निकाल
पारीत दिनांकः- 30/06/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी दि. 12/5/2011 रोजी 20 ग्रॅम वजनाची वेढणी रक्कम रु. 44,735/- देऊन खरेदी केली होते. त्यापैके रक्कम रु. 40,000/- तक्रारदारांनी रोखीने भरले व कार्डद्वारे रक्कम रु. 4,735/- भरले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी मेकिंग चार्जेसच्या नावाखाली रक्कम रु. 93/- कार्ड पेमेंट चार्जेस घेतले. जाबदेणारांनी दिलेल्या बीलावर 2% चार्जेस नमुद केले आहेत, त्याचा हिशोब करता ते रु. 88.40 किंवा व्हॅट चार्जेस आकारले असतील तर रु. 89.28 इतके आले पाहिजे परंतु जाबदेणारांनी रु. 93/- घेतले आहेत. जाबदेणार कार्ड पेमेंट सर्व्हिस चार्जेस आकारु शकत नाहीत व मेकिंग चार्जेसच्या नावाखाली कार्ड पेमेंट सर्व्हिस चार्जेस आकारणे, म्हणजे अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करणे होय. जाबदेणारांनी रोखीने वेढणी खरेदी केल्यामुळे मेकिंग चार्जेस आकारलेले नाहीत, त्यामुळे तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार रु. 93/- हे कार्ड पेमेंट सर्व्हिस चार्जेस आहेत, ते जाबदेणारांनी परत करावेत म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार, जाबदेणारांनी अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला आहे, असे घोषित करावे, त्याचप्रमाणे जाबदेणारांकडून रक्कम रु. 2,093/- ची मागणी करतात, तसेच रक्कम रु. 10,00,000/- प्राईम मिनिस्टर्स रिलिफ फंडामध्ये जमा करावे, द.सा.द.शे. 15% व्याज द्यावे, तक्रारीचा खर्च द्यावा व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार,
तक्रारदारांची रक्कम रु. 10,00,000/- प्राईम मिनिस्टर्स रिलिफ फंडामध्ये जमा करावी ही मागणी या मंचाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. जाबदेणार हे नोंदणीकृत पार्टनरशिप फर्म आहे, तेथे सोन्या चांदीचे दागिने विक्री केले जातात. जाबदेणार ऑर्डरनुसार दागिने बनवितात. जाबदेणारांकडे वेढणी किंवा स्टॅंडर्ड डिझाईनचे सोन्याचे बिस्किटे रोखीने खरेदी केले तर, ते मेकिंग चार्जेस आकारत नाहीत, परंतु जर विशिष्ट डिझाईनचे वेढणी किंवा सोन्याचे बिस्किटे आणि इतर वस्तुंकरीता 1% ते 20% असे वेगेवेगळे मेकिंग चार्जेस आकारतात, ते चार्जेस वापरलेले मटेरिअल, वस्तुचा प्रकार त्याची डिझाईन, त्यावर केलेली कलाकारी, लागलेला वेळ इ. बाबींवर अवलंबून असतात. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, इतर वस्तुंच्या तुलनेत वेढणीसाठी आकारले जाणारे मेकिंग चार्जेस हे अत्यंत कमी म्हणजे 1% ते 4% इतकेच असतात, त्यामुळे वेढणी आणि बिस्किटाची मजूरी माफ करणे त्यांना परवडते. मेकिंग चार्जेस घ्यावे किंवा नाही हा पूर्णपणे जाबदेणारांचा अधिकार आहे. जाबदेणारांनी त्यांच्या ग्राहकांसाठी “आमचे येथे वेढणी/बुलियन रोखीने खरेदी केल्यावर मजूरी आकारली जात नाही” असा बोर्ड लावलेला आहे. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी वेढणी खरेदी करतानी काही रक्कम रोखीने दिली व काही रक्कम कार्डने दिली, त्यामुळे त्यांनी रोखीच्या रकमेवर मजूरी आकारली नाही, परंतु कार्डने भरलेल्या रकमेवर 1.96% या दराने मजूरी आकारली, त्यामुळे त्यांनी कार्ड पेमेंट आकारलेले नाहीत. जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये ते कशाप्रकारे चार्जेस आकारतात याचे सविस्तर वर्णण केले आहे. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार श्रीमती निताली सुश्रुत हसबनिस यांनी तक्रारीवर सही केलेली नाही किंवा त्यांनी त्यांचे शपथपत्रही दाखल केलेले नाही, त्यामुळे प्रस्तुतची तक्रार खर्चासह नामंजूर करावी, अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ श्री. सतीश दिगंबर कुबेर, मॅनेजर, अधिकृत स्वाक्षरीकर्ता (Authorized Signatory) यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांची मुख्य तक्रार ही, जाबदेणारांनी त्यांच्याकडून मेकिंग चार्जेसच्या नावाखाली रक्कम रु. 93/- कार्ड पेमेंट चार्जेस घेतले, अशी आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, R.B.I. च्या नियमानुसार कार्ड पेमेंटवर सर्व्हिस चार्जेस घेता येत नाहीत, परंतु जाबदेणारांनी ते आकारले. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पावतीची मंचाने पाहणी केली असता त्यावर कुठेही कार्ड पेमेंट सर्व्हिस चार्जेसचा उल्लेख आढळून येत नाही, फक्त मेकिंग चार्जेस रु. 93/- दिसून येतात. जाबदेणारांनीही त्यांचे इतर ग्राहकांचे बील दाखल केले आहे, त्यावर कुठेही कार्ड पेमेंट सर्व्हिस चार्जेसचा उल्लेख आढळून येत नाही. सर्व ठिकाणी वेग-वेगळ्या दागिन्यांचे मेकींग चार्जेस नमुद केलेले आढळून येतात. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी केवळ त्यांच्या सोयीसाठी कार्ड पेमेंट करताना कुठले कार्ड आहे, कशाप्रकारचे कार्ड आहे, हे बीलामध्ये नमुद करतात. याचा अर्थ असा होत नाही की, ते कार्ड पेमेंट सर्व्हिस चार्जेस आकारतात. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदारांनी एकुण रक्कम रु. 44,735/- ची खरेदी केलेली आहे, त्यापैकी त्यांनी रक्कम रु. 40,000/- रोखीने दिले व रक्कम रु. 4,735/- क्रेडीट कार्डाने दिले. त्यामुळे जाबदेणारांनी कार्डने भरलेल्या रकमेवर 1.96% या दराने मजूरी आकारली, हे जाबदेणारांचे म्हणणे मंचास पटते. जाबदेणारांनी मेकिंग चार्जेसच्या नावाखाली रक्कम रु. 93/- कार्ड पेमेंट चार्जेस घेतले, यासाठी तक्रारदारांनी कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही, तक्रारदार त्यांची तक्रार सिद्ध करु शकले नाहीत असे मंचाचे मत आहे.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.