तक्रारदार यांचे वकील ः- श्री. सुनिल पाटील
सामनेवाले ः- एकतर्फा.
( युक्तीवादाच्या वेळेस)
न्यायनिर्णय - मा. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
न्यायनिर्णय
(दि.13/03/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारदारांनी सामनेवाले सहल कंपनीविरूध्द सेवेतील कसुराकरीता ही तक्रार दाखल केली. तक्रारीसोबत आवश्यक कागदपत्रे सादर केली. सामनेवाले यांना मंचानी पाठविलेली नोटीस पोस्टाच्या ट्रॅक रिपोर्टप्रमाणे दि. 14/03/2017 ला प्राप्त झाली. परंतू ते मंचात उपस्थित झाले नाही. त्यांनी लेखीकैफियत सादर केली नाही. सबब, दि. 11/05/2017 च्या आदेशाप्रमाणे प्रकरण त्यांचेविरूध्द एकतर्फा चालविण्यात आले.
2. तक्रारदारानूसार सामनेवाले क्र 1 ही विदेशात सहलीची व्यवस्था करणारी कंपनी आहे. तक्रारदारानी विदेशात सहलीकरीता जाण्याकरीता सामनेवाले यांना एकुण रू. 1,07,800/-,रक्कम अदा केली. तक्रारदार यांना, सामनेवाले यांनी विदेशी सहलीकरीता 4 मार्च, 22 एप्रिल, 13 में व 27 में 2016 च्या तारखा दिल्या होत्या. तक्रारदारानी सामनेवाले यांच्या मागणीप्रमाणे दोनदा आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. परंतू पहिल्यांदा फ्रॉंन्सच्या अधिका-यांनी त्यांचा व्हिसा नामंजूर केला. दुस-यांदा तक्रारदारानी पुन्हा तातडीने कागदपत्रे पाठविली. परंतू दुस-यांदा सुध्दा व्हिसा नामंजूर करण्यात आला. तक्रारदारानी सामनेवाले यांचा सतत पाठपुरावा केला. तेव्हा सामनेवाले यांनी तक्रारदाराना अतिरीक्त रक्कम भरून माहे नोव्हेंबर मध्ये सहलीवर जाता येईल असे कळविले. तक्रारदारानी सामनेवाले यांना दि. 14/05/2016 ला फोन केला असता, तो तक्रारदारांवर ओरडला व सामनेवाले यांच्याकडून तक्रारदाराना सहलीबाबत कोणतेही आश्वासन मिळणार नाही व ते तक्रारदार यांचा फोन स्विकारणार नाही व तक्रारदारांना धमकी दिली की, ते तक्रारदार यांचेविरूध्द पोलीसांकडे तक्रार नोंदवतील. तक्रारदारानी सामनेवाले यांच्या विरूध्द दि. 16/05/2016 ला गोरेगांव पोलीसस्टेशनला तक्रार दाखल केली. तक्रारदारानी सामनेवाले यांना दि. 19/05/2016 ला मागणीपत्र पाठविले व नुकसान भरपाई व व्याजासह मागणी केली. अंततः ही तक्रार दाखल करण्यात आली.
3. तक्रारदारांनी रू. 1,07,800/-,करीता तीन पावत्या व झालेला पत्रव्यवहार सादर केला. तक्रारदारानी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद सादर केला. तक्रारदारातर्फे वकील श्री. सुनिल पाटील यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
4. तक्रारदार यांचा पुरावा अबाधीत आहे. अदा केलेल्या रकमेबाबत पावत्या सादर आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना पत्रे पाठविली. परंतू, सामनेवाले यांनी त्याबाबत कोणताही जबाब दिला नाही. त्यामुळे सामनेवाले यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट होऊ शकले नाही. तक्रारदार यांच्या मागण्या मंजूर करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही.
5. तक्रारदारानी तक्रारीच्या परिच्छेद क्र 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कराराप्रमाणे सहल रद्द केल्यास, 20 टक्के रक्कम वजा करण्याची तरतुद होती. आमच्या मते ही बाब तक्रार मंजूर करतांना विचारार्थ ठेवणे आवश्यक आहे. दोन पक्षांच्या कराराला महत्व देणे आवश्यक आहे.
6. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
7. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापूर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्र 370/2016 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र 1 व 2 यांनी सेवा देण्यात कसुर केला असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र 1 व 2 यांनी व्यक्तीशः किंवा संयुक्तीकरित्या रू. 1,07,800/-,(एक लाख सात हजार आठशे) मधून 20 टकके कपात करून, उर्वरीत रकमेवर दि. 15/09/2015 पासून द.सा.द.शे 10 टक्के व्याजानी रक्कम तक्रारदार यांना दि. 30/04/2018 पर्यंत अदा करावी.
4. सामनेवाले क्र 1 व 2 यांनी व्यक्तीशः किंवा संयुक्तीकरित्यातक्रारदाराना मानसिक त्रासासाठी रू. 10,000/-,(दहा हजार) व तक्रारीच्या खर्चाकरीता रू. 5,000/-,(पाच हजार) दि. 30/04/2018 पर्यंत अदा करावी.
5. उपरोक्त क्लॉझ 3 व 4 प्रमाणे रक्कम दि. 30/04/2018 पर्यंत अदा न केल्यास, त्या रकमेवर दि. 01/05/2018 पासून द.सा.द.शे 15 टक्के व्याज लागु राहिल.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
7. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-