निकाल
पारीत दिनांकः- 30/06/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी दि. 6/11/2010 रोजी जाबदेणार क्र. 1 कडून ब्लॅकवेरी हॅंडसेट रक्कम रु. 18,800/- देऊन खरेदी केला. त्यावेळी जाबदेणारांनी त्यांना 18 महिन्यांची वॉरंटी दिली होती. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ते हा हॅंडसेट योग्य रितीने वापरीत होते. दि. 4/6/2011 रोजी तक्रारदाराच्या हॅंडसेटच्या स्क्रीनवर डिस्प्ले दिसत नव्हता, म्हणून त्यांना जाबदेणार क्र. 2 यांना फोन केला व त्यांच्या सल्ल्यानुसार सिममध्ये सर्व डाटा घेऊन हॅंडसेट दि. 7/6/2011 रोजी जाबदेणार क्र. 1 यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिला. दि. 14/6/2011 रोजी तक्रारदारांना जाबदेणार क्र. 1 यांच्याकडून मेल मिळाला, त्यामध्ये त्यांनी तक्रारदारांचा हॅंडसेट वॉरंटीमध्ये बसत नसल्यामुळे व एल.सी.डी. व स्नॅप शॉट डॅमेज असल्यामुळे तो ब्लॅकबेरी हाय लेव्हल रिपेअर सेंटरला पाठविण्यात आला आहे, असे नमुद केले होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, हॅंडसेट विक्रीच्या वेळी लिटरेचरमध्ये वॉरंटीबद्दल काहीही स्पष्ट केलेले नव्हते. हॅंडसेट खराब होण्याचे काहीही कारण नव्हते, कारण तक्रारदारांनी हॅंडसेट अतिशय योग्य रितीने हाताळला होता. हॅंडसेट रिपेअरिंगसाठी देताना त्याची स्थिती “Good” अशी नमुद केली होती. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जर खरेदी केलेल्या वस्तुमध्ये काही दोष असतील व ती वस्तु वॉरंटीमध्ये नसेल तर, जाबदेणारांनी ती वस्तु बदलून दिली पाहिजे किंवा त्याची रक्कम परत केली पाहिजे. सदरच्या हॅंडसेटची वॉरंटी नसल्यामुळे त्याच्या दुरुस्तीकरीता रक्कम रु. 5900/- खर्च येईल असे जाबदेणारांनी तक्रारदारास कळविले. म्हणून तक्रारदारांनी हॅंडसेट विनामुल्य दुरुस्त करुन द्यावा किंवा बदलून द्यावा अशी नोटीस जाबदेणारांना पाठविली, परंतु जाबदेणारांनी नोटीशीस उत्तर दिले नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 18,800/- हॅंडसेटची किंमत किंवा हॅंडसेट बदलून द्यावा, एल.सी.डी. डिस्प्ले विनामुल्य बदलून द्यावा, रक्कम रु. 10,000/- नुकसान भरपाई द्यावी, तक्रारीचा खर्च रक्कम रु. 4000/- व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] दोन्ही जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, जाबदेणार क्र. 2 यांनी संधी देऊनही गैरहजर राहिले म्हणून त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत.
जाबदेणार क्र. 1 मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, ते उत्पादक नाहीत व वॉरंटीचा मुद्दा हा उत्पादकच ठरवितात. लिमिटेड वॉरंटी स्टेटमेंटमध्ये खालीलप्रमाणे नमुद केले आहे,
“Warranty does not cover physical damage to the surface of the
Blackberry Hardware including cracks or scratches on the LCD
screen. In addition to the above, Point no. 3 of the terms and
conditions of the customer unit receipt reiterates that company
is not responsible to provide warranty for customer induced
defects, damaged products or for the products that do not meet
warranty criteria.”
यानुसार जाबदेणार क्र. 1 यांनी जो दोष तक्रारदारांच्या हॅंडसेटमध्ये निर्माण झाला त्यासाठी ब्लॅकबेरी हाय लेव्हल रिपेअर सेंटरला पाठविला व तक्रारदारांना सदरचा हॅंडसेट वॉरंटीमध्ये नसल्यामुळे विनामुल्य दुरुस्त करुन मिळणार नाही, तर त्यासाठी पैसे पडतील असे सांगितले. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, ते फर्स्ट लेव्हल सपोर्ट सर्व्हिस सेंटर आहेत, त्यामुळे एल.सी.डी. वरील क्रॅक्स समजू शकत नाहीत, त्यांच्याकडे जेव्हा हॅंडसेट आणला, तेव्हा एल.सी.डी. ब्लिंक होत नव्हता. एल.सी.डी. मधील दुरुस्ती केवळ हाय लेव्हल रिपेअर सेंटरमध्येच केले जातात, त्यामुळे हॅंडसेट त्यांच्याकडे आणल्यावर त्यांनी तो ‘Good” स्थितीमध्ये आहे असे नमुद केले. हॅंडसेटवरील क्रॅक्स या तो योग्य रितीने न हाताळल्यामुळे पडल्या आहेत. जाबदेणारांनी तक्रारदारास, सदरचा हॅंडसेट विनामुल्य दुरुस्त होऊ शकत नाही, असे सांगितले असतानाही तक्रारदार त्यांच्याकडून हॅंडसेट घेण्याकरीताही आले नाही किंवा दुरुस्तीकरीता रक्कमही दिली नाही. त्यामुळे हॅंडसेट विनामुल्य दुरुस्त करण्याचा किंवा बदलून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार क्र. 1 करतात.
4] जाबदेणार क्र. 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दि. 6/11/2010 रोजी जाबदेणार क्र. 1 कडून ब्लॅकवेरी हॅंडसेट रक्कम रु. 18,800/- देऊन खरेदी केला. दि. 4/6/2011 रोजी तक्रारदाराच्या हॅंडसेटच्या स्क्रीनवर डिस्प्ले दिसत नव्हता, म्हणून त्यांना जाबदेणार क्र. 2 यांना फोन केला व त्यांच्या सल्ल्यानुसार सिममध्ये सर्व डाटा घेऊन हॅंडसेट दि. 7/6/2011 रोजी जाबदेणार क्र. 1 यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिला. जाबदेणार क्र. 1 यांनी एल.सी.डी. मध्ये दोष असल्यामुळे व तो दोष त्यांच्या लेव्हलमध्ये न समजू शकल्याने ब्लॅकबेरी हाय लेव्हल रिपेअर सेंटरला पाठविला व तक्रारदारांना सदरचा हॅंडसेट वॉरंटीमध्ये नसल्यामुळे विनामुल्य दुरुस्त करुन मिळणार नाही, तर त्यासाठी पैसे पडतील असे सांगितले. तेथे त्यांना एल.सी.डी. व स्नॅप शॉट डॅमेज झाल्याचे आढळून आले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी 18 महिन्यांची वॉरंटी दिलेली होती. यासाठी तक्रारदारांनी पावती दाखल केलेली आहे, त्यावर उत्पादकिय दोष असल्याच एका वर्षाची वॉरंटी मिळेल असे नमुद केले आहे. तक्रारदारांनी वॉरंटी कार्ड दाखल केले नाही. जाबदेणारांनी बीबी वॉरंटी स्टेटमेंट दाखल केले आहे, तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ते ब्लॅकबेरीसंदर्भात नाही. परंतु त्याची पाहणी केली असता, सदरचे स्टेटमेंट हे ब्लॅकबेरीसंदर्भातीलच आहे, हे दिसून येते. त्यामध्ये स्पष्टपणे “ This Limited Warranty does not cover physical damage to the
surface of the Blackberry Hardware including cracks or scratches
on the LCD screen”
असे नमुद केले आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या ब्लॅकबेरी हॅंडसेटसाठी वॉरंटी होती, तरीही जाबदेणारांनी विनामुल्य त्यांचा हॅंडसेट दुरुस्त करुन दिला नाही, हे तक्रारदार सिद्ध करु शकले नाहीत, म्हणून तक्रारदारांनी त्यांचा हॅंडसेट दुरुस्तीचे चार्जेस देऊन जाबदेणारांकडून दुरुस्त करुन घ्यावा. जाबदेणारांनी बीबी वॉरंटी स्टेटमेंट दाखल करुन तक्रारदारांचा हॅंडसेट वॉरंटीमध्ये नव्हता, हे सिद्ध केले आहे, यामध्ये जाबदेणारांची कोणतीही सेवेतील त्रुटी मंचास आढळत नाही.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.