::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा. सदस्य)
(पारित दिनांक- 29 मे, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) अनुक्रमे तणनाशक औषधीचे विक्रेता व उत्पादक यांचे विरुध्द दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता शेतकरी असून मौजा वासी, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर येथे वडीलोपार्जीत शेती असून त्याच गट क्रं 153 आराजी-5.33 हेक्टर आर आहे आणि या शेतीची महसूली अभिलेखात नोंद त्याचा लहान भाऊ याचे नावाने आहे परंतु असे जरी असले तरी ही जमीन प्रत्यक्ष्य तक्रारकर्त्याच्या
वाटयाला आलेली आहे. या शिवाय गट क्रं 133/अ-1 आराजी 4.32 हेक्टर आर मालक श्री कवडू आडकू ढोबळे याचे नावाने असून तक्रारकर्त्याने ही शेती मक्त्याने वहिवाटीसाठी घेतली आहे त्या बाबतचे मक्त्याचे प्रमाणपत्र तक्रारी सोबत जोडलेले आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, सन-2015 च्या मान्सून खरीप हंगामात लागवड केलेल्या उसाच्या पिकात दोन ओळी मध्ये आंतरपिक म्हणून जुलै-2015 मध्ये सोयाबिन पिकाची पेरणी गट क्रं-133/1-अ, एकूण आराजी 10.82 एकरा पैकी 4.00 एकरात आणि गट क्रं-153 एकूण आराजी 13.00 एकर पैकी 6.00 एकरात केली.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-1) मे.मुंडले कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर श्री संजीव कुमार मुंडले यांनी सुचविल्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-2) निर्मित ऍंकर (ANCHOR) हे तणनाशक औषध दिनांक-09.08.2015 व दिनांक-10.08.2015 रोजी खरेदी केले, त्याप्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-1) ने पावती क्रं 789 अन्वये रुपये-1100/- व पावती क्रं 806 अन्वये रुपये-1340/- मिळाल्या बाबतच्या पावत्या दिल्यात. विरुध्दपक्ष क्रं 1 ने सुचविल्या प्रमाणे दिनांक-10.08.2015 व 11.08.2015 रोजी सोयाबिनचे पिकात तणनाशक औषधीची फवारणी केली. त्यानंतर दिनांक-13.08.2015 रोजी शेताची पाहणी केली असता लक्षात आले की, सोयाबिन पिक जळून पिकाचे नुकसान झाले . या बाबत विरुध्दपक्ष क्रं-2) जे तणनाशकाचे निर्माते आहेत यांना सुचना दिली, त्याप्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना माहिती मिळाल्या नंतर दिनांक-18.08.2015 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2 तणनाशक औषधी निर्माता कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष्य मोक्यावर येऊन पिकाची पाहणी केली असता संपूर्ण सोयाबिन पिक जळाल्याचे आढळून आले आणि त्यांनी तणनाशक औषधाचे फवारणीमुळे सोयाबिनचे पिक जळाले असा निष्कर्ष काढला आणि झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनी कडून देण्याचे आश्वासन सुध्दा दिले, त्यावेळी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता मोक्यावर हजर होते. या बाबत जिल्हा अधिक्षक, कृषी विभाग, नागपूर तसेच उपसंचालक, विभागीय आयुक्त कृषी विभाग, नागपूर यांना पिकाचे नुकसानीची माहिती दिली त्यानुसार श्री ए.एम.कुरुडकर, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच श्री डी.जी.रामटेके, तालुका कृषी अधिकारी भिवापूर तसेच शास्त्रज्ञ श्री व्ही.जी. नागदेवते आणि विरुध्दपक्ष क्रं 2 कंपनीचे प्रतिनिधी श्री विनोद डी.औंधकर, पंचायत समिती भिवापूरचे अधिकारी श्री एस.एन.पुरी व श्री आर.एच.राठोड प्रत्यक्ष्य मोक्यावर उपस्थित होते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, गट क्रं 131/1 मधील सोयाबिनचे पिक 95 ते 98 टक्के आणि गट क्रं-153 मधील सोयाबिनचे पिक 80 ते 85 टक्के तणनाशक औषधाच्या फवारणीमुळे नुकसान झाल्याचा अभिप्राय संबधित कृषी अधिका-यानीं दिला व त्या संबधी मोका पंचनामा कृषी अधिकारी यांनी केला. त्यामुळे तक्रारकर्त्याचे एकूण 10 एकर शेतातील सोयाबिन पिकाचे एकूण रुपये-2,00,000/- एवढया रकमेचे आर्थिक नुकसान झाले त्याच बरोबर पिकाचे नुकसानीमुळे त्याला शारिरीक व मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्याच्या व कुटूंबियाचे पालनपोषणाचा प्रश्न त्याचे समोर उभा झालेला आहे. विरुध्दपक्षानां नुकसान भरपाई मिळण्या करीता कळविले परंतु त्याचा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे दिनांक-06/10/2015 रोजी विरुध्दपक्षानां पंजीबध्द डाकेने कायदेशीर नेटीस पाठविली व त्याव्दारे नुकसान भरपाई रुपये-2,00,000/- मिळावी अशी मागणी केली परंतु विरुध्दपक्षानीं कोणतीही तसदी न घेता नोटीसला खोटे उत्तर देऊन त्याचे कथन खोटे व बनावटी असल्याचे त्यात नमुद केले. त्यामुळे त्याने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द योग्य ती दाद मिळण्या करीता ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन खालील मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्षानां आदेशित करण्यात यावे की, त्यांचे दोषपूर्ण तणनाशकाचे फवारणी मुळे तक्रारकर्त्याचे सोयाबिन पिकाचे झालेल्या नुकसानी संबधाने भरपाई म्हणून रुपये-2,00,000/- तक्रारकर्त्याला द्दावेत.
(02) तक्रारकर्त्याला माहे जुलै-2015 पासून सतत शारिरीक मानसिक त्रास सहन करावा लागल्याने त्यापोटी रुपये-40,000/- भरपाई व तक्रारखर्च रुपये-10,000/- विरुध्दपक्षानीं देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी एकत्रित लेखी उत्तर ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्यात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने तक्रारकर्त्याला ऍंकर मेट्रिब्युझिन 70% डब्ल्यु.पी. तणनाशक विकत घेण्यासाठी सुचविले नाही तसेच तक्रारकर्त्याने तणनाशकाचा उपयोग छापील पत्रकातील सुचने प्रमाणे पालन केलेले नाही. तणनाशक हे पेरणीच्या दोन दिवसा आधी किंवा पेरणीच्या दोन दिवसा नंतर वापरावयाचे असते. जर हे तणनाशक उभ्या पिकावर वापरले तर पिकाला नुकसान होऊ शकते त्यामुळे तक्रारकर्ता हा स्वतःच त्याचे निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीला जबाबदार आहे. तसेच त्याने सोयाबिन बियाणे दिनांक-10/06/2016 रोजी पेरले होते आणि ऍंकर मेट्रिब्युझिन 70% डब्ल्यु.पी. तणनाशकाचा वापर सोयाबिनचे उभ्या पिकावर दोन महिन्याचे नंतर म्हणजे दिनांक-10/08/2016 रोजी केला हा त्याचा स्वतःचाच निष्काळजीपणा आहे, त्याने छापील पत्रकातील सुचनांचे पालन केले नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा नुकसानीसाठी स्वतःच जबाबदार असल्याने तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत एकूण 22 दस्तऐवजांच्या प्रती दाखल केल्यात, त्यात प्रामुख्याने 7/12 चे उतारे, शेत मक्त्याने घेतल्या बाबत मक्त्याचे प्रमाणपत्र, ठेके पत्र, तणनाशक औषधी विकत घेतल्या बाबतच्या पावत्यांच्या प्रती, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष तसेच कृषी अधिकारी यांना पाठविलेल्या तक्रारीची प्रत, तालुका तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचनामा, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षानां पाठविलेली रजिस्टर नोटीसची प्रत, पोस्टाच्या पावत्या व पोच, त्याच बरोबर तणनाशक औषधी मुळे झालेल्या पिकाचे नुकसानीची छायाचित्रे, लिफलेट इत्यादी दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे. तसेच तणनाशक औषधीचे मूळ पॉकिट दाखल केले.
05. विरुध्दपक्षानीं आपल्या उत्तरा सोबत विरुध्दपक्ष क्रं-2) ने कृषी अधिकारी, पंचायत समिती भिवापूर यांचे नावे पाठविलेल्या तक्रारकर्त्याचे पिक पाहणीचे अहवालाची प्रत दाखल केली.
06. दाखल दस्तऐवजांच्या प्रती, आणि उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचा समक्ष खालील मुद्दे उपस्थित होतात-
मुद्दा उत्तर
(1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचां
ग्राहक होतो काय............................................ होय.
(2) विरुध्दपक्षानीं तक्रारकर्त्याला दोषपूर्ण
तणनाशकाची विक्री करुन दोषपूर्ण सेवा
दिली आहे काय..............................................होय.
(3) काय आदेश....................................................अंतिम आदेशा नुसार.
कारणे व निष्कर्ष
07. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तो एक शेतकरी आहे व त्याने सोयाबिनचे पिकात वाकलेल्या तणाचा नाश करण्या करीता विरुध्दपक्ष क्रं-1) तणनाशक औषधी विक्रेता याने सुचविल्या नुसार, विरुध्दपक्ष क्रं-2) तणनाशक निर्माता कंपनीव्दारे उत्पादीत ऍंकर मेट्रिब्युझिन 70% डब्ल्यु.पी. तणनाशक औषध (ANCHOR METRIBUZIN 70% WP HERBICIDE) विकत घेतले व सदर तणनाशक औषधीची फवारणी त्याचे शेतात केली परंतु फवारणी केल्या नंतर तक्रारकर्त्याचे सोयाबिनचे संपूर्ण पिक जळाले. सदर नुकसानी बाबत तक्रारकर्त्याने दोन्ही विरुध्दपक्षानां सुचना दिली व त्याच बरोबर संबधित कृषी अधिकारी यांना सुचना दिली त्यानुसार विरुध्दपक्ष आणि कृषी विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष्य मोक्यावर जाऊन पाहणी करुन पंचनामा केला व अहवाल दिला, त्यानुसार तक्रारकर्त्याच्या दोन्ही शेतातील सोयाबिन पिकाचे एकूण 05 एकराचे जवळपास 95 ते 98 टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्याचे झालेल्या सदर नुकसानीची भरपाई देण्याचे विरुध्दपक्षानीं त्याला आश्वासन दिले होते परंतु बराच अवधी लोटून गेल्या नंतरही विरुध्दपक्षानीं नुकसान भरपाई दिली नाही तसेच कायदेशीर नोटीसला अयोग्य उत्तर पाठवून नुकसान भरपाई फेटाळली.
08. विरुध्दपक्षानीं आपल्या उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने तणनाशक औषधीची फवारणी ही त्यांनी दिलेल्या छापील सुचने नुसार केली नाही व उभ्या पिकामध्ये फवारणी केल्यामुळे पिक जळाले व त्यामुळे तो स्वतःच नुकसानीसाठी जबाबदार आहे.
09. सदर तक्रारीचे स्वरुप पाहता व त्याच प्रमाणे तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्षानी दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विक्रेत्या कडून, विरुध्दपक्ष क्रं 2 कंपनीव्दारे उत्पादीत तणनाशक औषधी विकत घेतल्या बाबत पावतीची प्रत दाखल केली, ती तक्रारकर्त्याचे नावे आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा दोन्ही विरुध्दपक्षांचा ग्राहक होतो तसेच तालुका तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा दिनांक-08/09/2015 रोजीचा अहवाल व पंचनामा याचे अवलोकन केले असता तणनाशक औषधीचे फवारणीमुळे तक्रारकर्त्याचे सोयाबिनचे पिक जळाले व त्यामुळे त्याचे नुकसान झाले ही बाब त्यात स्पष्ट नमुद आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या सोयाबिन पिकाचे नुकसान झाले ही बाब सिध्द होते तसेच तक्रारकर्त्याने ग्राहक मंचा समोर दाखल केलेल्या तक्रारी सोबत तणनाशक औषधीचे मूळ पॉकीट दाखल केलेले असून त्यावरील सुचनांचे अवलोकन केले असता विरुध्दपक्षानीं आपल्या उत्तरात नमुद केल्या प्रमाणे म्हणजे तणनाशक औषधीचा वापर हा पेरणीच्या दोन दिवसा आधी किंवा पेरणीच्या दोन दिवसा नंतर करावयाचा असतो या बाबतची सुचना मूळ पॉकीटवर कुठेही आढळून
आलेली नाही तसेच विरुध्दपक्ष क्रं-2 निर्माता कंपनी तर्फे निर्मित बॅच क्रमांक-U0041 हे तणनाशक उत्कृष्ट दर्जाचे असल्या बाबतचे प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या पिकाचे झालेल्या नुकसानीला विरुध्दपक्ष क्रं-2) तणनाशक औषधी निर्माता कंपनी जबाबदार असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. सर्वसाधारण परिस्थितीत एकरी 12 क्विंटल सोयाबिनचे अपेक्षीत उत्पादन येते त्यामुळे तक्रारकर्त्याचे एकूण 05 एकरसाठी एकूण 60 क्विंटल अपेक्षीत सोयाबिन पिकाचे नुकसान झालेले आहे. सोयबिनचा दर प्रतीक्विंटल रुपये-3000/- प्रमाणे दर हिशोबात घेतल्यास येणारे एकूण नुकसान हे रुपये-1,80,000/- येते व तेवढी नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
10. त्याच बरोबर येथे महत्वाची बाब नमुद करणे आवश्यक वाटते की, महाराष्ट्रातील शेतकरी हा आधीच निसर्गाची साथ न मिळाल्याने सतत होत असलेल्या नापिकीमुळे कर्जबाजारी झालेला आहे, त्यातच शेतीचे योग्य उत्पादन न मिळाल्याने त्याचेवरील कर्जाचा बोझा व त्यावरील व्याज सतत वाढत आहे. सततचे आर्थिक हलाखीमुळे त्याचे कुटूंबातील सदस्यांचा उदरनिर्वाहाचा तसेच मुलांचा शिक्षणाचा आणि विवाहाचा प्रश्न त्याचे समोर असल्याने महाराष्ट्रातील शेतक-यांच्या आत्महत्येत सातत्याने वाढ होत आहे. अशापरिस्थितीत त्यात भर म्हणून अयोग्य व दोषपूर्ण बियाणे आणि दोषपूर्ण औषधींमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीने तो हवालदिल झालेला असून त्यांच्या झालेल्या नुकसानीची योग्य ती नुकसान भरपाई मिळणे क्रमप्राप्त आहे.
11. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री अशोक काशिनाथ राऊत यांची तक्रार, तणनाशक औषधी निर्माता कंपनी विरुध्दपक्ष क्रं-(2) मे. इन्सेक्टीसाईडस इंडीया लिमिटेड, ऊधमपूर (राज्य जम्मू काश्मीर) विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(2) ऍंकर मेट्रिब्युझिन 70% डब्ल्यु.पी. तणनाशक औषधी निर्माता मे. इन्सेक्टीसाईडस कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्यांचे दोषपूर्ण तणनाशक औषधीमुळे सोयाबिन पिकाचे झालेल्या नुकसानी संबधाने नुकसान भरपाई म्हणून रुपये-1,80,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष ऐंशी हजार फक्त) द्दावेत.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(2) तणनाशक औषधी निर्माता कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(2) तणनाशक औषधी निर्माता कंपनी तर्फे तक्रारकर्त्याला द्दावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-(1) तणनाशक औषधी विक्रेता याचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(2) तणनाशक औषधी निर्माता कंपनी तर्फे संबधितानी प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे, विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्यास सदर नुकसान भरपाईची रक्कम रुपये-1,80,000/- निकाल पारीत दिनांक-29 मे, 2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6% दराने व्याजासह तक्रारकर्त्याला देण्यास विरुध्दपक्ष क्रं-2 तणनाशक औषधी निर्माता कंपनी जबाबदार राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.