(द्वारा मा. सदस्य – श्री. ना.द.कदम)
1. सामनेवाले ही मालकी हक्क स्वरुपातील इमारत बांधकाम व्यावसायिक संस्था आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याशी केलेल्या संदनिका व्यवहारातून प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार सामनेवाले यांनी नायगाव येथे विकसित केलेल्या रश्मी स्टार सिटी या प्रकल्पातील इमारत क्र. सी-1 मधील सदनिका क्र.
204, रु. 14.63 लाख या किमतीस विकत घेण्याचा व्यवहार करून सामनेवाले यांना दि. 05/05/2014 रोजी रु. 4.50 लाख दिले. त्यानुसार सामनेवाले यांनी दि. 05/05/2014 रोजी तक्रारदाराचे सदनिका बुकिंग कन्फर्म केले. यानंतर, तक्रारदार वारंवार सामनेवाले यांचेकडे प्रत्यक्ष साईटवर गेले असता त्यांना प्रत्यक्ष जागेवर कोणतेही बांधकाम किंवा कार्यालय सुध्दा आढळुन आले नाही. सामनेवाले यांनी कोणतेही बांधकाम न केल्याने, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता सामनेवाले यांनी तक्रारदारांना रु. 1.50 लाख रकमेचे दोन धनादेश दिले व उर्वरित रक्कम रु. 1.50 लाख नंतर देण्याचे मान्य केले. तक्रारदारांनी सदर धनादेश खात्यावर जमा केले असता, सदर धनादेश न वटता अनादर होऊन परत आले. तक्रारदारांनी सदर बाब सामनेवाले यांना कळवुन रकमेची मागणी केली असता, सामनेवाले यांनी पैसे परत करण्यास नकार दिला. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन तक्रारदाराची रक्कम रु. 4.50 लाख व्याजासह परत मिळावी, नुकसान भरपाई रु. 50,000/- मिळावी, व तक्रार खर्च रु. 20,000/- मिळावा अशा मागण्या केल्या आहेत.
3. सामनेवाले यांना पाठविलेली तक्रारीची नोटिस ‘अनक्लेम्ड‘ या शे-यासह मंचामध्ये परत आल्यानंतर तक्रारदारांनी सर्विस अफिडेव्हिट दाखल केले. सामनेवाले यांना संधी देवूनही ते गैरहजर राहिल्याने, तक्रार त्यांच्या विरुध्द एकतर्फा चालविण्यात आली.
4. तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केले. तोंडी युक्तिवादची पुरसिस दाखल केली. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र व युक्तिवादाचे वाचन मंचाने केले. त्यावरुन प्रकरणामध्ये खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ) तक्रारदारांनी दाखल केलेल्या बुकिंग फार्मवरुन दिसून येते की, सामनेवाले यांच्या रश्मी स्टार सिटी या प्रकल्पातील सी-1 इमातीमधील 385 चौ.फुट श्रेत्रफळाची सदनिका क्र. 204 रु. 14.63 लाख किमतीस तक्रारदारांना विकल्याचे सदर बुकिंग फॉर्म वरील नोंदीनुसार दिसून येते. तक्रारदारांनी त्याचवेळी रु.4.50 लाख दिल्याचे व सामनेवाले यांना प्राप्त झाल्याची बाब सामनेवाले यांनी कन्फर्म केली आहे.
ब) तक्रारदाराच्या कथनानुसार, त्यानंतर, इमारतीच्या साईटवर त्यांनी बराचकाळ भेट दिल्यानंतर, सामनेवाले यांनी बांधकाम न केल्याचे त्यांना आढळुन आले. त्यामुळे त्यांनी सामनेवाले यांचेकडे बांधामाबाबत विचारणा केली असता, त्यांना प्रत्येक वेळी उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. सामनेवाले यांनी तक्रारदारांना रु. 1.50 लाख रक्कमेचे दि. 19/07/2014 व दि. 24/07/2014 रकमेचे एचडीएफसी बँकेवर काढलेले 2 धनादेश दिले. तथापी, दोन्ही धनादेश अनादर होवुन परत आल्याचा पुरावा तक्रारदारांनी दाखल केला आहे. यानंतर, अनेकवेळा मागणी करुनही, सामनेवाले यांनी तक्रारदारांना रक्कम परत केली नसल्याचे दिसून येते.
उपरोक्त बाबींचा विचार केला असता सामनेवाले यांना तक्रारदाराकडुन सदनिका विक्री संदर्भात बरीच रककम घेवुनही त्यांनी सदनिका देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाहीच, शिवाय, तक्रारदारांना रक्कम परत न करुन त्रृटींची सेवा दिली असल्याचे स्पष्ट होते, त्यावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्रमांक 1067/2015 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले यांनी विकलेल्या सदनिकेसंबंधी त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले यांनी तक्रारदाराकडुन स्वीकारलेली रकम रु. 4,50,000/- (रक्कम रु. चार लाख पन्नास हजार फक्त) दि. 01/06/2014 पासून 12% व्याजासह दि.31/03/2017 पुर्वी तक्रारदारांना परत करावी. आदेश पुर्ती नमुद कालावधीमध्ये न केल्यास दि. 01/06/2014 पासून 15% व्याजासह परत करावी.
4) तक्रार खर्चाबद्दल रु. 10,000/- (अक्षरी रु. दहा हजार फक्त) दि. 31/03/2017 पुर्वी सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावेत.
5) व्याज दिल्यामुळे नुकसान भरपाईचे आदेश नाहीत.
6) आदेशाच्या प्रति उभय पक्षांना विनाशुल्क, विनाविलंब पाठविण्यात याव्यात.
7) संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.