अॅड माधूरी वैद्य तक्रारदारांतर्फे
अॅड श्याम कुलकर्णी जाबदेणारांतर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. श्रीकांत एम. कुंभार, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 24/जून/2013
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत जाबदेणार यांच्याविरुध्द सेवेतील त्रुटी साठी दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या ‘वास्तुसमृध्दी’ या प्रकल्पातील सदनिका क्र 4ए व कार पार्किंग क्र 10 नोंदणीकृत करारनामा दिनांक 24/11/2005 अन्वये विकत घेतली. दिनांक 28/3/2007 रोजीच्या ताबा पत्रान्वये तक्रारदारांनी सदनिकेचा ताबा घेतला. ताबा घेण्यापूर्वी तक्रारदारांना सदनिकेचे इन्स्पेक्शन घेतले होते परंतू पार्किंगचे इन्स्पेक्शन तक्रारदारांना देण्यात आलेले नव्हते. पार्किंगचा उपयोग करण्यास सुरुवात केल्यानंतर सदरहू जागा लहान असल्याचे, कार सहजपणे त्यात बसत नसल्याचे, पार्किंगचा प्रवेश सोयीचा नसल्याचे, समोरील प्रवेश द्वारालगतच पार्किंग असल्यामुळे कार काढण्यास पुरेशी जागा नसल्याचे, तसेच पार्किंग मध्येच दोन पिलर्स आल्यामुळे कारचे दरवाजे उघडता येत नसल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. इतर कार पार्किंगचा एरिया 9 x 11, 10.5 x 11, 7.5 x 11, 8.25 x 11असल्याचे वतक्रारदारांचे कार पार्किंग 7 x 11 इतरांच्या तुलनेत लहान असल्याचेही तक्रारदारांच्या निदर्शनास आले. करारामध्ये पार्किंगचे स्पेसिफिकेशन्स देण्यात आलेले नव्हते. करार करतांना जाबदेणार क्र 2 व 3 यांनी पार्किंगचा एरिया नमूद करणे आवश्यक नसल्याचे व पुरेशी जागा देण्यात येणार असल्याचे तक्रारदारांना सांगितले होते. कार पार्क करतांना कारचे नुकसान झाल्यामुळे दिनांक 17/9/2007 रोजी रु. 2547/- व दिनांक 14/2/2008 रोजी दुरुस्ती खर्च रुपये 8583/- आला. तसेच तक्रारदारांची सदनिका व कार पार्किंग ए विंग मध्येच आहे. बी विंग मधील सदनिकाधारक ए विंग मधील पार्किंग वापरतात. जाबदेणार यांच्या निदर्शनास या बाबी आणूनही जाबदेणार यांनी कारवाई न केल्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून पार्किंग क्र 10 मधील दोष दुर करुन अथवा ए विंग मध्ये पुरेशा पार्किंगच्या जागेची मागणी करतात. ए विंग मधील सदनिकाधारकांना त्यांच्या पसंतीनुसार ए विंग मधे पार्किंग मिळावे व बी विंग मधील सदनिकाधारकांना ए विंग मधील पार्किंग वापरण्यास मनाई करण्यात यावी अशीही मागणी तक्रारदार करतात. तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावा अशी मागणी तक्रारदार करतात.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणी विरोध दर्शविला. सदनिकेचे, कागदपत्रांचे व कार पार्किंगचे इन्स्पेक्शन तक्रारदारांना देण्यात आलेले होते. तक्रारदारांच्या पसंतीनेच कार पार्किंग देण्यात आलेले होते. तक्रारदारांनी सदनिका व पार्किंगची पाहणी करुनच दिनांक 24/11/2005 रोजी नोंदणीकृत करारनामा करण्यात आलेला होता. प्रत्यक्षात ताबा घेतांनाही तक्रारदारांनी सदनिकेची व पार्किंगची पाहणी करुनच दिनांक 28/3/2008 रोजी ताबा घेतला होता. तक्रारदारांची कार पार्क करण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या कार पार्किंग मध्ये पुरेशी जागा आहे. जाबदेणार यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. सबब तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
3. तक्रारदारांच्या विनंतीनुसार कोर्ट कमिशनर यांची नियुक्ती करण्यात आली. कोर्ट कमिशनर यांनी दिनांक 29/12/2009 रोजी त्यांचा अहवाल मंचासमोर दाखल केला.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, कोर्ट कमिशनर यांचा अहवाल व फोटोग्राफ यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येतात. मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी तक्रारदारांना अपुरे कार पार्किंग देऊन सदोष सेवा दिली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
3 | आदेश काय ? | तक्रार अंशत: मान्य |
कारणे-
मुद्या क्र 1 ते 3-
तक्रारदारांनी दाखल केलेल्या तक्रारदार व जाबदेणार यांच्यात दिनांक 24/11/2005 रोजी झालेल्या नोंदणीकृत करारनाम्याचे अवलोकन केले असता करारनाम्याच्या पान क्र 13, कलम 2 मध्ये सदनिका क्र 4 ए विंग कार पार्किंग क्र 10 सह तक्रारदारांनी खरेदी केल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. कराराच्या शेडयुल क्र. दोन मध्येही कार पार्किंग क्र 10 चा उल्लेख आहे परंतू स्पेसिफिकेशन्स मात्र नमूद करण्यात आलेले नाहीत. कोर्ट कमिशनर यांच्या दिनांक 29/12/2009 रोजीच्या अहवालाचे अवलोकन केले असता पार्किंग उत्तर दक्षिण होते, प्रवेशाचा मार्ग उत्तर दिशेचा होता, उत्तर दिशेचे पुर्व पश्चिम माप 7.7 फुट होते, तर दक्षिण बाजूचे पुर्व पश्चिम माप 8 फुट तसेच पार्किंगचे पुर्व व पश्चिमेकडील माप सारखेच म्हणजेच 13.2 फुट होते असे नमूद करण्यात आलेले आहे. त्यानुसार कोर्ट कमिशनर यांनी नकाशाही काढून अहवालासोबत दाखल केला आहे. कार पार्किंगमध्ये कार पार्क केल्यानंतर दरवाजा उघडून प्रवेश करतांना त्रास होतो हे अहवालासोबत दाखल केलेल्या फोटो क्र 9 व 10 वरुन स्पष्ट होते. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार पार्किंगचे उत्तर व दक्षिणेकडील पुर्व-पश्चिम माप 19.3 फुट सारखेच होते. जाबदेणार यांच्या सुचनेप्रमाणे कमिशनर यांनी मापे घेतली असता पार्किंगचे उत्तर व दक्षिण कडील पुर्व पश्चिम माप 19.3 फुट, पार्किंगच्या उत्तर बाजूने इमारतीच्या मध्यापासून माप घेतले असता 8.7 फुट व दक्षिण बाजूला 8.4 होते. परंतू अधिकृत पार्किंगच्या खूणा 19.3 पर्यन्त कोर्ट कमिशनर यांना आढळून आलेल्या नाहीअसे अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तसेच गाडी पार्किंग मध्ये असतांना गाडीचा पूर्व व पश्चिम बाजूचा दरवाजा पूर्णपणे उघडता येत नाही, पुर्व बाजूने प्रवेश करतांना अडचणीचे होते, तसेच पार्किंगमध्ये दोन पिलर्स होते हे दाखल फोटोग्राफ वरुन स्पष्ट होते.
तक्रारदारांना दिलेले पार्किंग हे पुरेसे होते, पार्किंगची पाहणी करुनच तक्रारदारांनी पार्किंगचा ताबा घेतला होता यासंदर्भातील कोणताही कागदोपत्री पुरावा जाबदेणार यांनी दाखल केलेला नाही. तसेच करारामध्ये केवळ पार्किगचा क्रमांक नमूद करण्यात आलेला आहे, पार्किंगचे स्पेसिफिकेशन्स, एरिया नमूद करण्यात आलेला नाही. तक्रारदारांना दिलेले पार्किंग हे स्टॅन्डर्ड साईझ मध्ये होते, पार्किंगमध्ये पिलर्स येत नव्हते, गाडी आत आणणे व बाहेर काढणे सुलभ होते यासंदर्भातही जाबदेणार यांनी कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. यासर्वांवरुन तक्रारदारांना देण्यात आलेले पार्किंग क्र 10 हे सदोष आहे ही बाब स्पष्ट होते. जाबदेणार यांच्या सेवेतील ही त्रुटी आहे. तक्रारदारांनी त्यांच्या पार्किंग क्र 10 मधील दोष दूर करुन मागितलेले आहेत परंतू पिलर्स दूर करणे हे अशक्य असल्यामुळे तक्रारदारांची ही मागणी मंच अमान्य करीत आहे. कार पार्क करण्यासाठी 12.3 x 8.4 फुट जागा पुरेश आहे असे मंचाचे मत आहे. सबब तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून पार्किंग क्र 10 मध्येच दोन पिलरचे पुढे पुढील बाजूस 12.3 x 8.4 फूट कार पार्किंग नोंदणीकृत खरेदीखताने तक्रारदारांचे नांवे करुन मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
बी विंग मधील तक्रारदार ए विंग मधील पार्किंगचा उपयोग करतात अशीही तक्रारदारांची तक्रार आहे. परंतू त्यासंदर्भातील कागदोपत्री पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. तसेच प्रस्तुतची तक्रार ही प्रातिनिधीक स्वरुपाची नसल्यामुळे तक्रारदारांची ही मागणी मंच नामंजुर करीत आहे.
जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला म्हणून नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
वर नमूद विवेचन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदोष कार पार्किंग देऊन सेवेत
त्रुटी निर्माण केली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या
ए विंग मध्ये पार्किंग क्र 10 मध्येच दोन पिलरचे पुढील बाजूस 12.3 x 8.4 फूट कार पार्किंग नोंदणीकृत खरेदीखताने तक्रारदारांचे नांवे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करुन दयावे.
4. जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
5. दोन्ही पक्षकारांनी सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एका महिन्याच्या आत घेऊन जावेत अन्यथा ते नाश करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 24 जून 2013