श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांकः 01/12/2014)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
1. तक्रारकर्ता अरुण प्रल्हाद भजनी यांनी वि.प.क्र.1 मे. सादिक मोटर्स प्रा. लि. वोल्क्सवॅगन, नागपूर कडून वि.प.क्र. 2 वोल्क्सवॅगन इंडिया प्रा. लि. चाकण, पूणे निर्मित वोल्क्सवॅगन (VENTO TDI), कार नोंदणी क्र. MH-40 AC 2327 रु.9,70,822/- मध्ये इन्व्हाईस क्र. VS1130230 Dt. 12.07.2013 प्रमाणे विकत घेतली. वि.प.क्र.1 कडून आवश्यक बाबींची पुर्तता झाल्यावर सदर कारचा ताबा तक्रारकर्त्यास दि.15.03.2013 रोजी देण्यांत आला. सदर कारला 36 महिन्यांची वारंटी देण्यांत आलेली होती.
तक्रारकर्ता दि.17 जुलै 2013 रोजी सदर कारने बीड आणि लातूर येथे जात असता त्याला कारच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये दोष दिसून आला. सदर कारला अत्याधुनिक Anti-Lock Brake System देण्यात आलेली आहे. परंतु सदरची ABS ब्रेंकिंग प्रणाली योग्य प्रकारे कार्यरत नव्हती. जेंव्हा ब्रेक लावण्यांत येत होते, तेंव्हा वेग कमी होत नव्हता आणि वेळीच गाडी न थांबता 2-3 मीटर गेल्यानंतर थांबत होती. ABS ब्रेंकिंग प्रणाली योग्य प्रकारे कार्यरत नसल्यामुळे दि.18 जुलै 2013 रोजी तक्रारकर्ता लातूरवरुन परत येत होता तेंव्हा गाडी चालू असतांना उजव्या बाजूचा टायर फुटला आणि दि.21 जूलै 2013 रोजी नागपूरकडे परत येत असतांना रात्री 2 वा. खडकी वर्धा रस्त्याजवळ डाव्या बाजूचा दुसरा टायर फुटला आणि त्यामुळे डिस्क तडकली.
दुसल्या दिवशी तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 विक्रेता यांची भेट घेवून ब्रेकिंग सिस्टमधील दोषामुळे घडलेला प्रकार सांगितला, परंतु वि.प.क्र. 1 ने त्याकडे लक्ष दिले नाही. तक्रारकर्त्याने सदोष ब्रेकिंग सिस्टममुळे टायर फुटल्याची व ब्रेकिंग सिस्टम योग्यप्रकारे काम करित नसल्याची तक्रार केली आणि वि.प.क्र. 2 निर्मात्या कंपनीलाही त्याबाबत कळविले. वि.प.क्र. 1 ने वि.प.क्र.2 कडून टायर बदलून देण्याचे आणि ब्रेकिंग सिस्टममधील दोष दूर करण्याचे आश्वासन दिले. तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वि.प.क्र. 1 ने देखिल टायर बदलून देण्याचे आणि ब्रेकिंग सिस्टममधील दोष दूर करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दि.29.07.2013 रोजी कार वर्कशॉपमध्ये नेली असता वि.प.क्र.1 ने टायर बदलून देण्यास नकार दिला आणि कारची तपासणी न करताच ब्रेकिंग सिस्टममध्ये कोणताही दोष नाही असा मेमो दिला. सदर वाहन वारंटी पिरेडमध्ये असतांना वाहनातील अंगभूत दोषामुळे टायर फुटले तरी देखिल तक्रारकर्त्याला नविन टायर विकत घेण्यासाठी स्वतःजवळून रु. 8,500 खर्च करावे लागले.
तक्रारकर्त्याने टायर बदली केल्यानंतर ते डावीकडील टायर मडगार्डला लागत असल्याने तक्रारकर्त्याने कार पुन्हा वि.प.क्र. 1 कडे दुरुस्तीसाठी पाठविली. कार वारंटी पिरेडमध्ये असतांना व तक्रारकर्ता वारंटीमध्ये विनामुल्य दुरुस्तीस पात्र असतांना देखिल वि.प.ने सुटे भाग व लेबर चार्जेस घेवून खालील प्रमाणे दुरुस्ती केली.
1. Lower ball joint was changed
2.Reinstalled the wish bone and adjusted the front wheel track,chamber and ABS
टेस्ट ड्रॉईव्हनंतर वाहन ताब्यात घेतांना तक्रारकर्त्याने ABS सिस्टममधील दोष दूर झाला काय ? याबाबत विचारणा केली असता, दोष दूर झाची वि.प.क्र. 1 पूर्ण खात्री दिली. मात्र कार घरी आणत असतांनाच ABS सिस्टम योग्य प्रकारे कार्यकरित नसल्याचे तक्रारकर्त्यास आढळून आले.
तक्रारकर्त्याने पुन्हा ABS सिस्टम आणि डॅशबोर्डमघील दोषाबाबत वि.प.क्र. 1 चे सेल्स मॅनेजर गिरी यांचेकडे तक्रार केली, तेंव्हा प्रवासावरुन परत आल्यावर कार वर्कशॉपमध्ये आणण्यास सांगितले. ती नेली असता प्रयत्न करुनही वि.प.क्र.1 ला ABS सिस्टममधील दोष दुरुस्त करता आला नाही आणि त्यांनी दोष दुरुस्त न करताचा वाहन ओ.के. सांगून परत केले. तक्रारकर्त्याने 5-6 वेळा वाहन दुरुस्तीस नेवूनही वि.प.क्र. 1 कडून ABS सिस्टममधील दोष दुरुस्त झालेला नसल्याने तक्रारकर्त्याने वि.प.च्या कस्टमर केअर सेंटरला तक्रार करुन “NON SATISFACTORY” रिपोर्ट नोंदविला. त्यानंतर निर्माता कंपनी वि.प.क्र. 2 कडे वारंवार फोन करुन त्याचें गा-हाणे मांडले आणि वि.प.क्र. 1 कडे वाहन घेवून गेला असता त्यांनी वाहनात ABS सिस्टम मधील दोष दूर केला आहे व भविष्यात असा दोष निर्माण होणार नाही अशी हमी देवून वाहन तक्रारकर्त्यास परत केले .
दि.18.09.2013 रोजी तक्रारकर्ता त्याची कार घेवून बल्लारपूर येथे गेला होता. परत येत असतांना हैद्राबाद नागपूर महामार्गावर कांद्री गावाजवळ सायंकाळी 7.00 वा. तक्रारकर्त्याच्या कारसमोर दुसरी कार असल्यामुळे कारचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक मारला असता व्हायब्रेशन जाणवले आणि एकाएकी कार उजव्या बाजूला वळून रस्ता दुभाजक पार करुन विरुध्द बाजूच्या डाव्या लेनमध्ये थांबली. मागून येणा-या ट्रकने व अन्य वाहन चालकाने एकदम पूर्ण ब्रेक मारल्यामुळे त्यांचे वाहन थांबले आणि देवाच्या कृपेने तक्रारकर्ता आणि त्याचा कर्मचारी बचावले अन्यथा ते ट्रकखाली आले असते. तक्रारकर्त्याने त्याबाबतची माहिती त्वरीत वि.प.ला कळविली व त्यांच्या मदतीने वाहन वि.प.क्र. 1 च्या वर्कशॉपमध्ये रात्री 11.00 वा. नेण्यांत आले.
सदर वाहन दि.15 जुलै 2013 रोजी तक्रारकर्त्यास सुपुर्द केल्यापासून तक्रारकर्त्यास वाहनातील निर्मिती दोषांचा सामना करावा लागत आहे. विरुध्द पक्षांकडे 8-9 वेळा दुरुस्तीसाठी वाहन नेवूनही सदर निर्मिती दोष दूर करण्यास वि.प.क्र. 1 व त्यांचे इंजिनिअर्स/तंत्रज्ञ असमर्थ ठरलेले आहेत. दि.18.09.2013 चा अपघात सदर निर्मिती दोषांमुळे घडलेला असून वाहनाचे अतिशय नुकसान झालेले आहे. तक्रारकर्त्याने इमेल पाठवून वि.प.क्र.2 कडे सदोष कार बदलवून देण्याची मागणी केली व त्या पत्राची प्रत वि.प.क्र. 2 ला पाठविली. सदर सदोष वाहन ABS सिस्टममधील दोष दुरुस्तीसाठी वि.प.क्र. 1 कडे 1 वारंवार नेवूनही दोष दुरुस्त झालेला नाही यावरुन सदर वाहन अंगभूत निर्मिती दोषाने ग्रस्त आहे असाच निष्कर्ष निघतो. वि.प.क्र.1 व 2 कडून वारंटी काळात वाहनाची वारंटीप्रमाणे दुरुस्ती करुन न देणे ही सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवनलंब आहे. सदर वाहनात ABS सिस्टममध्ये निर्मिती दोष नाही असे जर वि.प. चे म्हणणे असेल तर त्यांनी वाहन निर्मिती क्षेत्रातील तज्ञाकडून वाहनाची तपासणी करुन वाहनात ABS सिस्टममधील निर्मिती दोष नाही असे प्रमाणपत्र तक्रारकर्त्यास द्यावे.
दि.18.09.2013 रोजीचा अपघात हा वाहनातील ABS सिस्टममधील निर्मिती दोष वि.प.क्र.1 नी दुरुस्त न केल्यामुळे झालेला असल्याने व वाहन वारंटी पिरेडमध्ये असतांना सुध्दा अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीसाठी वि.प.क्र. 1 ने रु.3,30,382.69 चे इस्टिमेट दिले आणि दुरुस्ती खर्चाची मागणी केली. परंतु वाहनातील निर्मिती दोषांमुळे सदरचा अपघात झाल्यामुळे सदर दुरुस्ती खर्च देण्यास तक्रारकर्त्याने नकार दिला आणि वि.प.क्र.2 कडे सदोष वाहनाचे बदली नविन वाहन देण्याची किंवा वाहनाची खरेदी किंमत परत करण्याची मागणी केली. परंतु वि.प.नी त्यास प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. वि.प. नी तक्रारकर्त्यास कारची किंमत रु.9,70,822/-, टॅक्स रु.1,06,791/-, रजि. खर्च रु.350/-, दोन टायरची किंमत रु.8,500/-, रत्यावरील अपघातांमुळे कराव्या लागलेल्या दुरुस्तीचा खर्च रु.6,802/- ही रक्कम वाहन खरेदीचे तारखेपासून म्हणजे दि.12.07.2013 पासून द.सा.द.शे. 20 टक्के व्याजासह देण्याचा आदेश व्हावा.
2. शारिरिक व मानसिक त्रास आणि सेवेतील त्रुटींबाबत नुकसान भरपाई रु.8,00,000/- देण्याचा वि.प. विरुध्द आदेश व्हावा.
3. मंचाला उचित वाटेल असा तक्रारीचा खर्च मंजूर करावा.
4. वि.प.ने अशा अनुचित व्यापर पध्दतीचा अवलंब करु नये असे निर्देश द्यावेत.
5. मंचाला उचित वाटेल अशी अन्य दाद मिळावी.
तक्रारकर्त्याने तक्रारीच्या पुष्टयर्थ दस्तावेज यादीसोबत खालीलप्रमाणे दस्तावेज दाखल केले आहेत
1.तक्रारकर्त्याने वोल्सवॅगन ग्रुप सेल्स इंडिया प्रा.लि.मुंबई यांना पाठविलेले पत्र दि.20.09.2013 व पोष्टाच्या रजिस्ट्रेशन पावत्या.
2. इन्शुरन्स कव्हर नोट
3. कार खरेदीचे वि.प.क्र. 1 ने दिलेले दि.12.07.2013 चे इन्व्हाईस रु.9,70,822/-
4. कारची रजिस्टेशन फी पावती.रु.350/-
5. कारची टॅक्स पावती रु.1,06,791/-
6. कार डिलिव्हरी लेटर
7. दोन टायर खरेदीचे बिल दि.23.07.2013 रु.8,500/-
8. वि.प.क्र.1 ने दिलेले दि.07.8.2013 चे कार दुरुस्ती खर्चाचे बिल.रु.6,802/-
9. वि.प.क्र.1 ने दि.19.09.2013 रोजी दिलेले
कार दुरुस्ती खर्चाचे इस्टीमेट रु.3,20,382.69
2. वि.प.क्र.1 व 2 ला मंचाकडून रजिस्टर पोष्टाने पाठविलेली नोटीस वि.प.क्र. 1 ला दि.21.02.2014 रोजी आणि वि.प.क्र.2 ला दि.26.02.2014 रोजी प्राप्त झाल्याबद्दल पोष्टाचा दाखला अभिलेखावर दाखल आहे. नोटीस प्राप्त होऊनही वि.प.क्र. 1 व 2 मंचासमोर हजर झाले नाही आणि तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेले कथन नाकारलेले नाही. म्हणून त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दि.04.09.2014 रोजी परित करण्यांत आला.
- कारणमिमांसा -
3. सदरच्या प्रकरणांत वि.प.क्र. 2 ने निर्मित केलेले तक्रारीत नमुद वाहन तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडून दि.12.07.2013 रोजी रु.9,70,822/- मध्ये विकत घेतल्याबाबत इन्हॉईस दस्त क्र. 3 वर दाखल केले असून . दस्त क्र. 7 वर दि.23.07.2013 चे रु.8,500/- चे दोन टायर खरेदीचे बिल, दस्त क्र. 8 वर दि.07.8.2013 चे कार दुरुस्ती खर्चाचे बिल.रु.6,802/-आणि दस्त क्र. 9 वर वि.प.क्र.1 ने दि.19.09.2013 रोजी दिलेले कार दुरुस्ती खर्चाचे इस्टीमेट रु.3,20,382.69 दाखल केले आहे.
4. तक्रारकर्त्याने शपथपत्रावरील तक्रारीत असे कथन केले आहे कि, तक्रारीतील वाहन वि.प. क्र. 1 ने दि.15 जुलै 2013 रोजी वि.प.क्र. 1 ने त्याच्या सुपुर्द केले, तेंव्हापासून सदर वाहनात ABS सिस्टममधील दोष आहे. सदर दोषामुळे ब्रेक लावताच गाडी न थांबता 2-3 मीटर गेल्यानंतर थांबते. त्यामुळे गाडीवर चालकाला नियंत्रण मिळविणे कठीण आहे. सदर दोषामुळे गाडीचे दोन टायर फुटले व स्वतः रु.8,500/- खर्चून टायर बदलवावे लागले. सदर दोषामुळेच डिस्क क्रॅक झाली आणि आणुषंगिक दुरुस्ती करावी लागली, त्यासाठी देखिल वि.प.क्र. 1 ने दस्त क्र. 8 प्रमाणे दुरुस्ती खर्चाचे रु.6,802/- घेतले आहेत. विरुध्द पक्षांकडे 8-9 वेळा ABS सिस्टम मधील निर्मिती दोष दुरुस्तीसाठी वाहन नेवूनही सदर निर्मिती दोष दूर करण्यास वि.प.क्र. 1 व त्यांचे इंजिनिअर्स/तंत्रज्ञ असमर्थ ठरलेले आहेत. सदर दोषामुळे दि.18.09.2013 रोजी हैद्राबाद – नागपूर महामार्गावर अपघात झाला. तक्रारकर्ता आणि त्याच्या कर्मचा-याचे प्राण वाचला. परंतु वाहनाचे अतिशय नुकसान झाले. सदरचा अपघात निर्मिती दोषामुळे आणि वारंटी पिरेडमध्ये झाला असल्याने वि.प.ने सदर दोष दूर करुन वाहनाची विनामुल्य दुरुस्ती करुन न देता दस्त क्र. 9 प्रमाणे दि.19.09.2013 रोजी दुरुस्ती खर्चाचे
रु.3,20,382.69 चे इस्टीमेट दिले आणि सदर खर्चाची मागणी केली. सदर दुरुस्ती वाहनातील निर्मिती दोषामुळे करावी लागत असल्याने दुरुस्ती खर्च देण्यास तक्रार.तक्रारकर्त्याने नकार दिला. तक्रारकर्त्याने वोल्सवॅगन ग्रुप सेल्स इंडिया प्रा.लि.मुंबई यांना दि.20.09.2013 रोजी दस्त क्र. 1 प्रमाणे पत्र पाठविले व त्याची प्रत वि.प.क्र.1 सादिक मोटर्स नागपूर यांना पाठवून निर्मिती दोष असलेले वाहन बदलून देण्याची किंवा वाहनखरेदीची किंमत देण्याची तसेच नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. परंतु वि.प.ने सदर मागणीची पुर्तता केलेली नाही.
5. वि.प.ना मंचाकडून नोटीस प्राप्त होवूनही ते हजर झाले नाही व तक्रारकर्त्याचे शपथपत्रावरील कथन नाकारलेले नाही. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे कि, जर वाहनात निर्मिती दोष नाही असे वि.प.चे म्हणणे असेल तर सदर वाहनाची तज्ञामार्फत तपासणी करुन वाहनाच्या ABS सिस्टम मघ्ये कोणताही निर्मिती दोष नाही असे प्रमाणत्र वि.प.नी द्यावे.
6. वि.प.नी तक्रारकत्याचे शपथपत्रावरील कथन नकारलेले नाही किंवा ते खोटे असल्याचे सिध्द केलेले नाही. म्हणून वाहनाच्या ABS सिस्टममध्ये निर्मिती दोष असल्यामुळे वाहन नियंत्रीत होत नाही व सदर कारणामुळे वाहन अपघातग्रस्त झाले या तक्रारकर्त्याचया म्हणण्यावर गैरविश्वास दाखविण्याचे कारण दिसत नाही. असे असले तरी सदर दोष दूर करुन वाहन नविन वाहनाप्रमाणे ABS सिस्टम दोषमुक्त करुन देण्याची संधी वि.प.ला देणे आणि ते वाहन नविन वाहनाप्रमाणे ABS सिस्टम दोषमुक्त होवू शकत नसेल तर तक्रारकर्त्यास वि.प.ने विकलेल्या सदोष वाहनाचे बदली नविन वाहन व तक्रारकर्त्यास करावा लागलेला नोंदणी आणि टॅक्सचा खर्च देण्याचा किंवा तक्रारकर्त्याकडून घेतलेली वाहनाची किंमत व तक्रारकर्त्यास करावा लागलेला नोंदणी खर्च व भरावी लागलेली टॅक्सची रक्कम देण्याचा वि.प.ना आदेश देणे न्यायोचित होईल.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश परित करीत आहे.
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 खालील तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्द वैयक्तिक व संयुक्त रित्या खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. वि.प.नी तक्रारकर्त्याच्या तक्रारीत नमुद वोल्क्सवॅगन (VENTO TDI), कार नोंदणी क्र. MH-40 AC 2327 ची विनामुल्य संपूर्ण दुरुस्ती करुन सदर वाहन नविन वाहनासारखे ABS सिस्टम दोषविरहित असल्याबाबत तक्रारकर्त्यास मान्य असलेल्या वाहन निर्मिती शास्त्रातील तज्ञ व्यक्ती/संस्थेचे प्रमाणपत्रासह तक्रारकर्त्यास सुपुर्द करावे.
किंवा
वाहनातील ABS सिस्टम मधील निर्मिती दोष दूर होवू शकत नसेल तर तक्रारकर्त्यास वि.प.ने विकलेल्या सदोष वाहनाचे बदली नविन वाहन व तक्रारकर्त्यास करावा लागलेला नोंदणी आणि टॅक्सचा खर्च द्यावा.
किंवा
तक्रारकर्त्याकडून घेतलेली वाहनाची किंमत व तक्रारकर्त्यास करावा लागलेला नोंदणी खर्च व भरावी लागलेली टॅक्सची रक्कम परत करावी.
2. याशिवाय तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.20,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- वि.प.नी तक्रारकर्त्यास द्यावी.
3. आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
4. मुदतीचे आंत आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारकर्त्याकडून वि.प.ने घेतलेली वाहनाची किंमत रु.9,70,822/- + टॅक्स रु.1,06,791/-+ नोंदणी फी रु.350/- =10,77,963 या रकमेवर तक्रार दाखल दि.02.01.2014 पासून आदेशाची पूर्ण पूर्तता होईपर्यंत तक्रारकर्ता द.सा.द.शे 12 टक्केप्रमाणे व्याज मिळण्यास पात्र राहिल.
5. निर्णयाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पुरवावी.