raviraj laad filed a consumer case on 11 Aug 2015 against M/s JK. Plastics in the Satara Consumer Court. The case no is cc/12/116 and the judgment uploaded on 04 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 116/2012.
तक्रार दाखल ता.14-8-2013.
तक्रार निकाली ता. 11-8-2015.
1. रविराज दशरथराव लाड,
2. सौ. विजयमाला रविराज लाड,
दोघेही रा. मु.पो. डिस्कळ,
ता. खटाव, जि.सातारा. ....तक्रारदार.
विरुध्द
1. मे. जी.क्र.प्लॅस्टिक्स (रजि.पार्टनरशिप फर्म),
रजि. नं. MPA 37199,
मु.पो. ढाकळी ढोकेश्वर,
ता. पारनेर जि. अहमदनगर, तर्फे भागीदार-
2. श्री.नंदकुमार काशीनाथ गारुडकर,
3. श्री. जयसिंग काशीनाथ गारुडकर,
जा.नं.2 व 3 रा. ढाकळी ढोकेश्वर,
ता. पारनेर, जि.अहमदनगर,
4. श्री. श्रीराम तुळशीराम अनारसे,
मा. व्यवस्थापक, मे. जी.के.प्लॅस्टिक्स,
गट नं. 243/244, भाळवणी, ता. पारनेर,
जि. अहमदनगर. (वगळणेत आलेले)
5. डॉ. महेंद्र रामदास चेडे, पार्टनर/भागीदार,
मे. जी.के.प्लॅस्टिक्स,
रा. भाळवणी, ता. पारनेर,जि.अहमदनगर. ..... जाबदार.
तक्रारदारतर्फे – अँड.श्रीराम भालचंद देव.
जाबदार क्र. 1 ते 5 तर्फे- अँड.उमेश शिंदे.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यांनी पारित केला.
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे जाबदाराविरुध्द मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदारांचे तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे-
प्रस्तुत तक्रारदार हे मौजे डिस्कळ, ता.खटाव, जि.सातारा येथील रहिवाशी असून ते व्यवसायाने शेतकरी आहेत. तक्रारदार क्र. 1 यांचे नावे असलेले शेतीचे क्षेत्र खालीलप्रमाणे,
अ.नं. | गट नं. | क्षेत्र हे.आर. | पैकी हिस्सा |
1. | 706 | 2.38 | आठ आणे |
2. | 707 | 1.77 | आठ आणे |
3. | 705 | 0.25 | संपूर्ण |
4. | 1294 | 1.93 | संपूर्ण |
5. | 1292 | 0.98 | संपूर्ण |
तसेच तक्रारदार क्र. 2 यांचे नावे असलेले शेतीचे क्षेत्र,
अ.नं. | गट नं. | क्षेत्र हे.आर. | पैकी हिस्सा |
1. | 701 | 0.56 | संपूर्ण |
2. | 702 | 0.47 | संपूर्ण |
3. | 703 | 0.41 | संपूर्ण |
येणेप्रमाणे तक्रारदार यांचे नावे शेत मिळकती आहेत. त्यांनी शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेतक-यांच्या शेतीमध्ये सामुहिक शेततळे बांधण्याचे ठरवले व त्याप्रमाणे त्यांनी शासनाकडे अर्ज केलेवर त्याना त्यांचे वरील जमिनीपैकी गट नं. 705 मध्ये अंदाजे 5.00 हेक्टर लाभक्षेत्रासाठी शेततळे मंजूर झाले. त्याप्रमाणे त्यांनी विषयांकित गट नंबर मध्ये सन 2007 मध्ये शेततळे तयार केले व या तळयातील पाणी साठवण इतर मार्गानी झिरपून वगैरे वाया जावू नये म्हणून सदर तळयामध्ये घालण्यासाठी प्लॅस्टिक फील्मचा (पॉलीलायनर फिल्म) (HDPE)यातील जाबदारंचेकडून दि. 20/7/2007 रोजी खरेदी केला व त्याचे बील रु. 1,15,690 (रुपये एक लाख पंधरा हजार सहाशे नव्वद मात्र) जाबदारांना अदा केले. सदर कागदाचे दर्जाची कार्यक्षमतेची गॅरंटी वॉरंटी 5 वर्षाची गॅरंटी(warranty) यातील जाबदारांनी तक्रारदार यांना दिलेली होती. तक्रारदार यांचे कथनानुसार वरील जाबदारांकडून शेततळयामध्ये कागद बसवल्यानंतर विषयांकित शेततळयामध्ये पाणीसाठा केलेवर 4 एकर क्षेत्रास केळी, चिक्कू, आंबा इत्यादी फळझाडांची लागवड केली. प्रस्तुत तक्रारदार यांना अपेक्षीत उत्पन्न मिळू लागले. साधारण जुलै अखेरचे दरम्यान सन 2009 मध्ये कागद बसवलेनंतर (दोन वर्षांनी) विषयांकित शेततळयामधील पाणी झिरपून ते नाहीसे होवू नये म्हणून वापरलेला प्लॅस्टिक कागद फाटलेला, चिरलेला, खराब झालेचे व त्यातून साठवलेले पाणी झिरपूर जात असलेचे तक्रारदाराचे लक्षात आले. त्यांनी सदरची बाब जाबदारांचे नजरेस आणून दिली व प्रस्तुत जाबदारांना विषयांकित शेततळयास वापरलेला कागद हा 5 वर्षेची गॅरंटी असताना दोनच वर्षात खराब झाला असलेने तो त्वरीत बदलून द्यावा अशी मागणी केली. परंतु प्रस्तुत जाबदाराचे श्री. डोके या अधिका-यांनी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजाने प्रस्तुत तक्रारदार यांनी दि. 20/8/2009 रोजी मा. जिल्हा कृषी अधिक्षक व तालुका कृषी अधिकारी, खटाव(वडूज) यांना तक्रार पाठवली. त्याचप्रमाणे दि. 7/9/2009 रोजी पुन्हा यातील जाबदाराला तक्रारदार यांनी त्यांचा खराब झालेला प्लॅस्टीक पेपर त्वरीत बदलून देणेविषयी कळविले व प्रस्तुत जाबदारांनी त्याकडे पुन्हा दुर्लक्ष केले. त्याची प्रत कृषी जिल्हा व तालुका कृषी अधिका-यांना पाठवण्यात आली. त्या पत्राची दखल घेवून जिल्हा कृषी अधिकारी यांनी मा. उपविभागीय कृषी अधिकारी, सातारा यांना चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे सदर कृषी अधिकारी यांनी यातील जाबदारांना नोटीस देवून दि.23/10/2009 रोजी विषयांकित तलावातील बसवलेल्या प्लॅस्टिक फिल्मची कागदपत्रे घेवून हजर राहण्यास कळविले व त्याप्रमाणे जाबदार क्र. 1, गांवकामगार तलाठी, कोतवाल, तालुका कृषी अधिकारी,खटाव, मंडल कृषी अधिकारी,पुसेगांव, कृषी पर्यवेक्षक,पुसेगांव, कृषी सहाय्यक, खटाव, मंडल कृषी अधिकारी,पुसेगांव, कृषी पर्यवेक्षक, पुसेगांव, कृषी सहाय्यक,खटाव व गावातील पंच श्री. बापूराव कर्णे वगैरेचा उपस्थितीतील पंचनामा करण्यात आला. त्यामुळे विषयांकित शेततळयामध्ये वापरलेला कागद हा खराब झालेचे कृषी अधिका-यांचे लक्षात आले व तसा वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हा कृषी अधिकारी यांना पाठवण्यात आला. जिल्हा कृषी अधिकारी यांनी जाबदार यांना 30/10/2009 रोजी तक्रारदारांच्या विषयांकित शेततळयामधील खराब कागद बदलून देण्यास सांगितले. परंतु तो जाबदारांनी बदलून दिलेला नाही. म्हणून प्रस्तुत कामी खराब कागदाचे वापरामुळे वाया गेलेल्या पाण्यामुळे तक्रारदार यांचे शेतपिकांचे अपु-या पाणी पुरवठयामुळे पिकाचे उत्पादनात झालेले नुकसान रक्कम रु.7,93,431 खराब प्लॅस्टिक कागदाची किंमत रक्कम रु.1,15,690, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000 व वरील रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के व्याजदराने सन 2009 पासून व्याज मिळावे, अर्ज खर्चापोटी रक्कम रु.30,000 मिळावेत अशी विनंती मे. मंचास केलेली आहे.
3. प्रस्तुत तक्रारदारानी नि.1 कडे तक्रारअर्ज, नि. 29 कडे तक्रार दुरुस्त अर्जाची प्रत, नि. 2 व 3 कडे तक्रारीचे पृष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र, नि.5 कडे तक्रारदाराचे वकीलपत्र, नि. 6 कडे एकूण पुराव्याचे 44 कागद, प्रस्तुत तक्रारदारानी दाखल केले असून नि. 6/1 कडे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा यांचे शेततळयाच्या मंजूरीचे पत्र, नि. 6/2 कडे तक्रारदारांनी जाबदारांना दिलेल्या पैशाच्या हशिोबाबच्या पावत्यास, नि. 6/3 कडे जाबदारांनी तक्रारदारांना पुरवलेल्या प्लॅस्टि कागदाबाबत 5 वर्षे वॉरंटी दिलेबाबतचे पत्र, नि. 6/4 कडे तक्रारदारांनी जाबदाराला पाठवलेले रजि. पत्र, नि. 6/5 कडे सामनेवाला यांना सदरच्या नोटीस पोहोचलेची पोष्टाची पोहोचपावती, नि. 6/6 कडे तक्रारदारांनी पाठवलेले पत्र, नि. 6/8 कडे तक्रारदारांनी जाबदारांना खराडे वकीलामार्फत पाठवलेल्या नोटीसीची स्थळप्रत, नि. 6/10 कडे जिल्हा कृषी अधिकारी यांनी उपविभागीय कृषी अधिकारी यांना पाठवलेले पत्र, नि. 6/11 कडे उपविभागीय अधिकारी सातारा यांनी तक्रारदार व जाबदार यांना पाठवलेले पत्र, नि. 6/12 कडे दि.23/10/2009 रोजी केलेल्या शेततळयाचा पंचनामा, नि.6/13 कडे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना सादर केलेलया खराब प्लॅस्टिक फिल्मबाबतचा चौकशी अहवाल, नि.ञ 6/14 कडे जिल्हा कृषीअधिक्षक,सातारा यांनी तक्रारदार यांना पाठवलेले पत्र, नि. 6/16 ते नि. 6/36 अखेर प्रस्तुत तक्रारदारांनी शेती पिकासाठी खरेदी केलेली औषधे नर्सरीच्या पावत्या बि-बियाणांच्या पावत्या, इत्यादी कागदपत्रे दाखल केली असून नि. 6/37 व नि. 6/38 कडे अनुक्रमे विकास सोसायटीकडील पिककर्ज व मध्यम मुदत कर्ज यांचे दाखले, नि. 6/39 कडे रजिस्टर्ड फर्मचे सर्टिफिकेट, नि.6/40 कडे अँड. के.व्ही पाटील यांनी सामनेवाला याना पाठवलेल्या नोटीसची प्रत, सदर नोटीसीसचा जाबदार तर्फे अँड. सचिन सारडा यांनी दिलेल्या उत्तरी नोटीसीसची प्रत, नि. 6/42 कडे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,सातारा यांच्या निर्णयाची प्रत, नि. 6/43 कडे, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग,मुंबई यांचे निर्णयाची प्रत. नि. 6/44 कडे, तक्रारदारांच्या शेतीचे सातबाराची कागदपत्रे इ. कागदपत्रे पुराव्यासाठी तक्रारदारांनी दाखल केली असून नि.29 कडे दावा दुरुस्तीची प्रत दाखल केली आहे. येणेप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामातील नोटीसा यातील जाबदार क्र. 1 ते 5 यांना रजि.पोस्टाने मंचातर्फे पाठविण्यात आल्या. सदरची नोटीस जाबदारांना मिळालेली आहे. त्यापैकी जाबदार क्र. 1 यांना नोटीस मिळालेची पोष्टाची पोहोच पावती नि. 12 कडे जाबदार क्र. 2,3,4 यांना मिळालेली पोहोच पावती अनुक्रमे नि. 19,20,21 कडे दाखल आहे. प्रस्तुत तक्रारीमध्ये जाबदार क्र. 5 हे जाबदार क्र. 1,3,4 व 5 यांचे मुखत्यार म्हणून हजर झालेले आहे. त्यामुळे जाबदार क्र. 5 ला नोटीस काढणेची गरज नाही असा अर्ज तक्रारदारांनी दाखल केला. त्यामुळे जाबदार क्र. 5 यांना ते प्रकरणी हजर असल्यामुळे त्यांना नाटीस मिळालेली आहे हे स्पष्टपणे शाबीत होते. प्रस्तुत जाबदारांनी प्रकरणी हजर होवून नि. 13 कडे जाबदार क्र. 1 व 3 ते 5 यांनी त्यांचे आक्षेप व कैफियत दाखल केलेले असून त्यामध्ये त्यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज या कोर्टात चालणेस पात्र नाही. यापूर्वी प्रस्तुत तक्रारदारांनी याच ग्राहक मंचामध्ये तक्रार अर्ज क्र. 151/2010 दाखल केलेला होता. तात्कालीन वेळी या मंचाने यावर निर्णयही पारीत केलेला असून तक्रारदारांचा अर्ज फेटाळण्यात आलेला होता. त्यामुळे त्याच विषयावर अनुसरुन याच मंचामध्ये मुळ विषयावर पुन्हा तक्रार दाखल करण्यामुळे या तक्रारीस Res-Judicata चा बाध येतो. मा. राज्य आयोगांनी सदर विषयाबाबत तक्रारदारांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिलेली आहे. या कोर्टात त्यांना दाद मागण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी असे आक्षेप नोंदवलेले आहे. जाबदारांनी त्यांच्या आक्षेपाच्या पृष्ठयर्थ नि. 34 सोबत नि.34/1 कडे सी.पी.आर.213(3) पेज नं. 207 एन.सी. नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिर्डेसल कमशिन, न्यू दिल्ली यांचेकडील अन्सल हौसिंग अँन्ड कन्स्ट्रक्शन लि., वि. इंडियन मशिनरी कंपनी या कामामध्ये दिलेल्या न्यायनिर्णयाचा त्यांनी आधार घेतला असून त्याप्रमाणे तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी असे आक्षेप नोंदवलेले आहेत.
प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र. 1 यांचे मॅनेजर श्रीराम तुळशीराम अनारसे यांनी सदर कंपनीच्या कामाचा राजीनामा दिलेला असलेने त्यांचे नाव तक्रारीतून कमी करणेत यावे असा अर्ज व राजीनाम्याची प्रत प्रकरणी दाखल केलेली आहे.
5. यातील तक्रारदार यांची तक्रार त्या अनुषंगाने प्रकरणी दाखल केलेले पुरावे व तक्रारदार यांचे अर्जावर जाबदारांनी घेतलेले आक्षेप व त्यातील आशय यांचा विचार करता आमचेसमोर प्रस्तुत प्रकरण न्यायनिर्णय करणेसाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. प्रस्तुत तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक आहे काय? होय.
2. प्रस्तुत तक्रारीस Res-Judicata या तत्वाची बाधा येते काय? नाही.
3. प्रस्तुत जाबदारांनी या तक्रारदार यांना दर्जेदार दिले गॅरंटीप्रमाणे
शेततळयामध्ये वापरण्यासाठी जास्त वर्षे टिकणारा
(प्लॅस्टिक फिल्म)प्लॅस्टिक कागद त्याची पूर्ण किंमत
घेऊनही निकृष्ठ दर्जाचा प्लॅस्टिक कागद देवून
तक्रारदार यांस सदोष सेवा दिली आहे काय? होय.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर
कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 3-
6. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार हे तक्रारीच्या सरनामेत नमूद केलेल्या पत्त्यावरील रहिवाशी असून त्याठिकाणी त्यांची न्यायनिर्णय कलम 1 मध्ये दर्शविलेप्रमाणे शेतमिळकती असून त्याबाबतचा कागदोपत्री पुरावा नि. 6/45 कडे गांवकामगार तलाठी मोळ यांचेकडील दाखल केलेल्या साताबारा उतारे प्रकरणी दाखल केले आहेत. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार हे शेतकरी आहेत हे निर्विवादरित्या शाबीत होते.
6.2 प्रस्तुत तक्रारदार यांनी सन 2006-2007 साली महाराष्ट्र शासनाच्या शेतकारी लोकांसाठी “राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना” जाहीर केली. त्या योजनेप्रमाणे या योजनेत भाग घेणा-या शेतक-यांनी त्यांच्या शेतीमध्ये सामूहिक वापरासाठी शेततळे बांधून घ्यावे व त्यामधील साठवलेल्या पाण्यावर शेती पिकवावी अशी योजना होती. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार यांनी या शासनाच्या योजनेचा फायदा घेवून गट नं. 503 व 705 साठी गट नं. 705 मध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे शेततळे तयार केले. व सदर शेततळे शासनाचे मंजूरीप्रमाणे तयार केले ही बाब प्रस्तुत तक्रारदार यांनी नि. 6/1 कडील शासनाच्या जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, सातारा यांचे दि.23/2/2007 च्या पत्रावरुन शाबीत होते.
6.3 प्रस्तुत शेततळयामधील साठवलेले पाणी वाहून जावू नये म्हणून त्यामध्ये संरक्षणासाठी प्लॅस्टिक कागद (पॉलीलायनर फिल्म) बसविण्याचे ठरले. त्याप्रमाणे प्रस्तुत तक्रारदार यांनी यातील जाबदार कंपनीकडून 1780 स्क्वे.मी. चा रक्कम रु.1,15,690/- रुपयांला खरेदी केला. ही बाब जाबदारांच्या नि. 6/2,6/3,6/4 कडील प्रकरणी दाखल कागदपत्रांवरुन शाबीत होते. प्रस्तुत प्रकरणातील नि. 6/5 कडील प्रकरणी दाखल असलेला कागद पाहता, प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदारांना शेततळयासाठी पुरविलेल्या पॉलीमर फिल्मची वैशिष्टे सांगून सदर पेपरची गॅरंटी 5 वर्षांसाठी दिलेली होती. म्हणजेच तक्रारदारांनी त्यांच्या शेततळयाला वापरलेल्या कागदाची वापरमर्यादा दि. 20/7/2007 ते दि.20/7/2012 अखेर होती. या व्यवहारावरुन प्रस्तुत तक्रारदार हा जाबदाराचा ग्राहक असलेचे शाबित होते. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो. दरम्यानच्या काळात सन 2009 साली ज्यावेळी शेततळयामधले पाणी कमी होवू लागले त्यावेळी प्रस्तुत विषयांकीत तळयामध्ये घातलेल्या पॉलीमर पेपरची तक्रारदारानी तपासणी केली. त्यावेळी सदरचा प्लॅस्टिकचा कागद खराब झालचे, फाटलेचे त्याना दिसून आले. सदरची बाब प्रस्तुत तक्रारदार यांनी दि.7/9/2009 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, सातारा यांना कळविले व त्यापूर्वी यातील जाबदार यांना दि.7/9/2009 रोजी त्यांचेकडे तक्रार दाखल करुन त्यांनी पुरवलेला प्लॅस्टिकचा कागद त्यास पाच वर्षांची गॅरंटी असताना तो दोन वर्षांमध्येच फाटून चिरुन खराब झालेला आहे. त्यामुळे तो जाबदारांनी शेततळयावर येवून प्रत्यक्ष येवून, पाहणी करुन बदलून द्यावा अशी मागणी केली. जाबदारांना वारंवार विनंती करुनही तो जाबदारानी बदलून दिला नाही. म्हणून जिल्हा कृषी अधिकारी, सांतारा यांचेकडे प्रस्तुत तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे जिल्हा अधिक्षक,कृषी अधिकारी,सातारा यांनी, उपविभागीय कृषी अधिकारी, सातारा यांना प्रत्यक्ष जागेवर जावून पंचनामा करुन वस्तुस्थिती पाहणी करुन अहवाल देण्यास कळविले. या चौकशीची संपूर्ण कागपत्रे व अहवाल नि. 6/11 ते नि.6/15 कडे दाखल असून त्यावरुन विषयांकित शेततळयावरील तक्रारदारांनी घातलेला व जाबदारांनी पुरविलेला प्लॅस्टिकचा कागद खराब झालेला होता हे निःसंशयरित्या शाबीत होते व अशा खराब झालेल्या व गॅरंटीच्या मुदतीमध्ये असलेला खराब कागद प्रस्तुत तक्रारदार यांनी जाबदारंकडे वारंवार बदलून देणेचे मागणी करुनही तो त्यांनी तक्रारदारांना बदलून दिला नाही वा त्याची किंमत दिली नाही. त्यामुळे प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे हे निर्विवादपणे शाबीत होते. त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
6.4 प्रस्तुत प्रकरणी यातील तक्रारदार यांनी यापूर्वी याच मंचासमोर ग्राहक तक्रार अर्ज क्र. 151/2010 दाखल केला होता. त्याचा निकाल 17/9/2010 रोजी झाला. त्यामध्ये प्रस्तुत तक्रारदार यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. अर्जदार यांनी सदरचा कागद नगर येथून खरेदी केला असल्याने प्रस्तुत तक्रार अहमदनगर जिल्हयात चालणे आवश्यक होते. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार या मंचास चालविण्यास अधिकार नाहीत असे मत नोंदवून सदरची तक्रार फेटाळण्यात आली. या निकालजपत्राचा विचार करता, यातील जाबदार यांनी सद्यःस्थितीत दाखल केलेली तक्रारदाराची तक्रार चालणेस पात्र नाही त्यास Res-Judicata या तत्वाचा बाध येतो. त्यामुळे सदरची केस फेटाळून लावण्यात यावी असे कथन केले आहे या जाबदारांच्या आक्षेपाचा प्रस्तुत मंचानी अर्जदारांनी नि.7 कडे दिलेल्या उशीरामाफीच्या अर्जामध्ये विचारात घेवून Res-Judicata बाबत निर्णय दिलेला आहे. तरीसुध्दा याबाबत अधिक खुलासेवार बोलावयाचे झाल्यास ग्राहक संरक्षण कायदा हा इतर कायद्याव्यतिरिक्त अधिकचा कायदा आहे. त्यामधील तरतूदींना इतर कायद्यांचा बाध येत नाही. सिव्हील प्रोसीजर कोडच्या तरतूदी या ग्राहक कायद्याला लागू पडत नाहीत. ग्राहकाच्या सर्वोच्च कल्याणाच्या व हिताच्यादृष्टीने विचार करुन संक्षीप्त चौकशीच्या माध्यमातून तक्रारदाराची तक्रार निर्गत करणे हा ग्राहक कायद्याचा मुळ हेतू आहे. त्याच्या अनुषंगाने विचार केल्यास नि.6/43 कडील निकालपत्राचे विचार केल्यास पूर्वी फक्त मॅनेजर, जे.के. प्लॅस्टिक भाळवणी, ता.पारनेर जि.अहमदनगर यांच्याविरुध्द तक्रारदाराने तक्रार केली होती. त्यावेळी एकच जाबदार होता. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी एकूण 5 जाबदारांविरुध्द पुनःश्च तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे याठिकाणी Res-Judicata चा बाध येत नाही असेही आमचे स्पष्ट मत आहे. प्रस्तुत तक्रारदार यांनी मंचाच्या मुळ निकालावर 1234/2010 चे अपील मा. राज्य आयोग, मुंबई यांचेकडे दाखल केले होते. त्या अपिलामध्ये योग्य त्या फोरममध्ये किंवा सिव्हील कोर्टामध्ये तक्रार दाखल करण्याच्या अटीवरती प्रस्तुत तक्रारदार यांच्या विनंतीवरुन राज्य आयोगाने तक्रारदारांचे अपील निकाली काढले होते. याचा विचार करता, प्रस्तुत तक्रारीमध्ये तथ्य असलेने प्रस्तुतची तक्रार मंचाने दाखल करुन घेतली होती. त्यामुळे मुद्दा क्र. 3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो..
6.5- सदर तक्रारीतील तक्रारदारानी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत बांधलेल्या शेततळयाचे पाण्यावर प्रस्तुत तक्रारदारानी फळभाज्या लागवडीसाठी ठिबक सिंचन बसवले, त्याचा खर्च मशागत, रोपे, मजुरी तसेच जाबदारांचे सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदारांचे उत्पादनातील झालेली नुकसानीची एकूण रक्कम रु.7,93,931/- व जाबदारानी पुरवलेला निकृष्ट दर्जाचा प्लॅस्टीक कागद, तो बदलून न दिल्याने त्याची किंमत रु.1,15,690/-, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- या सर्वांवर ऑगस्ट 2009 पासून द.सा.द.शे.18% दराने होणारे व्याज व अर्जाचे खर्चापोटी रु.30,000/- मिळावेत अशी विनंती मंचाला केली आहे. याचा विचार करता उत्पन्नातील नुकसानीसाठी तक्रारदारानी प्रकरणी नि.6/15 ते 6/27 कडे रासायनिक खते, शेती औषधे यांच्या खरेदीच्या पावत्या, नि.6/30 व 6/31, 6/35, 6/36 कडे खते खरेदी पावत्या नि.6/33 व 6/34 कडे केळी रोपे खरेदी पावती दाखल केली आहे. याचा विचार करता तक्रारदारानी विषयांकित शेतमिळकतीमध्ये केळी पिकाचे उत्पादन घेतलेचे प्रकरणी उपलब्ध सातबारा चे उता-यावरुन स्पष्ट होते, ते गट क्र.701, 702, 1292 मध्ये घेतलेचे दिसते परंतु या पिकाचे जाबदाराने पुरवलेल्या खराब प्लॅस्टिक कागदाचे वापरामुळेच किती नुकसान झाले हे तक्रारदारानी पुराव्यानिशी शाबित केलेले नाही. प्रस्तुत प्रकरणी जाबदारानी पुरवलेला खराब कागद त्यानी बदलून न दिल्याने दुसरा वापरला ाि किंवा आहे त्या स्थितीत उपलब्ध पाण्यावर पिके घेतली हे तक्रारदारानी मंचापुढे स्पष्ट केलेले नाही. ज्याअर्थी आहे त्या परिस्थितीमध्ये जाबदारांच्या खराब प्लॅस्टिक कागदामुळे समजा 30% पाणी वाया जाऊन झिरपत असेल असे धरले तरी ठरलेल्या 70% पाण्यावर पिके उत्तम येऊ शकतात व या फळपिकांना वापरलेली रासायनिक खते व औषधे पहाता प्रस्तुत पिकाना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते व तेवढे पाणी विषयांकित शेततळयातून पुरवठा होत होता व त्यावर त्यानी त्याना अपेक्षित फलोत्पादन घेतलेले आहे व कोणतेही उत्पादनाची नुकसानी झालेली नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्टपणे दिसून येते. जर फळपिकाची नुकसानी झाली असती तर जिल्हा कृषी अधिकारी सातारा यांचेकडे तक्रार देऊन नुकसानीचे पुरावे तक्रारदाराना मंचात सादर करता आले असते, परंतु प्रस्तुत तक्रारदाराने असा कोणताही ठोस पुरावा सादर करुन त्यांचे फलोत्पादनाचे उत्पन्नास रु.7,93,431/- इतकी नुकसानी झाली आहे ही बाब ठोस पुराव्यानिशी शाबित केलेली नाही, तसेच या रकमेच्या मागणीपोटी तक्रारदार कथन करतात की, ठिबक सिंचन कार्यान्वित केली त्याचा खर्च, मशागत, रोपे, मजुरी याचा खर्च, व उत्पन्नातील नुकसानीपोटी रु.7,93,431/- मागतात परंतु खराब कागदाच्या या बाबीचा कोणताही संबंध उत्पन्न नुकसानीमध्ये येत नसल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे तक्रारदारांची सदर मागणी कायद्याने व पुराव्याअभावी फेटाळणेस पात्र असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. वरील कारणामुळेच मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.1,00,000/-(रु.एक लाख मात्र) त्यावर ऑगस्ट 2009 पासून द.सा.द.शे.18% व्याज या मागण्याही फेटाळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत मंच आला आहे त्यामुळे जाबदारानी तक्रारदाराना पाच वर्षे गॅरंटी पिरीयड असलेला प्लॅस्टीक कागद बदलून द्यावा किंवा त्याची किंमत रु.1,15,690/- (रु.एक लाख पंधरा हजार सहाशे नव्वद मात्र) व त्यावर द.सा.द.शे.6% दराने दि.20-8-2009 पासून संपूण रक्कम पदरी पडेपर्यंतचे व्याजासह व तक्रारअर्जापोटी रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत व तक्रार अंशतः मंजुरीस पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच आला आहे. त्याचप्रमाणे सदर कामातील जाबदार क्र.1 चे व्यवस्थापक जाबदार क्र.4 श्रीराम तुळशीदास अनारसे यानी राजीनामा दिला असल्याने या तक्रारीचे जबाबदारीतून त्याना वगळणेत येते.
7. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन यास अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. प्रस्तुत जाबदारांनी या तक्रारदार यांना दर्जेदार गॅरंटीप्रमाणे
शेततळयामध्ये वापरण्यासाठी जास्त वर्षे टिकणारा (प्लॅस्टिक फिल्म)प्लॅस्टिक कागद त्याची पूर्ण किंमत घेऊनही निकृष्ठ दर्जाचा प्लॅस्टिक कागद देवून तक्रारदार यांस सदोष सेवा दिली असल्याचे घोषित करणेत येते.
3. प्रस्तुत जाबदार क्र.1 ते 3 व 5 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना पुरविलेल्या निकृष्ट दर्जाच्या प्लॅस्टीक पेपरच्या नुकसानीपोटी त्याची किंमत रु.1,15,690/- व त्यावर दि.20-9-2009 पासून द.सा.द.शे.6% दराने होणारे संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
4. सदर प्रकरणाचे जबाबदारीतून जाबदार क्र.4 हे पगारी नोकर असलेमुळे त्यांना वगळणेत येते.
5. तक्रारदारानी त्यांचे पिकाचे नुकसान शाबित न केलेने तक्रारदारांची कलम 19 क मधील मागणी रद्द करणेत येते.
6. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 अन्वये जाबदाराविरुध्द दाद मागू शकतील.
7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 11-8-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.