Dated the 30 Nov 2015
न्यायनिर्णय
(द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या )
- तक्रारदारांचे मालकीची खारटन रोड, ठाणे येथील सि.स.नं 14 व 13 अ व ब टिका नं 2 या जमिनीवर तळमजला अधिक एक मजली या सुमारे 80 चौ.फुट कारपेट मापाचे जागेमध्ये लॉंड्रीचा व्यवसाय करत होते. सदर जागा ही महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी पुर्णबांधणी योजनेनुसार विकसित करण्याचे ठरवले होते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांची वर नमुद केलेली मिळकत झोपडपट्टी विकास योजने अंतर्गत विकसित करण्यासाठी घेतली. या संदर्भातील करार ता.29/12/2006 रोजी करण्यात आला. सदर करारानुसार तक्रारदारांना सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या 80 चौ.फुट जागेच्या क्षेत्रफळाचे बदल्यात नविन इमारतीत तळमजल्यावर 80 चौ.फुट कारपेटचा दुकान गाळा विनामोबदला करारामध्ये नमुद केलेल्या सोई व सुविधेसह देण्याचे कबुल केले होते.
- सामनेवाले यांनी सन-2010 मध्ये इमारतीचे बांधकाम पुर्ण केले. तक्रारदारांना सामनेवाले यांनी गाळा नं 49 4x18 फुट मापाचा गाळा तात्पुरत्या स्वरुपात व्यवसायासाठी दिला परंतु सदर गाळा करारामध्ये ठरलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी जागेचा व नमुद केलेल्या सोई सुविधा उपलब्ध नसलेला असल्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले यांना ता.23/10/2010 रोजी नोटीस पाठवली परंतु सामनेवाले यांनी नोटीसला उत्तर दिले नाही. तसेच ता.29/12/2006 रोजीच्या करारानुसार तक्रारदारांना 80 चौ.फुट क्षेत्रफळाचा दुकानाचा गाळा करारामध्ये नमुद केलेल्या सोयी व सुविधासह दिलेला नाही. अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
- सामनेवाले यांच्या कैफियतीनुसार सामनेवाले यांनी करारामध्ये कबुल केल्यानुसार 80 चौ.फुट कारपेट क्षेत्रफळाचा दुकानाच्या गाळयाचा ताबा तक्रारदारांना दिला आहे. तक्रारदारांनी गाळयाचा ताबा ता.30/05/2010 रोजी स्विकारला आहे व ताबा पावती लिहुन दिली आहे, तसेच ठाणे महानगर पालिकेच्या शहर विकास विभागाने मंजुर केलेल्या नकाशा प्रमाणे कामाची पुर्तता केली आहे. ज्यांचे गाळे 500 चौ.फुटापेक्षा जास्त आहेत अशा वाणिज्य धारकाला स्वतंत्र संडास व स्नानगृह देण्याचे कबुल केले आहे. तक्रारदारांच्या उपस्थितीत गाळा क्र 49 ता.25/05/2010 रोजी सोडपध्दतीने निश्चित केला आहे.
- तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावाशपथपत्र, लेखी युक्तीवाद सामनेवाले यांची लेखी कैफियत यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद हाच तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. सामनेवाले तोंडी युक्तीवादाकरीता गैरहजर. सबब, अभिलेखावर उपलब्ध असलेल्या कागदपत्रावरुन मंच खालील प्रमाणे निष्कर्ष काढत आहे.
अ. तक्रारदारांना सामनेवाले यांनी ता.25/05/2010 रोजी सोडतपध्दतीने ओम श्री स्वामी समर्थ को ऑप हौ.सो.लि या सोसायटीचे इमारत क्र आर-2, गाळा क्र 49 चा ताबा दिलेला असून तक्रारदारांनी ताबा स्विकारला आहे. सामनेवाले यांनी ताबा पावती मंचात दाखल केली आहे. ताबापावती मध्ये सामनेवाले यांनी कायम स्वरुपी गाळा मिळणेकामी करारातील अटी व शर्तींचे पालन केले असून सर्व सुखसोई युक्त गाळयाचा ताबा सामनेवाले यांचेकडुन तक्रारदारांना प्राप्त झाल्यामुळे कोणतीही तक्रार नाही असे नमुद केले आहे.
ब तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तकारदारांना 18x4 फुट लांबी रुंदी व 9 फुट उंचीचा गाळा ताब्यात दिला आहे. तसेच करारामध्ये नमुद केल्यानुसार पोटमाळा, पावडर कोटींग शटर व स्वतंत्र्यपणे संडास व स्नानगृहाची सोय करुन दिली नाही. सामनेवाले यांनी कैफियत सोबत दाखल केलेल्या प्राथमिक पात्र सभासदांची यादीमध्ये तक्रारदारांचे नाव अ.क्र 45 येथे असून गाळयाचे क्षेत्रफळ 9x9 फुट म्हणजेच 81 फुट नमुद आहे. परंतु प्रत्यक्षात तक्रारदारांना 10 x 4 फुट लाबंट व गैरसोयीचा गाळयाचा ताबा दिला आहे.
क. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या प्राथमिक पात्र सभासदांच्या यादीप्रमाणे तक्रारदारांचे नाव अ.क्र 45 येथे असून जागेचे क्षेत्रफळ 9 x 9 असे नमुद केले आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या ताबा पावती नुसार तक्रारदारांना गाळा क्र 49 चा ताब दिल्याची बाब नमुद आहे. परंतु जागेचे क्षेत्रफळ व सोई सुविधाबाबतचा तपशिल नमुद नाही. तकारदारांना गाळयाचा ताबा मिळाल्यानंतर त्रुटी लक्षात आल्यामुळे त्यांनी सामनेवाले यांना ता.23/07/2009 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून त्रुटी संदर्भात विचारणा केल्याचे दिसते. परंतु सामनेवाले यांनी गाळयाचा ताबा दिल्यामुळे नोटीशीला उत्तर दिले नाही. असे लेखी कैफियतीमध्ये नमुद आहे.
ड. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या ताबापावती मध्ये गाळाचे क्षेत्रफळ व इतर सोई व सुविधा बाबतचा तपशिल नमुद नसल्यामुळे सामनेवाले यांनी ता.29/12/2006 रोजीच्या करारामध्ये नमुद केल्याप्रमाणे क्षेत्रफळ व सोई सुविधांसह तक्रारदारांना गाळा नं 49 चा ताबा दिल्याची बाब सिध्द होत नाही, असे मंचाचे मत आहे.
- तकारदारांना ता.29/12/2006 रोजीच्या करारामध्ये नमुद केल्यानुसार क्षेत्रफळ व सोई सुविधासह गाळा नं 49 चा ताबा सामनेवाले यांनी न देऊन त्रुटीची सेवा दिल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे.
सबब खालील आदेश
आ दे श
- तक्रार क्र. 355/2010 अंशतः मंजुर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी ता.29/12/2006 रोजीच्या करारामध्ये नमुद केल्यानुसार गाळा
नं 49 सोई सुविधासह न देऊन त्रुटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
- सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना ता.29/12/2006
रोजीच्या करारानुसार 80 चौ.फुट क्षेत्रफळाचा वाणिज्य स्वरुपातील जागेचा ताबा, दुकान गाळा 14 फुट उंचीचा तसेच 1/3 पोटमाळा असलेला, तसेच दुकान गाळयास पावडर कोटींग शटर, व गाळयाकरीता संडास व स्नानगृहाची सोय वगैरे सुविधासह ता.15/01/2016 पर्यंत द्यावा विहित मुदतीत ताबा न दिल्यास ता.16/01/2016 पासून ताबा देईपर्यंत सामनेवाले यांनी प्रतिमहा रु.1000/- रक्कम तक्रारदारांना द्यावी.
- सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासाची
रक्कम रुपये 50000/- तक्रारीच्या खर्चाची रक्कम रुपये 10000/- ता.15/01/2016 पर्यंत द्यावी विहित मुदतीत सदर रकमा अदा न केल्यास ता.16/01/2016 पासून 9% व्याज दरासहित द्याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्क देण्यात याव्यात.