Exh.No.27
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 44/2011
तक्रार दाखल झाल्याचा दि.31/12/2011
तक्रार निकाल झाल्याचा दि.30/12/2013
श्रीमती माधवी मोहन आचरेकर
वय 61 वर्षे, धंदा – घरकाम
राहणार- सि-17, कुंभारमाठ, म्हाडा कॉलनी,
ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग
तर्फे कुलअखत्यारी
श्री मंगेश मोहन आचरेकर
वय 37 वर्षे, धंदा- नोकरी,
राहणार- बी- 004, रिध्दी-सिध्दी अपार्टमेंट
लाल-बहादूर शात्री मार्ग, भांडूप (पश्चिम), मुंबई 78 ... तक्रारदार
विरुध्द
मेसर्स एस.बी. एंटरप्रायझेस तर्फे
प्रोप्रायटर श्री शिवाजी बाबुराव वडार,
वय – सज्ञान, धंदा- बांधकाम व्यावसायीक
राहाणार – कुंभारमाठ, म्हाडा कॉलनी,
ता.मालवण, जि. सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री वाय.आर. खानोलकर
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री एम.बी. सुकाळी
निकालपत्र
(दि.30/12/2013)
श्री डी.डी. मडके, अध्यक्षः – विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचेकडून अॅडव्हांस रक्कम रु.1,25,000/- घेऊनही त्यांचे घराचे वाढीव बांधकाम अर्धवट टाकून सेवेत त्रुटी केली असून नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांना आपल्या म्हाडा कॉलनी, कुंभारमाठ येथील सि-17 येथील घराचे वाढीव बांधकाम करावयाचे होते. त्यासाठी त्यांनी त्याच कॉलनीत राहणारे व बांधकाम व्यावसायीक असलेले शिवाजी वडार यांना त्याबाबत प्रस्ताव डिसेंबर 2010 मध्ये दिला. त्यासाठी एकूण खर्च रु.3,36,000/- येईल असे अंदाजपत्रक दिले. सदर करार मान्य झाल्यानंतर तक्रारदार यांनी दत्तजयंतीच्या दिवशी रु.10,000/- अॅडव्हांस रक्कम श्री वडार यांना दिली आणि बांधकामासाठी परवानगी मिळणेसाठी अर्ज सादर केला.
3) तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, सदर बांधकाम करणेची सूचना दिल्यानंतर त्या मुंबई येथे मुलासमवेत निघून गेल्या. मुंबई येथून त्यांनी श्री वडार यांना फोन करुन बांधकामाबाबत चौकशी केली असता श्री वडार यांनी बांधकाम चालू असल्याचे सांगितले व रक्कम रु.1,25,000/- देण्याची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी श्री वडार यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात काही रक्कम जमा केली. त्यानंतर तक्रारदार गावी आले असता श्री वडार यांनी फक्त वाढीव बांधकामाच्या भिंतीसाठी चि-याचे तीन ते चार थर बांधण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी श्री वडार यांना विचारले असता त्यांनी मजूर मिळत नाहीत, बांधकाम साहित्य उपलब्ध होत नाही अशी कारणे सांगून पावसाळयापूर्वी बांधकाम करुन देण्याचे आश्वासन दिले, परंतु पावसाळा चालू झाला तरी बांधकाम पूर्ण केले नाही. सदर बांधकाम अर्धवट राहिल्याने पावसाचे पाणी तक्रारदाराच्या घरात झिरपू लागले व घरातील इलेक्ट्रीक वस्तू इत्यादी सामानाचे फार मोठे नुकसान झाले. त्याबाबत त्यांनी श्री वडार यांना भेटून कल्पना दिली. त्यावेळी त्यांनी दिवाळीपूर्वी बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
4) तक्रारदार यांनी पूढे असे म्हटले आहे की, त्यांचा मुलगा जेव्हा सन 2011 च्या चतुर्थीच्या सुट्टीत घरी आला त्यावेळी बांधकाम आहे त्याच स्थितीत अर्धवट राहिले होते. त्यावेळी त्यांने श्री वडार यांना बांधकामाबाबत विचारले असता त्याने बांधकामाचे सामानाचे बजेट काढून दिले व आणखी रक्कमेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराच्या मुलाने उरलेली रक्कम बांधकाम सुरु केल्यानंतर तात्काळ देतो असे सांगितले, परंतू श्री वडार यांनी बांधकाम चालू केले नाही. त्यानंतरही वेळोवेळी विनंत्या करुनही श्री वडार यांनी बांधकाम पूर्ण केले नाही.
5) तक्रारदार यांनी म्हटले आहे की, बांधकामाबाबत सहमती झाल्यानेच व श्री वडार यांनी दिलेल्या अंदाजपत्रकानुसार त्यांना आगावू रक्कम देण्यात आली व त्यांनी 6 महिन्यात बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू रक्कम स्वीकारुनही श्री वडार यांनी ठरल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांना प्रस्तुत तक्रार करणे भाग पडले.
6) तक्रारदार यांनी श्री वडार यांनी बांधकाम पूर्ण न केल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी आगाऊ दिलेली रक्कम रु.1,25,000/- व त्यावर द.सा.द.शे.10% दराने व्याज, घराचे साहित्याचे झालेल्या नुकसानीपोटी रु.40,000/-, बाजार भाव वाढल्यामुळे नव्याने बांधकाम करण्यासाठी लागणारा खर्च, तक्रार अर्जाचा खर्च देण्याचा श्री वडार यांना आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
7) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ शपथपत्र, अखत्यारपत्र तसेच नि.5 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.5/1 वर अंदाजपत्रक, नि.5/2 वर रक्क्मा खात्यावर भरलेल्या पावत्या, नि.5/3 वर कामाचे देयक, नि.5/4 वर तक्रारदार यांनी श्री वडार यांना दिलेले पत्र व पोहोच पावती नि.5/5 वर मिळकतीचे छायाचित्र आणि नि.5/6 वर मंचाकडील आदेशाची प्रत दाखल केली आहे.
8) विरुध्द पक्ष श्री वडार यांनी आपले लेखी म्हणणे नि.9 वर दाखल केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, श्रीमती माधवी आचरेकर यांनी घर नं.17-सी या वन प्लस बांधकामाबद्दल व साईटची एक खोली बांधून देण्याबाबत म्हाडाकडे अर्ज केला होता. सदर बांधकामाचे एकूण क्षेत्र 486 स्वेअर फूट आहे. तक्रारदार यांनी प्लॅस्टर व स्लॅबचे बांधकाम रु.2,25,000/- मध्ये पूर्ण करुन देण्यास सांगीतले. त्यानुसार त्यांनी बांधकाम व साईट बांधकाम पूर्ण केलेले आहे व त्याचा खर्च रु.1,18,700/- झाला आहे.
9) श्री वडार यांनी पुढे म्हटले आहे की, सदर बांधकामाची मजूरी, सिमेंट, रेती, खडी व बांधकामाला लागणारे चिरे असा सर्व खर्च तक्रारदार यांना लेखी स्वरुपात दिलेला आहे. तसेच तक्रारदार यांनी सांगितलेप्रामणे 40 फुट पाईप बाहेरुन घेणेसाठी पाईप व लागणारे मटेरियल, मजूर याचा खर्च रु.20,000/- झाला आहे. सदर काम झाल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना रु.1,00,000/- देणेबाबत सांगितले व स्लॅब आणि प्लॅस्टरचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करुन देण्यात येईल असे सांगितले. परंतू तक्रारदार यांनी पैसे देण्यास नकार दिला व वाद निर्माण केला आहे. त्यामुळे मंचाने योग्य तो विचार करुन न्याय द्यावा अशी त्यांनी विनंती केली आहे.
10) श्री वडार यांनी नि.11 वर अर्ज देऊन तक्रारदार यांचे घरासाठी झालेल्या खर्चाचा सविस्तर तपशील दिला आहे व एकूण रु.1,00,800/- खर्च झाल्याचे नमूद केले आहे. तसेच स्लॅब व इतर कामासाठी रु.35,000/- चे चिरे, वाळू, खडी इ. साहित्य साईटवर पोहोच केले आहे. त्यामुळे तक्रादार यांचेकडून त्यांना रु.10,800/- येणे निघते. तसेच तक्रारदार रक्कम देण्यास तयार नसल्यास सदर साहित्य घेऊन जाण्यास त्यांना परवानगी द्यावी व त्या परिस्थितीत ते तक्रारदार यांना उर्वरित शिल्लक रक्कम रु.24,200/- देण्यास तयार आहेत असे म्हटले आहे.
11) तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे बांधकाम अर्धवट सोडून सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार अनुतोष मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
12) मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जात व शपथपत्रात म्हटले आहे की, त्यांनी श्री वडार यांच्यासोबत घराचे वाढीव बांधकाम करण्याबाबत करार केला होता व सदर करारानुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यानुसार रु.3,36,000/- खर्च अपेक्षित होता. सदर अंदाजपत्रक नि.5/1 वर आहे. सदर करार झाल्यानंतर त्यांनी तक्रारदारास रक्कम रु. 10,000/- अदा केली आहे. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार 6 महिन्यात बांधकाम पूर्ण करण्याचे श्री वडार यांनी मान्य केले होते. परंतु रक्कम रु.1,25,000/- अदा केल्यानंतर तक्रारदार यांनी फक्त भिंती केल्या व बांधकाम अर्धवट ठेऊन जादा रक्कमेची मागणी करु लागले. सदर बांधकाम हे अॅडव्हांसपोटी दिलेल्या रक्कमेपक्षा कमी असल्यामुळे तक्रादार यांनी बांधकाम चालू करणेबाबत व काम चालू केल्यानंतर रक्कम तात्काळ देण्यात येईल असे सांगितल्यानंतरही श्री वडार बांधकाम चालू न करता जादा रक्कमेची मागणी करु लागले व ठरल्यानुसार श्री वडार यांनी मुदतीत दिलेल्या रक्कमेपेक्षा कमी काम केले व पावसाळयात साचलेल्या पाण्याने घरातील साहित्याचेही नुकसान झाले व पावसाळयात साचलेल्या पाण्याने घरातील साहित्याचेही नुकसान झाले. सदर कृती ही सेवेतील त्रुटी आहे, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. श्री वडार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बांधकामासाठी रु.80,800/- खर्च केले आहेत व नवीन पाईप लाईनसाठी रु.20,000/- खर्च केले आहेत व रु.35,000/- चे साहित्य त्या ठिकाणी पुढील कामासाठी पोहोच केले आहे. पुढील कामासाठी पैशाची मागणी केली असता तक्रारदार रक्कम देण्यास तयार नाही. त्यामुळे बांधकाम करता आलेले नाही. त्यामुळे त्यांचा काहीही दोष नाही, असे विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे.
13) यासदंर्भात तक्रारदार यांनी झालेल्या बांधकामाचे मुल्यांकन शासकीय नोंदणीकृत मुल्यांकन तज्ज्ञ श्री विकास देसाई यांचेकडून करुन घेतले आहे ते नि.14/2 वर दाखल केले आहे व त्यांचे शपथपत्र नि.24/1 वर दाखल केले आहे. त्यानुसार बांधकामाचे मुल्यांकन रु.66,800/- इतके दर्शविण्यात आले सदर शपथपत्र, पुरावा संपल्याची पुरसीस दिल्यानंतर दाखल केले आहे. त्यामुळे ते पुराव्यात वाचता येणार नाही असा आक्षेप नि.26 वर श्री वडार यांचेतर्फे अॅड. सुकाळी यांनी घेतला आहे. सदर शपथपत्र दाखल मुल्यांकनाच्या अनुषंगाने असल्यामुळे व ते श्री वडार यांना पूर्वीच माहित असल्यामुळे ते पुरावा म्हणून वाचता येईल, असे आम्हांस वाटते. सदर मुल्यांकन चुकीचे आहे हे दर्शविण्यासाठी श्री वडार यांनी कुठलाही तज्ज्ञाचा पुरावा किंवा मुल्यांकन सादर केलेले नाही.
14) वरील परिस्थितीत विरुध्द पक्ष श्री वडार यांनी तक्रारदार यांचेकडून रु.1,25,000/- घेऊन तेवढया रक्कमेचे बांधकाम न करुन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
15) मुद्दा क्रमांक 2- विरुध्द पक्ष यांनी बांधकाम अपूरे ठेवून झालेल्या नुकसानीपोटी रु.1,25,000/- व त्यावर द.सा.द.शे.10% दराने व्याज, घराचे साहित्याचे झालेल्या नुकसानीपोटी रु.40,000/-, बाजार भाव वाढल्यामुळे नव्याने बांधकाम करण्यासाठी लागणारा खर्च, तक्रार अर्जाचा खर्च देण्याचा श्री वडार यांना आदेश द्यावा अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
16) आम्ही मुल्यांकन अहवाल व श्री विकास देसाई यांचे शपथपत्र बारकाईने पाहिले आहे. तक्रारदार यांचे एकूण बांधकाम हे रु.66,800/- चे झाल्याचे त्यावरुन दिसून येते. तक्रारदार यांचेकडून रु.1,25,000/- मिळाल्याचे श्री वडार यांनी नि.11 मध्ये मान्य केलेले आहे. त्यामुळे श्री वडार यांचेकडे 1,25,000 - 66,800= 58200 जादा झालेले आहेत, असे दिसून येते. श्री वडार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बांधकामासाठी रु.80,800/- आणि सदर बांधकामाच्या साईडचे खोलीचे बांधकामामधून पाण्याची तीन इंच सार्वजनिक पाईपलाईन जात होती. सदर पाईपलाईन खोदकाम करुन ती एका साईडला पुन्हा नवीन पाईपलाईन केली असे म्हटले आहे व त्यासाठी 3 इंच पाईप 60 फूट जी.आय.मध्ये टाकला त्यासाठी रु.6,000/-, मटेरियल रु.5,000/-, फिटींग मजूरी रु.5,000/-, खोदाई मजूरी रु.2,000/- व गाडी भाडे रु.2,000/- असे रु.20,000/- खर्च केल्याचे म्हटले आहे. सदर म्हणणे तक्रारदार यांनी नि.13 वरील पुराव्याचे शपथपत्रात नाकारलेले नाही. तसेच श्री विकास देसाई यांनीही मुल्यांकन अहवालात त्याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सदर पाईपलाईनसाठी झालेला खर्च विचारात घ्यावा लागेल असे आम्हांला वाटते. श्री वडार यांनी झालेल्या खर्चाच्या पावत्या दिलेल्या नाहीत. परंतू सर्वसाधारण दिलेले दर जास्त आहेत असे प्रथमदर्शनी दिसते. फिटिंग मटेरियल, मजुरी, खोदाईचे व गाडीभाडे जादा असलेचे दिसून येते. सदर पाईपलाईनसाठीचा खर्च रु.12,000/- झाला आहे असे आम्हांस वाटते. त्यामुळे श्री वडार यांनी एकूण रु.66,800/- + 12,000/- मिळून रु.78,800/- चे काम केले होते असे दिसून येते. त्यामुळे श्री वडार यांनी तक्रारदार यांना रु.46,200/- व त्यावर दि.24/03/2011 पासून सदर रक्कमेवर 12% दराने व्याज तक्रारदार मिळणेस पात्र आहे. तक्रारदार यांनी विद्यूत साहित्याचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. परंतू त्याचा तपशील व पुरावा दिलेला नाही त्यामुळे त्याबाबत भरपाई देता येणार नाही. तक्रारदार यांना मानसिक त्रास व तक्रारीसाठी खर्च झालेला आहे. त्यामुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- मिळणेस पात्र आहे.
17) मुद्दा क्रमांक 3 - वरील विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष मे.एस.बी. एंटरप्रायझेस तर्फे श्री शिवाजी वडार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.46,200/-(रुपये सेहेचाळीस हजार दोनशे मात्र) व त्यावर दि.24/03/2011 पासून रक्कमेची पुर्णफेड होईपर्यंत द.सा.द.शे. 12% दराने व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांचे आत दयावे.
3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.5,000/-(रुपये पाच हजार मात्र) व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/-(रुपये तीन हजार मात्र) या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांचे आत दयावेत.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 30/12/2013
सही/- सही/- सही/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.