सदरील धनादेशाचा गैरवापर केलेला असल्याचे गैरअर्जदार यांच्या लेखी जबाबावरुन निदर्शनास येते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या धनादेशाचा वापर करुन अर्जदाराविरुध्द 138 ची तक्रार फौजदारी न्यायालयात दाखल केलेली असल्याचे दिसून येते. यावरुन निश्चितच अर्जदारास मानसिक त्रास झालेला असल्याचे सिध्द होते.
8. अर्जदार यांनी तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांना दिलेल्या माहितीपत्रकाअधारे सुविधा दिलेल्या नाहीत, असे नमूद केलेले आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांनी कोणत्या सुविधा पुरविलेल्या नाहीत याचा तपशीलवार उल्लेख केलेला नाही त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्या सुविधा पुरविलेल्या नाहीत हे निदर्शनास नाही. तसेच तक्रार प्रलंबित असतांना अर्जदार यांनी गैरअर्जदाराने सुविधा पुरविलेल्या नसल्याने सदर बाबीची शाहनिशा करण्यासाठी कोर्ट कमिशनरची नेमणूक करण्यात यावी असा अर्ज दिलेला होता परंतू मा. राष्ट्रीय आयोग यांनी दिलेल्या रिव्हीजन पिटीशन क्र. 2447,2482/2014 निर्णय दिनांक 01/08/2014 मधील निवाडयानुसार अर्जदाराचा अर्ज नामंजूर करुन अर्जदारास सुविधा पुरविलेल्या नसल्याबद्दलचा पुरावा दाखल करण्याचे निर्देश दिलेले होते परंतू अर्जदाराने सुविधा पुरविलेल्या नसल्याबद्दलचा कुठलाही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही त्यामुळे अर्जदाराची ही मागणी मंचाला मान्य करता येणार नाही.
9. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रार व पुराव्यावरुन अर्जदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 1986 2(C)(iv)(d)
2(C) “Complaint” means any allegation in writing made by a complainant that-
iv) A trader or the service provider, as the case may be has charged for the goods or for the services mentioned in the complaint, a price in excess of the price.
d) Agreed between the parties.
ही बाब अर्जदाराने पुराव्यानिशी सिध्द केलेली आहे. असे मंचाचे मत आहे.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून रक्कम रु. 2,00,000/- जास्तीचे घेतलेले असल्याचे दाखल कागदपत्रावरुन सिध्द होते. तसेच गैरअर्जदार यांनी सिक्युरीटी म्हणून अर्जदाराकडून देना बँक शाखा मुदखेडचा धनादेश क्र. 339099 हा घेतलेला होता ही बाब दिसून येते. गैरअर्जदार यांनी करार रक्कमेपेक्षा वरील दोन्ही बाबी अर्जदाराकडून जास्तीच्या घेतलेल्या आहेत. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून जास्तीची रक्कम घेवून ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(r) नुसार अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला असल्याने अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून सिक्युरीटी म्हणून घेतलेल्या को-या धनादेशाचा गैरवापर करुन अर्जदाराविरुध्द फौजदारी न्यायालयात 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट प्रमाणे तक्रार दाखल केलेली असल्याने अर्जदारास कोरा धनादेश परत करावा असा आदेश करणे मंचास उचित वाटत नाही. परंतू या कृतीचा अर्जदारास निश्चितच त्रास झालेला असल्याने गैरअर्जदार हे अर्जदारास मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्यात जबाबदार आहेत.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु. 2,00,000/- दिनांक 09/11/2011 पासून 9 टक्के व्याजासह दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. गैरअर्जदार यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
5. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
6. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.