(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना शेतीपिकाचे नुकसान तसेच इतर शेती अनुषंगिक खर्चाचे आर्थीक नुकसान भरपाईपोटी रु.1,25,610/- मिळावेत, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत, अर्जाचा खर्चापोटी रु.10,000/- मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.26 लगत लेखी म्हणणे व पान क्र.29 लगत प्रतिज्ञापत्र तसेच सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.33 लगत म्हणणे व पान क्र.36 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहेत.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय
2) सामनेवाला क्र.2 यांनी खराब व दोषयुक्त बियाण्याचे उत्पादन करुन
त्याची विक्री सामनेवाला क्र.1 मार्फत अर्जदार यांना करुन अवैध व्यापार
पध्दतीचा अवलंब केलेला आहे काय?- नाही.
3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांनी युक्तीवाद केलेला नाही. सामनेवाला क्र.1 यांचे वतीने अँड.आर.व्ही.जाधव यांनी तसेच सामनेवाला नं.2 यांचे वतीने अँड.एस.पी.कुलकर्णी यांनी युक्तीवाद केलेला आहे.
अर्जदार यांनी पान क्र.6 लगत सामनेवाला क्र.1 यांची दिलेली दि.05/03/2011 ची रक्कम रु.1320/- ची पावतीची झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे. या पावतीवरती टीप या ठिकाणी “ओरीजिनल बिल शेतक-याकडून हरवल्यामुळे त्यांचे मागणीनुसार झेरॉक्स बिल देत आहे.” असा उल्लेख आहे. पान क्र. 6 ची पावती सामनेवाला नं.1 व 2 यांनी स्पष्टपणे नाकारलेली नाही. पान क्र.6 ची पावती व सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे याचा विचार करता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “पावटा ए एस 32 या वालाचा वाण त्यांचे सांगितल्याप्रमाणे लावला, 4 महिने झाले तरी फलफुलधारणा झाली नाही. पावटा ए एस 32 वाणाचा वाल बनावट बोगस हलक्या प्रतीचा होता त्यामुळे फळधारणा झाली नसल्याने तक्रारदाराचे रु.1,35,610/- इतक्या रुपयाचे नुकसान झाले आहे हा मजकूर मान्य नाही. सामनेवाला क्र.1 हा विक्रेता आहे. ग्राहकाने मागणी केल्यानुसार उत्पादक कंपनीने पुरविलेले सिलबंद पॅकमध्ये विक्री केलेले आहे. बियाण्याची गुणवत्ता व उत्पादकता इत्यादी बाबी सामनेवाला नं.1 यांचे नियंत्रणाबाहेरील असल्याने तसेच बियाण्याची गुणवत्ता व उत्पादकता इत्यादी बाबी त्या त्या वेळचे हवामान, रोग, हंगाम, देखभाल, वापरलेली खते यावर कारणीभूत असल्याने सामनेवाला नं.1 चा संबंध येत नाही. ” असे म्हटलेले आहे.
सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “कृषी अधिकारी यांनी अर्जदार यांचे मिळकतीत जावून पावटा (वाल) या पिकाची पाहणी करुन दि.06/07/2011 रोजी अहवाल दिलेला आहे. या अहवालामध्ये प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक खताचा वापर केलेला असल्यामूळे पिकाची वाढ झालेली दिसून आली व त्यामुळे फुलधारणा व फळधारणा झालेली नाही.”असा उल्लेख आहे. अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे पिक आलेले नाही. कोणत्यावेळी कोणते पिक घ्यावे हे शेतकरी ठरवत असतात. अर्ज रद्द करण्यात यावा असे म्हटलेले आहे.
या कामी अर्जदार यांनी पान क्र.7 लगत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचा दि.06/07/2011 रोजी क्षेत्रीय भेटीचा अहवाल दाखल केलेला आहे. या अहवालामध्ये पान क्र.3 वरती कलम 11 इतर माहिती निष्कर्ष या ठिकाणी “तेवढया क्षेत्रास प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर केलेला असल्याने पिकाची कायीक वाढ झालेली दिसून आली, त्यामुळे फुलधारणा व फळधारणा झालेली नाही.”असा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. या निष्कर्षामध्ये कोठेही बियाण्यामध्ये भेसळ होती किंवा बियाणे दोषयुक्त होते असा उल्लेख करण्यात आलेला नाही. याउलट अर्जदार यांनीच प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर केल्यामुळेच फुलधारणा व फळधारणा झालेली नाही असाच उल्लेख करण्यात आलेला आहे.
पान क्र.7 चे अहवालामधील कलम 11 इतर माहिती व निष्कर्ष या ठिकाणी कृषी अधिकारी यांनी जो निष्कर्ष दिलेला आहे, त्याचा विचार होता अर्जदार यांचेकडून प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर झाल्यामुळे पिकास फुलधारणा व फळधारणा झालेली नाही हे स्पष्ट होत आहे.
पान क्र.7 चा अहवाल व वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला नं.2 यांनी खराब व दोषयुक्त बियाण्याचे उत्पादन केलेले आहे ही बाब अर्जदार यांनी स्पष्टपणे शाबित केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद, आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.