Dated the 15 Mar 2017
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. सामनेवाले नं.1 ही इमारत बांधकाम व्यावसायिक संस्था असुन सामनेवाले नं. 2 व 3 हे त्या संस्थेचे भागिदार आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून विकत घेतलेल्या सदनिकेचा ताबा सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिला नसल्याने प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार सामनेवाले यांनी दिलेल्या जाहिरातीवर विश्वास ठेऊन, सामनेवाले यांनी मौजे वसार, ता.अंबरनाथ जिल्हा-ठाणे, येथील सर्व्हे नंबर-43, हिस्सा नं.3 या भुखंडावर विकसित करावयाच्या प्रायोजित इमारतीमध्ये 1 आर.के. 250 चौरस फुट क्षेत्रफळ असलेली सदनिका, तीचा लेखी करार ता.05.02.2013 रोजी केला होता. सदर सदनिकेचे विक्री मुल्य रक्कम रु.2,50,000/- इतक्या किंमतीस विकत घेण्याचे निश्चित झाले, तसेच लाईट व पाणी, टॅक्सचे पावतीचे रु.28,000/- असे मिळून एकूण रक्कम रु.2,78,000/-, सामनेवाले यांना दिली, त्यानुसार सामनेवाले यांनी रक्कम दिल्याबाबत पावत्या दिलेल्या आहेत.
तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार, कालांतराने तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडे त्यांना देण्यात येणा-या सदनिकेचा ताबा घेण्यासाठी गेले असता, त्यांना सामनेवाले यांनी सदर सदनिकेचे बांधकाम पुर्ण झाले नसल्याचे कारण सांगितले. यानंतर बराचकाळ सामनेवाले यांनी बांधकाम केले नाही. त्यामुळे तक्रारदार यांना आपण फसवलो गेलो असल्याचे ज्ञात झाल्यावर त्यांनी सामनेवाले यांचेकडे दिलेली रक्कम परत मागितली, परंतु प्रत्येक वेळी त्यांनी टाळाटाळ केली व यानंतर आपला पत्ता बदलून अन्य ठिकाणी गेले, व त्यांनी नविन नांवाने व्यवसाय चालु केला. त्याठिकाणी सुध्दा त्यांना गाठून पैसे परत मागितले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्द वरीष्ठ पोलिस निरीक्षक,महात्मा फुले चौक, कल्याण (प) जिल्हा-ठाणे यांचकडे सामनेवाले यांचे विरुध्द ता.19.11.2014 रोजी घर फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली आहे (पान क्रमांक-21), परंतु सामनेवाले यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन तक्रारदार यांची रक्कम रु.2,78,000/-, 24 टक्के व्याजासह परत मिळावी, मानसिक त्रासाबद्दल रु.1,00,000/-, तसेच तक्रार खर्चाबद्दल रु.20,000/- मिळावेत अशा मागण्या तक्रारदार यांनी केल्या आहेत.
तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे बुक केलेल्या खालील तक्त्यात नमुद केलेल्या सदनिकेचा ताबा लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन तक्रारदार यांना दिले होते. त्याचा तपशील खालील प्रमाणे.....
अ.क्र. | तक्रार क्रमांक | तक्रारदाराचे नांव | सामनेवाले यांचे नांव | एकूण मोबदला रुपये | तक्रारदाराने सामनेवाले यांना दिलेली रक्कम | सदनिका क्रमांक, इमारत नांव,व एरिया | सामनेवाले यांना एकूण रक्कम दिल्याची तारीख व विक्री कराराची तारीख | तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्कम |
1. | 1060/15 | श्री.दिलीप रामचंद्र शिंदे | 1.मे.ओम साई ड्रीम होम्स बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स, 2.मे.ओम साई ड्रीम होम्स बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स, भागिदार- श्री.सुनिल दामोदर पोटे 3.श्री.अनंत स. शिंदे | 2,50,000/- | 2,50,000/- + (रु.28,000/- लाईट व पाणी टॅक्सचे तक्रारीत नमुद केल्यानुसार) असे एकूण रु.2,78,000/- | भव्य घरकुल योजना, सर्व्हे नं.43, हिस्सा नं.3, मौजे-वसार, ता. अंबरनाथ, जि.ठाणे, 1 आ.के. 250 चौरस फुट | ता.29.09.2013 विक्री कराराची ता.05.02.2013 | मा.त्रास रु.1,00,000/- तक्रार खर्च रु.20,000/- |
3. सामनेवाले यांना पाठविण्यात आलेली तक्रारीची नोटीसचा अहवाल समाधानकारक नसल्याने , तक्रारदार यांनी सामनेवाले यांना जाहिर नोटीस देण्याची परवानगी घेऊन सामनेवाले यांना जाहिरप्रगटनाव्दारे सुनावणीची नोटीस देण्यात आली. तथापि, जाहिरप्रगटनामध्ये नमुद केलेल्या सुनावणीच्या तारखेस तसेच त्यानंतर संधी देऊनही सामनेवाले हजर न झाल्याने, त्यांच्या विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचे आदेश पारित करण्यात आले.
4. तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. तोंडी युक्तीवादाची पुरसिस दिली. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, व लेखी युक्तीवादाचे वाचन मंचाने केले. त्यावरुन प्रकरणात खालील मुदयांचा विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
अ. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून वरील तक्त्यात नमुद
केल्याप्रमाणे सदनिका विक्रीबाबत मोठयाप्रमाणात रक्कम
स्विकारुनही तक्रारदार यांना सदर भुखंडावर इमारत बांधुन तक्रारदार
यांनी सामनेवाले यांच्याकडे बुक केलेल्या सदनिकेचा ताबा न
दिल्यामुळे तक्रारदाराप्रती सदोष पुर्ण सेवा दिली आहे का ?........................होय.
ब. तक्रारीत काय आदेश ?.............................................तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
5.कारण मिमांसा-
अ. “सामनेवाले यांनी वसार ता.अंबरनाथ येथील सर्व्हे नंबर-43, हिस्सा नं.3, या भुखंडावर विकसित करावयाच्या प्रायोजित प्रकल्पातील 1 आर.के. 250 चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका रक्कम रु.2,50,000/- + लाईट व पाणी टॅक्सचे रु.28,000/- असे एकूण रक्कम रु.2,78,000/- एवढया किंमतीस सामनेवाले यांचेकडून विकत घेण्याचे तक्रारदार यांनी निश्चित केले, व तक्रारदार यांनी अभिलेखावर सादर केलेल्या खरेदीखतावरुन सदर सदनिकेच्या एकूण मोबदल्याची किंमत रक्कम रु.2,50,000/- उभयपक्षांत ठरल्याचे दिसून येते.” त्यानुसार तक्रारदार यांनी एकुण किंमत रु.2,50,000/- सामनेवाले यांना वर नमुद केलेल्या धनादेशांच्या तपशिलाप्रमाणे दिल्याचे दिसून येते. जसे- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.2,50,000/- मिळाल्याबाबतची पावत्या क्रमांक-293, 037, 182, 831,1196, 922, 2318 व 1113 तक्रारदार यांना दिलेल्या आहेत, त्या पान क्रमांक-19 ते 23 वर अभिलेखात उपलब्ध आहेत, तसचे लाईट व पाणी टॅक्सचे रक्कम रु.28,000/- सामनेवाले यांना अदा केल्याबाबतची पावती क्रमांक-183, पान क्रमांक-20 वर उपलब्ध आहे.
सामनेवाले यांनी, तक्रारदाराशी वसार बिल्डींग मधील सदनिका विकण्याचा व्यवहार करुन दि.05.02.2013 रोजी खरेदीखत करुन दिले. सदर खरेदीखता खाली तक्रारदार व सामनेवाले मे.ओम साई ड्रीम्स यांचेतर्फे त्यांचे भागिदार म्हणून नमुद केलेले श्री.अनंत सदाशिव शिंदे यांच्या स्वाक्ष-या दिसुन येतात. सदर खरेदीखत साक्षांकित करण्यात आले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारकडुन रक्कम रु.2,50,000/- स्विकारुन कोणतेच बांधकाम केले नाही, व तक्रारदाराचे पैसेही परत केले नाहीत, हे तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. वर नमुद केलेल्या भुखंडावर इमारत बांधुन त्यामध्ये तक्रारदार यांनी आरक्षित केलेली सदनिका विकण्याचे मान्य केले आहे, व त्याचा एकूण मोबदला तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे उभयपक्षांत ठरल्याचे मान्य केले आहे. त्यापैंकी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना तक्त्यात नमुद केल्या प्रमाणे धनादेशाव्दारे रक्कम अदा केल्याचे दिसुन येते. त्याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेली पावत्या क्रमांक-293, 037, 182, 831,1196, 922, 2318 व 1113 अनुक्रमे ता.25.11.2012, ता.02.01.2013, ता.30.01.2013, ता.25.06.2013, ता.23.11.2013, ता.11.08.2013 ता.09.12.2013 व ता.29.09.2013 तक्रारदार यांनी अभिलेखात सादर केलेल्या आहेत, तसचे लाईट व पाणी टॅक्सचे रक्कम रु.28,000/- सामनेवाले यांना अदा केल्याबाबतची पावती क्रमांक-183, ता.30.01.2013 ची तक्रारदार यांनी अभिलेखात सादर केलेली आहे.
परंतु असे असतांना देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर मिळकतीवर इमारत बांधुन त्यातील सदनिकेचा ताबा संबंधीत तक्रारदार यांना अदयाप दिला नाही. अशा प्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदार यांची फसवणूक केल्याने, सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिली हे सिध्द होते. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून वरील तक्त्यात नमुद केलेली रक्कम स्विकारुनही तक्रारदार यांना आश्वासन दिल्याप्रमाणे व खेदीखतात नमुद केल्याप्रमाणे सदर भुखंडावर इमारत विकसीत करुन त्यातील सदनिकेचा रितसर व कायदेशीर ताबा संबंधीत तक्रारदाराशी सदर व्यवहार पुर्ण करुन दिला नाही, त्यामुळे तक्रारदार यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले, व सदनिकेचा ताबाही अदयाप तक्रारदार यांना मिळाला नाही. म्हणुन सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदनिका खरेदीबाबत अदा केलेली संपुर्ण रक्कम सामनेवाले मे.ओम साई ड्रीम होम्स व त्यांच्या तर्फे दर्शविलेले भागिदार श्री.सुनिल पोटे,व श्री.अनंत शिंदे यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या सदर एकूण रक्कम रु.2,50,000/- (अक्षरी रुपये दोन लाख पन्नास हजार) तक्त्यामध्ये नमुद केलेल्या खरेदीखाताच्या तारखेपासुन (ता.05.02.2013) 12 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत परत करावी असे आदेश सामनेवाले मे.ओम साई ड्रीम होम्स व त्यांच्या तर्फे दर्शविलेले भागिदार श्री.सुनिल पोटे, व श्री.अनंत शिंदे यांना देण्यात येतात. तसचे लाईट व पाणी टॅक्सचे रक्कम रु.28,000/- सामनेवाले यांना अदा केल्याबाबतची पावती क्रमांक-183, ता.30.01.2013, पान क्रमांक-20 वर तक्रारदार यांनी अभिलेखात सादर केलेली आहे. त्यानुसार सामनेवाले मे.ओम साई ड्रीम होम्स व त्यांच्या तर्फे दर्शविलेले भागिदार श्री.सुनिल पोटे, व श्री.अनंत शिंदे यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी उपरोक्त रक्कम रु.28,000/- तक्रारदार यांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत ता.30.01.2013 पासुन दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजासह परत करावी.
तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणुन तक्रारदार सामनेवाले मे.ओम साई ड्रीम होम्स व त्यांच्या तर्फे दर्शविलेले भागिदार श्री.सुनिल पोटे, व श्री.अनंत शिंदे यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तीकरित्या रक्कम रु.15,000/- (अक्षरी रक्कम रुपये पंधरा हजार), तसेच ग्राहक मंचात वकीलाकरवी प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागल्याने झालेल्या न्यायिक खर्चापोटी सामनेवाले मे.ओम साई ड्रीम होम्स व त्यांच्या तर्फे दर्शविलेले भागिदार श्री.सुनिल पोटे, व श्री.अनंत शिंदे यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रार खर्च रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार) मिळण्यास पात्र आहेत.
सबब प्रस्तुत प्रकरणामध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- अंतिम आदेश -
1.तक्रार क्रमांक-1060/2015 अंशतः मंजुर करण्यात येतात.
2.सामनेवाले यांना सदनिका खरेदीपोटी वरील तक्त्यात दिलेल्या तपशीलानुसार तक्रारदार
यांनी अदा केलेली एकूण रक्कम रु.2,50,000/- (अक्षरी रुपये दोन लाख पंन्नास हजार)
सामनेवाले मे.ओम साई ड्रीम होम्स व त्यांच्या तर्फे दर्शविलेले भागिदार श्री.सुनिल पोटे,
व श्री.अनंत शिंदे यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांचेशी केलेल्या
खरेदीखाताच्या तारखेपासुन म्हणजेच ता.05.02.2013 पासुन दरसाल दर शेकडा 12 टक्के
व्याजाने आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत परत करावी.
3.तसचे लाईट व पाणी टॅक्सचे रक्कम रु.28,000/- सामनेवाले यांना अदा केल्याबाबतची
पावती क्रमांक-183, ता.30.01.2013, पान क्रमांक-20 वर तक्रारदार यांनी अभिलेखात
सादर केलेली आहे. त्यानुसार सामनेवाले मे.ओम साई ड्रीम होम्स व त्यांच्या तर्फे दर्शविलेले
भागिदार श्री.सुनिल पोटे, व श्री.अनंत शिंदे यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी उपरोक्त
रक्कम रु.28,000/- (अक्षरी रुपये अठ्ठावीस हजार) तक्रारदार यांना आदेश पारित
तारखेपासुन दोन महिन्यांत ता.30.01.2013 पासुन दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजासह
परत करावी.
4.सामनेवाले मे.ओम साई ड्रीम् होम्स व त्यांच्या तर्फे दर्शविलेले भागिदार श्री.सुनिल पोटे,
व श्री.अनंत शिंदे यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या,रक्कम रु.15,000/- (अक्षरी रक्कम
रुपये पंधरा हजार), तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी दयावेत, तसेच सामनेवाले मे.ओम
साई ड्रीम होम्स व त्यांच्या तर्फे दर्शविलेले भागिदार श्री.सुनिल पोटे, व श्री.अनंत शिंदे यांनी
वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रार खर्च रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा
हजार) तक्रारदार यांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावेत.
5.आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
6.तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.15.03.2017
जरवा/