जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 373/2010.
तक्रार दाखल दिनांक :18/06/2010.
तक्रार आदेश दिनांक : 18/04/2012.
निकाल कालावधी: 01 वर्षे 10 महिने 00 दिवस
श्री. शंकर खंडप्पा हर्डीकर, वय 40 वर्षे, व्यवसाय : व्यापार,
रा. संगोळगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
मे. इंडसइंड बँक लि., शॉप नं. जी-11, दमाणी शॉपींग
कॉम्प्लेक्स, साऊथ कसबा, दत्त चौक, सोलापूर.
(नोटीस मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: डब्ल्यू.बी. खान
विरुध्दपक्षयांचेतर्फेविधिज्ञ:के.एम. डोले (Dolle)
निकालपत्र
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्ययांचे द्वारा :-
1. अर्जदार शंकर खंडप्पा खर्डीकर हे मौजे संगोळगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथील रहिवाशी आहेत व त्यांनी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये ‘बँक’) यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी बँकेकडून लोन करुन रक्कम रु.1,05,000/- घेतले व दि.24/10/2007 रोजी अॅपे नांवाचा रिक्शा खरेदी केला व त्याचा नियमीत हप्ता रक्कम रु.4,191/- हा पहिल्या वर्षी व दुस-या वर्षी रक्कम रु.3,891/- तसेच बँकेने अॅपेचा विमा उतरवून त्याचा प्रिमियमही घेतलेला आहे. दि.5/12/2009 रोजी अर्जदाराच्या अॅपे रिक्शाचा अपघात झाला आणि त्याच्या दुरुस्तीसाठी रक्कम रु.9,668/- खर्च झाले. त्यानंतर अर्जदाराने अॅपेच्या इन्शुरन्स रिन्युअलची रक्कम बँकेला दिली. पण बँकेने विमा नुतनीकरण केले नाही. त्यानंतर अर्जदाराला कळले की, बँकेने अर्जदाराची अॅपे रिक्शा दि.26/10/2008 ते 25/10/2009 पर्यंत रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स कंपनी यांचेकडे व दि.28/12/2009 ते 27/12/2010 पर्यंत चोलोमंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी यांचेकडे संरक्षीत आहे. परंतु बँकेने विमा नुतनीकरण केला नाही. ही चूक सोलापूर बँकेचे मॅनेजर श्री. कुलकर्णी यांनी केली, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. त्यानंतर बँकने अर्जदाराची अॅपे दुरुस्त करुन दिली. परंतु नुकसान भरपाई देण्यास बँकेने नकार दिला. त्यानंतर अर्जदाराने दि.28/4/2010 रोजी विधिज्ञांमार्फत नोटीस पाठवली. त्याचे उत्तर चुकीच्या आधारावर दि.20/5/2010 रोजी दिले आणि त्यामुळे बँकेने सेवेत त्रुटी केलेली आहे आणि नुतनीकरणाची रक्कम बँकेकडे दिलेली असतानाही त्यांनी अॅपेचे नुतनीकरण केलेले नाही. म्हणून अर्जदाराने प्रस्तुत तक्रारीमार्फत रु.9,668/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अर्जदारास बँकेकडून देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केलेली आहे.
2. बँकेने त्यांचे म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणण्यानुसार सदर तक्रार अर्ज खोटा, बनावट, चुकीचा, गैरलागू व बेकायदेशरी आहे आणि फेटाळण्यास योग्य आहे. बँकेचे म्हणण्यानुसार दि.26/10/2007 रोजी कर्ज करार क. एमएसएए 20779 केला व कर्जाची रक्कम व्याजासह 35 हप्त्यात परत करण्याकरिता रक्कम रु.1,42,185/- चा करार झालेला आहे. कराराप्रमाणे कर्ज हप्ते 21 ते 37 हप्ते दरमहा रु.3,891/- भरलेले नाहीत. त्यामुळे बँकेचे थकबाकीदार आहेत. वेळेवर रक्कम भरलेली नाही. दि.21/8/2010 रोजी अर्जदाराकडे एकूण रक्कम रु.19,967/- एवढी रक्कम शिल्लक आहे. अर्जदाराचे बँकेने विमा डिपॉजीट दिलेले आहे, इन्शुरन्स प्रिमियम नाही. अर्जदाराने गाडी ही नुतनीकरणाशिवाय बेकायदेशीरपणे चालवत होता. बँकेच अधिकारी श्री. अनूप शिंदे यांनी अर्जदारास विमा नुतनीकरणाकरिता फोनवर संपर्क साधल्याने अर्जदाराने स्वत: विमा काढून घेतो, असे सांगितले व विम्याचे नुतनीकरण केलेले नाही. त्यामुळे अपघातग्रस्त वाहनाचे नुकसान हे वाहन धारकानेच सोसावे लागेल. बँकेचे असेही म्हणणे आहे की, अर्जदाराच्या गाडीचा विमा रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स कंपनीचे दि.16/10/2008 ते 25/10/2009 पर्यंत काढलेला आहे. त्यानंतर चोलोमंडलम जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा दि.28/12/2009 ते 27/12/2010 पर्यंत काढलेला आहे. सदर दोन्ही विमा कंपन्याचा विमा उतरविताना अर्जदाराने बँकेस संमती दिल्यावरच काढलेला आहे, असे बँकेचे म्हणणे आहे. त्यांनी त्रुटीयुक्त सेवा दिलेली नाही. त्यामुळे सदरची तक्रार रु.5,000/- खर्चासह खारीज करावी, अशी विनंती बँकेने केलेली आहे.
3. अर्जदाराची तक्रार, शपथपत्र, अर्जदाराची नोटीस, नोटीसचे उत्तर, स्मार्ट कार्ड, आर.सी. बूक, पॉलिसी, पॉलिसी कव्हरनोट, अॅपे दुरुस्त केलेल्या पावत्या, लेखी निवेदन, शपथपत्र, लोन अॅग्रीमेंट ऑफ व्हेईकल, नोटीसचे उत्तर, अर्बिट्रेटरकडे प्रकरण पाठविण्याचा अर्ज, अनूप शिंदे यांचे शपथपत्र इ. कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता, त्याचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. अर्जदाराने अॅपे पिक-अपचे नियमीत हप्ते भरल्याचे
सिध्द होते काय ? नाही.
2. अर्जदाराला देण्यात येणा-या सेवेत इंडस बँकेने
त्रुटी केली काय ? नाही.
3. अर्जदार अॅपे पिक-अपची नुकसान भरपाई
मिळविण्यास पात्र आहेत काय ? नाही.
4. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 :- अर्जदाराने इंडस बँकेकडून लोनवर अॅपे पिक-अप ही गाडी खरेदी केली. परंतु त्या अॅपे पिक-अप गाडीचे इंडस बँकेने लावून दिलेले हप्ते कराराप्रमाणे भरलेले आहेत, याच्या पृष्ठयर्थ कसलेली व कोणतेही कागदपत्रे पुरावा म्हणून दाखल केलेले रेकॉर्डवर दिसून येत नाही. त्यामुळे अॅपे पिक-अपचे नियमीत हप्ते भरलेले नाहीत, हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
5. मुद्दा क्र. 2 :- अर्जदाराने इंडस बँकेकडे अॅपे पिक-अपचे हप्ते नियमीत भरलेले नसतानाही व विमा पॉलिसीचे नुतणीकरणासाठीही प्रिमियम भरला याच्या पृष्ठयर्थ कसलाही पुरावा दिलेला नाही. असे असताना इंडस बँकेने अर्जदाराला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली, असे म्हणणे संयुक्तिक व योग्य वाटत नाही. म्हणून त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
6. मुद्दा क्र. 3 व 4 :- वरील सर्व विवेचनावरुन या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की, अर्जदार त्यांची तक्रार सिध्द करु शकले नाहीत व अॅपे पिक-अपचे नुकसान भरपाई मिळण्यास अपात्र ठरतात. म्हणून खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
3. उभय पक्षकारांना आदेशाची सही-शिक्क्याची प्रत नि:शुल्क द्यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/पुलि/18412)