::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-22 जुन, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष मे. कार्वी स्टॉक ब्रोकींग लिमिटेड यांचे विरुध्द अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याच्या आरोपा खाली ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हे मे. कार्वी स्टॉक ब्रोकींग लिमिटेड कंपनीचे हैद्राबाद आणि नागपूर येथील अनुक्रमे मुख्य कार्यालय आणि शाखा कार्यालय आहे. सदर कंपनी ही शेअर मार्केट आणि आर्थिक व्यवहार याचा व्यवसाय
करते. तक्रारकर्ता हा एक शेतकरी आहे. सन-1997 मध्ये त्याने बँक ऑफ इंडीयाचे 500 शेअर्स विकत घेतले होते परंतु त्याला ते शेअर्स स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करावयाचे नव्हते आणि म्हणून त्याने ते शेअर्स स्वतः जवळ ऑगस्ट-2012 पर्यंत ठेवले होते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, सन-2012 चे सुरुवातीला त्याला पैशाची गरज असल्याने तो बँक ऑफ इंडीया मध्ये त्या शेअर्सच्या रोखीकरणासाठी गेला होता, त्यावेळी बँकेच्या निर्देशा नुसार त्याने एक “Demat Account” उघडले, त्यासाठी त्याला विरुध्दपक्ष क्रं-1) चे नाव सांगण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं-2) कडून अन्सारी नावाच्या एका प्रतिनिधीने तक्रारकर्त्याशी “Demat Account” खाते उघडण्या संबधी ऑगस्ट-2012 मध्ये संपर्क केला. तक्रारकर्त्याने रुपये-1000/- भरुन “Demat Account” उघडले, त्यासाठी त्याच्या स्वाक्ष-या काही फॉर्मसवर घेण्यात आल्यात परंतु त्या फॉर्म संबधी संपूर्ण माहिती/कल्पना त्याला देण्यात आली नव्हती. तक्रारकर्त्याला ट्रेडींग कोड नंबर आणि आय.डी.नंबर देण्यात आला आणि त्याला संपूर्ण शेअर्स रोखीकरणासाठी सांगण्यात आले, त्यावेळी त्याच्या शेअर्सची एकूण किम्मत ही रुपये-1,60,000/- एवढी होती. विरुध्दपक्षाचे प्रतिनिधीने त्यानंतरची कारवाई पूर्ण करण्याचे आश्वासन तक्रारकर्त्याला दिले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, मार्च-2013 पर्यंत त्याच्या खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे त्याने चौकशी केली, त्यावेळी त्याला अशी माहिती मिळाली की विरुध्दपक्षाचा एक कर्मचारी फुलझेले याने तक्रारकर्त्याच्या खात्यातून काही बेकायदेशीर व्यवहार स्टॉक मार्केट मध्ये केला होता व त्यामध्ये शेअर्स विक्री करुन तक्रारकर्त्याने जितके पैसे स्टॉक मार्केट मध्ये लावले होते, त्या संपूर्ण रकमेचे नुकसान झाले. विरुध्दपक्षाचे प्रतिनिधी अन्सारी आणि फुलझेले यांनी त्याला झालेले नुकसान भरुन देण्याचे आश्वासन दिले परंतु त्यासाठी रुपये-25,000/- भरण्यास त्याला सांगण्यात आले, त्याप्रमाणे त्याने ती रक्कम विरुध्दपक्षाकडे भरली परंतु त्या नंतर दोन्ही प्रतिनिधीचां थांगपत्ता लागला नाही. तक्रारकर्त्याच्या खात्यात निरंक शिल्लक (Nil balance) दर्शविण्यात आले होते, ज्यावेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे या संबधी तक्रार केली त्यावेळी विरुध्दपक्ष क्रं-2) ने सर्व दोषारोप फुलझेलेवर लावलेत.
तक्रारकर्त्याचे म्हणण्या नुसार विरुध्दपक्षानीं वरील दोन्ही ईसमांचे मदतीने त्याची फसवणूक केली आणि त्याच्या खात्यातून शेअर्सची रक्कम स्टॉक मार्केट मध्ये गुंतवून त्याचे रुपये-1,85,000/- एवढया रकमेचे नुकसान केले, जी विरुध्दपक्षाची अनुचित व्यापारी पध्दती आहे आणि म्हणून त्याने या तक्रारीव्दारे विरुध्दपक्षा कडून वरील रक्कम व्याजासह परत मागितली असून झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मागितलेला आहे.
03. विरुध्दपक्षानीं तक्रारीला आपले लेखी उत्तर सादर केले आणि तक्रारीला प्राथमिक आक्षेप घेतला, त्यांचे प्राथमिक आक्षेपा नुसार ही तक्रार “ग्राहक तक्रार” म्हणून मंचा समक्ष चालू शकत नाही कारण तक्रारकर्ता हा एक गुंतवणूकदार आहे आणि म्हणून तो “ग्राहक” ठरु शकत नाही. शेअर्सचे खरेदी-विक्रीचा व्यवहार हा एक “व्यवसायिक व्यवहार” असून तो ग्राहक संरक्षण कायद्दाच्या कक्षेच्या बाहेर येतो. त्याशिवाय शेअर बाजारातील गुंतवणूक ही केवळ नफा कमाविण्यासाठीच केलेली असते आणि शेअर बाजारातील व्यवहार हा अंदाजित “Speculative” असतो, त्यामुळे तक्रारकर्त्याचा शेअर बाजारातील व्यवहार हा ग्राहक संरक्षण कायदाच्या कक्षे मध्ये येत नाही.
विरुध्दपक्षानीं पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्ता हा 1997 पासून स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करीत होता, त्याने 500 शेअर्स शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी खरेदी केले होते, त्यासाठी त्याने स्वतः “Demat Account” उघडले होते आणि सदर खाते उघडण्यासाठी त्याने “K.Y.C.Form” “Member Client Agreement” आणि “Risk Disclosure Document” भरुन दिले होते, त्याचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आय.डी. त्याच्या डिमॅट खात्या सोबत नोंदणी केला होता, ज्यामुळे त्याला त्याच्या खात्या मधून होणा-या संपूर्ण व्यवहाराची माहिती ताबडतोब मिळणार होती.
विरुध्दपक्षा तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्त्याने स्वतःहून शेअर्सची रक्कम ट्रेडींग खात्या मध्ये जमा केली आणि ते शेअर्स खरेदी विक्रीसाठी आणि त्याव्दारे नफा कमाविण्यासाठी निर्देश दिले होते. सन-2013 मध्ये शेअर बाजारातील आर्थिक स्थिती चांगली नव्हती आणि त्यामध्ये ब-याच शेअर्सच्या किमती घसरलेल्या होत्या परंतु भविष्यात काही फायदा होईल या आशेने त्याने पुन्हा रुपये-25,000/- रकमेची गुंतवणूक केली होती परंतु शेअर बाजार घसरल्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले, यामध्ये विरुध्दपक्षांचा कुठलाही दोष वा अनुचीत व्यापारी पध्दती नाही. सबब या सर्व कारणास्तव तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षां तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2 चे उत्तर, उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवज, लेखी युक्तीवाद आणि उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
:: निष्कर्ष ::
05. ज्याअर्थी विरुध्दपक्षाने ही तक्रार “ग्राहक तक्रार” म्हणून ग्राहक मंचा समक्ष चालविण्या संबधी आक्षेप घेतलेला आहे, तेंव्हा त्या आक्षेपावर सर्वप्रथम विचार करणे योग्य ठरेल. विरुध्दपक्षाच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, ग्राहक संरक्षण कायद्दा मध्ये केलेल्या “ग्राहक” या व्याख्येमध्ये तक्रारकर्ता बसत नाही याचे कारण असे आहे की, त्याने आपले शेअर्स स्टॉक मार्केट मध्ये नफा कमाविण्याचे उद्देश्याने गुंतविले होते म्हणून तो एक गुंतवणूकदार असल्याने त्याला “ग्राहक ” म्हणून संबोधिता येणार नाही.
06. विरुध्दपक्षा तर्फे आमचे लक्ष काही कागदपत्रांकडे वेधण्यात आले, त्याचे अवलोकन केल्यावर सर्व प्रथम हे लक्षात येते की, तक्रारकर्ता हा शेतकरी नाही तर त्याचा नर्सरीचा व्यवसाय आहे आणि त्याचे वार्षिक उत्पन्न हे रुपये-एक ते पाच लक्ष असे दाखविण्यात आलेले आहे. दुसरी बाब अशी आहे की, तो एकटा खातेधारक नसून त्याची पत्नी त्याच्या सोबत संयुक्त खातेधारक आहे या बाबी तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केलेल्या नाहीत.
07. विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या दस्तऐवजा मध्ये ईलेक्ट्रानिक कॉम्युनिकेशन साठी दिलेले अधिकारपत्र, आममुखत्यारपत्र, सी.डी.एस.एल. एग्रीमेन्ट, एन.एस.डी.एल.एग्रीमेन्ट, मोबाईल डिक्लरेशन आणि इंटरनेट अकाऊंट असे दस्तऐवज आहेत ज्याव्दारे हे स्पष्ट होते की, तक्रारकर्ता हा स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करीत होता आणि एस.एम.एस. व ईमेल व्दारे त्याला पाठविण्यात आलेल्या मॅसेजच्या प्रती सुध्दा हे दर्शवितात की, त्याने विरुध्दपक्षाकडे ट्रेडींग अकाऊंट उघडले होते आणि त्या अकाऊंट वरुन झालेल्या प्रत्येक व्यवहाराची सुचना त्याला देण्यात येत होती. आममुखत्यार पत्रा मध्ये तक्रारकर्त्याने स्पष्ट नमुद केलेले आहे की, त्याला शेअर बाजारात व्यवहार करावयाचा आहे आणि त्यासाठी त्याने विरुध्दपक्षाला आपले आममुखत्यार नेमले होते. या सर्व वस्तुस्थिती वरुन हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्ता नफा कमाविण्याचे उद्देश्याने स्टॉक मार्केट मध्ये शेअर्सची गुंतवणूक करीत होता आणि म्हणून तो ग्राहक संरक्षण कायद्दा अंतर्गत “ग्राहक ” या सज्ञेत बसत नाही. हे सर्वश्रुत आहे की, स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक ही अंदाजित “Speculative” असते आणि शेअर बाजारा मध्ये शेअरच्या किम्मती मध्ये रोज चढ-उतार होत असतो. शेअर बाजारात केलेली गुंतवणूक ही व्यवसायिक स्वरुपाची आणि नफा कमाविण्याचे दृष्टीने केलेली असते आणि म्हणून असा व्यवहार ग्राहक संरक्षण कायद्दाचे कक्षे बाहेर येत असतो, म्हणून विरुध्दपक्षाचे वकीलांनी घेतलेल्या उपरोक्त नमुद आक्षेपाशी आम्ही सहमत आहोत. सबब ही तक्रार “ग्राहक तक्रार” म्हणून ग्राहक मंचा समक्ष चालविण्यास योग्य नाही.
08. वरील कारणास्तव तक्रारीतील इतर मुद्दांचा विचार करण्याची गरज उरत नाही. तक्रारकर्त्याचे हे म्हणणे सपशेल चुकीचे दिसून येते की, त्याने घेतलेले शेअर्स स्वतःजवळच ठेवले होते आणि त्याची गुंतवणूक त्याने कधीही शेअर बाजारात केली नव्हती. ज्याअर्थी ही तक्रार “ग्राहक तक्रार” म्हणून ग्राहक मंचा समक्ष चालविण्यास योग्य नाही, त्याअर्थी ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे म्हणून तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री प्रभुदयाल रामखिलावन पांडे यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) मे. कार्वी स्टॉक ब्रोकींग लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय हैद्राबाद तर्फे कार्यकारी संचालक आणि अधिक-एक यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.