तक्रारदार : स्वतः हजर. सामनेवाले क्र.1 : प्रतिनिधीमार्फत हजर. सामनेवाले क्र.2 : प्रतिनिधीमार्फत हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले क्र.1 हे टी.व्ही.चे उत्पादक आहेत. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 चे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेला एलसीडी टी.व्ही.मॉडेल क्रमांक 32 एलजी 80 एफआर हा दिनांक 19.10.2008 रोजी रु.42,997/- किंमतीस खरेदी केला. सा.वाले यांनी तक्रारदारांना तो टी.व्ही. विक्री करीत असताना त्या टी.व्ही.मध्ये डायनामिक कॉन्ट्रास्ट रेशो हा 50000: 1 असा राहील असे सांगीतले होते. तक्रारदार हे डिसेंबर, 2008 सा.वाले क्र.2 विक्रेते यांचेकडे केले असताना त्यांना असे दिसून आले की, त्याच मॉडेलचा टि.व्ही. ज्याचा डायनामिक कॉन्ट्रास्ट रेशो हा 30000: 1 असा होता. सा.वाले क्र.2 यांनी असा खुलासा केला केला की, सा.वाले क्र.1 उत्पादक यांचेकडून प्राप्त झालेल्या माहितीवरुन तसे नुद करण्यात आलेले आहे. तक्रारदाराने अन्य विक्रेत्याकडे त्याच श्रेणीचा टी.व्ही. याची चौकशी केली असताना असे दिसून आले की, त्यात देखील डी.सी.आर. हा 30000: 1 असा दाखविण्यात आलेला होता. त्यानंतर तक्रारदाराने सा.वाले क्र.1, सा.वाले क्र.2 व सा.वाले क्र.1 यांचे नोईडा, उत्तरप्रदेश येथील कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला. तथापी तक्रारदारांना या बाबत योग्य तो खुलासा देण्यात आलेला नाही. 2. तक्रारदारांच्या तक्रारीत असे कथन आहे की, टी.व्ही चालु असताना तक्रारदारांना असे दिसून आले की, तक्रारदारांनी विकत घेतलेल्या टी.व्ही.मध्ये समोरच्या पट्टीमध्ये दोष असून तक्रारदारांनी त्या बद्दल सा.वाले यांचेकडे चौकशी केली. व सा.वाले यांचे अभियंत्याने तक्रारदारांच्या टी.व्ही.ची पहाणी करुन त्यांनी असे सांगीतले की, टी.व्ही. ची पट्टी बदलावी लागेल व त्याकामी टी.व्ही. सा.वाले क्र.1 यांचे दुरुस्ती केंद्राकडे न्यावा लागेल. तक्रारदारांचा टी.व्ही. हा जास्त किंमतीचा असल्याने तक्रारदारांनी तशी संमती दर्शविली नाही. सा.वाले यांनी टि.व्ही.दुरुस्त केली नाही. व या उलट तक्रारदारांना असे कळविले की, तक्रारदारांनी दुरुस्ती बद्दलचा वार्षीक करार रु.2,500/- देवून करावा व त्यानंतर तक्रारदारांच्या टी.व्ही.ची देखभाल करण्यात येईल. 3. तक्रारदारांनी सरतेशेवटी सा.वाले यांचेकडून टि.व्ही.ची किंमत वसुल करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे सा.वाले यांना दिनांक 9.11.2009 रोजी पत्र लिहीले. तथापी सा.वाले यांनी कुठेलीही कार्यवाही केली नाही. अंतीमतः तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये टि.व्ही.ची किंमत रु.42,997/- सा.वाले यांनी तक्रारदारांना परत करावे. तसेच मानसिक त्रास व कुचंबणा या बद्दल रु.7000/- नुकसान भरपाई द्यावी, तकारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली. 4. सा.वाले क्र.1 यांनी आपली कैफीयत दाखल केली. त्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनास नकार दिला. सा.वाले क्र.1 यांच्या कथना प्रमाणे तक्रारदारांच्या टि.व्ही.मध्ये कुठेलाही दोष नव्हता. त्याच प्रमाणे तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने ही केवळ तर्कावर आधारीत आहेत असाही आरोप केला. या प्रमाणे तक्रारदारांनी खरेदी केलेला टि.व्ही. चे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली या आरोपास सा.वाले क्र.1 उत्पादक यांनी नकार दिला. 5. सा.वाले क्र.2 यांनी त्यांचे अधिकृत प्रतिनिधी मार्फत शपथपत्र दाखल केले. व असे कथन केले आहे की, सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 टि.व्ही. उत्पादक यांचे अधिकृत विक्रेते असून सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेल्या वस्तु सा.वाले क्र.2 विक्री करतात. परंतु त्या वस्तुमध्ये काही दोष असल्यास सा.वाले क्र.2 हे जबाबदार असू शकत नाही. 6. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचे कैफीयतीस प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये तक्रारीतील आरोपांचा पुर्नउच्चार केला व डी.सी.आर.संदर्भात सा.वाले यांनी तक्रारदारांची फसवणूक केली असा आरोप केला. 7. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली. सा.वाले यांनी त्यांचे प्रतिनिधी श्री.सुधीर नायक यांचे तर्फे शपथपत्र दाखल केले. प्रस्तुतच्या मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यानुसार तक्रारीच्या निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. . | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना विक्री केलेल्या टि.व्ही. मध्ये डी.सी.आर. हा 50000: 1 असे दर्शविले परंतु तो प्रत्यक्षात तो 30000: 1 म्हणजे कमी होता या प्रमाणे सा.वाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला हे तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 8. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत व कागदपत्राच्या यादीसोबत टि.व्ही. खरेदीची पावती दिनांक 19.10.2008 ची प्रत जोडली आहे. ती क्र.2 यांचे छापील प्रतीवर दिलली आहे. त्यावरील नोंदीवरुन असे दिसते की, सा.वाले क्र.2 यांनी सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेला टि.व्ही. एल.जी.एल.सी.डी. 32 एलजी 80 एफआर रु.43,000/- ला खरेदी केला. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेला टि.व्ही. त्यातील बिलाचे नोंदीप्रमाणे खरेदी केला यास नकार दिला नाही. तक्रारदारांनी निशाणी 2 वर सा.वाले क्र.1 यांचे दुरुस्ती केद्रास दिलेल्या पत्राची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये तक्रारदारांनी जे मॉडेल खरेदी केले होते त्याचा डी.सी.आर. 30000:1 असा आहे. व अन्य दुकानामध्येही चौकशी केली असता त्याच मॉडेलचा डी.सी.आर. 30000:1 असा दाखविला आहे असे नमुद केलेले आहे. तथापी सा.वाले यांचे संकेत स्थळावर त्याच मॉडेलचा डी.सी.आर. 50000:1 असा नमुद केलेला आहे. 9. तक्रारदारांनी आपल्या लेखी युक्तीवादासोबत सा.वाले क्र.1 यांच्या संकेत स्थळावरुन जी माहिती मिळाली त्याची प्रत दाखल केली आहे. ते छायाचित्र क्रमांक 1 संचिकेचे पृष्ट क्र.56 वर आहे. त्यातील निरीक्षणावरुन असे दिसते की, सा.वाले क्र.1 यांचे संकेत स्थळावर 32 एलजी 80 एफआर या मॉडेलच्या टि.व्ही.ची जाहीरात करीत असतांना सा.वाले क्र.1 यांनी या टि.व्ही.चा डी.सी.आर. 50000:1 असा दर्शविला आहे. तक्रारदारांनी छायाचित्र क्र.3 मध्ये तक्रारदार क्र.1 चे अन्य विक्रेते यांचे दुकानातून टि.व्ही.च्या खोक्यावरुन घेतलेल्या छयाचित्रात तोच टि.व्ही.त्याच मॉडेलचा डी.सी.आर. 30000:1 असा दाखविला आहे. त्याच प्रकारची माहिती अन्य एका विक्रेत्याकडे विक्रीसाठी ठेवलेला टि.व्ही.च्या खोक्यावरुन तक्रारदारांनी मीळविली. तक्रारदारांनी आपल्या लेखी युक्तीवादासोबत पृष्ट क्र.56 व 57 वर जी छायाचित्रे दाखल केलेली आहेत, त्याचे काळजीपूर्वक निरीक्षक केले असताना असे दिसून येते की, सा.वाले क्र.1 यांनी आपल्या संकेत स्थळावर अशी जाहीरात केली आहे की, त्या विशिष्ट मॉडेलचा डी.सी.आर. 50000:1 आहे. परंतू प्रत्यक्षात त्याच मॉडेलचा टि.व्ही. विक्रेत्याकडे पाठविला असता त्या टि.व्ही.चे खोक्यावर मात्र डी.सी.आर. 30000:1 असा नोंदविला होता. डी.सी.आर. ही टि.व्ही. मधील महत्वाची सुविधा असून दुरचे चित्र स्पष्ट दिसण्याचे संदर्भात ही एक मोजपट्टी आहे. सा.वाले क्र.1 यांनी त्या सुविधेचे संदर्भात आपल्या संकेत स्थळावर चुकीची माहिती प्रसुत केली आहे. तसेच तक्रारदारांची दिशाभूल केली. सा.वाले यांनी आपल्या कैफीयेतीमध्ये या संदर्भात कुठलाही समाधानकारक खुलासा केलेला नाही. त्याच प्रमाणे संकेत स्थळावरील माहिती व विक्रेत्याकडे विक्रीकरीता पाठविलेला टि.व्ही. चे खोक्यावरील माहिती यामध्ये विरोधाभास कसा निर्माण झाला याचा खुलासा केलेला नाही.सा.वाले क्र.1 यांचे कैफीयेतीमध्ये केवळ तक्रारदारांचे कथनास नकार दिलेला दिसून येतो. यावरुन सा.वाले क्र.1 यांनी तक्रारीतील या संदर्भातील कथन पुराव्यानिशी खोडून काढले असे म्हणता येणार नाही.ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(r) प्रमाणे विक्रेत्याने लिखीत किंवा मौखीक स्वरुपात विक्री करावयाच्या वस्तुचा दर्जा, गुणवत्त,संख्या इ. संदर्भात चुकीची माहिती दिली असेल तर ती अनुचित व्यापारी प्रथा होते. प्रस्तुतचे प्रकरणामध्ये सा.वाले क्र.1 यांनी डी.सी.आर.चे संदर्भात विशेषतः 32 एलजी 80 एफआर या मॉडेलच्या डी.सी.आर.चे संदर्भात आपल्या संकेत स्थळावरुन चुकीची माहिती दिली व तक्रारदारांची दिशाभूल केली असे सिध्द होते. या प्रमाणे सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना टि.व्ही. च्या संदर्भात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला हे सिध्द होते. 10. तक्रारदारांनी असेही कथन केले आहे की, तक्रारदारांना टि.व्ही.ची पट्टी सदोष असल्याचे दिसून आले व त्याबद्दल तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडे आपले पत्र दिनांक 20.10.2009 निशाणी 10 या प्रमाणे दिले आहे. सा.वाले क्र.2 यांचेकडून त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याने तक्रारदारांनी 27.10.2009 रोजी स्मरणपत्र पाठविले. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांना दिनांक 9.11.2009 रोजी या संदर्भात स्मरणपत्र पाठविले व टि.व्ही. ची किंमत परत करण्यात यावी अशी विनंती केली. सा.वाले क्र.1 किंवा 2 यांनी तक्रारदारांच्या दिनांक 20.10.09,27.10.09, व 9.11.09 या तिन्ही पत्रांना कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही व त्यातील कथने नाकारली नाही. या तिन्ही पत्रामध्ये तक्रारदारांनी अशी तक्रार केली आहे की, टि.व्ही. च्या पट्टीचे आयुष्य 60 हजार तास असताना काही दिवसातच टि.व्हि. मध्ये दोष निर्माण झाला व सा.वाले यांचेकडून कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. सा.वाले यांनी पत्राव्दारे अथवा अन्य माध्यमाव्दारे तक्रारदारांच्या वरील कथनास नकार दिला नाही.व तक्रार दाखल झाल्यानंतर कैफीयतीमध्ये मात्र असे कथन केले की, तक्रारदारांनी खरेदी केलेल्या टि.व्ही.मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता.सा.वाले यांनी तक्रारदारांच्या या संदर्भातील पत्रास पुर्विच उत्तर दिले असते तर सा.वाले यांचे या कथनास निच्छितच पुष्टी मिळाली असती. तथापी सा.वाले यांनी तक्रारदारांच्या टि.व्ही.सदोष असल्या बद्दलच्या तक्रारीतच्या पत्रास उत्तर दिले नाही. सा.वाले यांचे वरील वर्तन तक्रारदारांच्या तक्रारीतील त्यांचे शपथपत्रातील कथनास पुष्टी देते. यावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना विक्री केलेला टि.व्ही.सदोष होता व सा.वाले यांनी तो दुरुस्त करुन अथवा बदलून दिला नाही हे सिध्द होते. 11. तकारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये टि.व्ही.बदलून मिळावा अशी मागणी केलेली आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनावरुन व तक्रारीवरुन असे दिसते की, तक्रारदाराच्या या संदर्भातील मागण्या योग्य आहेत. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी मानसिक त्रास, कुचंबणा व गैरसोय या बद्दल नुकसान भरपाई रु.7 हजार मागीतली आहे ती वाजवी दिसते. तक्रारदारांनी नुकसान भरपाईचा आकडा अन्य तक्रारदारांप्रमाणे अधिकचा अथवा फुगवून दिलेला नाही, तर तो योग्यच आहे. तक्रारीतील एकंदर कथने व तक्रारदारांना झालेली मानसिक त्रास, कुचंबणा, व गैरसोय याचा विचार करता सा.वाले यांनी नुकसान भरपाईदाखल तसेच तक्रारीच्या खर्चादाखल तक्रारदारांना वैयक्तिक किंवा संयुक्तपणे रु.10,000/- अदा करणे असा आदेश देणे योग्य व न्याय राहील असे प्रस्तुतच्या मंचाचे मत झाले आहे. 12. वरील विवेचन व चर्चेनुरुप पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 897/2009 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांचे बिल दिनांक 19.10.2008 रोजी खरेदी केलेला 32 एलजी 80 एफआर .टि.व्ही.तेच मॉडेल अथवा ते मॉडेल उपलब्ध नसेल तर अन्य सुधारीत मॉडेल बदलून द्यावे व सामनेवाले क्र.1 यांचे कडून त्याबद्दल अन्य टि.व्ही.मागवून घ्यावा. 3. या व्यतिरिक्त सामनेवाले क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तपणे तक्रारदारांना नुकसान भरपाई तसेच तक्रारीच्या खर्चाबद्दल एकत्रीत रु.10,000/- अदा करावेत. 4. सामनेंवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता न्यायनिर्णयाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत करावी अन्यथा वरील रक्कमेवर 9 टक्के दाराने व्याज द्यावे. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |