*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
अॅड राजेश नितनवरे तक्रारदारांतर्फे
अॅड आर.बी.राजोरे जाबदेणारांतर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 24 एप्रिल 2014
प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदेणार बांधकाम व्यावसायिक यांच्याविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदार हे पुणे विद्यापीक सेवक वसाहत, पुणे 411 007 येथे रहातात. जाबदेणार यांचा सदनिका बांधून विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांच्या कथनानुसार जाबदेणार यांनी सर्व्हे नं 56/1/37, सर्व्हे नं 56/1/38, तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका हवेली, मौजे पिंपळे गुरव या गावातील मिळकतीमध्ये सदनिका बांधायचे ठरविले होते. तक्रारदार यांनी 480 चौ.फुटाची सदनिका बुक केली होती. त्या सदनिकेची किंमत रुपये 2,88,000/- इतकी ठरली होती. त्यापैकी तक्रारदारांनी वेळोवेळी जाबदेणार यांना रक्कम रुपये 2,50,000/- रोख व चेकनी अदा केले होते. केवळ रुपये 38,000/- देणे बाकी आहेत. दिनांक 31/12/1999 रोजी लिहून दिलेल्या करारानुसार सदनिकेचे बांधकाम 11 महिन्यात पूर्ण करुन ताबा तक्रारदार यांना देण्याचे जाबदेणार यांनी मान्य केले होते. परंतू जाबदेणार यांनी ताबा दिला नाही व तक्रारदार यांनी योजनेमध्ये प्रवेश करु नये, अशी धमकी दिली. जाबदेणार यांनी कराराप्रमाणे सदनिकेचा ताबा न देऊन सेवेतील त्रुटी निर्माण केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदेणार यांना नोटीस पाठविली. त्या नोटीसचे पालन न केल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तूतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांच्या कथनानुसार ते उर्वरित रक्कम केव्हाही देण्यास तयार होते. जाबदेणार यांनी वादातीत सदनिकेचा ताबा दयावा, नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 3,00,000/ मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांची वैकल्पिक मागणी अशी आहे की, सदनिकेचा ताबा दिला नाही तर त्याऐवजी रुपये 5,00,000/- दिनांक 31/12/1999 पासून द.सा.द.शे 18 टक्के व्याजासह मिळावेत.
2. या प्रकरणात जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारीतील विधाने नाकारली आहेत. जाबदेणार यांच्या कथनानुसार तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे रक्कम दिलेली नाही. तक्रारदार यांनी वस्तूस्थिती लपवून ठेवली आहे. तक्रारदार यांनी पोलिसांसमोर खोटी तक्रार दिल्याचे मान्य केले आहे. सबब तक्रार फेटाळण्यात यावी व जाबदेणार यांना नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती जाबदेणार यांनी केली आहे.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्रे, पुरावा व युक्तीवाद यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरील मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | कारणे |
1 | तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रुपये 2,50,000/- दिल्याचे सिध्द केले आहे काय | नाही |
2 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना बुकींगची रक्कम परत केल्याचे सिध्द होते काय | नाही |
3 | अंतिम आदेश काय | तक्रारदार हे त्यांनी जमा केलेली रक्कम रुपये 61,000/-व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत. |
कारणे
मुद्या क्र 1 ते 3-
4. या प्रकरणातील कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी रुपये 61,000/- दिनांक 31/12/1999, 5/2/2000, 5/4/2000 अशा तीन व्यवहारांनुसार जाबदेणार यांना अदा केलेले आहेत. रकमा मिळाल्यासंदर्भात वर नमूद तीन व्यवहारांच्या पावत्या जाबदेणार यांनी दिलेल्या आहेत. त्या पावत्यांमध्ये बुकींगचे कुठलेही सविस्तर वर्णन नाही. तक्रारदार यांनी जाबदेणार यांनी लिहून दिलेल्या करारामध्ये सदनिकेचा क्रमांक, त्याचे क्षेत्र व दर यासंबंधी कोणताही उल्लेख केलेला नाही. सदरचा करार हा अत्यंत मोघम आहे. तक्रारदार यांनी जाबदेणार यांना नोटीस पाठवून रुपये 2,50,000/- भरल्याचे नमूद केले होते. परंतू तक्रारदार यांनी केवळ रुपये 61,000/- या रकमेच्याच पावत्या दाखल केलेल्या आहेत. तक्रारदार यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती त्यात देखील तक्रारदार यांनी रुपये 61,000/- अॅडव्हान पोटी दिले होते असे नमूद केले आहे. जाबदेणार यांनी दिनांक 6/8/2013 रोजीच्या दोन पावत्या हजर केल्या आहेत. त्यात त्यांनी तक्रारदार यांनी दिनांक 5/5/2005 रोजी रुपये 50,000/- व दिनांक 14/3/2004 रोजी रुपये 28,000/- परत केले आहेत असे नमूद केले आहे. या प्रकरणातील नोटीसचे उत्तर व लेखी कैफियत विचारात घेतली असता सदरची बाब जाबदेणार यांनी त्यात नमूद केली नाही. त्याअर्थी सदरच्या पावत्या संशयास्पद वाटतात. त्यामुळे त्यांचा विचार या मंचास करता येणार नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार सदनिकेची खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचे तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. सबब तक्रारदार त्यांनी भरलेली रक्कम रुपये 61,000/- परत मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सदरची रक्कम जाबदेणार यांनी मुदतीत न दिल्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे तक्रारदार यांना त्यांच्या रक्कमेवर व्याज मागण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यासाठी झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासासाठी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
वर उल्लेख केलेल्या विवेचनानुसार मुद्यांचे निष्कर्ष काढण्यात येऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांची रक्कम परत न करुन सेवेमध्ये
त्रुटी निर्माण केली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रुपये 61,000/- [रुपये
एकसष्ठ हजार फक्त] तक्रार दाखल दिनांकापासून द.सा.द.शे 9 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम शारिरीक व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- [रुपये दहा हजार फक्त] व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- [रुपये दोन हजार फक्त] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
5. उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत, अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.