निकालपत्र :-(दि.24.09.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2 हे प्रस्तुत प्रकरणी हजर झालेले नाहीत तसेच म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, शहर कोल्हापूर तालुका करवीर, जि.कोल्हापूर महानगरपालिका ए वॉर्ड येथील सि.स.नं.3106/1, 3106/2, 3106/3 ही मिळकत विकसित करणेसाठी सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 बांधकाम व्यावसायिक यांना वटमुखत्यार पत्राद्वारे दिलेली आहे. सदर मिळकत सामनेवाला क्र.1 यांनी विकसित करुन ‘श्री समर्थ संकुल’ ही इमारत बांधलेली आहे. तक्रारदार हे मुळ जागेत कुळ म्हणून होते. त्यामुळे सवलतीच्या दरात सदर संकुलातील तिस-या मजल्यावरील 500 चौ.फूट टी-4 ही सदनिका विकत घेणेचे ठरले. त्याप्रमाणे दि.05.06.2004 रोजी रक्कम रुपये2,90,000/- इतक्या मोबदल्यापोटी सदर सदनिका खरेदी करणेचा करार झाला व मोबदल्याची रक्कम रुपये 2,90,000/- सामनेवाला क्र.1 यांना अदा केलेली आहे. (3) सामनेवाला क्र.1 यांनी उपरोक्त उल्लेख केलेल्या सदनिकेचे खरेदीपत्र व डीड ऑफ डिक्लेरेशन करुन दिलेले नाही; तसेच, बांधकामामध्ये त्रुटी ठेवलेल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे :- 500 चौरस फूटाची सदनिका प्रत्यक्षात दिलेली नाही, प्रत्यक्षात 430 चौरस फूटाची सदनिका आहे. त्यामुळे 70 चौरस फूटाचे रक्कम रुपये 40,600/- सामनेवाला यांनी परत केले पाहिजेत. तसेच, सदनिकेमधील किचन प्लॅनमध्ये दाखविलेप्रमाणे नाही. तसेच, हॉल आणि किचन प्लॅनप्रमाणे बांधलेला नाही. सदर हॉल व किचन यांच्या पलिकडे ओपन टेरेस आहे. त्यामध्ये परवानगीशिवाय किचन केलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या सदनिकेमध्ये हवा व उजेड येत नाही. त्यामुळे सतत लाईटची आवश्यकता असलेने त्याचा खर्च वाढून तक्रारदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. मूळ प्लॅनमध्ये ओपन टेरेस दाखविले जागेवर किचन बांधलेने तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच, बांधलेली इमारत व सदनिका यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच, तक्रारदार हे मूळ जागेत कूळ असल्याने दरमहा मासिक भाडे रुपये 100/- वेळोवेळी न दिल्याने तक्रारदारांना 18 ते 20 महिने बाहेर भाडयाने रहावे लागले. त्याचे मासिक भाडे रुपये 1,500/- प्रमाणे रुपये 30,000/- इतके तक्रारदारांचे नुकसान झाले आहे. तक्रारदारांच्याकडून लिफटच्या डिपॉझिटपोटी रुपये 25,000/- घेतलेले आहेत. परंतु, ब-याच वेळा सदरची लिफट नादुरुस्त असते. या सगळयाला कंटाळून व तक्रारदार भिक्षुक असल्याने त्यांचेकडे लोकांची ये-जा सुरु असते, त्यामुळे तक्रारदार हे अन्य ठिकाणी एक खोलीत भाडयाने रहात आहेत. (4) तक्रारदार पुढे सांगतात, ठरलेल्या मोबदल्यापेक्षा सामनेवाला यांनी रुपये 1,30,000/- जादा वसुली केली आहे व एकूण रक्कम रुपये 4,30,000/- सक्तीने घेतलेले आहे. त्यामुळे जादा रक्कम रुपये 1,40,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होवून मिळावेत. सबब, सदनिका क्र.4 चे नोंद खरेदीपत्र होवून मिळणेचा आदेश व्हावा. मंजूर नकाशाप्रमाणे सदनिकेमध्ये दुरुस्ती व्हावी. जादा रक्कम रुपये 1,40,000/- देणेचा आदेश व्हावा. मानसिक त्रासापोटी रुपये 1 लाख, तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दि.05.06.2004 रोजीचा करार, सामनेवाला क्र.1 यांना करारापोटी दिलेल्या रोख रक्कमांच्या 11 पावत्या इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (6) सामनेवाला क्र.1 बांधकाम व्यावसायिक यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, कराराप्रमाणे तक्रारदारांना 500 चौरस फूटाची सदनिका देणेचा दि.25.08.2005 रोजी करार केला होता व मुदतीपूर्वीचा सदनिकाचा खुला कब्जा दिला आहे व ठरलेल्या रक्कमेपेक्षा रुपये 10,000/- तक्रारदारांकडून येणे बाकी आहे. प्रत्यक्षात तक्रारदारांना 715.94 चौरस फूट सुपर बिल्ट-अपचे क्षेत्राची सदनिका बांधून दिली आहे. मूळ ठरलेल्या क्षेत्रापेक्षा 215.94 चौरस फूट इतक्या क्षेत्राची करारात ठरलेप्रमाणे रुपये 1050/- प्रति फूट दराने होणारी रक्कम रुपये 2,26,737/- इतकी रक्कम तक्रारदारांनी भागविणे क्रमप्राप्त आहे. तक्रारदारांना सदनिकेचा कब्जा जानेवारी 2006 मध्ये दिलेला आहे व सदर तारखेपासून येणे बाकी रक्कमेवर द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज मिळणे जरुरीचे आहे. (7) सामनेवाला पुढे सांगतात, तक्रारदारांनी तोंडी सुचविल्याप्रमाणे वास्तुशास्त्रातील नियमानुसार बांधकामात बदल केले आहेत. त्यावेळेस तसेच, कब्जा घेताना तक्रारदारांनी याबाबत कोणताही वाद उपस्थित केलेला नाही. ओपन टेरेसच्या जागेत तक्रारदारांनी किचन केलेले आहे. सदनिकेची पाहणी करुन तक्रारदारांनी खात्री केल्यानंतरच त्यांनी कब्जा घेतलेला आहे. भाडयापोटी होणारी दि.01.04.2004 ते दि.31.11.2005 अखेर एकूण रक्कम रुपये 20,000/- तक्रारदारांना रोखीने अदा केली आहे. ती रक्कम स्विकारुन तक्रारदार हे त्यांच्या कुटुंबियासहीत ऑगस्ट 2004 ते ऑगस्ट 2005 अखेर कोकणात रहात होते. लिफटची डिपॉझिट तक्रारदारांकडून स्विकारलेली नाही. मूळ ठरलेल्या मोबदल्यापोटी रक्कम रुपये 10,000/- तक्रारदारांकडून येणे आहे. तसेच, जादा क्षेत्राची रक्कम रुपये 2,26,737/- व्याजासह येणे आहे. तक्रारदारांनी त्यांच्या अर्जामध्ये रक्कम रुपये 50,000/- च्या बिगरसहीच्या पावत्या हजर केलेल्या आहेत, त्या खोटया आहेत. दि.30.05.2004, दि.10.07.2004, दि.24.12.2004, दि.23.04.2005, दि.27.05.2005, दि.26.06.2005, दि.18.08.2005 या पावतींवरील रक्कम रुपये 2,80,000/- तक्रारदारांच्याकडून मिळालेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेकडून बांधकाम परिपुर्ती प्रमाणपत्र करुन देणेची कार्यवाही सुरु झालेली आहे. मात्र भोगवटा प्रमाणपत्र उपलब्ध झालेले नाही. बांधकाम परिपुर्ती प्रमाणपत्र मिळालेनंतर इमारतीचे घोषणापत्र करणार आहे. तक्रारदारांची येणे रककम भागवून खरेदीपत्र पूर्ण करुन घेणेचे आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासहक नामंजूर करणेत यावी. तसेच, तक्रारदाराकडून येणे रक्कम रुपये 10000/- अधिक जादा क्षेत्राच्या खर्चापोटी रुपये 2,26,737/- द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे व्याज देणेचा आदेश व्हावा व नुकसान भरपाई रुपये 15,000/- देणेचा आदेश व्हावा. (8) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ दावा मिळकतीचा नकाशा, बांधकाम प्रमाणपत्र च्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (9) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकलेला आहे. तसेच, उपलब्ध कागदपत्राचे अवलोकन केले आहे. प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या करारपत्राचे अवलोकन केले असता तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे श्री समर्थ संकुल येथे निवासी संकुल येथेल निवासी सदनिका क्र.टी-4 याबाबतचा करार तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेला आहे व करारापोटी रुपये 2,90000/- इतका मोबदला ठरलेला आहे. प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला बांधकाम व्यावसाईक यांनी दि.20.05.2004 रोजी रक्कम रुपये 1,00,000/- इतकी स्विकारली असल्याचे पावती दिली आहे. दि.10.07.2004 रोजी रक्कम रुपये 50,000/- स्विकारली असलेबाबत पावती, दि.25.06.2005 रोजी रक्कम रुपये 25000/-, दि.18.08.2005 रोजी रुपये 20,000/- स्विकारलेची पावती आहे. त्याशिवाय तक्रारदारांनी रक्कम रुपये 25,000/- च्या को-या कागदावरती तसेच, रुपये 50,000/- च्या तीन को-या कागदावरती सदर रक्कमेचा उल्लेख केला आहे. परंतु, सदर को-या कागदावरती रक्कमेव्यतिरिक्त कोणताही उल्लेख नाही. तसेच, को-या कागदावरती कोणाच्याही सहया नाहीत. त्यामुळे सदरच्या रक्कमा सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी स्विकारलेचे सिध्द होत नाही. याचा विचार करता मोबदल्यापोटी रक्कम रुपये 10,000/- तक्रारदार हे सामनेवाला यांना देय लागतात या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) प्रस्तुत प्रकरणी बांधकामातील त्रुटीबाबत अहवाल येणेबाबत कोट कमिशनर - अर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स असोसिएन, कोल्हापूर यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणुक केली होती. सदर कोर्ट कमिशनर यांनी त्याप्रमाणे कमिशनचे कामकाज करुन अहवाल सादर केलेला आहे. सदरचा अहवाल पुढीलप्रमाणे :- 1. आर.सी.सी.स्ट्रक्चर स्पेसिफिकेशनप्रमाणे केलेले आहे. 2. 6 इंच व 4 इंच वीट बांधकाम स्पेसिफिकेशनप्रमाणे केलेले आहे. 3. अॅल्युमिनियम स्लायडिंग विंडो लोखंडी ग्रीलसह केलेल्या आहेत. ते स्पेसिफिकेशनप्रमाणे आहे. 4. फरशी - अ) हॉल - 1. स्पेसिफिकेशनमधील व्हाईट मोजॅक टाईल्सच्या ऐवजी प्रत्यक्षात 1 x 1 फूट च्या सिरॅमिक टाईल्स स्कर्टींगसह बसविलेल्या आहेत. 2. हॉलमध्ये अर्ध्या भागामध्ये कोटा टाईल्स बसविलेल्या आहेत. ब) किचन - स्पेसिफिकेशनमधील ग्रे मोजॅक टाईल्सच्या ऐवजी प्रत्यक्षात कोटा टाईल्स बसवलेल्या आहेत. सिरॅमिट स्कर्टींग बसवलेले आहे. क) बेडरुम - स्पेसिफिकेशनप्रमाणे ग्रे मोजॅक ऐवजी प्रत्यक्षात सिरॅमिक टाईल्स स्कर्टिंगसह बसविलेल्या आहेत. ड) दरवाजे - अ) मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा हा टीक वूड पॅनेल दरवाजा आहे. तो स्पेसिफिकेशनप्रमाणे केलेला आहे. ब) आतील बेडरुमचे दरवाजे स्पेसिफिकेशनप्रमाणे केलेले आहेत. 6. प्लंबिंग व इलेक्ट्रीफिकेशन हे स्पेसिफिकेशनप्रमाणे केलेले आहे. 7. आतून व बाहेरुम गिलावा स्पेसिफिकेशनप्रमाणे केलेला आहे. 8. किचन कट्टा - अ) स्पेसिफिकेशनमधील काडाप्पा टॉप ऐवजी प्रत्यक्षात ग्रॅनाईट टॉप बसवलेला आहे व स्टेनलेस स्टील बसवलेले आहे. ब) डॅडो वॉल किचन कटट्यावरती खिडकीपर्यन्त टाईल्स बसवणेत आलेल्या आहेत, त्या स्पेसिफिकेशनप्रमाणे आहेत. 9. वॉश बेसिन स्पेसिफिकेशनप्रमाणे आहे. परंतु, वॉश बेसिनवर आरसा बसवणेत आलेला नाही. 10. विंडो सीलला स्पेसिफिकेशनप्रमाणे काडाप्पा बसवणेत आलेला आहे. 11. स्पेसिफिकेशनप्रमाणे मुद्दा स्पष्ट होत नाही. 12. स्पेसिफिकेशनप्रमाणे जिन्याला टाईल्स बसविणेत आलेल्या आहेत. 13. इलेक्ट्रिक सप्लाय - स्पेसिफिकेशनप्रमाणे सर्व इलेक्ट्रिक पॉईंट बसविणेत आलेले आहेत. परंतु, बाथरुममध्ये 15 अॅम्पीअर चा पॉवर पॉईंट दिलेला आढळून येत नाही. 14. ग्लेज्ड् टाईल्स - संडासमध्ये स्पेसिफिकेशनप्रमाणे दीड फूटापर्यन्त ग्लेज्ड् टाईल्सच्या ऐवजी प्रत्यक्षात खिडकीच्या सीलपर्यन्त (4 फूट) बसविणेत आलेल्या आहे. बाथरुममध्ये विंडो सीलच्या (4 फूट) ऐवजी लेंटल पर्यन्त (7 फूट) ग्लेज्ड टाईल्स बसवणत आलेल्या आहेत. 15. स्पेसिफिकेशनप्रमाणे लॉफ्ट स्लॅब दिलेले आहेत. 16. अंतर्गत व बाहेरील रंगकाम स्पेसिफिकेशनप्रमाणे केलेले आहे. 17. स्पेसिफिकेशनप्रमाणे आहे. 18. स्पेसिफिकेशनप्रमाणे आहे. (11) वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारीत उल्लेख केलेल्या सदनिकेचा कब्जा जानेवारी 2006 मध्ये दिलेचे दिसून येते व तक्रारदारांची तक्रार दि.25.08.2008 रोजी दाखल केलेची दिसून येते. सदनिकेचा कब्जा घेतलेनंतर दोन वर्षाहून अधिक काळानंतर सदनिकेच्या त्रुटीबाबत तसेच, भाडे रक्कमेबाबत तक्रारदारांनी तक्रार दाखल केली आहे. ग्राहक संक्षरण कायदा, 24 (ए) यातील तरतुदीचा विचार करता याबाबतची मागणी मुदत बाहय झालेली आहे. उपरोक्त कोर्ट कमिशन अहवालाचे अवलोकन केले असता करारात ठरलेप्रमाणे जादा क्षेत्राची सदनिका तक्रारदारांना दिलेची दिसून येत आहे. परंत, त्या अनुषंगाने तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये कोणताही करार झालेचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदारांनी मागणी केलेली दाद ही कौंटर क्लेम होत आहे व अशी मागणी तक्रारदरांना करता येणार नाही. परंतु, न्यायाच्या दृष्टीकोनातून तक्रारदारांनी मोबदल्याची उर्वरित रक्कम रुपये 10,000/- सामनेवाला क्र.1 बांधकाम व्यावसाक यांना द्यावी व बांधकाम व्यावसायिक यांनी बांधकाम पूर्ततेचा दाखला घेवून डीड ऑफ डिक्लेरेशन करुन द्यावे वतक्रारदारांना करारात नमूद केलेल्या सदनिक नं.टी-4 चे नोंद खरेदीपत्र करुन द्यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेवून हे मंचखालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रादारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला क्र.1 बांधकाम व्यावसायिक यांनी बांधकाम पूर्ततेचा दाखला घेवून डिड ऑफ डिक्लेरेशन करावे व करारात उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदारांकडून मोबदल्याची उर्वरित रक्कम रुपये 10,000/- स्विकारुनसदनिका नं. टी-4 चे नोंद खरेदीपत्र करुन द्यावे. 3. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |