तक्रारदार : त्यांचे वकील श्री.सुरज कुडाळकर सोबत
हजर.
सामनेवाले : सामनेवाले त्याचे वकील सुरभी निकम
मार्फत हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*--
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले हे पर्यटन ठिकणी त्यांच्या सभासदांना निवासकामी सेवा सुविधा उपलब्ध करुन देणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे त्यांचे सभासद होण्याचे हेतुने दिनांक 8.2.2005 रोजी रु.16,950/- म्हणजे एकूण सभासदत्व फी रुपये 1,69,500/- ची 10 टक्के रक्कमेचा धनादेश सा.वाले यांचेकडे दिला. व सभासद करारनाम्यावर सही करुन तो सुपुर्द केला. सा.वाले यांनी तक्रारदारांना या योजनेच्या अंतर्गत सोनी कंपनीचा हॅन्डीकॅम (कॅमेरा) भेट देण्याचे कबुल केले होते. तसेच सा.वाले यांनी तक्रारदारांना सभासदत्व प्रमाणपत्र पाठवावयाचे होते. तक्रारदारांनी वेळोवेळी स्मरण देऊनही सा.वाले यांनी तक्रारदारांना हॅन्डीकॅम (कॅमेरा) पाठविला नाही. तक्रारदारांचे पत्र दिनांक 16.3.2005 चे पत्रास सा.वाले यांनी त्यांचे पत्र दिनांक 4.4.2005 प्रमाणे तक्रारदारांना असे कळविले की, संपूर्ण सभासद शुल्कापैकी 25 टक्के रक्कम प्राप्त झाल्यानंतर सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) तक्रारदारांना पाठविण्यात येईल. परंतु सा.वाले यांनी तो पाठविला नाही. अंतीमतः तक्रारदारांनी निराश होऊन दिनांक 26.7.2006 चे पत्राव्दारे आपले सभासदत्व रद्द केले व सा.वाले यांचेकडे जमा केलेली सभासद शुल्क रक्कम रु.80,358/- परत मागीतले. तक्रारदारांचे हे पत्र गेल्यानंतर देखील सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बँकेकडून रु.5,284/- चा हप्ता वसुल केला. तक्रारदारांनी त्यावर आक्षेप नोंदविला.
2. तक्रारदार पुढे असे कथन करतात की, तक्रारदार व सा.वाले यांचे दरम्यान सभासद शुल्क परत करण्याबद्दल बराच पत्र व्यवहार झाला. परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांना आश्वासनाप्रमाणे सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) दिला नाही, तसेच सभासदत्व शुल्कही परत केले नाही. अंतीमतः तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द दिनांक 20.11.2007 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना सभासद शुल्काचे सा.वाले यांचेकडे जमा केलेले रु.85,642/- तक्रारदारांना 21 टक्के व्याजासहीत परत करावे व नुकसान भरपाई बद्दल रु.50,000/- अदा करावेत अशी दाद मागीतली.
3. तक्रार प्रलंबीत असतांना मुळचे तक्रारदार मयत झाले व त्यांचे वारसांनी प्रस्तुतची तक्रार पुढे चालविली व त्यांची नांवे अभिलेखात सामील करुन घेण्यात आली.
4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, सभासद शुल्काची अग्रीम रक्कम जमा केल्यानंतर नियमा प्रमाणे सभासदांनी 10 दिवसाचे आत जर सभासदत्व रद्द केले नाहीतर ते सभासद शुल्क व जमा केलेली रक्कम परत मिळत नाही. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदारांनी अग्रीम सभासद शुल्क जमा केल्यानंतर काही महिन्यानंतर सभासदत्व रद्द केले व त्यानंतर सभासद शुल्काची रक्कम परत मिळणेसाठी मागणी केली व नियमा प्रमाणे तक्रारदार सभासद शुल्काचा परतावा मिळण्यास पात्र नाही.
5. सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) चे संदर्भात सा.वाले असे कथन करतात की, सभासद शुल्कापैकी ¼ रक्कम प्राप्त झाल्यानंतर सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) सभासदांना देण्यात येणार होता. परंतु दरम्यान तक्रारदारांच्या बँकेने एका हप्त्याची रक्कम पाठविली नसल्याने तक्रारदारांना सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) देण्यात आलेला नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कुठल्याही पर्यटन केंद्रावर सेवा सुविधा न घेता एकतर्फी करार रद्द केल्याने तक्रारदार सभासद शुल्काचा परतावा मागण्यास पात्र नव्हते असे सा.वाले यांनी कथन केले.
6. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले होते. तक्रारदारांचे वारस अभिलेखात दाखल झाल्यानंतर त्यांचे वतीने तक्रारदार क्र.2 यांनी पुराव्याचे ज्यादा शपथपत्र दाखल केले. सा.वाले यांनी सभासद नियमाची प्रत हजर केली. तसेच त्यांचे विभागीय व्यवस्थापक सुमती मोहन यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.
7. प्रस्तुत मंचाचे तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्रे, सभासद नियमावलीची प्रत, यांचे वाचन केले. त्याचप्रमाणे तक्रारदार व सा.वाले यांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) दिला नाही व त्यावरुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व तक्रारदारांना सभासद शुल्क परत करण्यास नकार देवून तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय? | होय. |
2. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
8. तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी अ वर माहिती पत्रक (ब्रोशर) ची प्रत जोडलेली आहे. त्यातील माहितीवरुन असे दिसते की, सा.वाले यांनी त्या योजने अंतर्गत सभासद होणा-या व्यक्तीस रु.23,990/- किंमतीचा सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) अधिक इतर सुविधा देण्याचे मान्य केले होते. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे आवश्यक तो फॉर्म भरुन दिला. व 10 टक्के रक्कम अनामत शुल्क रु.16,950/- दिनांक 8.2.2005 रोजी जमा केली. ही रक्कम वसुल झाल्याचे सा.वाले मान्य करतात. तक्रारदारांनी त्यानंतर सा.वाले यांचेकडे सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) मिळणेकामी दिनांक 16.3.2005 रोजी म्हणजे महीन्यानंतर निशाणी क प्रमाणे पत्र पाठविले. व त्यामध्ये सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा), सभासद प्रमाणपत्र, व सभासद पत्र प्राप्त न झाल्याचे कळविले. सा.वाले यांनी तक्रारदाराच्या या पत्रास दिनांक 4.4.2005 (निशाणी-ड) च्या पत्राव्दारे उत्तर दिले व त्यामध्ये असे कथन केले की, सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) 25 टक्के रक्कम जमा केल्यानंतर त्यांना पाठविण्यात येईल. व ती 25 टक्के रक्कम मासीक हप्त्याप्रमाणे ऑक्टोबर,2005 मध्ये पूर्ण होणार होती. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, माहिती पत्रकात कोठेही 25 टक्के रक्कम जमा झाल्यानंतर सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) देण्यात येईल असे नमुद केलेले नव्हते. यावरुन 25 टक्के रक्कम जमा केल्यानंतर सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) देण्यात येईल हे सा.वाले यांचे कथन म्हणजे पश्चातबुध्दी दिसते. सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 4.4.2005 च्या पत्रानंतर दुसरे पत्र दिनांक 27.1.2006 रोजी पाठविले. व त्या पत्रासोबत सभासदत्वाची माहिती तक्रारदारांना पुरविण्यात आली. त्या पत्रामध्ये देखील 25 टक्के रक्कम प्राप्त झाल्यानंतर सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) देण्यात येईल असा उल्लेख नाही. या उलट त्या पत्राचे शेवटी खास भेट या मथळयाखाली सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) चा उल्लेख आहे. परंतु तेथे मात्र 25 टक्के रक्कम वसुल झाल्यानंतर खास भेट म्हणजे सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा)
देण्यात येईल अशी नोंद आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 27.1.2006 चे पत्र हे तक्रारदार सभासद झाल्यानंतर जवळ पास एका वर्षानंतर पाठविले कारण तक्रारदारांनी रु.16,950/- चा धनादेश सा.वाले यांचेकडे दिनांक 8.2.2005 रोजी दिला होता. व त्या धनादेशाव्दारे सा.वाले यांनी त्यातील रक्क्म रु.16,950/- तक्रारदार यांचेकडून वसुल केली. यावरुन असे दिसते की, माहिती पत्रक/ब्रोशर यामध्ये कोठेही सा.वाले 25 टक्के रक्कम वसुल झाल्यानंतर सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) देण्यात येईल असा उल्लेख करीत नाही व तेथे फक्त सभासदांना सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) या योजनेअंतर्गत प्राप्त होईल अशी जाहीरात करतात. परंतु एका वर्षानंतर सभासद झाल्यानंतर जे पत्र पाठविण्यात येते त्यामध्ये मात्र सा.वाले असे म्हणतात की, सभासदांची संपूर्ण शुल्कापैकी 25 टक्के येणे रक्कम वसुल झाल्यानंतर सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) सभासदांना देण्यात येईील.
9. सा.वाले यांनी असे कथन केले की, सभासद होण्याची 25 टक्के रक्कम वसुल झाल्यानंतर सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) सभासदाला म्हणजे तक्रारदारांना देण्यात येणार होता. सभासद शुल्क एकूण रक्कम रु.1,69,500/- होती त्यापैकी 25 टक्के रक्कम वसुल झाल्यानंतरही सा.वाले यांनी तक्रारदारांना सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) दिला नाही. रु.1,69,500/- पैकी 25 टक्के रक्कम रु.42,375/- होते व तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे अनामत रक्कम रु.16,950/- धनादेशाव्दारे दिनांक 8.2.2005 रोजी जमा केली होती. त्यानंतर मासीक हप्त्याने रु.5,284/- तक्रारदारांकडून एप्रिल, 2005 पासून पुढे रक्कम वसुल व्हावयाची होती. यावरुन तक्रारदारांचे एप्रिल, ते ऑगस्ट 2005 या दरम्यानचे 5 मासीक हप्ते वसुल झाल्यानंतर तक्रारदारांनी अनामत जमा केलेले रक्कम रु.16,950/- व 5 मासीक हप्ते या प्रमाणे 25 टक्के रक्कम पूर्ण होते. म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर 2005 या महिन्यात तरी कमीत कमी सा.वाले यांनी तक्रारदारांना सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) पाठविणे आवश्यक होते. तथापी सा.वाले यांनी त्या प्रमाणे कार्यवाही केलेली नाही. व अंतीमतः तक्रारदारांनी वर्षेभर वाट पाहून त्यांचे पत्र दिनांक 26.7.2006 व्दारे सभासदत्व रद्द करीत असल्याची सूचना सा.वाले यांना दिली. त्या पत्राची प्रत तक्रारदारांनी तक्रारीच्या निशाणी फ येथे पृष्ट क्र.23 वर दाखल केलेली आहे. सा.वाले असे कथन करतात की, त्या दरम्यानचा एक हप्ता तक्रारदारांकडून सा.वाले यांना वसुल करावयाचा होता परंतु तो हप्ता कुठला याचा खुलासा सा.वाले यांनी केलेला नाही. त्याचप्रमाणे तक्रारदारांचे दिनांक 26.7.2006 चे पत्र प्राप्त झाल्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांच्या खात्यातून रु.5,284/- चा एक हप्ता वसुल केला. व सा.वाले असे म्हणतात की, त्या स्वरुपाची रक्कम तक्रारदारांना ते परत करण्यास तंयार आहेत. म्हणजे तक्रारदारांचे बँकेने एक मासीक हप्ता रोखून धरला होता किंवा पाठविला नाही हे कथन देखील संदिग्ध आहे व त्याबद्दल कुठलाही पूरावा उपलब्घ नाही. कुठल्याही परिस्थितीत एप्रिल, 2005 नंतर 5 किंवा 6 हप्ते वसुल झाल्यानंतर पुर्वीचे रु.16,950/- व त्या 5 ते 6 महिन्यातील हप्त्याची रक्कम असे एकत्रित 25 टक्के शुल्क सा.वाले यांना वसुल झाले होते. तरी देखील सा.वाले यांनी सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) तक्रारदारांना दिलेला नाही. यावरुन सा.वाले यांनी त्यांचे माहिती पत्रकाचे विरुध्द वर्तन केले व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असा निष्कर्ष काढावा लागतो.
10. वर नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी त्यांचे पत्र दिनांक 26.7.2006 च्या पत्राव्दारे सभासदत्व रद्द केले. व सा.वाले यांचेकडे एकूण जमा असलेली रक्कम रुपये 80,358/- परत मागीतले. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले यांनी त्यानंतर म्हणजे दिनांक 26.7.2006 नंतर एक मासिक हप्ता रुपये 5,284/- तक्रारदारांच्या खात्यामधून बँकेकडून वसुल केला. या प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांकडून एकूण रक्कम रु.85,642/- वसुल केली. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, त्यांनी सा.वाले यांना दिनांक 26.7.2006 रोजी सभासदत्व रद्द करीत असल्या बद्दलचे पत्र दिले व शिल्लक जमा असलेल्या रक्कमेचा परतावा मागीतला असता सा.वाले यांनी तक्रारदारांच्या दिनांक 26.7.2006 चे पत्रास त्यांचे पत्र दिनांक 19.8.2006 व्दारे उत्तर दिले. व त्यामध्ये असे कथन केले की, सभासद रद्द होण्याची कार्यवाही सुरवातीचे शुल्क भरल्यापासून 6 महिन्याचे आत केली जावू शकते व तक्रारदारांनी सभासदत्व 6 महिन्यानंतर रद्द केले असल्याने तक्रारदारांना शिल्लक परतावा मिळणार नाही. या पत्राचे विपरीत कैफीयतीमध्ये व लेखी युक्तीवादात सा.वाले असे म्हणतात की, सुरवातीची अनामत शिल्लक भरल्यानंतर 10 दिवसा पर्यतच सभासदत्व रद्द होऊ शकते व त्यानंतर सभासदत्व रद्द केल्यास शिल्लक परत मिळू शकत नाही. या प्रकारचे कथन सा.वाले यांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्रात परिच्छेद क्र.7 मध्ये केलेले आहे. लेखी युक्तीवादामध्ये देखील सा.वाले यांचे त्याच प्रकारचे कथन आहे.
11. या कथनाचे पृष्टयर्थ सा.वाले यांनी सभासदत्वा बद्दलच्या नियमाची प्रत कागदपत्राच्या यादीसोबत दाखल केलेली आहे. यामधील नियम 5(3) असे दर्शविते की, विशिष्ट परिस्थितीत सभासदत्व रद्द केल्यास काही रक्कम व नुकसान भरपाई वसुल करुन सभासदत्व रद्द करता येईल. या नियमाच्या वरती कलम 5.3 हे सभासद जर सभासदत्व शुल्काचे मासिक हप्ते भरु शकत नसतील तर लागू होत नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये तशी परिस्थिती नाही. तर तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे बँकेमार्फत सभासदत्व शुल्क वेळोवेळी जमा केले होते. नियमावलीचे कलम 6 असे नमुद करते की, एखादा सभासद अर्ज दिल्यापासून 10 दिवसाचे आत आपले सभासदत्व रद्द करु शकतो. व त्या परिस्थितीमध्ये सा.वाले म्हणजे कंपनी सभासदांकडून प्राप्त केलेले सभासद शुल्क परत करण्यास जबाबदार असतील.सा.वाले हे प्रस्तुत नियमाच्या वतीने 6.1, 6.2, यावर भर देतात. व असे कथन करतात की, तक्रारदारांनी सभासद अर्ज भरुन दिल्यानंतर 10 दिवसाचे नंतर सभासदत्व रद्द केल्याने तक्रारदार सभासद शुल्क मिळण्यास पात्र नाही.
12. तक्रारदारांवर या नियमातील तरतुदी तेव्हाच बंधनकारक राहातील जेव्हा तक्रारदार हे नियम मान्य होते व तक्रारदारांनी ते मान्य केले होते असा पुरावा सा.वाले यांचेकडून दाखल केला जाईल. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदारांनी सुरवातीचे सभासद शुल्क रु.16,950/- दिनांक 8.2.2005 रोजी जमा केले होते. त्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 27.1.2006 रोजी निशाणी ई एक पत्र पाठविले व त्यामध्ये तक्रारदारांच्या सभासदत्वाची माहिती पुरविली. व त्या पत्रामध्ये असे कथन केलें की, तक्रारदारांना 30 दिवसाचे आत सभासदत्वाचा संपूर्ण संच ( Membership Kit ) प्राप्त होईल. त्या प्रस्तुतच्या संचामध्ये सभासदत्व प्रमाणपत्र, व सभासद दाखला राहील असे नमुद करण्यात आले तर सा.वाले यांचे दिनांक 27.1.2006 चे पत्र असे स्पष्टपणे दर्शविते की, सा.वाले यांनी तक्रारदारांना या पत्रासोबत नियमावलीची प्रत पाठविलेली नव्हती. त्याचप्रमाणे सभासदाचे संचामध्ये देखील ती असेल असे नमुद केलेले नव्हते. सा.वाले यांनी कैफीयत दाखल केलेली आहे त्यामध्ये कोठेही सा.वाले असे म्हणत नाहीत की, तक्रारदारांना या नियमावलीची प्रत देण्यात आलेली होती. सा.वाले यांचे पुराव्याचे शपथपत्र दिनांक 15.9.2008 यामध्ये असा उल्लेख आहे की, सभासद अर्जामध्ये सर्व बाबी नमुद केलेल्या असतात व त्यात अटी व शर्तीचा उल्लेख असतो. व सभासदांनी त्या अर्जावर सही केली तर संबंधीत शर्ती व अटी सभासदांनी समजावून घेतल्या असा अर्थ काढावा लागतो. सा.वाले आपल्या लेखी युक्तीवादामध्ये नियम क 601,602 वर भर देतात. परंतु ते नियम किंवा त्या संबंधीत अटी व शर्ती सभासद अर्जामध्ये नमुद केलेले होते असे सा.वाले यांच्या साक्षीदाराचे शपथपत्रात नमुद नाही. सा.वाले यांना तक्रारदारांनी दाखल केलेला सभासदत्वाचा मुळचा अर्ज किंवा त्याची प्रत दाखल करणे सहज शक्य झाले असते, परंतु त्या प्रकारची कोणतेही प्रयत्न केले नाही. यावरुन सा.वाले आपले पुराव्याचे शपथपत्र, किंवा लेखी युक्तीवाद ज्या नियमाचा आधार घेतात ते नियम तक्रारदारांना समजावून सांगीतले होते व माहीत होते या बद्दलचा पुरावा सा.वाले यांनी दाखल केलेला नाही. तसा पुरावा दाखल केलेला नसल्याने ते नियम, तरतुदी विशेषतः कलम 6.1,6.2 तक्रारदारांवर बंधनकारक असू शकत नाही.
13. सा.वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादात असेही कथन केले आहे की, सभासदत्व रद्द केल्यामुळे तक्रारदार सा.वाले यांचे सभासद रहात नाही व तक्रारदारांना ग्राहक मंचापुढे तक्रार दाखल करण्याचा अधिकार पोहचत नाही. सा.वाले यांनी तक्रारदारांकडून सभासद शुल्का बद्दल अनामत रक्कम व त्यानंतर मासीक हप्ता वसुल केला ही बाब मान्य आहे. तक्रारदार सभासद झाल्यानंतर त्यांना सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) देण्यात येईल असे आश्वासन दिले होते ही बाब देखील मान्य आहे. या आश्वासनाची पुर्तता सा.वाले यांनी केलेली नसल्याने तक्रारदारांनी जर सभासदत्व रद्द केले तर ती सा.वाले यांची म्हणजे सेवा सुविधा पुरविण्याचे ग्राहक रहाणार नाही असे म्हणता येत नाही. सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांची जमा रक्कम परत केली नाही, तसेच सभासदत्व रद्द केल्याचे पत्र दिले नाही. सभासद व ग्राहक असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत व एखादी व्यक्ती ग्राहक बनणेकामी त्या व्यक्तीकडून सेवा सुविधा पुरविणेकामी विशिष्ट रक्कम शुल्क म्हणून वसुल करणे आवश्यक असते, ती अट येथे पूर्ण होते. सबब मुळ तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक नाहीत हे कथन पोकळ ठरते.
14. सा.वाले यांनी आपल्या युक्तीवादाचे पृष्टयर्थ प्रस्तुत मंचाचा ग्राहक तक्रार क्रमांक 276/2007 निकाल दिनांक 13.6.2008 या मधील निर्णयाची प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये सा.वाले यांचे विरुध्द तसीच तक्रार दाखल केलेली होती. परंतु त्यातील घटणा व सभासद रद्द करण्याचे कारण वेगळे हेाते. त्या प्रमाणे मुलभूत घटणा व बाबी वेगळया असल्याने तो निकाल पुस्तुतचे प्रकरणास लागू होऊ शकत नाही.
15. वर चर्चा केल्याप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) दिला नाही व जाहीरात व माहिती पत्रकाचे विपरीत वर्तन करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असा निष्कर्ष काढावा लागतो. त्याच प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना सभासद शुल्काची जमा रक्कम परत करण्यास नकार देवून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो. तक्रारदार हे मुळ तक्रारदारांचे वारसदार आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये एकूण जमा रक्कम रु.85,642/- व्याजासहीत परत मागीतलेली आहे. त्या व्यतिरिक्त सोनी हॅन्डीकॅम (कॅमेरा) ची किंमत तसेच नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतु प्रकरणातील एकंदर कथनांचा व घटनांचा विचार करता सा.वाले यांनी तक्रारदारांना विशिष्ट मुदतीमध्ये जमा रक्कम परत करावी असा आदेश देणे योग्य व न्याय राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. यापेक्षा जादा रक्कम, नुकसान भरपाई, अथवा व्याज सा.वाले यांना अदा करण्यास आदेश झाल्यास तो जाचक ठरेल असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
16. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो
आदेश
1. तक्रार क्रमांक 475/2007 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या सभासदत्वाचे संदर्भात अनुचित व्यापारी
प्रथेचा अवलंब केला व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे
जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना शुल्काची वसुल रक्कम रुपये 85,642/- प्रस्तुत आदेशाची प्रत मिळाल्यापासून आठ आठवडयाचे आत अदा करावी असा आदेश देण्यात येतो. अन्यथा विहीत मुदत संपल्यापासून 9 टक्के व्याज रक्कम अदा करेपर्यत द्यावे.
4. खर्चाबद्दल आदेश नाही.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.