::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सदस्या कल्पना जांगडे (कुटे))
1. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून गैरअर्जदार क्र. १ ही मेसर्स मटरीक्स इन्फ्रा केअर इंडिया प्रा. ली. या नावाने चंद्रपूर जिल्ह्यात प्लॉट व त्यावर घर बांधून देण्याचा व्यवसाय करतात. गैरअर्जदारांनी मौजा दाताळा खसरा क्र. १६८, आराजी ०.७४ आणि खसरा क्र. १६९ आराजी ०.१९ आराजी ०.९३ जागेचे प्लॉट पाडून त्यावर घर/flat बांधण्याची योजना मार्च एप्रिल २०१२ मध्ये सुरु केली. अर्जदाराने त्यावर विश्वास ठेऊन फ्लट क्र. टी-३WA-१०२ हा बुक केला व गैरअर्जदाराला दि २.३.२०१२ रोजी रु. ११,०००/- व दि.२३.३.२०१२ रोजी रु. २,०६,५००/-असे एकूण रु.२,१७,५००/- दिले. . गैरअर्जदार क्र. २ ने लेखी करार रु. १००/- च्या स्टंप पेपरवर दि. १५.०३.२०१२ रोजी करुन करारापासून २ वर्षाच्या आत फ्लट बांधून व विक्री करुन देतो असे सांगितले. परंतु त्यानंतर गैरअर्जदारांकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारांना दिलेली अग्रिम रक्कम रु. २,१७,५००/- परत देण्याची मागणी नोटीस द्वारे केली. परंतु गैरअर्जदारांनी त्यावर काहीही उत्तर दिले नाही. सबब, अर्जदाराने सदर तक्रार मंचासमोर दाखल केली आहे.
३ . अर्जदाराने तक्रारीत मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्र. १ ते ७ ह्यांनी अर्जदारासोबत अनुचित पद्धतीचा व्यवहार केला आहे असे घोषित करावे तसेच गैरअर्जदार क्र.१ ते ७ ह्यांनी स्वतंत्र व संयुक्तपणे अर्जदाराकडून घेतलेली रक्कम रु. २,१७,५००/-अर्जदाराला द्यावी. तसेच त्यावर दि. १८.०३.२०१३ पासून १२ टक्के व्याज अर्जदाराला द्यावे. शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु २५,०००/-व तक्रारीचा खर्च रु. १०,०००/- देण्यात यावे.
४ . वि.प.क्र. १ व २ यांनी लेखी म्हणणे दाखल करुन प्राथमिक आक्षेप घेतला कि, अर्जदाराने शेतमालक यांना पक्ष केलेले नाही. जमीन मालक श्रीमती शोभा शालिग्राम सदाफळे व शिरीष सदाफळे हे वरील स्कीम मधील २५ टक्के भागीदार असून त्यांच्या स्वमालकीच्या जमिनीवर बहुमजली इमारत उभारून ग्राहकांना विकण्याकरिता गैरअर्जदार क्र. २ यांना अधिकृत अधिकार व परवानगी दिली होती. त्याप्रकारचा मौखिक करारनामा दि ०८.०१.२०११ ला झाला होता त्या करारानुसार जमिनीची किंमत रु. १,७८,००,०००/- ठरविण्यात आली होती व जमीन मालक यांना २५ टक्के नफ्यातील भागीदारी देण्याचे ठरले. परतू त्यानंतर जमीन मालक ह्यांनी संपूर्ण प्रोजेक्ट स्वतः करण्याची इच्छा जाहीर केल्यामुळे डेव्हलपर्स, गैरअर्जदार क्र. २ आणि जमीन मालक याच्यात संपूर्ण ग्राहकांच्या साक्षीने सिटी पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे तडजोड होऊन जमीन मालक ह्यांना संपूर्ण प्रोजेक्ट देण्याचे अटी व शर्तीनुसार ठरले. जमीन मालकाने कराराप्रमाणे सुखसुविधा व अतिरिक्त रक्कम न घेता प्रोजेक्ट पूर्ण करणे, जे ग्राहक फ्लट वा दुकान घेण्यास समर्थ नसतील त्यांना रक्कम परत करणे, ह्या अटी व शर्ती होत्या त्या प्रमाणे जमीन मालकाने रक्कम परत न केल्यामुळे ग्राहकांनी मंचात तक्रारी दाखल केल्या. गैरअर्जदार ह्यांनी मौखिक करारनुसार रु. ५५,००,०००/- किंमतीच्या मोबदल्यात ग्राहकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन व्यक्तिना ८० लाख रु. किंमतीचे मोबदल्यात येथील जमीन नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये सुपूर्द केली आहे. अर्जदार यांनी सौ. शोभा शालीकराम सदाफळे जमीन मालक यांचेसोबत दि.१.२.२०१४ रोजी संदर्भीय फ्लट करता केलेल्या खरेदीचा करार हा ग्राहक संघटना जमीन मालक व डेवलपर्स यांच्यात झालेल्या कराराची पुर्तता म्हणूनच करून दिलेला करारनामा हा अर्जदार व जमीन मालक यांच्यातील नवीन करार हे सिद्ध करण्यास पुरेसा आहे की ग्राहक संघटना जमीन मालक व डेवलपर्स यांच्यात तडजोड झाली होती गैरअर्जदार क्र. १ ने आपल्या मार्केटिंग प्रमोशन करता मिळालेल्या ५० लाखापैकी १५ लाख रुपये जमीन मालकाला अतिरिक्त दिली जेणेकरून ग्राहकांना आधीच्या ठरलेल्या दरात बंगलो फ्लट मिळावेत यासाठी गैरअर्जदार क्रमांक २ ने आर्थिक भुर्दंड सहन केला सबब अर्जदाराला गैरअर्जदारांमुळे शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला हे म्हणणे अनुचित व न्यायसंगत नसल्यामुळे अर्ज नामंजूर करण्यात यावा.
५. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, तक्रारअर्ज व शपथपत्रालाच लेखी युक्तीवाद स्वीकारीत आहे अशी पुर्सीस दाखल गैरअर्जदार क्र.१व२यांचे लेखी म्हणणे, दस्तावेज आणि शपथपत्र व लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुर्सीस दाखल तसेच तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.१व२यांचे तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकालकामी खालील मुद्दे तयार करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष
(१) गैरअर्जदार क्र. १ ते ७ ह्यांनी अर्जदारास सेवासुविधा पुरविण्यात
कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिध्द करतात काय ? होय
(२) गैरअर्जदार क्र.१ ते ७ तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई
देण्यास पाञ आहेत काय ? होय
(३) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ व २ बाबतः-
१. अर्जदाराने गैरअर्जदारांच्याकडे मौजा दाताळा तालुका व जिल्हा चंद्रपूर येथील खसरा क्रमांक १६८,१६९ मधील प्रस्तावित सदनिकेतील पहिल्या माळ्यावर सदनिका क्रमांक टी-३-WA-१०२ रुपये १०,८७,५००/- किंमतीत बुक केला त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदारांना दि २.३.२०१२ रोजी रु. ११,०००/- व दि. २३.३.२०१२ रोजी रु. २,०६,५००/-असे एकूण रु.२,१७,५००/- दिले व त्यानुसार गैरअर्जदाराने अर्जदाराला पावत्या दिल्या सदर पावत्या अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या आहेत व त्यावर गैरअर्जदाराची स्वाक्षरी असून सदर सदनिका बद्दल गैरअर्जदाराने अर्जदाराला करारनामा करून दिला. करारनामा तक्रारीत दाखल असून त्यावरही अर्जदार व गैरअर्जदाराची स्वाक्षरी आहे वरील दस्तावेजावरून असे स्पष्ट होत आहे की अर्जदाराने गैरअर्जदार ह्यांना उपरोक्त सदनिकेसाठी रुपये. २,१७,५००/-दिले व ती रक्कम गैरअर्जदारांनी स्वीकारलेली आहे ही बाब सिद्ध होते. प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी त्यांच्या उत्तरात अर्जदाराने सदर प्रकरणात जमीन मालकाला पक्ष केलेले नाही असा आक्षेप घेतला आहे. तसेच गैरअर्जदार यांनी जमीन मालकासोबत झालेला करार तक्रारीत दाखल केला आहे. परंतु अर्जदार व गैरअर्जदार ह्यांच्यात झालेल्या दि.१५.०३.२०१२ च्या कराराबद्दल कोणतीही बाब त्यात नमूद नाही.गैरअर्जदारांच्या सोबत झालेला दि.१५.०३.२०१२ चा करार रद्द झाल्याची बाब तक्रारीत कुठेही नमूद नाही. दि. १५.०३.२०१२ चा करार रद्द झाल्याशिवाय गैरअर्जदार क्र. १ व २ ह्यांनी दाखल केलेला अर्जदाराचा जमीन मालकाशी केलेला करार कायदेशीर ठरत नाही. याउलट अर्जदाराने तक्रारीत त्यांनी गैरअर्जदाराला करारापोटी रुपये. २,१७,५००/- दिले याबद्दलच्या पावत्या व करारनामा तक्रारीत दाखल केला. सदर करारनाम्यात पान नंबर ४ वर अर्जदाराने गैरअर्जदाराना सदर रक्कम दिली, तसेच पुढील रक्कम अर्जदार गैरअर्जदाराला बांधकामाच्या प्रगती प्रमाणे देईल व त्यानंतर सदर सदनिकेचा ताबा गैरअर्जदार, अर्जदाराला देणार असे नमूद केलेले असून त्यावर गैरअर्जदाराची स्वाक्षरी आहे असे असून सुद्धा गैरअर्जदारांनी अर्जदाराकडून रक्कम स्वीकारूनही नमूद वेळेत काम सुरू केले नाही, किंवा त्याबद्दल अर्जदाराला सूचनाही केली नाही. अर्जदाराकडून करारानुसार रक्कम स्वीकारून सदनिकेची विक्री गैरअर्जदारांनी, अर्जदाराला करून दिली नाही तसेच उपरोक्त रक्कमही परत केली नाही ही बाब दाखल दस्तावेजावरून सिद्ध होते. याशिवाय गैरअर्जदार क्रमांक ३ ते ७ ह्यांनी प्रकरणात उपस्थित राहून आपले बचावापुष्ठ्यर्थ अर्जदाराचे तक्रारीतील कथन खोडून काढले नाही त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक ३ ते ७ हे गैरअर्जदार क्रमांक १ यांचे संचालक आहेत हे अर्जदाराचे कथन ग्राह्य धरण्यायोग्य आहे. मंचाचे मते गैरअर्जदार क्रमांक १ते ७ यांनी रक्कम स्वीकारूनहि अर्जदाराला सदनिकेची विक्री करून ताबा दिला नाही तसेच उपरोक्त रक्कमही परत केली नाही, ही अर्जदाराप्रती अवलंबलेली अनुचित व्यापारी पद्धती असून सेवेतील न्यूनता आहे हे सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्रमांक १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदवीण्यात येते.
६. गैरअर्जदार क्रमांक ३ ते ७ यांना वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस देऊनसुद्धा ते प्रकरणात उपस्थित न रहिल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक ३ ते ७ विरुद्ध सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक २४.७.१७ रोजी करण्यात आला. सदर आदेश आज रोजी अबाधित आहे.
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
७. मुद्दा क्रं. १ व २ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) तक्रार क्र. १६६/२०१५ अंशत मान्य करण्यात येते.
(२) गैरअर्जदार क्र. १ ते ७ यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या तक्रारकर्त्यास सेवा सुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
(३) गैरअर्जदार क्र.१ते ७ यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या रक्कम रु. २,१७,५००/- अर्जदारास दि.०१.०९.२०१५ पासून अदा करेपर्यत द.सा.द.शे. ९ टक्के व्याजासह आदेश प्राप्त दिनांकापासून ३०दिवसांत अदा करावी.
. .
(४) गैरअर्जदार १ ते ७ यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक ञास व तक्रार खर्चापोटी एकत्रीत रक्कम रु ३०,०००/- तक्रारकर्त्यास, आदेश प्राप्त दिनांकापासून ३०दिवसांत द्यावे.
(५) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
अधि. कल्पना जांगडे (कुटे) अधि. किर्ती वैदय (गाडगिळ) श्री. उमेश वि. जावळीकर
मा.सदस्या मा.सदस्या मा. अध्यक्ष