::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारीत दिनांक–10 एप्रिल, 2018)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष बिल्डर विरुध्द करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून न दिल्याचे कारणावरुन दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता सध्या गडचिरोली येथे राहत आहे परंतु त्याला नागपूर येथे कायम राहण्यासाठी घर बांधण्याचे दृष्टीने भूखंडाची आवश्यकता होती. विरुध्दपक्ष या फर्मचा भूखंड विकसित करुन ते विक्री करण्याचा व्यवसाय आहे. विरुध्दपक्ष फर्मचे भूखंड विक्रीचे जाहिराती वरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष इन्फ्राटेक रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड फर्मचे प्रस्तावित मौजा पिपरी, तालुका कुही, जिल्हा नागपूर येथील ले आऊट मधील भूखंड विकत घेण्याचे निश्चीत केले. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने विरुध्दपक्ष फर्म सोबत दिनांक-08 जुलै, 2008 रोजी भूखंड विक्री करार केला. करारा नुसार विरुध्दपक्षाचे प्रस्तावित मौजा पिपरी, तालुका कुही, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-01, सेक्टर-III, V.C.IV मधील भूखंड क्रं-41, एकूण क्षेत्रफळ-1453.14 चौरसफूट एकूण किम्मत रुपये-5,08,599/- मध्ये विकत घेण्याचे निश्चीत केले. तक्रारकर्त्या कडून इसारा दाखल दिनांका पर्यंत रुपये-1,78,000/- प्राप्त झाल्याचे विरुध्दपक्षाने करारात मान्य केले. उर्वरीत रक्कम प्रतीमाह रुपये-25430/- प्रमाणे 11 मासिक किस्तीमध्ये परतफेड करावयाची होती आणि उर्वरीत रक्कम रुपये-50,869/- विक्रीपत्र नोंदविण्याचे वेळी देण्याचे ठरले. शेवटची किस्त अदा केल्याचे दिनांका पासून 15 दिवसांचे आत विक्रीपत्र नोंदवावे लागेल असेही करारात नमुद आहे. विरुध्दपक्षाने करारात ले आऊट विकसित करण्याची जबाबदारी सुध्दा स्विकारली. करारामध्ये विक्रीपत्र नोंदणीचा खर्च हा खरेदीदार याला करावा लागेल असे नमुद आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले की, त्याच्या मध्ये आणि विरुध्दपक्ष फर्म मध्ये दिनांक-08 जुलै, 2018 रोजी “Memorandum of Understanding” चा लेख तयार करण्यात आला, त्यामध्ये विरुध्दपक्षाने असे आश्वासित केले की, भूखंडाची पूर्ण किम्मत दिल्या नंतर 30 महिन्या नंतर जर खरेदीदारास भूखंड परत करावयाचा असेल तर विरुध्दपक्ष तो भूखंड परत घेईल आणि त्याचे मोबदल्यात तक्रारकर्त्यास किमतीपोटी रुपये-10,17,198/- परत करेल.
त्यानंतर तक्रारकर्त्याने वेळोवेळी विरुध्दपक्षाकडे ले आऊट मंजूरी संबधाने विचारणा केली असता त्याने फक्त आश्वासने देऊन फक्त वाट पाहण्यास सांगितले. शेवटी कंटाळून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिनांक-27/03/2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून एम.ओ.यु. मध्ये आश्वासित केल्या नुसार वागण्यास सुचित केले परंतु विरुध्दपक्षाची नोटीस लेफ्ट या पोस्टाचे शे-यासह परत आली. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली, म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्षाला आदेशित करण्यात यावे की, त्याने करारा प्रमाणे नमुद एन.ए./टी.पी.मंजूरी प्राप्त विकसित भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून ताबा देण्याचे आदेशित व्हावे. परंतु असे विक्रीपत्र करुन देणे विरुध्दपक्षाला शक्य नसल्यास उभय पक्षां मधील झालेल्या एम.आ.यु. प्रमाणे विरुध्दपक्षाने करारातील भूखंड तक्रारकर्त्या कडून परत घेऊन त्याची आश्वासित किम्मत रुपये-10,17,198/- तक्रारकर्त्यास परत करावी.
(2) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- तसेच तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षा कडून मिळावा.
03. विरुध्दपक्षाचे नाव आणि पत्त्यावर दैनिक सकाळ दिनांक-11 ऑक्टोंबर, 2017 रोजीचे अंकातून जाहिर नोटीस प्रकाशित करुनही विरुध्दपक्ष मंचा समक्ष उपस्थित झाला नाही वा त्याने तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेली विधाने खोडून काढलेली नाहीत. विरुध्दपक्षा विरुध्द सदरची तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने प्रकरणात दिनांक-06.12.2017 रोजी पारीत करण्यात आला.
04. तक्रारकर्त्याने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला भूखंडापोटी दिलेल्या रकमांच्या पावत्यांच्या प्रती तसेच भूखंडाचा विक्री करार प्रत, मेमो ऑफ अंडर स्टॅन्डींगची प्रत, ले आऊट मॅप, तक्रारकर्त्याने पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, परत आलेल्या नोटीसचे पॉकीट अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे.
05. प्रस्तुत तक्रारी मध्ये त.क. तर्फे वकील श्री औरंगाबादकर यांचे सहकारी वकील श्री अहिर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
06. तक्रारकर्त्याची सत्यापनावरील वरील तक्रार तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रती इत्यादींचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले तसेच तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
07. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष फर्म सोबत (“विरुध्दपक्ष” म्हणजे इन्फ्राटेक रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, रजि.ऑफीस महात्मा फुले नगर, सोमलवाडा, वर्धा रोड, नागपूर तर्फे ऑथोराईज्ड सिग्नेटरी असे समजण्यात यावे) दिनांक-08 जुलै, 2008 रोजी भूखंड विक्री करार केला. करारा नुसार विरुध्दपक्षाचे प्रस्तावित मौजा पिपरी, तालुका कुही, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-01, सेक्टर-III, V.C.IV मधील भूखंड क्रं-41, एकूण क्षेत्रफळ-1453.14 चौरसफूट एकूण किम्मत रुपये-5,08,599/- मध्ये विकत घेण्याचे निश्चीत केले. तक्रारकर्त्या कडून इसारा दाखल दिनांक-08 जुलै, 2008 पर्यंत रुपये-1,78,000/- प्राप्त झाल्याचे विरुध्दपक्षाने करारात मान्य केले. उर्वरीत रक्कम (रुपये-3,30,599/-) प्रतीमाह रुपये-25,430/- प्रमाणे 11 मासिक किस्ती प्रमाणे येणारी रक्कम रुपये-2,79,730/- परतफेड करावयाची होती आणि उर्वरीत राहिलेली रक्कम रुपये-50,869/- विक्रीपत्र नोंदविण्याचे वेळी देण्याचे ठरले. तक्रारकर्त्याने या त्याच्या कथनाचे पुराव्यार्थ मौजा पिपरी, तालुका कुही, जिल्हा नागपूर येथील भूखंड खरेदी संबधाने उभय पक्षां मध्ये झालेल्या कराराची प्रत, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्म मध्ये भूखंडापोटी जमा केलेल्या रकमांच्या पावत्यांच्या प्रती आणि उभय पक्षां मध्ये झालेल्या एम.ओ.यु.ची प्रत पुराव्यार्थ दाखल केली, यावरुन त्याचे उपरोक्त कथनास पुष्टी मिळते.
08. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंडा संबधी जमा केलेल्या रकमे संबधात-
विरुध्दपक्षाने भूखंड विक्रीच्या करारनाम्यात तक्रारकर्त्या कडून करार दिनांक-08 जुलै, 2008 पर्यंत इसारा दाखल रुपये-1,78,000/- मिळाल्याची बाब मान्य केलेली आहे. याशिवाय तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्म तर्फे निर्गमित पावत्यांच्या प्रती पुराव्यार्थ दाखल केल्यात. करारा प्रमाणे भूखंडाची एकूण किम्मत रुपये-5,08,599/- एवढी आहे. दाखल पावत्यांच्या प्रतीं वरुन त्याने करारातील भूखंडापोटी विरुध्दपक्ष फर्म मध्ये दिनांक-22/06/2008 ते दिनांक-11/06/2010 या कालावधीत एकूण रुपये-4,06,000/- जमा केल्याची बाब सिध्द होते. तक्रारकर्त्याला अद्दापही विरुध्दपक्षाला करारा प्रमाणे भूखंडाची उर्वरीत रक्कम रुपये-1,02,599/- देणे बाकी आहे.09. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे, त्याच्या आणि विरुध्दपक्ष फर्म मध्ये भूखंड विक्रीपत्र कराराचे दिवशीच म्हणजे दिनांक-08 जुलै, 2018 रोजी “Memorandum of Understanding” चा लेख तयार करण्यात आला, त्यामध्ये विरुध्दपक्षाने असे आश्वासित केले की, भूखंडाची पूर्ण किम्मत दिल्या नंतर 30 महिन्या नंतर, जर खरेदीदारास भूखंड परत करावयाचा असेल, तर विरुध्दपक्ष तो भूखंड परत घेईल आणि त्याचे मोबदल्यात तक्रारकर्त्यास भूखंडाचे किमतीपोटी रुपये-10,17,198/- परत करेल. तक्रारकर्त्याने आपल्या या म्हणण्याचे पुराव्यार्थ एम.ओ.यु.ची प्रत दाखल केली, यावरुन त्याचे या कथनास पुष्टी मिळते.
10. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे त्याने वेळोवेळी विरुध्दपक्षाकडे ले आऊट मंजूरी संबधाने विचारणा केली असता फक्त आश्वासने देऊन फक्त वाट पाहण्यास सांगितले. शेवटी कंटाळून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिनांक-27/03/2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून एम.ओ.यु. मध्ये आश्वासित केल्या नुसार वागण्यास सुचित केले परंतु विरुध्दपक्षाची नोटीस लेफ्ट या पोस्टाचे शे-यासह परत आली. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याचे तक्रारकर्त्याने नमुद केले.
11. तक्रारकर्त्याचे तक्रारी संबधाने मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने विरुध्दपक्षाला नोटीसची सुचना मिळूनही तो न्यायमंचा समक्ष हजर झाला नाही वा त्याने लेखी निवेदन सुध्दा सादर केलेले नाही वा तक्रारीतील तक्रारकर्त्याची विधाने खोडून काढलेली नाहीत. या उलट तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीचे पुराव्यार्थ आवश्यक दस्तऐवजाच्या प्रती दाखल करुन आपले म्हणणे सिध्द केलेले आहे.
12. तक्रारकर्त्याने करार केलेल्या मौजा पिपरी, तालुका कुही, जिल्हा नागपूर येथील प्रस्तावित ले आऊट संबधाने विरुध्दपक्षाने एन.ए./टी.पी. मंजूरी आदेश प्राप्त केले किंवा नाहीत तसेच ले आऊट मध्ये विकासाची कामे केली किंवा नाहीत या संबधी कोणताही पुरावा ग्राहक मंचा समोर आलेला नाही. अशा परिस्थितीत विरुध्दपक्षाने करारा प्रमाणे मौजा पिपरी, तालुका कुही, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-01, सेक्टर-III, V.C.IV मधील भूखंड क्रं-41, एकूण क्षेत्रफळ-1453.14 चौरसफूट एन.ए./टी.पी.मंजूरी प्राप्त विकसित भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र, भूखंडाची एकूण किम्मत रुपये-5,08,599/- पैकी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्म मध्ये जमा केलेली एकूण रक्कम रुपये-4,06,000/- वजा जाता, उर्वरीत रक्कम रुपये-1,02,599/- तक्रारकर्त्या कडून स्विकारुन त्याचे नावे नोंदवून द्दावे परंतु असे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देणे विरुध्दपक्षाला शक्य नसल्यास उभय पक्षां मधील झालेल्या एम.ओ.यु. प्रमाणे विरुध्दपक्षाने करारातील भूखंड तक्रारकर्त्या कडून परत घेऊन त्याची आश्वासित किम्मत रुपये-10,17,198/- तक्रारकर्त्यास परत करण्याचे दिनांक-08 जुलै, 2018 रोजी उभय पक्षां मध्ये झालेल्या “Memorandum of Understanding” च्या लेखा मध्ये मान्य केलेले असल्याने एम.ओ.यु. प्रमाणे रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे परंतु तक्रारकर्त्याने करारातील भूखंडा संबधाने भूखंडाची एकूण किम्मत रुपये-5,08,599/- पैकी रुपये-4,06,000/- एवढी रक्कम (79.82%) जमा केलेली असल्याने त्या अनुपाता (%) प्रमाणे येणारी रक्कम रुपये-8,11,927/- आणि त्यावर एम.आ.यु. मध्ये ठरल्या नुसार भूखंडाची शेवटची किस्त जमा केल्याचा दिनांक-11.06.2010 पासून 30 महिन्या नंतर येणारा दिनांक-11.12.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह येणारी रक्कम विरुध्दपक्षा कडून परत मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. विरुध्दपक्षाने करारा नुसार बहुतांश 80% रक्कम प्राप्त होऊनही तक्रारकर्त्यास भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून न देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला तसेच दोषपूर्ण सेवा दिली, त्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्षां कडून मिळण्यास तो पात्र आहे.
13. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री लालजी महादेव मारटकर यांची, विरुध्दपक्ष इन्फ्राटेक रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, रजि.ऑफीस महात्मा फुले नगर, सोमलवाडा, वर्धा रोड, नागपूर तर्फे ऑथोराईज्ड सिग्नेटरी याचे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष इन्फ्राटेक रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, रजि.ऑफीस महात्मा फुले नगर, सोमलवाडा, वर्धा रोड, नागपूर तर्फे ऑथोराईज्ड सिग्नेटरी याला आदेशित करण्यात येते की, त्याने उभय पक्षांमध्ये झालेल्या दिनांक-08 जुलै, 2008 रोजी झालेल्या एग्रीमेन्ट आफ सेल करारा नुसार मौजा पिपरी, तालुका कुही, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-01, सेक्टर-III, V.C.IV मधील भूखंड क्रं-41, एकूण क्षेत्रफळ-1453.14 चौरसफूट एन.ए./टी.पी.मंजूरी प्राप्त विकसित भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र, भूखंडाची एकूण किम्मत रुपये-5,08,599/- (अक्षरी रुपये पाच लक्ष आठ हजार पाचशे नव्व्याण्णऊ फक्त) पैकी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्म मध्ये जमा केलेली एकूण रक्कम रुपये-4,06,000/- (अक्षरी रुपये चार लक्ष सहा हजार) वजा जाता उर्वरीत रक्कम रुपये-1,02,599/- (एक लक्ष दोन हजार पाचशे नव्व्याण्णऊ फक्त) तक्रारकर्त्या कडून स्विकारुन करारातील भूखंडाचे नोंदणीपत्र विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून द्दावे. भूखंड विक्रीपत्र नोंदविण्यासाठी लागणारी नोंदणी फी व मुद्रांक शुल्काचा खर्च तसेच शासनमान्य देय विकासशुल्काचे रकमेचा खर्च तक्रारकर्त्याने स्वतः सहन करावा.
3) विरुध्दपक्ष इन्फ्राटेक रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर तर्फे ऑथोराईज्ड सिग्नेटरी याला करारातील मौजा पिपरी, तालुका कुही, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-01, सेक्टर-III, V.C.IV मधील भूखंड क्रं-41, एकूण क्षेत्रफळ-1453.14 चौरसफूट एन.ए./टी.पी.मंजूरी प्राप्त विकसित भूखंडाचे नोंदणीकृत काही कायदेशीर व तांत्रिक कारणामुळे तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देणे शक्य नसल्यास उभय पक्षां मध्ये झालेल्या दिनांक-08 जुलै, 2008 चे “Memorandum of Understanding” च्या लेखा मध्ये मान्य केल्या प्रमाणे तक्रारकर्त्याने करारा नुसार भूखंडाच्या एकूण किमती पैकी प्रत्यक्ष्य जमा केलेल्या रकमेच्या अनुपाता (79.82%)प्रमाणे भूखंडाची येणारी रक्कम रुपये-8,11,927/- (अक्षरी आठ लक्ष अकरा हजार नऊशे सत्ताविस फक्त) दिनांक-11.12.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह मिळून येणारी रक्कम विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला परत करावी.
4) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष इन्फ्राटेक रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर तर्फे ऑथोराईज्ड सिग्नेटरी याने तक्रारकर्त्यास द्दावेत.
5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष इन्फ्राटेक रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर तर्फे ऑथोराईज्ड सिग्नेटरी याने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.