सौ. मंजुश्री खनके, सदस्या यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 08 फेब्रुवारी, 2016)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. वि.प. ही प्रोप्रायटरी संस्था आहे. श्री संतोष बुरेवार हे दि.28.06.2013 रोजी मरण पावल्याने त्यांची पत्नी श्रीमती ज्ञानदेवी बुरेवार व भाऊ सुरेश बुरेवार सदर पवनसुत रीएल ईस्टेट अँड लँड डेव्हलपर्स या संस्थेचे प्रोप्रायटर असून ते कारभार पाहत आहे. त्यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय असा की, तक्रारकर्त्याने वि.प.कडून मौजा – बोरखेडी, ता. व जि.नागपूर, प.ह.क्र. 80, शेत सर्व्हे क्र. 17/18, भुखंड क्र. 78, भुखंडाचे एकूण क्षेत्रफळ 1614.50 चौ.फु. असून त्यांची एकूण किंमत रु.4,03,625/- होती व त्याबाबतचा करार उभय पक्षांमध्ये दि.09.10.2008 रोजी करण्यात आला. सदर कराराप्रमाणे रु.1,30,000/- बयाना म्हणून देण्यात आली व एकूण उर्वरित रक्कम तक्रारकर्त्याने हप्त्यांद्वारे वि.प.कडे द्यावयाची होती. तक्रारकर्त्याने रु.3,02,000/- रक्कम वि.प.कडे दि.03.12.2012 पर्यंत दिली. उर्वरित रक्कम रु.1,01,625/- हप्तेवारीने जमा करण्याकरीता गेले असता वि.पने कार्यालय बंद करुन ठेवल्याने तक्रारकर्ता उर्वरित रक्कम देऊ शकला नाही. पुढे चौकशीअंती तक्रारकर्त्याला असे कळले की, ज्या जमिनीचे वि.प. विक्रीचे व्यवहार करीत आहे, ती त्यांच्या नावानेच नाही. तक्रारकर्त्याने त्याची पोलिस स्टेशनला तक्रार केली. तसेच पुढे दैनिक वर्तमानपत्रासुध्दा अनेक लोकांना वि.प.ने फसविल्याची बाब प्रसिध्द झाली. वि.प.ने तक्रारकर्त्याला पुढे त्याने अदा केलेली रक्कमही परत दिली नाही आणि विक्रीपत्रही करण्याकरीता पावले उचलली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन वि.प. प्लॉटची विक्रीपत्र करु शकत नसल्यामुळे रु.3,02,000/- ही रक्कम व्याजासह मिळावी, मानसिक, शारिरीक नुकसान भरपाई मिळावी व इतर आदेश व्हावेत अशा मागण्या केलेल्या आहेत.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीचे पुष्ट्यर्थ करारनामा, रक्कम भरल्याच्या पावत्या, खाते विवरण, पो.स्टे.ला केलेल्या तक्रारीची प्रत व पोस्टाची पावती इ. दस्तऐवज तक्रारीसोबत दाखल केलेले आहेत.
2. वि.प.क्र. 1 ते 3 ला मंचाने नोटीस बजावली असता ते गैरहजर राहिल्याने मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व त्यासोबत दाखल दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता खालिल मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय ? अंशतः.
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
4. मुद्दा क्र.1 बाबत – तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेल्या भुखंडाचे विवरण, रक्कम दिल्याच्या पावत्या व वि.प.ने तक्रारकर्त्यास भुखंडाच्या विक्रीचा करारनामा यांच्या प्रतीवरुन उभय पक्षांमध्ये तक्रारीत वर्णन केलेल्या भुखंडासंबंधी विक्रीचा करार झाला होता व त्यादाखल तक्रारकर्त्याने रु.3,00,000/- वि.प.ला दिल्याचे दाखल पावत्यांच्या प्रतीवरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने काही रकमेचा भरणा केला असून, तसेच स्वतः वि.प.ने विक्रीचा करारनामा करतांना विक्रीपत्र करुन देण्याचे तक्रारकर्त्यास कबूल करुन व नंतर आजपावेतो विक्रीपत्र करुन देण्यास प्लॉटधारकांना कुठलेही पत्र, सुचना किंवा नोटीस दिलेली नाही. तक्रारकर्त्याने विक्रीपत्राची मागणी केल्यावर व चौकशी केल्यावर सदर जमिन ही वि.प.च्या नावावर नाही, त्याही जमिनीचे व्यवहार वि.प. तक्रारकर्त्यासोबत करतो व दस्तऐवजही तयार करतो ही वि.प.ने अनुसरलेली अनुचित व्यापारी प्रथा होय असे मंचाचे मत आहे. करिता मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहे.
5. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – तक्रारकर्त्याने प्लॉटच्या किमतीदाखल वि.प.ला काही रक्कम दिलेली आहे. वि.प.च्या नावावर जमिन नसल्याने तक्रारकर्त्याने अदा केलेली रक्कम परत मिळण्याची मागणी केलेली आहे. मंचाचे मते तक्रारकर्त्याची सदर मागणी तक्रारीतील वादाचे स्वरुप पाहता तक्रारकर्त्याने वि.प.ला दिलेली रक्कम ही व्याजासह परत करणे न्यायोचित व वैधानिक आहे. या सर्व बाबींचा विचार करता मंच या निष्कर्षाप्रत पोहोचले आहे की, तक्रारकर्ता हा प्रार्थनेतील मागणीप्रमाणे त्याने भरलेली एकूण रक्कम रु.3,00,000/- ही द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह दि.03.12.2012 पासून रकमेच्या प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत मिळण्यास पात्र आहे.
मंचाने सदर तक्रारीचा नोटीस वि.प.ला पाठविला होता, परंतू वि.प.ने मंचासमोर येऊन सदर तक्रार ही खोटी आहे किंवा तक्रारकर्त्याचे अभिकथन खोडून काढण्याकरीता कुठलेही जमिनीबाबत दस्तऐवज दाखल केले नाही किंवा मंचासमोर येऊन शपथपत्रावरील तक्रारकर्त्याची तक्रार नाकारलेली नाही, म्हणून तक्रारकर्ता मागणीप्रमाणे अंशतः स्वरुपात दाद मिळण्यास पात्र आहे.
तसेच तक्रारकर्त्याने शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. मंचाचे मते तक्रारकर्ता शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईदाखल रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
उपरोक्त निष्कर्षावरुन व दाखल दस्तऐवजांवरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श -
1) तक्रारकर्त्याची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.ला आदेश देण्यात येतो की, तक्रारकर्त्याने भरणा केलेली रक्कम रु.3,00,000/- ही द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह दि.03.12.2012 पासून तर प्रत्यक्ष रकमेच्या अदाएगीपर्यंत तक्रारकर्त्यास द्यावी.
3) वि.प.ने तक्रारकर्त्याला शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईदाखल रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.5,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून एक महिन्याचे आत करावे.