::: न्यायनिर्णय :::
मंचाचे निर्णयान्वये उमेश वि. जावळीकर, मा. अध्यक्ष
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. १ यांचेकडुन गॅस ची सेवा घेण्याबाबत करार केला आहे. गैरअर्जदार क्र. २ व ३ या कंपनीचे गैरअर्जदार क्र. १ हे अधिकृत विक्रेता आहे. दिनांक २६.०३.२०१५ रोजी अर्जदाराचा ग्राहक क्र. २९४७ अन्वये संपलेला गॅस परत करुन नविन गॅस सिलेंडर ची नोंदणी करण्याकरीता गैरअर्जदार क्र. १ यांचेकडे गेले असता गैरअर्जदार क्र. १ यांनी नोंदणी न करुन घेता अर्जदाराचे गॅस कनेक्शन बंद झाले आहे असे सांगीतले त्यानंतर अर्जदाराने दिनांक ०७.०४.२०१५ व दिनांक ०८.०५.२०१५ रोजी गॅस कनेक्शन सुरु करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे गैरअर्जदार क्र. १ यांना देण्यास गेली असता गैरअर्जदार क्र. १ यांनी कागदपत्रे न स्विकारुन गॅस सिंलेंडर दिले नाही. अर्जदाराने गॅस सिलेंडरभरण्याचे अतिरीक्त शुल्क रक्कम रु. ७७५/- घेवुन देखील व अर्जदारास ऑनलाईन नोंदणी न करुन देवुन व कागदपत्रे देखील न देवुन सेवेत न्युनता व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याने अर्जदाराने वकिलामार्फत दिनांक २७.०५.२०१५ रोजी नोटीस पाठवुन सेवा पुरविण्याचे व रक्कम रु. १०,०००/- मागणी केली. सदर नोटीस ला गैरअर्जदार क्र. १ यांनी दिनांक २६.०६.२०१५ रोजी वकीलामार्फत प्रतीउत्तर पाठवुन सेवा सुविधा पुरविण्यास कसुर न केल्याने नुकसान भरपाई देण्यास पात्र नाही असे कळविले. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांच्या नियमाप्रमाणे सर्व बाबींची पुर्तता करुन गॅस सिलेंडर भरण्याचे शुल्क व कागदपत्रे जमा करण्यास जावुन देखील गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी अर्जदारास सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केल्याने गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांना अर्जदारास गॅस ची सुविधा तात्काळ देण्यात यावी, रक्कम रु. ७७५/- स्विकारुन ऑनलाईन नोंदणीव्दारे तात्काळ गॅस सिलेंडर देण्यात यावे व नुकसान भरपाईसह तक्रार मंजुर करावी अशी विनंती अर्जदाराने केली आहे.
३. गैरअर्जदार क्र. १ यांनी तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन अर्जदार हे गैरअर्जदार क्र. १ यांचे ग्राहक असुन अर्जदाराचे राहण्याचे ठिकाण गैरअर्जदार क्र. १ यांचे एजंसीचे ठिकाणापासुन १५ कि.मी. पेक्षा अधिक अंतर असल्याने कॅश अॅन्ड अंडरटेकींग फार्म भरुन १५ कि.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या ग्राहकांना स्वत: गॅस सिलेंडर घेवुन जावे लागतो, त्याप्रमाणे अर्जदाराने सदर फार्म भरुन दिला असुन कंपनीच्या नियमाप्रमाणे ६ महिने पर्यंत गॅस सिलेंडर मिळणेसाठी ऑनलाईन क्र. लावला नाही तर कंपनीच्या संगणकीय प्रणालीमध्ये ग्राहकाचा क्रमांक स्थगीत होतो. सदर क्रमांक सुरु करण्यासाठी कागदपत्रे जाम केल्यास पुन्हा सुरु केला जातो. परंतु अर्जदाराने दिनांक ०६.०५.२०१४ पासुन ऑनलाईन क्रमांक न लावुन गैरअर्जदार क्र. १ कडे गॅस सिलेंडर घेण्यासाठी आले नाही. गैरअर्जदार क्र. १ यांनी दिनांक ०९.०६.२०१५ रोजी अर्जदारांची नोटीस प्राप्त झाल्यानंतर अर्जदार यांचे घरी भरलेले गॅस सिलेंडर के.वाय.सी. अर्ज, मॅन्डेटरी तपासणी अर्ज, गैरअर्जदार क्र.१ यांचे सुपरवायजर घेवुन गेले होते. परंतु अर्जदाराने भरलेले गॅस सिलेंडर परत करुन कागदपत्रावर सही / अंगठा केला नाही गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदारांनी कागदपत्रांची पुर्तता केल्यास गैरअर्जदार क्र. १ तात्काळ अर्जदाराचा गॅस पुरवठा त्वरीत सुरु करुन देईल. सबब अर्जदाराची तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती गैरअर्जदार क्र. १ यांनी केली आहे.
४. गैरअर्जदार क्र. २ व ३ यांना मंचाची नोटीस मिळून देखील हजर न राहिल्याने दिनांक ०७.०३.२०१७ रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले, सदर आदेश आज रोजी अबाधित आहे.
४. अर्जदाराची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद व दस्तावेज तसेच गैरअर्जदार क्रमांक एक चे लेखी उत्तर, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद, दस्तावेज तसेच दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात आले.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी अर्जदारास गॅस पुरवठा कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब अर्जदार
सिद्ध करतात काय ? होय
२. गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुकसान भरपाई अदा करण्यास
पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत - :
५. गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदारास गॅस सिलेंडरची सुविधा केवळ १५ कि.मी. पर्यंत देण्यातयेईल व त्यापुढील सुविधेसाठी अर्जदारास स्वत: येवुन गॅस सिलेंडर घेवुन जावा लागेल तसेच गॅस सिलेंडरची ऑनलाईन नोंदणी ६ महिन्या पर्यंत न केल्यास सेवा खंडीत होवुन पुन्हा कागदपत्रे दिल्यास सेवा सुरु करण्यात येईल या संबंधीची कोणतीही कागदपत्रे मंचात दाखल केलेली नाही. गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदाराचे घर १५ कि.मी. पेक्षा अधिक असल्याबाबत कोणताही पुरावा मंचात दाखल केला नसल्याने गैरअर्जदार क्र. १ यांचा युक्तीवाद न्याय्य व उचित नाही हि बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदारास दिनांक २६.०३.२०१२ पासुन आज पर्यंत जिवनाआवश्यक वस्तुची सेवा सुविधा पुरविण्यास कसुर करुन अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याची बाब सिध्द झाली आहे. गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदारास दिनांक २६.०३.२०१५ पासुन गॅस सिलेंडर न दिल्याने अर्जदारास आर्थिक नुकसान होवुन प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.१ यांनी अर्जदाराकडुन रक्कम रु. १,८००/- गॅस सिलेंडर भरण्याकरीता अतिरीक्त घेतल्याची बाब गैरअर्जदार क्र. १ यांनी नाकबुल न केल्याने तसेच वकिला मार्फत पाठविलेली नोटीस कागदोपत्री दाखल असल्याने अर्जदाराची नुकसान भरपाई ची मागणी उचित आहे. हि बाब सिध्द होते, असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. ३ बाबत :
६. सबब मुद्दा क्र. १ व २ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र.१५५/२०१५ अंशत: मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे अर्जदारास गॅस पुरवठा
कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे अर्जदारास गॅस पुरवठा
कराराप्रमाणे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब जाहीर करण्यात
येते.
४. गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे अर्जदाराकडुन रक्कम
रु. ७७५/- व नियमानुसार ती कागदपत्रे या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३०
दिवसांत स्विकारुन त्यापुढे अर्जदारास नियमीतपणे गॅस सिलेंडर नोंदणी
केल्यानंतर घरपोच तात्काळ देण्यात यावा.
५. गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे अर्जदारास शारिरीक,
मानसिक, आर्थिक, तक्रार खर्च व नुकसान भरपाई पोटी एकत्रित रक्कम रु.
५०,०००/- या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३० दिवसात अदा करावे.
६. गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे प्रत्येक ग्राहकास गॅस
सिलेंडर नोंदणी केल्यानंतर तात्काळ घरपोच देण्याचे निर्देश ग्राहक संरक्षण
अधिनीयम १९८६ चे कलम १४ (फ) अन्वये देण्यात येतात.
७. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)