::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारीत दिनांक–21 मार्च, 2018)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष बिल्डर विरुध्द करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून न दिल्याचे कारणावरुन दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याला राहण्यासाठी घर बांधण्याचे दृष्टीने भूखंडाची आवश्यकता होती. विरुध्दपक्ष मे.फीनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड या फर्मचा भूखंड विकसित करुन ते विक्री करण्याचा व्यवसाय आहे. विरुध्दपक्ष फर्मचे भूखंड विक्रीचे जाहिराती वरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्मचे प्रस्तावित मौजा पेवठा, तालुका जिल्हा नागपूर येथील ले आऊट मधील भूखंड विकत घेण्याचे निश्चीत केले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने विरुध्दपक्षाने मागणी केल्या नुसार सन-2009 ते सन-2010 मध्ये भूखंडा पोटी वेळोवेळी एकूण रुपये-5,08,818/- दिलेत. त्यानंतर विरुध्दपक्षाने मौजा पेवठा, तालुका जिल्हा नागपूर येथील ले आऊट मधील भूखंडाची विक्री होणे शक्य नसल्याचे सांगून भूखंडापोटी जमा रक्कम टप्प्या-टप्प्याने परत करेल असे सांगितले. विरुध्दपक्षाच्या असमर्थतेमुळे तक्रारकर्त्याने मौजा पेवठा येथील भूखंडाची नोंदणी रद्द केली आणि रक्कम परत घेण्याचे मान्य केले, सदरचा व्यवहार मे-जून-2011 मध्ये पार पडला.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्षाने मान्य केल्या प्रमाणे तक्रारकर्त्यास दिनांक-07/06/2011 रोजी रुपये-1,00,000/- आणि त्यानंतर दिनांक-22/0622011 रोजी रुपये-2,00,000/- अशाप्रकारे एकूण रुपये-3,00,000/- परत केले. त्यानंतर उर्वरीत रकमेसाठी वारंवार विरुध्दपक्षाकडे पाठपुरावा करुनही रक्कम मिळाली नाही.
त्यानंतर विरुध्दपक्षाने मौजा वाकेश्वर, तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंडाचे करारपत्र करुन देण्यात येईल व रद्द केलेल्या मौजा पेवठा येथील भूखंडा संबधीची जमा रक्कम मौजा वाकेश्वर येथील भूखंडाचे किमतीमध्ये समायोजित करण्यात येईल असा प्रस्ताव मांडला, त्यास तक्रारकर्त्याने मान्यता दिली. त्यानुसार दिनांक-24/07/2014 रोजी करार करण्यात आला, त्यानुसार मौजा वाकेश्वर येथील भूखंड क्रं-80 चे इसारापोटी तक्रारकर्त्याची जमा रक्कम रुपये-2,08,185/- इसारा दाखल समायोजित करण्यात आली, समायोजना नंतर भूखंडाची राहिलेली उर्वरीत रक्कम रुपये-4,86,771/- विक्रीपत्राचे नोंदणीचे वेळी देण्याचे करारा मध्ये नमुद करण्यात आले. परंतु विरुध्दपक्षाचे सततचे तगाद्दा मुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास जुलै-2014 नंतर रुपये-1,46,128/- एवढी रक्कम दिली. अशाप्रकारे रद्द झालेल्या मौजा पेवठा भूखंडापोटी जमा केलेली रक्कम रुपये-2,08,185/- (अधिक) सुधारीत मौजा वाकेश्वर येथील भूखंडाचे करारा पोटी दिलेली रक्कम रुपये-1,46,128/- असे मिळून एकूण रुपये-3,54,353/- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला अदा केलेत.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, काही ग्राहकांनी विरुध्दपक्षा विरुध्द फौजदारी तक्रार सुध्दा दाखल केलेली आहे. वर्षानुवर्षे भूखंडास ताटकळत ठेवणे, ही विरुध्दपक्षाची अनुचित व्यापारी पध्दती आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याची फसवणूक केली आहे, म्हणून त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन अशी मागणी केली की, विरुध्दपक्षाने त्याचे नावे दिनांक-24/07/2014 रोजी झालेल्या करारा नुसार मौजा वाकेश्वर येथील ले आऊट संबधाने एन.ए./ टी.पी. मंजूरी प्राप्त भूखंड विकसित करुन भूखंड क्रं-80 चे नोंदणीकत विक्रीपत्र त्याचे नावे नोंदवून देण्याचे आदेशित व्हावे. परंतु असे करणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास त्याने भूखंडापोटी जमा केलेली रक्कम वार्षिक-18% दराने व्याजासह परत करण्याचे आदेशित व्हावे. त्याच बरोबर त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे, अशा मागण्या केल्यात.
03. विरुध्दपक्षाचे नावे दैनिक सकाळ, नागपूर दिनांक-10 ऑगस्ट, 2016 रोजीचे अंकात जाहिर नोटीस प्रकाशित करण्यात आली परंतु विरुध्दपक्ष अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाला नाही वा त्याने आपले लेखी निवेदन सुध्दा सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्षा विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात मंचाने दिनांक-01/10/2016 रोजी पारीत केला.
04. तक्रारकर्त्याने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला भूखंडापोटी दिलेल्या रकमांच्या पावत्यांच्या प्रती तसेच भूखंडाचा विक्री करार प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे.
05. त.क. तर्फे वकील श्री गावंडे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
06. तक्रारकर्त्याची सत्यापनावरील वरील तक्रार तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रती इत्यादींचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले तसेच तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
07. तक्रारकर्त्याचे तक्रारी संबधाने विरुध्दपक्षाला नोटीसची सुचना मिळूनही तो न्यायमंचा समक्ष हजर झाला नाही वा त्याने लेखी निवेदन सुध्दा सादर केलेले नाही वा तक्रारीतील तक्रारकर्त्याची विधाने खोडून काढलेली नाहीत.
08. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष फोनेक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेडचा प्रस्तावित मौजा पेवठा, तालुका जिल्हा नागपूर येथील ले आऊट मधील भूखंड विकत घेण्याचे निश्चीत केले व या संदर्भात त्याने विरुध्दपक्ष फर्म मध्ये सन-2009 ते सन-2010 मध्ये वेळोवेळी एकूण रुपये-5,08,818/- जमा केलेत. त्यानंतर विरुध्दपक्षाने मौजा पेवठा, तालुका जिल्हा नागपूर येथील ले आऊट मधील भूखंडाची विक्री होणे शक्य नसल्याचे सांगितल्याने तक्रारकर्त्याने मौजा पेवठा येथील भूखंडाची नोंदणी रद्द केली आणि रक्कम परत घेण्याचे मान्य केले, सदरचा व्यवहार मे-जून-2011 मध्ये पार पडला. विरुध्दपक्षाने मान्य केल्या प्रमाणे तक्रारकर्त्यास दिनांक-07/06/2011 रोजी रुपये-1,00,000/- आणि त्यानंतर दिनांक-22/06/2011 रोजी रुपये-2,00,000/- असे एकूण रुपये-3,00,000/- परत केले. त्यानंतर विरुध्दपक्षाने मौजा वाकेश्वर, तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याचे व तक्रारकर्त्याची जमा रक्कम त्या भूखंडाचे किमतीमध्ये समायोजित करण्याचा प्रस्ताव दिला, त्यास तक्रारकर्त्याने मान्यता दिली. त्यानुसार दिनांक-24/07/2014 रोजी उभय पक्षां मध्ये करार करण्यात आला, त्या करारा नुसार मौजा वाकेश्वर येथील भूखंड क्रं-80 चे इसारापोटी रुपये-2,08,185/- एवढी रक्कम इसारा दाखल समायोजित करण्यात आली, आणि उर्वरीत राहिलेली रक्कम रुपये-4,86,771/- विक्रीपत्राचे नोंदणीचे वेळी देण्याचे करारा मध्ये ठरले. तक्रारकर्त्याने या त्याच्या कथनाचे पुराव्यार्थ मौजा पेवठा येथील रद्द झालेल्या भूखंडापोटी जमा केलेल्या रकमांच्या पावत्यांच्या प्रती आणि पुढे मौजा वाकेश्वर, तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-80 चे विक्री संबधाने उभय पक्षां मध्ये झालेल्या सुधारित करारनाम्याची प्रत पुराव्यार्थ दाखल केली, यावरुन त्याचे उपरोक्त कथनास पुष्टी मिळते.
09. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंडा संबधी जमा केलेल्या रकमे संबधात-उपलब्ध पावत्यां प्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी जमा केलेली रक्कम आणि सुधारित करारा मध्ये तक्रारकर्त्याची भूखंडापोटी जमा नमुद रक्कम या मध्ये विसंगती/फरक पडल्याचे दिसून येतो.
सुधारित करारनाम्या वरुन असे दिसून येते की, मौजा वाकेश्वर, तालुका जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं-113, पटवारी हलका क्रं-74 मधील भूखंड क्रं-80 चे एकूण क्षेत्रफळ 2260.44 चौरसफूट (210 चौरसमीटर) असून भूखंडाची किम्मत प्रतीचौरसफूट रुपये-307.44 पैसे प्रमाणे एकूण रुपये-6,94,956/- नमुद आहे. तक्रारकर्त्याने रद्द झालेल्या मौजा पेवठा तालुका जिल्हा नागपूर या भूखंडापोटी जमा असलेली रक्कम रुपये-2,08,185/- समायोजित केल्या नंतर उर्वरीत रक्कम रुपये-4,86,771/- विक्रीपत्र नोंदवून देण्याचे वेळी देण्याचे करारात नमुद आहे.
परंतु तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतीं वरुन त्याने विरुध्दपक्षा कडे मौजा पेवठा, तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंडापोटी दिनांक-19/12/2009 ते दिनांक-24/11/2010 या कालावधी मध्ये एकूण रुपये-6,05,383/- जमा केल्याचे सिध्द होते. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे मौजा पेवठा तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंड करार रद्द झाल्याने विरुध्दपक्षाने त्यास दिनांक-07/06/2011 रोजी रुपये-1,00,000/- आणि त्यानंतर दिनांक-22/06/2011 रोजी रुपये-2,00,000/- अशाप्रकारे एकूण रुपये-3,00,000/- परत केले. परंतु या त्याचे कथनार्थ तक्रारकर्त्याने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही परंतु विरुध्दपक्षाला मंचाचे नोटीसची वृत्तपत्रातून जाहिर नोटीसीव्दारे सुचना मिळूनही तो प्रकरणा मध्ये हजर झाला नाही वा त्याने तक्रारकर्त्याने परत मिळालेल्या नमुद रकमे संबधी कोणताही विवाद केलेला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याचे कथना प्रमाणे त्याला विरुध्दपक्षा कडून एकूण रुपये-3,00,000/-परत मिळालेत हे मान्य करण्या शिवाय गत्यंतर नाही. प्रत्यक्ष्य प्रकरणा मध्ये उपलब्ध पावत्यांच्या प्रतीं वरुन तक्रारकर्त्याने मौजा पेवठा येथील भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-6,05,383/- मधून तक्रारकर्त्याचे कथना प्रमाणे त्यास विरुध्दपक्षा कडून परत मिळालेली एकूण रक्कम रुपये-3,00,000/- वजा जाता उर्वरीत रक्कम रुपये-3,05,383/- शिल्लक राहते.
परंतु मौजा वाकेश्वर तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंड खरेदी संबधाने उभय पक्षांमध्ये जो सुधारीत करारनामा दिनांक 24 जुलै, 2014 रोजी करण्यात आला त्यामध्ये मौजा पेवठा येथील भूखंडापोटी तक्रारकर्त्या कडून रुपये-2,08,185/- एवढी रक्कम प्राप्त झाल्याची पोच विरुध्दपक्षाने दिलेली आहे, सदर सुधारित करारनाम्यावर उभय पक्षांच्या स्वाक्ष-या आहेत. अशाप्रकारे प्रत्यक्ष्य उपलब्ध पावत्यांच्या प्रती वरुन तक्रारकर्त्याची जमा रक्कम आणि त्यामधून त्यास परत मिळालेली रक्कम वजा जाता उर्वरीत राहिलेली रक्कम आणि सुधारित करारा नुसार तक्रारकर्त्याची नमुद केलेली जमा रक्कम या मध्ये विसंगती/ फरक असल्याचे दिसून येते.
अशापरिस्थितीत सुधारित करारनाम्या मध्ये तक्रारकर्त्याची मौजा पेवठा, तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंडापोटी विरुध्दपक्षा कडे रुपये-2,08,185/- एवढी रक्कम जमा असल्याचे जरी नमुद असले तरी प्रत्यक्ष्य उपलब्ध पावत्यांच्या प्रतीं वरुन त्याने विरुध्दपक्षाकडे मौजा पेवठा येथील भूखंडापोटी एकूण रक्कम रुपये-6,05,383/- जमा केल्याची बाब सिध्द होते, पावत्यां प्रमाणे प्रत्यक्ष्य जमा रकमे मधून तक्रारकर्त्याचे कथना प्रमाणे त्यास विरुध्दपक्षाने परत केलेली एकूण रक्कम रुपये-3,00,000/- वजा जाता उर्वरीत रक्कम रुपये-3,05,383/- विरुध्दपक्षा कडे जमा असल्याची बाब मंचा तर्फे मान्य करण्यात येते.
10. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्षाचे सततचे तगाद्दा मुळे त्याने विरुध्दपक्षास जुलै-2014 नंतर रुपये-1,46,128/- एवढी रक्कम दिली. अशाप्रकारे रद्द झालेल्या मौजा पेवठा भूखंडापोटी अदा केलेली रक्कम रुपये-2,08,185/- (अधिक) सुधारीत मौजा वाकेश्वर येथील भूखंडाचे करारा पोटी दिलेली रक्कम रुपये-1,46,128/- असे मिळून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास एकूण रुपये-3,54,353/- अदा केलेत. परंतु तक्रारकर्त्याने ज्या पावत्यांच्या प्रती पुराव्यार्थ दाखल केलेल्या आहेत, त्या पावत्या सन-2009-2010 मधील आहेत. त्याच प्रमाणे जुलै-2014 नंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रुपये-1,46,128/- एवढी रक्कम दिल्याचा पुरावा प्रकरणात उपलब्ध नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास जुलै-2014 नंतर रुपये-1,46,128/- एवढी रक्कम दिल्याची बाब मंचा तर्फे योग्य त्या पुराव्याच्या अभावी मान्य करण्यात येत नाही.
11. विरुध्दपक्षाने करारा नुसार रक्कम प्राप्त होऊनही तक्रारकर्त्यास भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून न देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला तसेच दोषपूर्ण सेवा दिली, त्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्षां कडून मिळण्यास तो पात्र आहे.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री मुकूल प्रयागजी त्रिवेदी यांची, विरुध्दपक्ष मे.फीनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनूशनल लिमिटेड, नागपूर तर्फे संचालक श्री चंद्रशेखर मोतीरामजी देशभ्रतार याचे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष मे.फीनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड, नागपूर तर्फे संचालक श्री चंद्रशेखर मोतीरामजी देशभ्रतार याला आदेशित करण्यात येते की, त्याने उभय पक्षांमध्ये झालेल्या दिनांक-24 जुलै, 2014 रोजी झालेल्या सुधारित करारनाम्या प्रमाणे मौजा वाकेश्वर, तालुका जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं-113, पटवारी हलका क्रं-74 मधील भूखंड क्रं-80 एकूण क्षेत्रफळ 2260.44 चौरसफूट (210 चौरसमीटर) प्रतीचौरसफूट दर रुपये-307.44 पैसे प्रमाणे एकूण किम्मत रुपये-6,94,956/- मधून तक्रारकर्त्याची उपरोक्त नमुद केलेल्या हिशोबा नुसार भूखंडापोटी विरुध्दपक्षाकडे जमा असलेली रक्कम रुपये-3,05,383/- (अक्षरी जमा रक्कम रुपये तीन लक्ष पाच हजार तीनशे त्रयाऐंशी फक्त) वजा जाता उर्वरीत रक्कम रुपये-3,89,573/- (अक्षरी उर्वरीत रक्कम रुपये तीन लक्ष एकोणनव्वद हजार पाचशे त्र्याहत्तर फक्त) तक्रारकर्त्या कडून स्विकारुन त्याचे नावे करारा प्रमाणे नमुद भूखंडा संबधी एन.ए./टी.पी.मंजूरी प्राप्त करुन व विकसित भूखंडाचे नोंदणीपत्र नोंदवून द्दावे. भूखंड विक्रीपत्र नोंदविण्यासाठी लागणारी नोंदणी फी व मुद्रांक शुल्काचा खर्च तसेच शासनमान्य देय विकासशुल्काचे रकमेचा खर्च तक्रारकर्त्याने स्वतः सहन करावा.
3) विरुध्दपक्ष मे.फीनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड, नागपूर तर्फे संचालक श्री चंद्रशेखर मोतीरामजी देशभ्रतार याला काही कायदेशीर व तांत्रिक कारणामुळे मौजा वाकेश्वर, तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देणे शक्य नसल्यास उपरोक्त नमुद हिशोबा प्रमाणे तक्रारकर्त्याची विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी जमा असलेली एकूण रक्कम रुपये-3,05,383/- (अक्षरी जमा रक्कम रुपये तीन लक्ष पाच हजार तीनशे त्रयाऐंशी फक्त) शेवटची किस्त जमा केल्याचा दिनांक-24/11/2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्याज यासह मिळून येणारी रक्कम विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला परत करावी.
4) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष मे.फीनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड, नागपूर तर्फे संचालक श्री चंद्रशेखर मोतीरामजी देशभ्रतार याने तक्रारकर्त्यास द्दावेत.
5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष मे.फीनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड, नागपूर तर्फे संचालक श्री चंद्रशेखर मोतीरामजी देशभ्रतार याने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.