सदस्या : श्रीमती एस ए बिचकर यांनी दिले.
// नि का ल प त्र //
1) सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक मंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पिडिएफ/439/2001 असा नोंदणिकृत नंबर देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपिडिएफ/562/2005 असा नोंदविण्यात आला आहे.
2) तक्रारदाराने सदरची तक्रार जाबदार यांचे विरुध्द पिण्यासाठी योग्य व आरोग्यदायक पाणी पुरवठा मिळणेकामी तसेच फरशी फिटींगकरीता रक्कम रु 1000/- व मानसिक त्रासापोटी रककम रु. 1000/- आणि कोर्ट खर्चाकामी रक्कम रु 250/- मिळण्यासाठी दाखल केली आहे.
3) तक्रारदाराची तक्रारच थोडक्यात अशी आहे की, तक्रारदाराने जाबदार यांचेकडून सर्व्हे नं. 17, सुखसागर नगर, कात्रज, पुणे येथील साहिल कन्स्ट्रक्शन मध्ये सदनिका नं; 18 खरेदी केलेली आहे. त्या ठिकाणी पाणी पुरवठा व्यवस्थीत व पुरेसा होत नसून जे पाणी पुरविले जाते ते आरोग्यास हितावह नाही. सदरची बाब तक्रारदाराने जाबदार यांना वेळोवेळी तोंडी व पत्रांद्वारे कळविलेली आहे. परंतु जाबदार यांनी त्याची दखल घेतली नाही. तक्रारदार यांचे सदनिकेमधील फरशी व्यवस्थीत फिटींग केलेली नाही. तसेच दरवाज्याचे पॉलीश केलेले नाही व भोगवटा पत्रकाची प्रतही दिलेली नाही. त्यामुळे वरिल सर्व बाबींबाबत तक्रारदार यांना सदरची तक्रार दाखल करणे भाग पडत आहे.
4) तक्रारदाराने सदरची तक्रार शपथपत्र स्वरुपात दाखल केलेली असून सोबत सदनिका खरेदीच्या पावत्या तसेच जाबदार यांना पाठविलेले दिनांक 18.10.2001 चे पत्र, जाबदार यांनी दिनांक 30.10.2001 रोजी नाकारलेले पत्र ( पोष्टाच्या शे-यानिशी) दिनांक 20.10.2001 रोजीचा पाणी तपासणीचा अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5) मंचाने जाबदार यांना दिनांक 11.06.2010 रोजी नोटीस पाठविली असा दिनांक 12/07/2010 रोजी जाबदार हे वकील देऊन हजर झालेले आहेत. दिनांक 29.09.2010 रोजी जाबदार यांनी त्यांचे म्हणणे शपथपत्र स्वरुपात दाखल केलेले असून सोबत कागदपत्रे दाखल केलेली आहेत. जाबदार यांनी त्यांचे म्हणणे मध्ये तक्रारदार यांचे तक्रारीतील मुद्ये नाकारलेले आहेत.
6) जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये असे नमुद केले आहे की, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये दिनांक 14.01.2000 रोजी रितसर करार होवून जाबदार यांचे मिळकतीमधील सदनिका नं. 18 ही तक्रारदाराने जाबदार यांचेकडून रु 2,43,810/- या रक्कमेस खरेदी केलेला आहे. त्या बाबतचा इन्डेक्स 2 चा उतार जाबदार यांनी सोबत जोडलेला आहे व त्याप्रमाणे तक्रारदार हे सदर सदनिकेमध्ये रहात आहेत
जाबदार यांनी सदर मिळकतीमध्ये एकुण 24 सदनिका बांधलेल्या आहेत. परंतु तक्रारदाराशिवाय इतर कोणत्याही लोकांनी कोणतीही तक्रार जाबदार यांचेकडे केलेली नाही.
7) तक्रारदाराने सदनिका खरेदी करताना विद्या सहकारी बँकेचे कर्ज घेतले असून कर्ज घेताना सर्व कागदपत्रे जाबदार तक्रारदार यांना दिलेली आहेत व नंतरच कर्ज मंजुर झालेले आहे. त्यामुळे भोगवटापत्राची प्रत दिली नाही हे तक्रारदार यांचे म्हणणे खोटे आहे.
8) जाबदार यांनी तक्रारदार यांना दिनांक 18.01.2000 रोजी सदनिकेचा ताबा दिलेला आहे. त्या बाबतचे पत्र दिनांक 31.01.2000 रोजी जाबदार यांनी तक्रारदार यांना दिलेले आहे. सदर पत्रामध्ये The construction of the said flat is completein all respects and the said flat is ready for occupation असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणून जर काही त्रृटी असल्या वर तक्रारदाराने लगेचच तक्रार करावयास पाहिजे होती. तसेच सदर पत्रामध्ये पुढे असेही नमुद केले आहे की, “ You have taken the flat after inspection the Flat as regards workman ship, material used And specifications provided and that you are fully satisfied about the said flat”. त्यामुळे तक्रारदाराचे प्रस्तुतचे तक्रारीत तथ्य नाही.
9) तक्रारदाराने जाबदार यांना सदनिकेपोटी रक्कम रु. 23,000/- चा दिनांक 31.12.2008 रोजी पुणे मर्चट को. ऑ. बँकेचा चेक दिलेला होता परंतु सदरचा चेक वटला नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांना माझे विरुध्द कोर्टकेस करु नका अशी विनंती केल्याने जाबदार यांनी त्यांचेवर चेकबाबत कोर्टकारवाई केलेली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचे कडुन सदनिकेपोटी रक्कम रु 23,000/- येणे बाकी आहे. सदरची रक्कम तक्रारदार यांचेकडून मिळणे बाबत जाबदार यांनी म्हणणे मध्ये नमुद केलेले आहे. तसेच तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्य करणेत यावी व जाबदार यांना तक्रारदाराकडून नुकसानभरपाई मिळावी असे म्हटलेले आहे.
10) मंचाने तक्रारदार यांचे शपथपत्र व जाबदार यांनी त्यांचे शपथपत्र स्वरुपात दाखल केलेले म्हणणे तसेच दोघांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे वाचन केले. तक्रारदार यांनी दिनांक 26.10.2010 रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले व दिनांक 29.12.2010 रोजी लेखी युक्तिवाद दाखल केला.
11) मंचाने तक्रारदार व जाबदार यांच्या सर्व कागदपत्रांचे वाचन केले असता मंचाचे विचारार्थ खालील मुद्ये –
1) जाबदार यांनी तक्रारदार यांना दिलेल्या :
सेवेमध्ये त्रृटी आहे काय ? : नाही.
2) आदेश : अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा:
12) तक्रारदाराने जाबदार यांचे कडुन सर्व्हे नं. 17, सुखसागरनगर, कात्रज, पुणे येथील साहिल अपार्टमेंट मध्ये सदनिका नं 18 विकत घेतलेली असून सदनिकेची एकुण किंमत तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये रक्कम रु. 2,34,375 ठरलेली होती. सदरची ठरलेली किंमत तक्रारदाराने जाबदार यांना वेळोवेळी दिलेली आहे. त्या बाबतच्या पावत्या तक्रारदाराने तक्रारी सोबत दाखल केलेल्या आहेत त्यावरुन सिध्द होते.
13) तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून फरशी फिटींगसाठी व आरोग्यदायक पाणी पुरवठा करणेसाठी मागणी केलेली आहे. परंतु जाबदार यांनी तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा दिनांक 18.01.2000 रोजी दिलेला आहे. त्याबाबतचे ताबापत्र जाबदार यांनी तक्रारदार यांना दिनांक 31.01.2000 रोजी दिलेले आहे. सदरचे ताबापत्र जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यासोबत दाखल केलेले आहे. सदर ताबापत्राचे मंचाने काळजीपुर्वक वाचन केले असता त्यामध्ये असे नमुद केले आहे की,
“ The construction of the said flat is complete In all respects and the said that is ready for possession and you have taken the same after inspecting the flat as regards workman ship, Material used and specifications provided and that you are fully satisfied about the said flat”. म्हणजे तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून ताबा घेताना सदनिकेची संपुर्ण पहाणी करुनच ताबा घेतलेला आहे हे स्पष्ट होते. तसेच तक्रारदार यांनी सदनिकेच्या फरशी बाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचात दाखल केलेला नाही.
14) तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सदनिकेबाबत दिनांक 14.01.2000 रोजी रितसर करारनामा झालेला होता असे दोघांनी म्हटलेले आहे. परंतु तक्रारदारांनेही तक्रारी सोबत व जाबदार यांनीही त्यांचे म्हणणे सोबत सदरचा करारनामा दाखल केलेला नाही. दोघांनीही सदरची बाब मंचापासून लपवून ठेवली आहे. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना कशा प्रमारच्या सुविधा द्यावयाच्या होत्या हे करारनामा दाखल केला नसल्यामुळे मंचास त्या बाबत विचार करता येणार नाही.
15) तक्रारदाराने जाबदार यांचेकडून आरोग्यदायक पाणी पुरविण्याची मागणी केलेली आहे व त्याबाबत स्टेट पब्लींक हेल्थ लॅब्रोटरीचा अहवाल दाखल केलेला आहे. सदर अहवालामध्ये तक्रारदार यांना पिण्यासाठी जे पाणी दिले जाते ते योग्य आहे असा उल्लेख आहे.
16) वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांचे तक्रारीमध्ये काहीही तथ्य नसल्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करणेचे निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे.
वरील सर्व विवेंचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारित करीत आहे –
// आ दे श //
1) तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2) तक्रारदार व जाबदार यांनी आपआपला खर्च सोसावा.
3) निकालपत्रांच्या प्रति दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात
याव्यात.