:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री मिलींद रामराव केदार ,मा.सदस्य)
(पारीत दिनांक :07 एप्रिल, 2012)
1. अर्जदार/तक्रारकर्ता याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. अर्जदारास, गैरअर्जदार क्रमांक-1 ने, गैरअर्जदार क्रमांक-2 कडून खरेदी केलेली दोषपूर्ण किटकनाशक औषधाची विक्री केल्याने व ही गैरअर्जदाराच्या सेवेतील न्युनता असल्यामुळे दोषपूर्ण किटकनाशक औषधा मुळे कपाशिच्या पिकाची झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे-
2. अर्जदाराने त्याचे मालकीचे मौजे दहेगांव (स्टेशन) तहसिल जिल्हा वर्धा येथील शेतात सन 2011 मध्ये 03 एकर कपाशिची पेरणी आधुनिक पध्दतीने 4 फूट अंतरावर लावण पध्दतीने केली. लावण केल्या नंतर पिकामध्ये बारीक तण निघाल्यामुळे, गैरअर्जदार क्रमांक-1 चे दुकानातून दिनांक-05.07.2011 रोजी, गैरअर्जदार क्रमांक-2 गोदरेज कंपनीचे हिटवीड रुपये-2350/- लिटर प्रमाणे तसेच धानुका कंपनीचे टरगा सुपर रुपये-1350/- प्रतीलिटर प्रमाणे औषध विकत घेतले व गैरअर्जदार क्रमांक-1 ने सांगितल्या नुसार हिटविड 25 एम.एल.मात्रा व टरगा सुपर 40 एम.एल.मात्रा फवारणी 03 एकर मधील संपूर्ण कपाशिचे पिकावर केली. सदर्हू फवारणीसाठी शेतातील विहिरीचे शुध्द पाणी वापरले होते. गैरअर्जदार क्रमांक-1 ने उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे फवारणी केल्यास तणाचे 100% नियंत्रण होईल असे सांगितले होते.
3. अर्जदाराने पुढे असे नमुद केले की, फवारणी केल्या नंतर 15 दिवसा नंतर पिकाची पाहणी केली असता गवतवर्गीय तण थोडे नष्ठ झाल्याचे दिसून आले परंतु पानवर्गीय तण शेतात तसेच शिल्लक होते व त्याची जोमाने वाढ चालू होती. पिकाची पाहणी केल्या नंतर लगेच अर्जदाराने, गैरअर्जदार क्रमांक-1 ला कळविले व फोनवरुन माहिती दिली परंतु गैरअर्जदाराने, अर्जदाराची समजूत घालण्या करीता धानुका कंपनीचे अधिका-यांना पाहणी करीता पाठवितो असे सांगितले. गोदरेज कंपनीचे अधिकारी येणार नाहीत असे सुध्दा सांगितले. त्यानुसार दिनांक 27.07.2011 रोजी धानुका कंपनीचे अधिका-यानी अर्जदाराचे शेतावर प्रत्यक्ष्य येऊन मोका पाहणी केली व टरगा सूपर या तणनाशकाची पूर्ण क्रिया झाली असल्याचे सांगून समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
ग्राहक तक्रार क्रमांक-107/2011
4. अर्जदाराने पुढे असे नमुद केले की, दिनांक 28.07.2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक-2 चे अधिकारी श्री टेंभरे यांनी प्रत्यक्ष्य मोक्यावर येऊन शेताची पाहणी केली व हिटविड या औषधाचा पानवर्गीय तणावर परिणाम झाला नसल्याचे सांगितले व सदर बाब कंपनीचे वरिष्ठ अधिका-यांना कळविते असे म्हणून निघून गेले. त्यानंतर पुन्हा दिनांक-29.07.2011 रोजी श्री टेंभरे व श्री हिवरे या अधिका-यांनी शेताची प्रत्यक्ष्य पाहणी केली व हिटविड औषधानी पानवर्गीय तण नष्ठ झाले नसल्याचे सांगितले परंतु ते का नष्ठ झाले नाही? अशी विचारणा केली असता त्यांचे वरिष्ठ अधिकारी श्री अंबुलकर व डॉ.बनसोडे यांनी फोन वरुन अर्जदारास उडवा उडवीची उत्तरे दिली व जे होईल ते करुन घ्या अशी धमकी दिली.
5. अर्जदाराने, गैरअर्जदार क्रमांक-2 कडून निंदनाचा खर्च रुपये-15,000/- मागितला असता मागणी फेटाळून लावली. त्यानंतर अर्धा खर्च मागितला असता ती मागणी सुध्दा फेटाळून लावली. तणामुळे पिकाची वाढ थांबली असून उत्पन्नाचे नुकसान झाले आहे व भविष्यात सुध्दा नुकसान होणार आहे. अशाप्रकारे अर्जदार हा उभय गैरअर्जदारांचा ग्राहक असून उभय गैरअर्जदारांनी, अर्जदारास दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
6. म्हणून अर्जदारने जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती, वर्धा यांचेकडे पत्र दिले व उभय गैरअर्जदारांना रजिस्टर नोटीस पाठविली असता ती दिनांक 31.07.2011 रोजी प्राप्त झाली असता, गैरअर्जदारांनी त्यास खोटे उत्तर पाठविले.
7. त्यानंतर कृषी अधिकारी, वर्धा पंचायत समिती यांनी अर्जदाराचे शेताची प्रत्यक्ष्य पाहणी केली, त्यावेळी गैरअर्जदार क्रमांक-2 चे अधिकारी श्री टेंभरे व श्री हिवरे हजर होते, त्यांनी सुध्दा दिनांक 20.08.2011 रोजी पाहणी केल्यावर सदर्हू औषधाचा कुठलाही परिणाम झालेला नाही व त्या अहवालावर अर्जदाराचे बयान घेउन सर्वांनी सहया केलेल्या आहेत. त्यानुसार दिनांक 24.08.2011 रोजी प्रमाणपत्र दिले. सदर्हू प्रमाणपत्रा नुसार ग्राम पंचायत दहेगाव (स्टे) यांनी सुध्दा पाहणी करुन प्रमाणपत्र दिले. सदरची बातमी लोकमत आणि अन्य वृत्तपत्रातून आल्या नंतर गैरअर्जदार क्रमांक-1 व 2 यांनी प्रतीएकर रुपये-5000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे कबुल केले परंतु या प्रमाणे नुकसान भरपाई दिली नाही.
ग्राहक तक्रार क्रमांक-107/2011
8. म्हणून अर्जदाराने उभय गैरअर्जदारा विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्याद्वारे उभय गैरअर्जदारा कडून वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात झालेल्या नुकसानी बाबत रुपये-1,00,000/- भरपाई द.सा.द.शे.18% दराने व्याजासह मिळावी तसेच झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-50,000/- नुकसान भरपाई मिळावी व तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- मिळावेत अशी मागणी केली.
9. गैरअर्जदार क्रमांक-1 रासायनिक औषधी विक्रेता याने पान क्रमांक-22 ते 27 वर न्यायमंचा समक्ष लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक-1 ने त्याचे लेखी उत्तराद्वारे, अर्जदाराने केलेली संपूर्ण विपरीत विधाने नाकबुल केलीत. गैरअर्जदार क्रमांक-1 ने नमुद केले की, त्याचे दुकानाचे नाव टावरी कृषी सेवा केंद्र असे आहे, अर्जदाराने तक्रारीत नमुद केल्या नुसार नाव नाही. शेतीमध्ये पावसाळयाचे दिवसात पेरणी नंतर कोणतेही पिक लावले असता त्यात तण निघत असते परंतु अर्जदाराने त्यासंबधी कधीही तक्रार त्यांचेकडे केली नाही. अर्जदाराने त्याचे दुकानातून दिनांक-05.07.2011 रोजी गोदरेज कंपनीचे हिटवीड रुपये-2300/- व टरगासुपर धानुका कंपनीचे रुपये-1350/- मध्ये विकत घेतले ही बाब मान्य केली. त्याने अर्जदारास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही त्यामुळे अर्जदाराचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. अर्जदाराने केलेली मागणी अमान्य केली.
10. गैरअर्जदार क्रमांक-1 रासायनिक औषधी विक्रेता याने पुढे असे नमुद केले की, त्याने गैरअर्जदार क्रमांक-2 उत्पादीत हिटवीड औषधी, गैरअर्जदार क्रमांक-2 चे वितरक श्रीराम ट्रेडींग कंपनी, वर्धा यांचे कडून दिनांक 03.07.2011 चे डिलेव्हरी मेमोद्वारे विकत घेतली होती, सदरहू औषधीचे उत्पादनाची तारीख 19.06.2011 असून ती दिनांक 18.06.2013 पर्यंत वैध होती. त्यांनी सदर औषधी पाच लोकांना विकलेली आहे परंतु अर्जदारा शिवाय अन्य कोणाचीही तक्रार प्राप्त झालेली नाही. गैरअर्जदार क्रमांक-1 हा उत्पादक नसून विक्रेता आहे. हिटवीड औषधी प्रभावी असून फवारणी केल्यानंतर सर्व प्रकारचे तण नष्ठ होतात. त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे की, हिटवीड औषधामुळे शेतातील तण नष्ठ झाले नाही हे मान्य होऊ शकत नाही. अर्जदाराचे म्हणण्या प्रमाणे त्याने हिटवीड व टरगासुपर मिसळून फवारणी केली, या दोन पैकी कोणत्या औषधीचे परिणामा मुळे तण नष्ठ झाले या संबधीचा अहवाल दाखल केला नाही तसेच दोन पैकी एका औषधीचा परिणाम झाला या बद्यल तज्ञाचा अहवाल दाखल केला नाही त्यामुळे पुराव्या अभावी अर्जदाराचे म्हणणे सिध्द होऊ
ग्राहक तक्रार क्रमांक-107/2011
शकत नाही. सबब गैरअर्जदार क्रमांक-1 चे विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज व्हावी, असा उजर घेतला.
11. गैरअर्जदार क्रमांक-2 ने पान क्रमांक 56 ते 62 वर न्यायमंचा समक्ष लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक-2 ने अर्जदाराची संपूर्ण विपरीत विधाने नाकबुल केलीत. गैरअर्जदार क्रमांक-2 चे लेखी उत्तराद्वारे, अर्जदाराने हिटवीड फवारणी पूर्वी माहितीपत्रक वाचून व समजावून न घेता फवारणी केली असल्याचे नमुद केले. अर्जदाराने 25 मि.ली.हिटवीड व टरगासुपर 40 मि.ली.मिसळून फवारणी केली, जे सर्वस्वी चुकीचे आहे, त्यांचे माहितीपत्रकात स्पष्ट नमुद आहे की, सदर औषध अन्य कोणत्याही औषधा सोबत मिसळून फवारणी करु नये. अर्जदाराने त्याचे शेतातील तण कोणते वर्गीय रुंद कि सरळ होते या बद्यल माहिती दिली नाही. गैरअर्जदार कंपनीचे अधिकारी श्री हिरवे व श्री टेंबरे यांना माहिती मिळताच दोघेही अर्जदाराचे शेतात प्रत्यक्ष्य पाहणी करता गेले असता, पाहणी अंती , अर्जदाराचे शेतातील तणाची वाढ मर्यादे पेक्षा जास्त म्हणजे कपासीची व तणाची वाढ एकसारखी असल्याचे आढळून आले. तण हे 6 ते 7 पानाचे अवस्थेत असताना म्हणजेच तणाची वाढ पूर्ण झाल्यावर हिटवीड औषधी फवारलेली आहे. सदर बाब गैरअर्जदाराचे अधिका-यांनी घेतलेल्या छायाचित्रावरुन स्पष्ट दिसून येते. गैरअर्जदार कंपनीचे अधिका-यांनी पाहणी नंतर पानवर्गीय तणावर औषधीचा परिणाम झाला नसल्याचे सांगितल्याची बाब खोटी असल्याचे नमुद केले. गैरअर्जदार कंपनीचे अधिका-यांनी अर्जदारास कोणतीही उडवाउडवीची उत्तरे दिलेली नाहीत. गैरअर्जदार कंपनीचे अधिका-यांनी पाहणी नंतर, अर्जदारास सत्य परिस्थिती नमुद करुन त्यासाठी अर्जदार स्वतः जबाबदार असल्याचे कळविले. त्यांनी अर्जदारास रुपये-5000/- प्रतीएकर प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे कधीही आश्वासन दिलेले नव्हते. अर्जदाराचे नोटीसला गैरअर्जदार यांनी दिनांक 15.09.2011 रोजी योग्य उत्तर दिलेले आहे. त्यांनी अर्जदारास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे अर्जदारास नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न उदभवत नाही. अर्जदाराची तक्रार कोणत्याही शास्त्रीय आधारा शिवाय मान्य होऊ शकत नाही.
12. गैरअर्जदार क्रमांक-2 ने पुढे असे नमुद केले की, अर्जदाराने दिनांक 20.08.2011 रोजी गैरअर्जदाराचे प्रतिनिधी , कृषी अधिकारी यांचे समक्ष बयान देऊन नमुद केले की, त्याने शेत तणरहीत ठेवले फक्त 01 एकर शेत अजूनही तसेच ठेवलेले आहे अशा परिस्थितीतत अर्जदाराचे म्हणणे की, त्याचे 03 एकरातील उत्पादनास गैरअर्जदार जबाबदार आहे हे म्हणणे सर्वस्वी खोटे आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक-107/2011
अर्जदाराचे म्हणण्या नुसार तण काही प्रमाणात नष्ठ झालेले आहे, ते हिटवीड मुळे की दुस-या औषधीमुळे झाले ? या बाबत कोणताही शास्त्रोक्त पुरावा अर्जदाराने दाखल केलेला नाही. हिटवीड औषधीमध्ये पायरीथायोबॅक सोडीयक क्रियाशिल घटक आहे व ते रुंद पानाच्या तणावर प्रभावी आहे. सदर औषधी उगवणीपूर्व तणाच्या नियंत्रणासाठी, पेरणी नंतर पहिल्या दिवशी किंवा लवकर उगवणी नंतर तणाच्या नियंत्रणासाठी, पेरणी नंतर 3 ते 4 दिवसा नंतर किंवा तण दोन ते चार पानावर असताना जास्त उपयोगी व फायदेशीर आहे. फवारणीसाठी 250 मि.ली.हिटवीड 250 ते 300 लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकरसाठी वापरण्यात यावे. फवारणीचे वेळी शेतात पुरेशी ओल असणे आवश्यक आहे. सदर औषधा सोबत दुसरे कोणतेही औषध मिसळू नये. अर्जदाराने सदर औषधी संबधाने प्रयोग शाळेचा अहवाल दाखल केलेला नाही. गैरअर्जदार न्यायालया मार्फत प्रयोगशाळेत तपासणी करीता सदर हिटवीड रासायनिक औषधी पाठविण्यास तयार आहेत.
13. गैरअर्जदार क्रमांक-2 ने पुढे असे नमुद केले की, गैरअर्जदार क्रमांक-2 हे मेर्सस बहार अग्रो फेम आणि फीडस प्रायव्हेट लिमिटेड यांनी उत्पादीत केलेली औषधी ज्यात हिटवीड सुध्दा आहे, ती बाजारात विक्री करतात, त्यासंबधीचे सर्व दस्तऐवज व परवाना इत्यादी ते सोबत दाखल करीत आहे, त्यावरुन सुध्दा सदर बाब स्पष्ट होईल. गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्यास ज्या परिस्थितीत सिलबंद हिटवीड औषध मे.बहार अग्रो फेम आणि फीडस प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडून मिळाले,त्याच परिस्थितीत ते बाजारात वेगवेगळया डिलर मार्फत विकलेले आहे. अर्जदाराने माहितीपत्राकात नमुद केल्या नुसार हिटवीड औषधीचा वापर केलेला नाही त्यामुळे अपेक्षीत परिणाम प्राप्त झालेले नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 हिटवीड औषधाचे उत्पादक नाहीत, ते केवळ मे.बहार अग्रो फेम आणि फीडस प्रायव्हेट लिमिटेड यांनी उत्पादीत केलेल्या औषधाची विक्री करतात. अर्जदार व्यतिरिक्त अन्य कास्तकारांच्या हिटवीड औषधी संबधाने तक्रारी नाहीत. सबब अर्जदाराची तक्रार पुराव्या अभावी खारीज व्हावी असा उजर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी घेतला.
14. अर्जदाराने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रमांक 10 वरील यादी नुसार एकूण 08 दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये तणनाशकाचे मूळ बिल, वृत्तपत्रीय कात्रणे, अर्जदाराने गैरअर्जदाराना दिलेली नोटीस, कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र , नोटीस पावती, कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचे नोंदविलेले बयान, तलाठी प्रमाणपत्र इत्यादीचा समावेश आहे. तसेच पान क्रमांक 40 वरील
ग्राहक तक्रार क्रमांक-107/2011
यादी नुसार पोस्टाच्या पावत्या दाखल केल्यात. अर्जदाराने पान क्रमांक 47 ते 53 वर आपले शपथपत्र दाखल केले व लेखी युक्तीवाद दाखल केला.
15. गैरअर्जदार क्रमांक 1 विक्रेत्याने आपला लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला. सोबत पान क्रमांक 28 वरील यादी नुसार एकूण 03 दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये डिलेव्हरी मेमो, शेतक-यांचे मनोगत, कंपनीचे ब्राऊचर इत्यादीचा समावेश आहे.
16. गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपला लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला. सोबत पॉवर ऑफ अटर्नी दाखल केले. तसेच पान क्रमांक 71 वरील यादी नुसार अर्जदाराचे नोटीसला दिलेले उत्तर, पोच पावती, हिटवीड औषधाचे माहितीपत्रक, रजिस्ट्रेशन सर्टिफीकेट, लायसन प्रत, परवानगी पत्र, व्हेलिडीटी सर्टिफीकेट, अनालीसीस सर्टीफीकेट इत्यादीचा समावेश आहे.
17. अर्जदाराची तक्रार, उभय गैरअर्जदारांचे स्वतंत्र लेखी जबाब तसेच प्रकरणातील उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज तसेच उभय पक्षांचा मौखीक युक्तीवाद यावरुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
अक्रं मुद्या उत्तर
(1) अर्जदारास, उभय गैरअर्जदांनी हिटवीड रासायनिक नाही.
औषधी पुरवून दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?
(2) हिटवीड या रासायनिक औषधामुळे तण निघाले नाही नाही.
व अर्जदाराचे नुकसान झाले ही बाब अर्जदाराने सिध्द
केलेली आहे काय?
(3) अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यास पात्र आहे काय? नाही.
(4) या तक्रारीचा अंतिम निकाल काय? अंतिम आदेशा नुसार.
:: कारण मिमांसा ::
मुद्या क्रं-1 ते 3
18. अर्जदार/तक्रारकर्त्याने, गैरअर्जदार क्रमांक 1 कडून तणनाशक रासायनिक औषधी हिटवीड खरेदी केल्या बद्यल बिलाची प्रत पान क्रमांक 10 वरील यादी दस्तऐवज क्रं 1 अनुसार दाखल केलेली आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा, गैरअर्जदार क्रमांक 1 चा ग्राहक ठरतो. तसेच सदर तणनाशक रासायनिक औषधी, गैरअर्जदार
ग्राहक तक्रार क्रमांक-107/2011
क्रमांक-1 ला, गैरअर्जदार क्रमांक-2 द्वारे वितरित केलेली असल्यामुळे, तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्रमांक-2 चा सुध्दा ग्राहक ठरतो, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
19. अर्जदार/तक्रारकर्त्याने आपले तक्रारीमध्ये मुख्यत्वे आक्षेप घेतला आहे की, त्याने गैरअर्जदार क्रमांक-2 चे हिटवीड हे तणनाशक रासायनिक औषध घेतले होते तसेच धानुका कंपनीचे टरगा सुपर हे तणनाशक औषध सुध्दा खरेदी केले होते. या दोन्ही बाबी पान क्रं.10 वरील यादी दस्तऐवज क्रं 1 वर उपलब्ध बिलाचे प्रती वरुन स्पष्ट होतात.
20. अर्जदार/तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने दोन्ही तणनाशक औषधी एकत्रितरित्या मिसळून त्याची फवारणी आपले शेतात केली. फवारणीचे 15 दिवसा नंतर गवतवर्गीय तण इत्यादी नष्ठ झाले परंतु पानवर्गीय तण तसेच शिल्लक होते. तक्रारकर्त्याने हिटवीड या गैरअर्जदार क्रमांक 2 द्वारे वितरीत तणनाशक औषधीचा काहीही परिणाम झालेला नसल्याचे आपले तक्रारीत नमुद केलेले आहे. गैरअर्जदार क्रमांक-2 द्वरा वितरित हिटवीड या तणनाशक रासायनिक औषधीचा, तण नष्ठ होण्या करीता काहीही परिणाम झालेला नाही, ही बाब सिध्द करण्या करीता कोणत्याही तज्ञाचा अहवाल प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याने फक्त त्याचे कृषी अधिका-याने नोंदविलेले बयान व ग्राहक पंचायतीचा अहवाल दाखल केलेला आहे. सदर दोन्ही दस्तऐवज पुरावा म्हणून ग्राहय धरता येत नाही. तसेच या दस्तऐवजा वरुन हिटवीड तणनाशक परिणामकारक नव्हते असा निष्कर्ष काढता येत नाही.
21. मंचाचे असे मत आहे की, दोन्ही तणनाशक औषधी एकत्रित मिश्रण करुन, एकाच वेळी शेतात फवारल्यामुळे, कोणत्या तणनाशक औषधीचा तण नष्ठ होण्या करीता उपयोग झाला आणि कोणत्या तणनाशक औषधीचा परिणाम शुन्य होता, ही बाब सिध्द करण्या करीता, अर्जदाराने विशेषज्ञाचा अहवाल दाखल करणे गरजेचे होते परंतु तसे काहीही अर्जदाराने प्रस्तुत प्रकरणात केलेले नाही. त्यामुळे वस्तुतः कोणत्या तणनाशक औषधीचा परिणाम झाला नाही, ही बाब सिध्द करण्या करता अर्जदार/तक्रारकर्ता अपयशी ठरलेला आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक-107/2011
22. तक्रारकर्ता/अर्जदाराने आपले तक्रारीत नमुद केले की, त्याने हिटवीड व टरगा सुपर या दोन्ही तणनाशक रासायनिक औषधीचे एकत्रितरित्या मिश्रण करुन त्याची फवारणी आपले शेतात केलेली आहे.
23. गैरअर्जदार क्रमांक-2 चे वकिलांनी युक्तीवादाचे वेळी मंचाचे निदर्शनास आणून दिले की, गैरअर्जदार क्रमांक-2 द्वारे वितरित हिटवीड तणनाशक रासायनिक औषधी, दुस-या कोणत्याही रासायनिक औषधी सोबत मिश्रण करुन वापर करण्या योग्य नाही. त्या संदर्भात त्यांनी हिटवीड या तणनाशक रासायनिक औषधीचे माहितीपत्रकावर मंचाचे लक्ष वेधले. सदर माहितीपत्रकाचे अवलोकन केले असता, ही बाब स्पष्ट होते की, गोदरेज हिटवीड फवारताना घ्यावयाची काळजी या सदराखाली अक्रं-6 वर स्पष्टपणे सुचित केलेले आहे की, गोदरेज हिटवीड वापरताना इतर कुठलीही बुरशीनाशक, तणनाशक, किटकनाशक औषधी मिसळून वापरु नये, असे असताना, अर्जदाराने हिटवीड तणनाशक औषधी, दुस-या तणनाशक औषधी सोबत
मिश्रण करुन फवारल्याचे अर्जदार/तक्रारकर्त्याचेच तक्रारीतील कथनावरुन स्पष्ट होत असल्यामुळे, अर्जदार/तक्रारकर्त्याने माहितीपत्रकात दिलेल्या सुचनांचे योग्य पालन केलेले नाही, ही बाब स्पष्ट होते व स्वतःचे चुकीचे कृती करीता अर्जदार हा गैरअर्जदारांना दोषी धरु शकत नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
24. गैरअर्जदार क्रमांक-2 ने, हिटवीड या तणनाशक रासायनिक औषधीचे उत्पादन करणारे बहार अग्रो फेम आणि फीडस प्रायव्हेट लिमिटेडला, प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याने प्रतिपक्ष केले नसल्याचा आक्षेप घेतलेला आहे. तसेच हिटवीड रासायनिक तणनाशक औषधी बहार अग्रो फेम आणि फीडस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे उत्पादीत असल्या बाबत पान क्रमांक 72 वरील दाखल दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता/अर्जदाराने बहार अग्रो फेम आणि फीडस प्रायव्हेट लिमिटेडला प्रस्तुत तक्रारीमध्ये प्रतिपक्ष सुध्दा केलेले नाही, त्यामुळे खरी वस्तुस्थिती न्यायमंचा समक्ष येऊ शकलेली नाही.
25. अर्जदार/तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीत गैरअर्जदारां विरुध्द केलेले आक्षेप, पुरेश्या पुराव्या अभावी सिध्द होऊ शकलेले नाही.
ग्राहक तक्रार क्रमांक-107/2011
मुद्या क्रं-4
26. सदर प्रकरणामध्ये अर्जदार/तक्रारकर्त्याने गैरअर्जदारां विरुध्द घेतलेले आक्षेप तो योग्य त्या पुराव्यानिशी सिध्द करु शकलेला नाही तसेच गैरअर्जदारांचे सेवेतील त्रृटी आढळून येत नसल्यामुळे, वरील निष्कर्षाचे आधारे प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे न्यायमंचे स्पष्ट मत आहे.
27. वरील सर्व विवेचना वरुन, आम्ही, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार खारीज.
2) उभय पक्षांना सदर आदेशाची प्रमाणित प्रत निःशुल्क देण्यात यावे.
वर्धा.
दि-07 एप्रिल,2012