(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदारांनी ता. 22/12/2012 रोजी सामनेवाले नं. 1 यांचेकडुन सामनेवाले नं. 2 यांनी उत्पादित केलेला भ्रमणध्वनी रक्कम रु. 3,900/- किमतीचा विकत घेतली.
2. तक्रारदारांचा नोकीया आशा 200 हा भ्रमणध्वनी ता. 23/09/2013 रोजी बंद झाला. तक्रारदारांनी नोकीया सर्व्हिस सेंटर ‘इलीट केअर मुलुंड’ यांचे कडे दुरूस्तीसाठी दिला. त्यांनी मोबाईल चालू करुन दिला तथापी जॉबशीटची झेरॉक्स प्रत उपलब्ध होवू शकली नाही. तक्रारदारांचा मोबाईल ता. 23/09/2013 रोजी रात्री पुन्हा बंद झाला.
3. तक्रारदारांनी ता. 24/09/2013 मोबाईल दुरूस्तीसाठी दिला. इलीट केअर यांनी भ्रमणध्वनीतील सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन त्यांचेकडे दुरूस्तीसाठी दिला. सामनेवाले यांचे सर्व्हिस सेंटर कडुन मोबाईलची दुरूस्ती करण्यात आली. तथापी त्याच रात्री पुन्हा बंद पडला.
4. तक्रारदारांनी ता. 27/09/2013 रोजी मोबाईल दुरूस्तीसाठी इलिट केअर यांचेकडे दिला. त्यांनी मोबाईलची दुरूस्ती बाहेरून केल्यामुळे रक्कम रु. 1,200/- दुरूस्ती चार्जेसची आकारणी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचा मोबाईल वॉरंटी कालावधीत नादुरुस्त झालेला असून अन्य कोणत्याही रिपेरिंग सेंटर मध्ये दुरूस्तीसाठी दिलेला नाही.
5. तक्रारदारांनी त्यानंतर सामनेवाले नं. 2 कंपनीच्या Consumer Care यांचेकडे फोन केला. त्यांचे सुचनेनुसार मोबाईल ता. 14/10/2013 रोजी रुडंट टेलीफोन सर्व्हिस सेंटर यांचेकडे दुरूस्तीसाठी दिला असता मोबाईल ‘Tampered’ झाल्यामुळे दुरूस्ती होवु शकत नाही असे सांगितले.
6. तक्रारदारांनी सामनेवाले नं. 2 यांचेकडे या संदर्भात अनेकवेळा तक्रार केली असता ता. 17/12/2013 रोजी ठाण्यातील सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल जमा करण्याची सूचना फोनवर देण्यात आली. तक्रारदारांनी लेखी सूचना देण्याची विनंती केली असता सामनेवाले नं. 2 यांनी नकार दिला. त्यामुळे तक्रारदारांनी मोबाईल दुरूस्तीसाठी दिला नाही.
7. सामनेवाले 1 व 2 यांना मंचाची नोटिस प्राप्त होवुनही ते गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फा चालविण्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला.
8. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे हाच त्यांचा पुरावा, लेखी युक्तिवाद तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरर्सिस दाखल केली. तक्रारीतील उपलब्ध कागदपत्रांचे सखोल वाचन करुन मंच खालीलप्रमाणे निष्कर्ष काढत आहे.
9. कारण मिमांसा
अ) तक्रारदारांनी सामनेवाले नं. 1 यांचेकडून रक्कम रु. 3,900/- एवढया किमतीचा “NOKIA ASHA GRAPHITE” ता. 22/2/2012 रोजी विकत घेतल्याबाबतच्या “Retail Invoice” ची प्रत मंचात दाखल आहे.
ब) तक्रारदारांचा मोबाईल सामनेवाले नं. 2 यांचे आधीकृत सर्व्हिस सेंटर “ELITE CARE मुलुंड येथे दुरूस्तीसाठी दिला असल्याबाबतची पावती व सर्व्हिस जॉबशीट मंचात दाखल आहे. जॉबशीट मध्ये “Handset returned, unrepaired, Because handset was found Tampered / physically damaged / Breakage” या प्रमाणे नमुद केले आहे. सदर जॉबशीट व पावतीची प्रत मंचात दाखल आहे.
क) तक्रारदारांच्या मोबाईल “RIDENT TELECON SERVICES” यांचे कडे ता. 14/10/2013 रोजी दुरूस्तीसाठी दिल्याबाबतच्या जॉबशीटची प्रत मंचात दाख ल आहे. सदर जॉबशीट मध्ये नमुद केल्यानुसार तक्रारदारांच्या मोबाईलमध्ये अनाधिकृत दुरूस्ती केल्याचे दिसून येते. त्यामुळे मोबाईलची दुरूस्ती होवु शकत नाही त्यामुळे तक्रारदारांच्या मोबाईलची दुरुस्तीचा वॉरंटीमध्ये समावेश करता येत नाही.
ड) तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचा मोबाईल विकत घेतल्यानंतर 1 वर्षाच्या आधीच नादुरूस्त झाला असून वॉरंटी कालावधी उपलब्ध असल्यामुळे मोबाईल दुरूस्तीसाठी अन्य ठिकाणी दिला नाही.
सामनेवाले यांनी दुरुस्ती चार्जेसची आकारणी बेकायदेशिरित्या व चुकीची केली आहे.
इ) सामनेवाले यांचे तर्फे आक्षेप दाख ल नाही. तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. तक्रारदारांच्या मोबाईल करीता वॉरंटी कालावधी उपलब्ध असल्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले यांचे अधिकृत सर्विस सेंटर यांचेकडे सदर मोबाईल दुरूस्त केला आहे. सामनेवाले 2 सदर प्रकरणात हजर नाहीत. तक्रारदारांचा मोबाईल अधिकृत सेंटर व्यतिरिक्त इतर ठिकाणी दुरूस्तीसाठी देवून मोबाईल टँपर झाल्याबाबतचा अहवाल मंचात दाखल नाही. सदर बाब पुराव्यानिशी सिध्द न झाल्यामुळे ग्राह्य धरता येत नाही असे मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी मंचात हजर होवुन तक्रारदारांचा मोबाईल टँपर झाल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द करणे आवश्यक होते.
उ) वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता सामनेवाले 2 यांनी तक्रारदारांचा मोबाईल वॉरंटी कालावधीत नादुरूस्त झालेला असल्यामुळे त्यांची योग्य ती दुरूस्ती होणेसाठी चार्जेसची आकारणी न करता करून देणे न्यायोचित आहे असे मंचाचे मत आहे.
10. उपरोक्त चर्चेवरून तसेच निष्कर्षानुसार, खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्र. 274/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले नं. 2 यांनी तक्रारदारांचा मोबाईल वॉरंटी कालावधीत नादुरूस्त होवूनही चार्जेसची आकारणी न करता दुरूस्ती न करुन त्रृटिची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले 1 विरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
4) सामनेवाले नं. 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांच्या मोबाईलची ता.30/9/2016 पर्यंत ‘योग्य ती दुरूस्ती कोणत्याही चार्जेसची आकारणी न करता करुन द्यावी.
5) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.1,000/- (रु. एक हजार फक्त) ता.30/09/2016 पर्यंत द्यावी. विहित मुदतीत अदा न केल्यास ता.01/10/2016 पासुन आदेशाच्या पुर्ततेपर्यंत 9% व्याजदारासहीत द्यावी.
5) आदेशाच्या प्रती उभय पक्षकाराना विनाविलंब, विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.
6) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम अंतर्गत विनियम 2005 मधील विनियम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.
ठिकाण – ठाणे.
दिनांक – 01/07/2016