द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
निकालपत्र
दिनांक 15 फेब्रुवारी 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून सदनिका क्र.5, क्षेत्रफळ 470 चौ.फुट, श्रावणी अपार्टमेंट, सिंहगड रोड, पुणे रक्कम रुपये 7,40,000/- देऊन खरेदी केली. दिनांक 23/7/2007 रोजी नोंदणीकृत करारनामा करण्यात आला. दिनांक 18/6/2010 रोजी जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिलेल्या ताबा पावती मध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ 470 चौ.फुटां ऐवजी 538.50 चौ. फुट दाखविण्यात आले. म्हणून दिनांक 3/11/2010 रोजी नोंदणीकृत दुरुस्त करारनामा करण्यात आला. श्री. आनंद पाटील, कन्सल्टींग सिव्हील इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर यांनी सदनिकेचे क्षेत्रफळ 470 चौ.फुटांऐवजी 538.50 चौ.फुट असल्याचे पत्र दिले. म्हणून तक्रारदारांनी श्री. अजय मदाने, गव्हर्नमेंट रजिस्टर्ड व्हॅल्युअर यांच्याकडून दिनांक 14/2/2011 रोजी सदनिकेची मोजणी करुन घेतली, त्यात सदनिकेचा कार्पेट एरिया 338.55 चौ.फुट व बिल्टअप एरिया 451.04 चौ.फुट असल्याचे अहवालात नमूद केले. जाबदेणार यांनी 77.10 चौ.फुट क्षेत्रफळ कमी देऊन रुपये 1,53,700/- तक्रारदारांकडून अधिक घेतले. तसेच जाबदेणार यांनी सांगितलेल्या सोई-सुविधा – एम एस डोअर फ्रेम, प्लश डोअर तसेच एम एस सेप्टी डोअर टू ऑल एन्ट्रन्स, श्रावणी बिल्डींगला लिफटची सुविधा दिलेली नाही. म्हणून तक्रारदारांनी वकीलांमार्फत दिनांक 5/5/2011 रोजी नोटीस पाठविली, परंतू उपयोग झाला नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 1,53,700/- त्यावरील 18 टक्के व्याज रक्कम रुपये 83,000/-, दुरुस्ती पत्राचा खर्च रुपये 5000/-, नुकसान भरपाई पोटी रुपये 1,00,000/- एकूण रुपये 3,41,700/- व तक्रारीचा खर्च रुपये 25,000/- मागतात.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द दिनांक 28/9/2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी मुळ करारनामा दिनांक 23/7/2007 ची प्रत दाखल केलेली आहे. त्यात सदनिकेचे क्षेत्रफळ 470 चौ.फुट किंमत रुपये 6,50,000/- नमूद करण्यात आलेले आहे. तर दुरुस्त करारनामा दिनांक 3/11/2010 च्या प्रतीचे अवलोकन केले असता सदनिकेचे क्षेत्रफळ 505.30 चौ.फुट बिल्टअप सोबत बाल्कनी 34 चौ.फुट नमूद केल्याचे दिसून येते. जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिनांक 18/6/2010 रोजी दिलेल्या ताबा पावतीचे अवलोकन केले असता त्यात त्यांना तक्रारदारांकडून सदनिकेचा संपुर्ण मोबदला रुपये 7,40,000/- प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे, तसेच सदनिकेचे क्षेत्रफळ 538.50 चौ.फुट नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांना रक्कम अदा केल्याबाबतचे स्टेटमेंटही दाखल केलेले आहे. श्री. अजय मदाने, गव्हर्नमेंट अॅप्रुव्हड रजिस्टर्ड व्हॅल्युअर्स यांच्या दिनांक 14/2/2011 च्या अहवालाचे अवलोकन केले असता त्यात तक्रारदारांच्या सदनिकेचे क्षेत्रफळ बिल्ट अप एरिया 451.4 चौ.फुट असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. यासर्वांवरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून विकत घेतलेल्या सदनिकेचे क्षेत्रफळ 470 चौ.फुटची किंमत रुपये 6,50,000/- ठरलेली होती. परंतू प्रत्यक्षात जाबदेणार यांनी तक्रारदारांना 451.4 चौ.फुटांचीच सदनिका दिल्याचे दिसून येते. जाबदेणार यांनी दुरुस्त नोंदणीकृत करारनामा दिनांक 3/11/2010 मध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ 505.3 चौ.फुट नमूद करुन तक्रारदारांकडून सदनिकेच्या मोबदल्यापोटी रुपये 7,40,000/- घेतल्याचे दिसून येते. यावरुन जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून जवळजवळ 35.30 चौ.फुटांसाठी, क्षेत्रफळ वाढले म्हणून रुपये 90,000/- अधिकचे घेतल्याचे स्पष्ट होते. परंतू प्रत्यक्षात 54.26 चौ.फुटांचे कमी क्षेत्रफळ तक्रारदारांना दिल्याचे दिसून येते. म्हणून जाबदेणार यांनी 35.30 चौ.फुटासाठी [505.30 चौ.फुट – 470 चौ.फुट] रुपये 90,000/- जास्तीचे घेतले. प्रत्यक्षात मात्र त्यांनी [505.30 चौ.फुट – 451.04 चौ.फुट = 54.26 चौ.फुट] एवढे क्षेत्रफळ कमी दिले. म्हणजेच 35.30 चौ.फुटासाठी रुपये 90,000/-, तर 18.50 चौ. फुटासाठी रुपये 45,000/- होतात. म्हणजेच जाबदेणारांनी तक्रारदारांकडून 35.30 चौ.फुटासाठी घेतलेले रुपये 90,000/- अधिक 54.26 चौ.फुट हे प्रत्यक्षात कमी दिलेले क्षेत्रफळासाठी [54.26 चौ.फुट – 35.30 चौ.फुट = 18.96 चौ.फुट] रुपये 45,000/- एकूण रुपये 1,35,000/- दयावेत असा आदेश मंच जाबदेणार यांना देत आहे. प्रत्यक्षात सदनिकेचे क्षेत्रफळ कमी असतांना करारानाम्यात चुकीची दुरुस्ती करण्यास तक्रारदारांना भाग पाडून त्यासाठी नोंदणी व इतर खर्च तक्रारदारांकडून करवून घेऊन प्रत्यक्षात कमी क्षेत्रफळाची सदनिका तक्रारदारांना दिली ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी ठरते व जाबदेणार यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. त्यामुळे निश्चितच तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/- दयावेत असा मंच जाबदेणार यांना आदेश देत आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांनी सोई-सुविधा दिलेल्या नाहीत असे जरी तक्रारीत नमूद केलेले असले तरी त्याबदृलचा पुरावा मंचात दाखल केलेला नाही, म्हणून तक्रारदारांची ही मागणी अमान्य करण्यात येत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या तक्रारदारांना कमी क्षेत्रफळ दिले म्हणून रक्कम रुपये 1,35,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
[3] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.