::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारीत दिनांक–21 मार्च, 2018)
01. तक्रारकर्तीने अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष बिल्डर व त्याच्या प्रतिनिधी विरुध्द करारा प्रमाणे भूखंडापोटी जमा केलेली रक्कम नमुद व्याजासह न दिल्याचे कारणावरुन दाखल केली आहे.
02. तक्रारकर्तीचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीला राहण्यासाठी घर बांधण्याचे दृष्टीने भूखंडाची आवश्यकता होती. विरुध्दपक्ष मे.फीनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड या फर्मचा भूखंड विकसित करुन ते विक्री करण्याचा व्यवसाय आहे. विरुध्दपक्ष फर्मचे भूखंड विक्रीचे जाहिराती वरुन तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष फर्मचे प्रस्तावित मौजा पेवठा, तालुका जिल्हा नागपूर येथील ले आऊट मधील भूखंड क्रं-22-ए विकत घेण्याचे निश्चीत केले.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-2) हा विरुध्दपक्ष क्रं-1) चा प्रतिनिधी आहे आणि त्याची ओळख तक्रारकर्तीचे पतीशी होती, त्या ओळखीच्या माध्यमातून त्याने तक्रारकर्तीला ले आऊट मध्ये गुंतवणूक करण्यास प्रवत्त केले. विरुध्दपक्ष क्रं-2) याने सुचविल्या वरुन, विरुध्दपक्ष क्रं-1) याने तक्रारकर्तीशी करार केला, याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, विरुध्दपक्ष क्रं-2) हा विरुध्दपक्ष क्रं-1) चा प्रतिनिधी आहे. विरुध्दपक्षाने मागणी केल्या नुसार तक्रारकर्तीने सन-2009 ते सन-2010 मध्ये वेळोवेळी रकमेचा भरणा केला, तिने विरुध्दपक्षाला एकूण रुपये-5,34,876/- दिलेत. त्यानंतर विरुध्दपक्ष फर्मचे एजंट असलेले विरुध्दपक्ष क्रं-2) श्री एम.डी.राणा यांनी पेवठा येथील ले आऊट मधील भूखंडाची विक्री होणे शक्य नसल्याचे सांगून तिने भूखंडापोटी जमा केलेली रक्कम विरुध्दपक्ष क्रं-1) फर्म मध्ये ठेव म्हणून स्विकारण्यात येईल असे सांगितले, त्यास तक्रारकर्तीने मान्यता दिली. त्या नुसार विरुध्दपक्ष क्रं-1) याने दिनांक-23/09/2011 रोजी तक्रारकर्ती सोबत करार केला, त्यामध्ये विरुध्दपक्षाने मान्य केले की, त्याला तक्रारकर्ती कडून रुपये-5,34,876/- प्राप्त झालेले असून त्यावर तो करार दिनांका पर्यंत वार्षिक -8% दराने व्याज देईल, त्याप्रमाणे वार्षिक-8% दराने व्याजाची रक्कम रुपये-56,632/- येते. मूळ जमा रक्कम रुपये- 5,34,876/- अधिक व्याजाची रक्कम रुपये-56,632/- असे मिळून एकूण रुपये-5,91,508/- विरुध्दपक्षाकडे मुदतठेव म्हणून जमा असल्याचे विरुध्दपक्ष क्रं-1) याने करारात मान्य केले. अशाप्रकारे करार दिनांका पर्यंत व्याजासह जमा एकूण रक्कम रुपये-5,91,508/- वर विरुध्दपक्ष क्रं-1) हा तक्रारकर्तीस पुढील कालावधी करीता दरमहा दिड टक्के दराने ( वार्षिक-18% दराने) व्याज प्रतीमाह रुपये-8,872/- या प्रमाणे रक्कम देतील. तक्रारकर्तीस कोणत्याही कारणास्तव मुद्दलाची रक्कम हवी असल्यास एक महिन्याची आगाऊ नोटीस द्दावी लागेल असेही करारात नमुद करण्यात आले.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने विरुध्दपक्ष क्रं-1) कडे वेळोवेळी कबुल केल्या प्रमाणे व्याजाची रक्कम मिळावी व शक्य असल्यास मूळ गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्यात यावी अशी मागणी केली, या संदर्भात तिने विरुध्दपक्ष क्रं-1) याला पत्र दिले असता विरुध्दपक्ष क्रं-1) याने टप्प्या-टप्प्याने रक्कम परत करण्यास सुरुवात केली. जुलै-2014 मध्ये विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस रुपये-1,00,000/- परत केले. त्यानंतर ऑगस्ट-2014 मध्ये रुपये-1,00,000/- परत केले अशाप्रकारे तक्रारकर्तीस आंशिक एकूण रुपये-2,00,000/- विरुध्दपक्षा कडून प्राप्त झाले.
प्रथम भूखंड नोंदणी करीता पैसे जमा करुन नंतर ते पैसे गुंतवणूक स्वरुपात जमा ठेवणे आणि त्यातील काही पैसे परत करुन उर्वरीत पैसे देण्यास टाळाटाळ करणे ही विरुध्दपक्षाची अनुचित व्यापारी पध्दती आहे. विरुध्दपक्षावर फौजदारी गुन्हा सुध्दा दाखल केलेला आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे, म्हणून तिने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन अशी मागणी केली की, विरुध्दपक्षानीं तिची परत न केलेली रक्कम रुपये-3,91,508/- आणि सप्टेंबर-2011 पासून ते ऑगस्ट-2014 पर्यंत रुपये-8872/- प्रमाणे 34 महिन्याचे व्याज त्याच बरोबर ऑगस्ट-2014 पासून ते तक्रार दाखल करे पर्यंत रुपये-3,91,508/- या रकमेवर वार्षिक-18% दराने व्याज अशा रकमा मिळाव्यात. तसेच विरुध्दपक्षा कडून प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-25,000/- मिळावा अशी मागण्या केल्यात.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचे नावे दैनिक सकाळ, नागपूर दिनांक-10 ऑगस्ट, 2016 रोजीचे अंकात जाहिर नोटीस प्रकाशित करण्यात आली परंतु दोन्ही विरुध्दपक्ष अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी आप-आपले लेखी निवेदन सुध्दा सादर केले नाही म्हणून दोन्ही विरुध्दपक्षां विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात मंचाने दिनांक-01/10/2016 रोजी पारीत केला.
04. तक्रारकर्तीने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये प्रामुख्याने विरुध्दपक्ष क्रं-2) एम.डी.राणा याने विरुध्दपक्ष क्रं 1 ला लिहिलेले पत्र, विरुध्दपक्ष क्रं-1) फर्म तर्फे संचालक विजय माणिकराम गौतम याने तक्रारकर्तीला लिहून दिलेला करारनामा प्रत, तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं-1) फर्मला दिनांक-30 मे, 2014 रोजी लिहिलेले पत्र, तक्रारकर्तीचे बँक पास बुकाची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
05. त.क. तर्फे वकील श्री गावंडे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
06. तक्रारकर्तीची सत्यापनावरील वरील तक्रार तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रती इत्यादींचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले तसेच तक्रारकर्तीचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
07. तक्रारकर्तीचे तक्रारी संबधाने दोन्ही विरुध्दपक्षांना नोटीसची सुचना मिळूनही ते न्यायमंचा समक्ष हजर झाले नाहीत वा त्यांनी लेखी निवेदन सुध्दा सादर केलेले नाही वा तक्रारीतील विधाने खोडून काढलेली नाहीत. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिने विरुध्दपक्ष क्रं-2) एम.डी.राणा जो विरुध्दपक्ष क्रं-1) फोनेक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेडचा अधिकत प्रतिनिधी आहे याचे माध्यमातून विरुध्दपक्ष क्रं-1) फोनेक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेडचा प्रस्तावित मौजा पेवठा, तालुका जिल्हा नागपूर येथील ले आऊट मधील भूखंड क्रं-22-ए विकत घेण्याचे निश्चीत केले व या संदर्भात तिने विरुध्दपक्ष क्रं-1) फर्म मध्ये सन-2009 ते सन-2010 मध्ये एकूण रुपये-5,34,876/- चा भरणा केला परंतु पुढे विरुध्दपक्ष क्रं-2) प्रतिनिधी श्री एम.डी.राणा याने मौजा पेवठा येथील भूखंडाचे नोंदणीकत विक्रीपत्र नोंदविणे शक्य नसल्याचे सांगितले.
08. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं-1) फोनेक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेडचा विरुध्दपक्ष क्रं-2) एम.डी.राणा हा अधिकत प्रतिनिधी असल्या बाबत पुरावा म्हणून विरुध्दपक्ष क्रं-2) याने, विरुध्दपक्ष क्रं-1) फोनेक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड, नागपूरच्या संचालकाला दिनांक-22/09/2011 रोजी लिहिलेल्या पत्राची प्रत पुराव्या दाखल दाखल केली, सदर पत्रामध्ये तक्रारकर्तीने मौजा पेवठा येथील भूखंड क्रं-22-ए नोंदणी करुन त्याचे प्रित्यर्थ तिने रुपये-5,34,876/- जमा केले असून काही तांत्रिक कारणामुळे भूखंडाचे विक्रीपत्राची नोंदणी होऊ शकत नाही, त्यामुळे तक्रारकर्तीची रक्कम स्विकारुन तिला आज पर्यंत 8% दराने बँक दरा प्रमाणे व्याज देण्यात यावे आणि पुढे प्रतीमाह दिड टक्के दराने (वार्षिक-18% दराने) व्याज देण्यात यावे असे त्या पत्रात नमुद केले. परंतु सदर पत्र विरुध्दपक्ष क्रं-1) फर्मला मिळाल्या बाबतची पोच त्यावर नाही.
09. त्यानंतर तक्रारकर्तीने तिचे सोबत विरुध्दपक्ष क्रं-1) फोनेक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल नागपूर तर्फे तिचे संचालक विजय माणिकराम गौतम याने स्टॅम्प पेपरवर दिनांक-23 सप्टेंबर, 2011 रोजी लिहून दिलेल्या करारनाम्याची प्रत पुराव्यार्थ दाखल केली. सदर करारा मध्ये असे नमुद आहे की, तक्रारकर्तीने करार दिनांका पर्यंत रुपये-5,34,876/- एवढी रक्कम वेळोवेळी धनादेश स्वरुपात आणि रोख स्वरुपात विरुध्दपक्ष क्रं-1) यांचेकडे जमा केलेली आहे आणि त्या जमा रकमेवर विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेच्या 8% दरा प्रमाणे व्याज रुपये-56,632/- देण्यास तयार आहेत, त्याप्रमाणे मूळ जमा रक्कम आणि बँकेच्या दरा प्रमाणे व्याज असे मिळून विरुध्दपक्ष क्रं-1) यांचेकडे तक्रारकर्तीची रक्कम रुपये-5,91,508/- जमा असल्या बाबत मान्यता/पोच देत आहे असे नमुद केलेले आहे. तसेच करार दिनांक-23 सप्टेंबर, 2011 पासून ते पुढील कालावधी करीता विरुध्दपक्ष क्रं-1) हे जमा रकमेवर 1.5% दराने (वार्षिक 18% दर) व्याजाची रक्कम प्रतीमाह रुपये-8872/- प्रमाणे देण्यास तयार आहेत असेही करारात नमुद आहे पुढे असेही नमुद आहे की, तक्रारकर्तीला जर जमा रक्कमेची उचल करावयाची असेल तर ती एक महिना पूर्व विरुध्दपक्ष क्रं-1) ला नोटीस देईल. सदर करारनाम्यावर विरुध्दपक्ष क्रं-1) फर्म तर्फे तिचा संचालक विजय माणिकराम गौतम आणि तक्रारकर्तीची सही आहे.
10. तक्रारकर्तीने दिनांक-30 मे, 2014 रोजीचे पत्राची प्रत जे तिने विरुध्दपक्ष क्रं-1) ला लिहिलेले आहे, दाखल केली, ज्यामध्ये तिने जमा रक्कम रुपये-5,91,508/- ही रक्कम परत करण्याची मागणी केलेली आहे. सदर पत्रावर पोच नाही.
11. तक्रारकर्तीने पुराव्यार्थ तिचे बँकेच्या पासबुकाची प्रत दाखल केली, ज्यावरुन असे दिसून येते की, तिला विरुध्दपक्षा कडून युनायटेड बँकेच्या धनादेशांव्दारे पुढील प्रमाणे रकमा प्राप्त झाल्याचे दिसून येते-
दिनांक | धनादेश क्रमांक | मिळालेली रक्कम |
07.07.2014 | 457297 | 50,000/- |
07.07.2014 | 457300 | 50,000/- |
01.08.2014 | 457298 | 1,00,000/- |
| एकूण | 2,00,000/- |
12. उपरोक्त नमुद पुराव्यांच्या प्रतीं वरुन तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं-2) श्री एम.डी.राणा याचे माध्यमातून विरुध्दपक्ष क्रं-1) फोनेक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेडशी मौजा पेवठा, तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंड खरेदी संबधात एकूण रक्कम रुपये-5,34,876/- जमा केली होती आणि पुढे भूखंडाची विक्री होणे शक्य नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-1) फोनेक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल नागपूर तर्फे तिचे संचालक विजय माणिकराम गौतम याने दिनांक-23 सप्टेंबर, 2011 रोजी लिहून दिलेल्या कराराव्दारे तिचे कडून रुपये-5,34,876/- एवढी रक्कम वेळोवेळी धनादेश आणि रोख स्वरुपात रक्कम प्राप्त झाल्याचे आणि त्या जमा रकमेवर व्याज रुपये-56,632/- असे मिळून करार दिनांक-23 सप्टेंबर, 2011 पर्यंत तिचे रुपये-5,91,508/- त्यांचेकडे जमा असल्या बाबत मान्य केलेले आहे.
13. विरुध्दपक्ष क्रं-1) ने करार दिनांक-23 सप्टेंबर, 2011 पासून दिड टक्का दरा (वार्षिक 18% दर) प्रमाणे प्रतीमाह रुपये-8872/- प्रमाणे पुढे जमा रकमेवर व्याज देण्याची बाब सुध्दा मान्य केलेली आहे. तक्रारकर्तीला विरुध्दपक्षा कडून दिनांक-07/07/2014 रोजी रुपये-1,00,000/- आणि दिनांक-01/08/2014 रोजी रुपये-1,00,000/- अशा आंशिक रकमा प्राप्त झाल्याचे तिच्या बँकेच्या पासबुका मधील नोंदी वरुन स्पष्ट होते.
14. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, करार दिनांक-23 सप्टेंबर, 2011 पासून ते जुलै-2014 पर्यंत म्हणजे आंशिक रक्कम देण्याचे कालावधी पर्यंत म्हणजे एकूण-34 महिन्या पर्यंत ती करारा प्रमाणे प्रतीमाह रुपये-8872/- (वार्षिक-18% दर) या प्रमाणे व्याजाची रक्कम आणि उर्वरीत असलेली रक्कम प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो सुध्दा वार्षिक-18% दरा प्रमाणे व्याजासह मिळण्यास पात्र आहे.
15. विरुध्दपक्ष क्रं-2) हा विरुध्दपक्ष क्रं-1) चा प्रतिनिधी असल्याची बाब विरुध्दपक्ष क्रं-2) याने, विरुध्दपक्ष क्रं-1) ला लिहिलेल्या पत्रावरुन सिध्द होते तसेच तक्रारकर्तीने जमा केलेली संपूर्ण रक्कम मिळाल्याची कबुली विरुध्दपक्ष क्रं-1) फर्म तर्फे तिचा संचालक विजय माणिकराम गौतम याने स्टॅम्पपेपरवर लिहून दिलेली आहे, ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही या तक्रारीमध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) आणि विरुध्दपक्ष क्रं-2) या दोघांनाही या प्रकरणात जबाबदार धरीत आहोत.
16. तक्रारकर्तीचे दिनांक-23 सप्टेंबर, 2011 करार दिनांका पर्यंत विरुध्दपक्ष क्रं-1) फर्म मध्ये एकूण रुपये-5,34,876/- जमा होते आणि त्यावर करार दिनांका पर्यंत व्याजाची रक्कम रुपये-56,632/- असे मिळून रुपये-5,91,508/- जमा असल्याचे विरुध्दपक्ष क्रं-1) याने करारात मान्य केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) याने करारात कराराचे दिनांका पासून ते पुढील कालावधी करीता प्रतीमाह दिड टक्के म्हणजे वार्षिक-18% दराने व्याजासह रक्कम परत करण्याची बाब मान्य केलेली आहे, त्यानुसार दिनांक-23 सप्टेंबर, 2011 पासून ते प्रत्यक्ष्य आंशिक रक्कम देई पर्यंत म्हणजे जुलै-2014 पर्यंतचा कालावधी म्हणजे 34 महिन्याचे कालावधी करीता वार्षिक-18% दरा प्रमाणे येणारे व्याज रुपये-3,01,669/- असे मिळून एकूण रुपये-8,93,177/- एवढी रक्कम येते, त्यामधून जुलै आणि ऑगस्ट, 2014 मध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) फर्म तर्फे अदा केलेली आंशिक रक्कम रुपये-2,00,000/- वजा जाता उर्वरीत येणारी रक्कम रुपये-6,93,177/- येते आणि या रकमेवर सप्टेंबर-2014 पासून ते पुढील कालावधी करीता म्हणजे रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्याज यासह मिळून येणारी रक्कम विरुध्दपक्षां कडून मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्षां कडून मिळण्यास ती पात्र आहे.
17. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) तक्रारकर्ती श्रीमती भावना सचदेव यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) मे.फीनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड, नागपूर तर्फे संचालक श्री विजय मा.गौतम आणि विरुध्दपक्ष क्रं-1) चा प्रतिनिधी विरुध्दपक्ष क्रं-2) श्री एम.डी.राणा यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रं-1) मे.फीनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड, नागपूर तर्फे संचालक श्री विजय मा.गौतम आणि विरुध्दपक्ष क्रं-1) याचा प्रतिनिधी विरुध्दपक्ष क्रं-2) श्री एम.डी.राणा यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकतीला उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे हिशोबा नुसार येणारी रक्कम रुपये-6,93,177/- (सहा लक्ष त्र्याण्णऊ हजार एकशे सत्ताहत्तर फक्त) आणि त्यावर सप्टेंबर-2014 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्याज यासह मिळून येणारी रक्कम परत करावी.
3) तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) मे.फीनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड, नागपूर तर्फे संचालक श्री विजय मा.गौतम आणि विरुध्दपक्ष क्रं-1) चा प्रतिनिधी विरुध्दपक्ष क्रं-2) श्री एम.डी.राणा यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्तीस द्दावेत.
4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) मे.फीनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड, नागपूर तर्फे संचालक श्री विजय मा.गौतम आणि विरुध्दपक्ष क्रं-1) चा प्रतिनिधी विरुध्दपक्ष क्रं-2) श्री एम.डी.राणा यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.