तक्रार दाखलकामी आदेश
(दि. 21/02/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारदारांचे वकील श्री. नरेंद्र जैन यांना तक्रार दाखलकामी सविस्तर ऐकण्यात आले. त्यांनी निवेदनाच्या पृष्ठर्थ आधी दोन व नंतर एक असे न्यायनिवाडे सादर केले.
2. तक्रार व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे पाहण्यात आली. तक्रारदार यांचे वडिल व इतर दोन इसम में. के.आर.विठ्टल या भागीदारी संस्थेचे भागीदार होते. या संस्थेचे सामनेवाले बँकेकडे कॅश क्रेडिट खाते होते. या संस्थेनी कर्जाच्या सुविधेकरीता दुकान क्र 18, दत्तानी अपार्टमेंट नं. 4, पारेख नगर, एस.व्ही. रोड, कांदिवली(प), मुंबई- 400067 चे मूळ दस्तऐवज हमी म्हणून सामनेवाले यांना दिले होते. काही काळानंतर तक्रारदार यांचे वडिल वारल्यानंतर, तक्रारदार व त्यांच्या आई हे भागीदार झाले. सामनेवाले यांच्या कर्जाची परतफेड करण्यात आली व ते खाते बंद करण्यात आले. पूर्वी असलेले दोन भागीदार हे निवृत्त झाले. तक्रारदार यांच्या आई वारल्यानंतर ते एकटेच भागीदार असल्यामूळे तक्रारदार में. के.आर. विठ्ठलचे प्रोप्रायटर म्हणून काम बघू लागले. तक्रारदार यांचे व्यतिरीक्त तीन विवाहित भगीनी वारसदार आहेत. तक्रारदारनी सामसनेवाले यांना दुकानाच्या मूळ दस्तऐवजांची मागणी केली असता, इतर इसमांनी आक्षेप घेतल्यामूळे सर्व संबधीत व्यक्तींनी बँकेत यावे व दस्तऐवज सर्वांच्या समक्ष परत करण्यात येतील, असे कळविले. परंतू, ठरलेल्या दिवशी बँकेत फक्त तक्रारदार उपस्थित होते. तक्रारदार यांना मूळ दस्तऐवज प्राप्त न झाल्यामूळे ही तक्रार त्या दस्तऐवजासाठी व नुकसान भरपाईकरीता दाखल करण्यात आली .
3. उपरोक्त बाबीवरून हे स्पष्ट होते की, सामनेवाले कडे कॅश क्रेडिट खाते असणारी व कर्ज घेणारी ही भागीदार संस्था होती. या भागीदारी संस्थेनी व्यापाराकरीता सामनेवाले यांची सेवा घेतल्यामूळे भागीदारी संस्था ही ग्रा. सं.कायदयाच्या ‘ग्राहक’ या संज्ञेमध्ये समाविष्ट होत नाही. त्यामुळे ही तक्रार या मंचात चालु शकत नाही. तक्रारदार यांनी वैयक्तिक रूपात कागदपत्राची मागणी सामनेवाले यांच्याकडे केलेली आहे. तक्रारदार व सामनेवाले यांचा प्रत्यक्षपणे कोणताही करार नाही. तक्रारदार यांना भागीदारी संस्थेचे अधिकार प्राप्त आहेत किंवा ते त्या संस्थेचे उत्तराधिकारी आहेत हे सिध्द करणे आवश्यक आहे. काही व्यक्तींनी सामनेवाले यांच्याकडे तक्रारदार यांना दस्तऐवज देण्याबाबत आक्षेप घेतल्यामूळे हि बाब सिध्द करणे आवश्यक होते. तक्रारदार यांना तीन विवाहित भगीनी आहेत ही बाब सुध्दा महत्वाची आहे. आमच्या मते, तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून दस्तऐवज प्राप्त करण्याचे अधिकारी आहेत, ही बाब (टायटल) या मंचास समरी पध्दतीने ठरविता येत नाही. तक्रारीच्या बाबी विचारात घेता, आमच्या मते ही तक्रार मा. दिवाणी न्यायालयानी निकाली काढणे योग्य होईल.
4. तक्रारदारानी मा. आंध्र प्रदेश राज्य आयोगानी अपील क्र. 571/2008 लक्ष्मी पुरम प्रॉयमरी अॅग्रीकल्चरल को.ऑर सोसायटी लि. विरूध्द गोल्ला शिवरामा क्रिष्णा निकाल तारीख. 10/02/2011, मा. राष्ट्रीय आयोगानी एम. मलीका विरूध्द स्टेट बँक ऑफ इंडिया, IV (206) CPJ 1 NC व मा. दिल्ली राज्य आयोगानी में. विशाखा केमिकल्स आणि इतर विरूध्द पियोर अर्थ इन्फ्रॉस्ट्रक्चर लि. प्रथम अपील क्र. 327/2010 निकाल तारीख 29/04/2014 चा आधार घेतला आहे.
5. उपरोक्त पहिल्या दोन न्यायनिवाडयामध्ये तक्रारदार हे व्यक्तीशः सुरूवातीपासून प्रकरणांशी संबधीत होते व त्यामध्ये भागीदारी संस्थेचा अंर्तभाव नव्हता. में. विशाखा केमिकल्समध्ये संस्थेचे भागीदार हे उपजिवीकेकरीता काम बघतात असे नमूद आहे. परंतू, मा. राष्ट्रीय आयोगानी कंपनी ही स्वतःच्या उपजिवीकेकरीता काम/व्यवसाय/व्यापार करते हे तत्व लागु होत नाही, असा निर्णय तक्रार क्र 286/2015 में. फुचासीया डेव्हलोपमेंट प्रा.लि. विरूध्द में. डि.एल.एफ कमर्शियल डेव्हलोपमेंट लि. निकाल तारीख 29/04/2015 मध्ये निर्णय पारीत केलेला आहे. सबब, आमच्या मते मा. दिल्ली राज्य आयोगाचा निर्णय लागु होणार नाही.
6. उपरोक्त चर्चेनूसार खालील आदेश.
आदेश
- तक्रार क्र 252/2017 ही ग्रा.सं.कायदयाच्या कलम 12(3) प्रमाणे फेटाळण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
- अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-