मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 108/2010 तक्रार दाखल दिनांक – 21/08/2010 अंतिम आदेश दिनांक – 09/03/2011 श्री. अमेया एस खोत, एस/ऑफ श्री. एस. आर. खोत, रा. फ्लॅट नंबर 103, रॉयल गार्डन, न्यू टिळक नगर, जुनी बिल्डींग नंबर 160 जवळ, चेंबूर ( पश्चिम), मुंबई 400 089. ........ तक्रारदार विरुध्द
मेसर्स नटराज, 10, वेंकटेश प्रसाद, आर. के. विद्यारोड, दादर (पश्चिम), मुंबई 400 028. ......... सामनेवाले
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – उभयपक्ष हजर
- आदेश - - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दिनांक 21/08/2010 रोजी दाखल केलेली आहे. तक्रारदाराने नमूद केलेले आहे की, त्याने गैरअर्जदाराकडून दिनांक 26/10/2007 रोजी सलवार कमिज रक्कम रुपये 2,395/- या किंमतीस विकत घेतला होता. तक्रारदाराने पुढे असे नमूद केले आहे की, सदर सलवार कमिजची फीटींग बरोबर नसल्याने तो दुरुस्तीकरीता गैरअर्जदार यांच्याकडे दिला होता. तक्रारदाराने नमूद केले आहे की, त्यांनी सदर सलवार कमिज बदलून सुध्दा मागितला होता. परंतु प्रस्तुत गैरअर्जदार यांनी तो बदलून दिला नाही. तक्रारदाराने नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांना त्यांनी नोटीस पाठविली व सदर रकमेची मागणी केली होती. तसेच मुंबई ग्राहक पंचायत यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सदर गैरअर्जदार यांनी रक्कम परत केली नाही.
2) मंचामार्फत गैरअर्जदारांना नोटीस पाठविण्यात आली. गैरअर्जदार मंचात हजर झाले. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराने लावलेले आरोप अमान्य केले. गैरअर्जदार यांनी ही बाब अमान्य केली आहे की, सदर सलवार कमिज हा तक्रारदारांनी बदलून मागितला होता. तसेच गैरअर्जदार यांनी ही बाब सुध्दा अमान्य केली आहे की, सलवार कमिजच्या दुरुस्तीत दोष होता. 3) प्रस्तुत तक्रार दिनांक 09/03/2011 रोजी मंचासमक्ष मौखिक युक्तीवादाकरीता आली. तक्रारदार व त्यांचे वकील हजर, गैरअर्जदारातर्फे त्यांचे प्रतिनिधी हजर. उभयपक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, सत्य प्रतिज्ञापत्रावरील पुरावा इत्यादीचे अवलोकन केले असता मंच खालील मुद्दा विचारात घेत आहेत. प्रथम ही बाब पडताळून पहाणे आवश्यक आहे की, तक्रार ही मुदतीत दाखल केलेली आहे काय? स्पष्टीकरण - तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांनी गैरअर्जदार यांच्या दुकानातून दिनांक 26/10/2007 रोजी सलवार कमिज विकत घेतला होता. तदनंतर तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांना दिनांक 07/01/2008 रोजी पत्र पाठवून रक्कम परत मागितली होती. तसेच सदर रक्कम परत न केल्यास ग्राहक मंच येथे तक्रार नोंदविण्यात येईल. तक्रारदार यांनी पुन्हा दिनांक 14/06/2008 रोजी गैरअर्जदार यांना पत्र पाठवून रक्कम परत मिळणेबाबत मागणी केली होती. गैरअर्जदार यांना तक्रारदाराने दिनांक 17/12/2008 रोजी मुंबई ग्राहक पंचायत यांचेकडे त्यांची तक्रार नोंदणी केल्याबाबत कळविले होते. तसेच मुंबई ग्राहक पंचायत यांनी गैरअर्जदाराला दिनांक 28/01/2009 रोजी पत्र पाठविले. मौखिक युक्तीवादाच्या वेळी तक्रारदाराच्या वकीलांनी नमूद केले आहे की, वरील पत्रव्यवहाराच्या आधारे तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडलेले आहे त्यामुळे सदर तक्रार ही मुदतीच्या दाखल केलेली आहे. मंचाच्या मते तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक 26/10/2007 रोजी घडलेले आहे. ज्या दिवशी तक्रारदार यांनी सलवार कमिज विकत घेतला होता. तदनंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराद्वारे कारण सतत घडू शकत नाही ही बाब मा. राष्ट्रीय आयोग यांनी अनेक न्याय निवाडयात नमूद केलेली आहे. तक्रारदार यांनी सदर तक्रार ही मंचात दिनांक 21/08/2010 रोजी दाखल केलेली आहे, व ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 24(अ) अन्वये सदर तक्रार ही सदर तक्रारीचे कारण घडल्यापासून दोन वर्षाच्या आत मंचात दाखल करावयास पाहिजे होती. परंतु तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार तक्रारीस कारण घडल्यापासून दोन वर्षाच्या आत मंचात दाखल केली नाही मंचाच्या मते सदर तक्रार ही मुदतबाहय दाखल केलेली असल्याने ती खारिज होण्यास पात्र आहे. सबब मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश देत आहेत
- अंतिम आदेश - 1) तक्रारदाराची तक्रार क्रमांक 108/2010 ही मुदतीच्या आत दाखल केली नसल्याने खारिज करण्यात येते. 2) उभयपक्षांनी आपापला खर्च सोसावा.. 3) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 09/03/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./- |