Dated the 19 Nov 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार वर नमुद पत्यावर रहातात सामनेवाले हे इमारत बांधकामाचा व्यवसाय करीत असुन सामनेवाले यांचे कार्यालय तक्रारीच्या शिर्षकामध्ये नमुद पत्यावर आहे. तसेच श्री.सुदर्शन पांडूरंग जाधव हे सामनेवाले मे.मंगलमुर्ती होम्स याचे प्रोप्रायटर आहेत.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे....
2. तक्रारदार म्हणतात सामनेवाले यांनी मंगलमुर्ती होम्सची भव्य घरकुल योजने अंतर्गत बांधण्यात येणा-या चाळीसाठी मौजे-टिटवाळा येथील जमिनीची मिळकत श्री.कमलाकर अंबो गायकर व श्री.भास्कर अंबो गायकर यांच्याकडून कायमस्वरुपी विकत घेतली असुन सामनेवाले हे सदर मिळकतीचे मालक आहेत. सामनेवाले यांनी सदर भुखंडावर भव्य घरकुल योजने अंतर्गत मंगलमुर्ती होम्स या नांवाने घरकुल योजना आखली व मंगलमुर्ती होम्सच्या वर नमुद पत्यावर सामनेवाले यांचेकडून बांधण्यात येणा-या चाळी मधील सदनिका तक्रारदार यांना तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे मोबदल्याच्या किंमतीत विकण्याचे ठरविले. तक्रारदार यांनी सदर चाळीमध्ये बांधण्यात येणा-या व तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे आरक्षीत केलेल्या सदर सदनिकेबाबत सामनेवाले यांना एकूण रक्कम रु.1,50,000/- अदा केली, त्याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी पावत्याही दिलेल्या आहेत. तसेच तक्रारदार यांनी त्याबाबतचा खातेउतारा सादर केलेला आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून एकूण मोबदल्याच्या रकमेपैंकी मोठया प्रमाणात रक्कम स्विकारुन सदर चाळीमधील तक्रारदार यांना विक्री केलेल्या सदनिकेचा तक्रारदार यांच्याशी रितसर व कायदेशीर करारनामा स्वाक्षरित केला नाही,अथवा नोंदवूनही दिला नाही. तक्रारदार यांनी याबाबत सामनेवाले यांचेकडे वारंवार विचारणा केल्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याशी ता.14.08.2011 रोजी समझोता करार स्वाक्षरीत केला, व सदर समझोता करार केवळ साक्षांकित करण्यात आला, परंतु अदयापपर्यंत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना, त्यांनी सामनेवाले यांचेकडे आरक्षीत केलेल्या चाळी मधील सदनिकेचा ताबा सदर चाळीचे बांधकाम करुन दिलेले नसल्याने सामनेवाले यांचे विरुध्द तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल करुन सामनेवाले यांचेकडून खालील प्रमाणे मागण्या केल्या आहेत. (अ) तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करावे. (ब) तक्रारदार यांनी, सामनेवाले यांनी सदनिका खरेदीपोटी भरलेली रक्कम व्याजासह सामनेवाले यांनी तक्रारदार यांना 21 टक्के व्याजासह परत करावी, (क) मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- न्यायिक खर्चापोटी रु.25,000/- अशी मागणी केलेली आहे.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे बुक केलेल्या खालील तक्त्यात नमुद केलेल्या सदनिकांचा ताबा लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याचा तपशील खालील प्रमाणे......
अ.क्र. | तक्रार क्रमांक | तक्रारदाराचे नांव | सामनेवाले यांचे नांव | एकूण मोबदला रुपये | तक्रारदाराने सामनेवाले यांना दिलेली रक्कम | सदनिका क्रमांक, इमारत नांव,व एरिया | समझोता करारनाम्याची तारीख | तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्कम |
1. | 157/15 | Mr. Krishna Ishwar Shinde | Mangalmurti Homes Mr. Sudarshan Pandurang Jadhav Titwala (E) 421 605 Dist.Thane | 1,50,000/- | 1,50,000/- | भव्य घरकुल योजना, मंगलमुर्ती होम्सची चाळ, मिळकत मौजे-टिटवाळा, 250 चौरस फुट | ता.14.08.2011 | नुकसानभरपाई रु.1,00,000/- न्यायिक खर्च रु.25,000/- |
4. सामनेवाले यांना जाहिर प्रगटनाव्दारे नोटीस देऊन तसेच कैफीयत दाखल करण्यासाठी संधी देऊन देखील सामनेवाले हे सुनावणीस गैरहजर राहिल्याने सामनेवाले यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदार यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये ते तोंडी युक्तीवाद करणार नसल्याबाबत पुरसिस दिली असुन उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे प्रकरण अंतिम आदेशासाठी नेमण्यात आले.
5. तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मंचाने खालील मुदयांचा तक्रारीच्या निराकणार्थ विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
अ. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून वरील तक्त्यात नमुद
केल्याप्रमाणे सदनिका विक्रीबाबत मोठयाप्रमाणात रक्कम
स्विकारुनही तक्रारदार यांना सदर भुखंडावर इमारत बांधुन
तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे बुक केलेल्या सदनिकेचा
ताबा न दिल्यामुळे तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिली आहे का ?...................होय.
ब. तक्रारदार सामनेवाले यांचेकडून तक्त्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे
सदनिका खरेदीपोटी भरलेली रक्कम अंतिम आदेशामध्ये नमुद केल्याप्रमाणे
व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत का ?....................................................होय.
क. तक्रारदार सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटीची नुकसानभरपाई
व न्यायिक खर्च अंतिम आदेशात नमुद केल्याप्रमाणे मिळण्यास पात्र
आहेत का ?....................................................................................................होय.
ड. तक्रारीत काय आदेश ?.............................................तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
6.कारण मिमांसा
मुददा अ. प्रस्तुत तक्रारीमधील तक्रारदार यांनी मे. मंगलमुर्ती होम्सच्या भव्य घरकुल योजना या स्वस्त घरांच्या विक्री बाबतच्या सामनेवाले यांच्या मौजे टिटवाळा येथे बांधण्यात येणा-या भावी प्रकल्पामधील चाळीमध्ये तक्त्यात नमुद केलेल्या तपशीला प्रमाणे सदनिका आरक्षीत केली, त्याबाबत सामनेवाले व तक्रारदार यांच्यात ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी वरील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे सामनेवाले यांना सदर चाळीमधील सदनिकेबाबत मोबदल्याची संपुर्ण रक्कम अदा केली, सामनेवाले यांनी त्याबाबत तक्रारदार यांना दिलेल्या पावत्या व तक्रारदार यांच्या बँकेचा खातेउतारा तक्रारदार यांनी संबंधीत तक्रारीमध्ये निशाणी-सी-1 वर जोडला आहे. त्यापैंकी रक्कम रु.1,39,000/- धनादेशाव्दारे, व रक्कम रु.11,000/- समझोता करार स्वाक्षरीत करतांना रोख रकमेच्या स्वरुपात सामनेवाले यांना अदा केलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे आरक्षित केलेल्या मंगलमुर्तीच्या चाळीमधील सदर सदनिकेच्या व्यवहारासंदर्भात सामनेवाले यांनी रितसर विक्री करारनामा स्वाक्षरित करुन व नोंदवून देण्याची वेळोवेळी सामनेवाले यांचेकडे मागणी केली, परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्याबाबत सहकार्य न करता केवळ तक्रारदार यांच्याशी सदर चाळीमधील सदनिकेबाबत समझोता करारनामा ता.14.08.2011 रोजी स्वाक्षरीत केला, व सदर करारनामा साक्षांकित करण्यात आला. सदर समझोता करारनाम्यामध्ये मौजे-टिटवाळा,पोट तुकडी तालुका कल्याण, जिल्हा परिषद ठाणे, येथील जमिनीची मिळकत सामनेवाले यांनी श्री.कमलाकर अंबो गायकर व श्री.भास्कर अंबो गायकर यांच्याकडून कायमस्वरुपी विकत घेतलेली असुन सदर मिळकतीची कब्जेवहीवाट मे.मंगलमुर्ती होम्स यांच्याकडे असल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच सामनेवाले व तक्रारदार यांच्यामध्ये सदर मंगलमुर्ती होम्सच्या चाळीमधील आरक्षीत केलेल्या रुमचे क्षेत्रफळ व एकूण मोबदल्याची रक्क्म इत्यादीबाबी वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे नमुद करण्यात आलेल्या आहेत. सदर समझोता करारानुसार सदर मिळकतीवर मे.मंगलमुर्ती होम्स यांनी अन्य कोणाही व्यक्तीबरोबर अन्य कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नसल्याचे सामनेवाले यांनी नमुद केलेले आहे. तसेच सामनेवाले यांनी सदर समझोता करारामध्ये तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे आरक्षीत केलेल्या खोलीचा ताबा सन-2012 पर्यंत देण्याचे लिखीत स्वरुपात मान्य केलेले आहे, असे असुन देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याशी सदर चाळीमधील तक्रारदार यांनी आरक्षित केलेल्या सदनिकेच्या विक्रीच्या व्यवहाराबाबत मोबदल्याची संपुर्ण रक्कम स्विकारुनही सदर चाळीचे बांधकाम करुन तक्रारदार यांना त्यांनी सामनेवाले यांचेकडे आरक्षित केलेल्या खोलीचा ताबा अदयाप दिलेला नाही, तसेच त्याबाबतची कायदेशीर कागदपत्रे, करारनामा इत्यादी देखील तयार करुन स्वाक्षरित करुन दिले नाहीत, व अशा प्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते.
मुद्दा क्र.ब- सामनेवाले यांनी अदयापपर्यंत भव्य घरकुल योजने अंतर्गत बांधण्यात येणा-या चाळीचे बांधकाम सुरु केलेले नाही, व नाहक इतकी वर्षे तक्रारदारांकडून घेतलेली रक्कम सामनेवाले यांचेकडे अडकून राहिली असल्याने तक्रारदार यांना दुसरीकडे घर घेणेही अशक्य झाले व आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले, त्यामुळे तक्रारदार सामनेवाले यांचेकडे वरील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे सदर सदनिका खरेदीपोटी भरलेली संपुर्ण रक्कम सामनेवाले यांचेशी स्वाक्षरित केलेल्या समझोता कराराच्या तारखेपासुन म्हणजेच ता.14.08.2011 पासुन दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजासह सामनेवाले यांचेकडून ता.19.01.2017 पर्यंत परत मिळण्यास पात्र आहेत. ता.19.01.2017 पर्यंत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांनी सामनेवाले यांना अदा केलेली रक्कम रु.1,50,000/- अदा न केल्यास सामनेवाले यांनी सदर रक्कम तक्रारदार यांना ता.14.08.2011 पासुन दरसाल दर शेकडा 15 टक्के व्याजाने परत करावी.
मुद्दा क्र.क- तक्रारीतील तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या भव्य घरकुल योजनेत स्वस्त दरात घरे मिळण्याच्या अपेक्षेने सामनेवाले यांचेकडे त्यांच्या कष्टाचे पैसे गुंतवले, परंतु सामनेवाले यांनी, सदर प्रकल्प पुर्ण केला नाही. रितसर विक्री करारनामे स्वाक्षरित करुन तक्रारदार यांना त्यांच्या संबंधीत सदनिकेचा ताबाही दिला नाही, व अनेकवर्षे सामनेवाले यांचेकडे तक्रारदाराचे पैसे अडकून राहिल्याने तक्रारदार यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागले, तसेच घराच्या वाढत्या किंमतींमुळे अदयाप दुसरीकडे घर घेणेही अशक्य झाल्याने तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला, व वकीलाकरवी ग्राहक मंचात प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली याबाबत, तक्रारदार सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार), व न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) मिळण्यास पात्र आहेत.
सबब प्रस्तुत प्रकरणामध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- अंतिम आदेश -
1. तक्रार क्रमांक-157/2015 अंशतः मंजुर करण्यात येतात.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार प्रती सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदनिका खरेदीपोटी भरलेली संपुर्ण रक्कम रु.1,50,000/-
(एक लाख पन्नास हजार) ता.14.08.2011 पासुन दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजासह
आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यात परत करावी असे आदेश सामनेवाले यांना
देण्यात येतात. विहीत मुदतीत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वर नमुद रक्कम 12
टक्के व्याजसह परत न केल्यास सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर संपुर्ण रक्कम
रु.1,50,000/- (एक लाख पन्नास हजार) ता.19.01.2017 पासुन दरसाल दर शेकडा 15
टक्के व्याजासह परत करावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कारण मिमांसेमध्ये नमुद केल्यानुसार झालेल्या मानसिक
त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) व
न्यायिक खर्चापोटी रु.10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार) आदेश पारित तारखेपासुन दोन
महिन्यात दयावे.
5. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
6. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.19.11.2016
जरवा/