निकालपत्र :- (दि.07/09/2010) (व्दारा-सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदाराने लेखी युक्तीवाद दाखल केला. अंतिम युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदारचे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला, सामनेवाला व त्यांचे वकील गैरहजर.
सदरची तक्रार सामनेवालांनी तक्रारदारांना फ्लॅटचे खरेदीपत्र व घोषणापत्र करुन न दिलेने दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-अ)यातील सामनेवाला यांची कोल्हापूर महानगर पालीका हद्दीतील रि.स.नं.598/2ब, बी वॉर्ड,प्लॉट नं.9, क्षेत्र 510.02 चौ.मि. या मिळकतीचे जागा मालक,बिल्डर डेव्हलपर असून सदर मिळकतीवर बांधणेत आलेल्या गौरीनंदन या अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.104 क्षेत्र 101 चौ.मि.यासी चतु:सिमा पुर्वेस-सदर अपार्टमेंटमधील फ्लॅट नं.101 व 103, पश्चिमेस-10 फुटी ओपन टू स्काय पॅसेज, दक्षिणेस-ओपन टू स्काय पॅसेज, उत्तरेस-ओपन टू स्काय पॅसेज. सदर फ्लॅटचे सामनेवाला बिल्डर यांनी बांधकाम पूर्ण केले आहे. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेबरोबर सदर फ्लॅट खरेदीसाठी दि.15/12/2001 रोजी रजिस्टर अग्रीमेंट टू सेल(करारपत्र) केले आहे. सदर करारपत्रातील अटी व शर्तीनुसार सदर फ्लॅट मिळकती असलेले संपूर्ण इमारतीचे घोषणापत्र(Deed of Delcaration) रजिस्टर करुन सदर फ्लॅटचे मिळकतीचे रजिस्टर खरेदीपत्र(Deep of Apartment) करुन देणेची कायदेशीर जबाबदारी सामनेवाला यांची होती व आहे. परंतु सामनेवाला यांनी सदर फ्लॅट मिळकती असलेले संपूर्ण इमारतीचे घोषणापत्र(Deed of Delcaration) व सदर फ्लॅटचे मिळाकतीचे रजिस्टर खरेदीपत्र (Deep of Apartment) पूर्ण करणेबाबत टाळाटाळ करीत आहेत. सदर फ्लॅट तक्रारदार यांचे कब्जात दिला. परंतु सदर फ्लॅट मिळकतीची कायदेशीर कागदोपत्री मालकी तक्रारदार यांची नसलेने सदर फ्लॅटमध्ये मूलभूत आवश्यक सुविधा(वीज-पाणी कनेक्शन) स्वत:चे नांवे घेणे तक्रारदारांना अडचणीचे झाले आहे. सदर फ्लॅटकरिता काही बँका, वित्तीय संस्था यांचेकडून अर्थ सहाय्य घेतले असून त्याप्रमाणे संबंधी कागदपत्रांची पूर्तता ठरले कालावधीत झाली नसलेमुळे तक्रारदारांना रक्कम रु.50,000/-इतके नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांना सदर फ्लॅटची रजिस्टर अग्रीमेंट टू सेल मध्ये नमुद केले प्रमाणे रक्कम रु.5,77,720/-चेकव्दारे दिलेली असून बाकी रक्कम रोख दिलेली आहे.तक्रारदार यांनी सामनेवाला यांना फ्लॅटची संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांची काहीही देय बाकी नाही. याचा गैरफायदा घेवून सामनेवाला हे कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करणेस टाळाटाळ करीत आहेत. सबब तक्रारदाराने सामनेवाला यांना दि.22/04/2008रोजी वकीलांमार्फत रजि.ए.डी.ने नोटीस पाठवली. सदर नोटीस सामनेवाला यांना दि.27/04/2008रोजी पोहचली. तरीही सामनेवाला यांनी तक्रारदारास सदर फ्लॅटचे खरेदीपत्र करुन दिलेले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारासोबत केलेल्या रजिस्टर अग्रीमेंट टू सेल मधील अटी व शर्तीप्रमाणे संपूर्ण इमारतीचे रजिस्टर घोषणापत्र नोंदणी करुन खरेदीपत्र पूर्ण करुन देणेची जबाबदारी सामनेवाला यांची असताना ते आपली जबाबदारी टाळत आहेत.सबब सामनेवाला यांनी सदर दावा मिळकत असलेल्या संपूर्ण इमारतीचे रजिस्टर घोषणापत्र करुन सदर फ्लॅट मिळकतीचे रजिस्टर खरेदीपत्र पूर्ण करुन देणेबाबत आदेश व्हावा; तसेच तक्रारदारचे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.50,000/-व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-व सामनेवाला यांनी सदर दोन्ही दस्तांची पूर्तता करणेस असमर्थत दर्शवलेस प्रस्तुत कामी कोर्ट कमिशनरव्दारे कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहेत. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ करारपत्र, सामनेवाला यांना पाठविलेली वकील नोटीस, सामनेवाला यांना रक्कम पोहोच झालेची पावती, फ्लॅट नं.3 च्या रजिस्टर्ड खरेदी पत्र दस्ताची इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार- अ)तक्रारदाराच्या तक्रारीतील मजकूर साफ खोटा चुकीचा असून तो सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही. प्रस्तुतची तक्रार 15/12/2001 रोजीच्या संचकारपत्राच्या आधारे दाखल केली असलेने मुदतीचा बाध येतो. सबब प्रस्तुतचा अर्ज चालणेस पात्र नाही. तक्रार अर्ज कलम 1 मधील मिळकतीचे वर्णन खोटे व चुकीचे आहे. कलम 2 मधील मजकूर साफ खोटा व चुकीचा आहे. कलम 3 मधील रक्कमेचा तपशील खोटा व चुकीचा आहे.कलम 4 ते 9 मधील मजकूर साफ खोटा व चुकीचा असून सामनेवाला यांस तो मान्य व कबूल नाही. ब) वस्तुत: सामनेवाला हे दावा मिळकतीचे मालक, बिल्डर, डेव्हलपर असून वर नमुद प्लॉट मिळकतीचे बांधकाम पूर्ण केलेचा मजकूर खरा व बरोबर आहे. दि.15/12/2001 रोजी तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दावा मिळकतीबाबत अग्रीमेंट टू सेल झालेले होते. त्यामध्ये नमुद अटी व शर्तीचे पालन करणेची जबाबदारी दोघांचीही होती व आहे. तक्रारदाराने संचकार पत्रामध्येच नोंद केलेप्रमाणे रक्कम रु.25,000/-चेकने व उर्वरित रक्कम रु.4,00,000/- करारपत्राच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत देणेचे तक्रारदाराने मान्य व कबूल केले होते. तसेच उर्वरित रक्कम रु.1,52,720/-खरेदीपत्राच्या वेळेस देणेचे होते.म्हणजेच रक्कम रु.5,52,720/-दि.15/03/2002चे आत तक्रारदाराने सामनेवाला यांना देणे कायदेशीररित्या बंधनकारक व आवश्यक होते. त्याप्रमाणे तक्रारदाराने ठरले मुदतीत रक्कम अदा न करुन कराराचा भंग केलेला आहे. त्यामुळे त्यास सदर करारपत्राच्या आधारे घोषणापत्र व खरेदीपत्र करुन मागणेचा कोणताही हक्क व अधिकार नव्हता व नाही. यास तक्रारदारच जबाबदार असलेमुळे त्यांना नुकसान सोसावे लागले हे मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने संचकारपत्रादिवशी म्हणजेच दि.15/11/2001 रोजी चेकने रक्क्म रु.25,000/-दि.04/02/2002 रोजी व दि.18/08/2003 रोजी अनुक्रमे रु.4,75,000/-व रु.50,000/-चेकने अदा केले आहेत. खरेदी रक्कम रु.5,77,000/- पैकी केवळ रु.5,50,000/- दिलेले आहेत. तक्रारदाराने कधीही 24-जानेवारी-2001, 05, 07, व 10 डिसेंबर-2002 रोजी अनुक्रमे रक्कम रु.25,000/-, 10,000/-, 40,000/-, 42,000/- सामनेवालांना दिलेले नव्हते. तसेच दि.05/12/2001 रोजी रु.25,000/- चा चेक दिलेला नव्हता. आजतागायत तक्रारदाराने सामनेवाला यांना रक्कम रु.6,67,000/- दिलेले नव्हते व नाहीत. क) सामनेवाला यांनी दावा मिळकतीमध्ये रु.34,000/- चे जादा कामकाज केलेले आहे. यामध्ये ग्रे मोझॅक ऐवजी व्हाईट मोझॅक, बाथरुम् टाईल्स, किचन कट्टा काम, वॉशबेसीन जवळील काम, दरवाजा बंद करणे व दुसरीकडे बसवणे, इलेक्ट्रॉनिक फिटींग, रंगकाम, पाणी व बोरींग कॉन्ट्रीब्युशन व लाईट कनेक्शन इत्यादीचे जादा कामकाज केलेले आहे. त्याप्रमाणे तक्रारदार हे खरेदीची उर्वरित रक्कम रु.27,720/- व जादा कामाचे रु.34,000/-असे एकूण रु.61,720/- सामनेवाला यांना देणे लागत होते व आहेत. सदर रक्कमेची सामनेवाला यांनी वेळोवेळी मागणी केली असता तक्रारदाराने त्यास टाळाटाळ केलेली आहे. सबब प्रस्तुतची रक्कम दि.16/03/2002 पासून ते दि.05/08/2008 पर्यंत 18 टक्के व्याजाप्रमाणे एकूण रु.1,32,542/-देणे लागत होते व आहेत. सामनेवालांनी तक्रारदारास दि.15/12/2007 पर्यंत दावा मिळकत खरेदी करुन देण्याचे कधीही आश्वासन दिेले नव्हते व नाही. त्याबाबत तक्रारदाराने त्यांचेकडे विचारणा केली व त्यास उडवाउडवीची उत्तरे दिली हे खोटे आहे. दि.22/04/2008 मधील मजकूर खोटा आहे. तक्रारदारास आर्थिक भुर्दंड सोसावा लागला व पार्कींग सुविधा विक्री केली हा मजकूर खोटा आहे. तक्रारदाराची कोणतीही मागणी मान्य करता येणार नाही. सबब तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा.तक्रारदाराकडून रक्कम रु.1,32,542/- वसुल होऊन मिळावेत तसेच मानसिक त्रासाबाबत रक्कम रु.50,000/- मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ आपले म्हणणे शपथपत्रावर दिलेले व कोणतेही कागदपत्रे प्रस्तुत कामी दाखल केलेली नाहीत. (6) तक्रारदाराची तक्रार व दाखल कागदपत्रे, लेखी युक्तीवाद युक्तीवाद, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे तक्रारदारांचा तोंडी व लेखी युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्देनिष्कर्षास येतात. 1. सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- अ) तक्रारदाराने दाखल केलेले दि.15/12/2001 चे अग्रीमेंट टू सेल करारपत्रावरुन कोल्हापूर महानगर पालीका हद्दीतील रि.स.नं.598/2ब, बी वॉर्ड,प्लॉट नं.9, क्षेत्र 510.02 चौ.मि. या मिळकतीचे जागा मालक,बिल्डर डेव्हलपर असून सदर मिळकतीवर बांधणेत आलेल्या गौरीनंदन या अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.104 क्षेत्र 101 चौ.मि.यासी चतु:सिमा पुर्वेस-सदर अपार्टमेंटमधील फ्लॅट नं.101 व 103, पश्चिमेस-10 फुटी ओपन टू स्काय पॅसेज, दक्षिणेस-ओपन टू स्काय पॅसेज, उत्तरेस-ओपन टू स्काय पॅसेज, एकूण मोबदला रक्कम रु.5,77,720/-ठरलेली होती व त्यापैकी रक्कम रु.25,000/- चेकने संचकारापोटी मिळालेचे तसेच रक्कम रु.4,00,000/-तीन महिन्याच्या आत व राहिलेली रक्कम रु.1,52,720/-खरेदीपत्राच्या वेळी देणेचे आहे असे नमुद केलेचे दिसून येते. ब) सामनेवालाने रक्कम रु.5,50,000/- मिळालेचे मान्य केले आहे. संचकारपत्राच्या वेळी चेकने रक्क्म रु.25,000/- दि.04/02/2002 रोजी रु.4,75,000/- व दि.18/08/2003 रोजी रु.50,000/- चेकने सामनेवाला यांना मिळालेचे त्यांनी लेखी म्हणणेमध्ये मान्य केले आहे. करारपत्रातील अटीनुसार दि.15/12/2001 रोजी कराराच्या वेळी सामनेवाला यांना रु.25,000/-मिळालेले आहेत. तदनंतर 3 महिन्याच्या आत म्हणजेच दि.15/03/2002 चे आत रु.4,75,000/- मिळालेले आहेत. म्हणजेच करारातील अटी व शर्तीनुसार रु.75,000/- ची जादा रक्कम सामनेवाला यांना मिळालेली आहे. अधिक रु.50,000/-अशी एकूण रु.1,25,000/-ची रक्कम सामनेवालास जास्तीची मिळालेली आहे. अटी व शर्तीप्रमाणे खरेदीपत्राच्या वेळी रु.1,52,720/- देणेचे होते. प्रस्तुत मिळकतीचे सामनेवालांनी अदयापही खरेदीपत्र करुन दिलेले नाही. मात्र उर्वरित रक्कमेपैकी रु.1,25,000/- सामनेवाला यांचेकडे आधीच जमा झालेले आहेत याची हे मंच गांर्भियाने दखल घेत आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या पावत्यांचे झेरॉक्स प्रतीचे अवलोकन केले असता दि.05/12/2001 रोजी रक्कम रु.25,000/-,चेक नं.048262 या कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक लि.शाखा-राजारामपूरीचे चेकने अदा केलेबाबतची नोंद दिसून येते.तसेच हस्तलिखीतामध्ये कल्पक बिल्डर जी.आर.जाधव दि.24/10/2001रोजी रक्कम रु.25,000/-, दि.05/12/2001 रोजी रक्कम रु.10,000/-, दि.07/12/2001 रोजी रक्कम रु.40,000/-, दि.10/12/2001 रोजी रक्कम रु.42,000/-असे रोखीत एकूण रक्क्म रु.1,17,000/-रोखीत जमा झालेचे दिसून येते व त्या नमुद पावतीवरील सही करारपत्रावरील सही उघडया डोळयांनी पाहिली असता सदर सहयामध्ये साम्य दिसून येते. सामनेवालांनी रक्कम रु.34,000/-चे जादा काम केलेची बाब तक्रारदाराने नाकारलेली आहे. त्यासाठी सामनेवाला यांनी कोणतीही पुरावा दिलेला नाही. तसेच प्रस्तुत दिलेल्या रक्कमांबाबत तक्रारदाराने आपल्या तक्रारीत मागणी केलेली नाही. युक्तीवादाच्या वेळीस तक्रारदाराने हिशोबाबाबत मला वाद करणेचा नसून मला माझे मिळकतीचे घोषणापत्र व खरेदीखत करुन मिळणे महत्वाचे असलेचे प्रतिपादन केले. क) वरील विस्तृत विवेचनानुसार सामनेवालांना कराराच्या अटी वशर्तीप्रमाणे संपूर्ण रक्कम मिळालेली आहेत व त्या वेळेत तक्रारदाराने अदा केलेल्या आहेत. तसेच नमुद फ्लॅटच्या खरेदीपोटीची मोबदला रक्कम पूर्णत: अदा केलेली आहे. तरीही सामनेवाला यांनी तक्रारदारास खरेदीपत्र करुन दिलेले नाही. ही सामनेवालांची सेवेतील गंभीर त्रुटी आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या फ्लॅट नं.3 च्या रजिस्टर दस्त् क्र.4137/07 च्या खरेदीपत्राच्या सत्यप्रतीवरुन प्रस्तुत भगवान शंकर निकम यांना दि.17/08/2007 रोजी नोंद खरेदीखत करुन दिलेचे दिसून येते. सबब तक्रारदाराच्या तक्रारीस यामुळे पुष्टीच मिळते. सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्कमा स्विकारुनही तक्रारदाराचे मिळकतीचे घोषणापत्र व नोंद खरेदीपत्र करुन न देऊन सेवेत गंभीर त्रुटी ठेवली असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवाला यांचे या सेवात्रुटीमुळे तक्रारदार हा झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवालांनी तक्रारदारास त्यांचे वर नमुद मिळकतीतील फ्लॅट क्र.104चे नोंद खरेदीपत्र करुन दयावे. (3) सामनेवालांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(रु.दहा हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |