तक्रारदार : त्यांचे वकील श्रीमती इंदू वर्मा मार्फत हजर.
सामनेवाले : सा.वाले क्र.1 एकतर्फा. सा.वाले क्र.2 गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी सा.वाले क्र 2 यांचेकडे रूम बुकींग केली. बुकींगच्या वेळी सा.वाले यांना रूम बुकींग हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून तिकीट मिळण्यावर अवलंबून आहे याची कल्पना दिली. त्यामूळे क्रेडीट कार्डद्वारे व्यवहार करतांना आवश्यक असलेले CVV नंबर सा.वाले क्र 2 यांना दिला नाही. परंतू क्रेडिट कार्ड नंबर दिला.
2. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार त्यानंतर परतीचे तिकीट, सा.वाले क्र. 2 यांचेकडे रूम बुक केल्यानंतर तीन तासातच निश्चित झाले. त्यामूळे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे केलेले रूम बुकींग रद्द केले.त्यावेळेस रूम बुकींग हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे हे कळवूनही सा.वाले क्र. 2 यांचेकडून तक्रारदारांचे सेक्रेटरी श्री.धूपकर यांना असे कळविण्यात आले की, रूम बुकींग बद्दलचे 75% रक्कम म्हणजेच रू.9,633/-,कपात केले जातील. तक्रारदारांना सा.वाले क्र. 2 यांची ही अट मान्य नव्हती. त्यामूळे तक्रारदारांनी सा.वाले क्र. 2 यांना तक्रारदारांनी रूम वापरली नसल्याकारणाने रू.9,633/-घेऊ नये याबद्दल विनंती केली.
3. तक्रारदारांनी सा.वाले क्र 2 हे रूम बुकींगची रक्कम क्रेडीट कार्डच्या व्यवहारातून वळते करून घेतील या विचाराने तक्रारदार यांनी दि.10जून 2007 रोजी लगेचच 24तासाच्या आत सा.वाले क्र.1यांचेकडे झालेल्या घटनेचे स्पष्टीकरण देऊन सा.वाले क्र. 1 यांना तक्रारदारांचे क्रेडीट कार्ड अचलीत(De-active) करण्यास सांगीतले व तसेच सा.वाले क्र. 2 यांचेकडून कोणतेही अनाधिकृत वजावट करू नये याबद्दल सूचना दिली. त्यानंतर पुन्हा दि. 11 जून 2007 रोजी तक्रारदार यांनी त्यांचे क्रेडीट कार्ड अचलीत(De-active) केले आहे की नाही याबद्दल चौकशी केली असता सा.वाले क्र 1यांनी कॉम्पुटर नेटवर्क बंद असल्याने त्यांना कस्टमर सर्व्हिस सेलकडे कॉनटॅक्ट करण्यास सांगीतले.
4. दि. 12 जून 2007 रोजी व दि. 13 जून 2007 रोजी तक्रारदारांच्या सेक्रेटरीस सा.वाले क्र 2 यांनी रूम बुकींगचे रू.9,633/-,बिल व सही न केलेले चार्जस्लिप पाठविले. दि. 13 जून 2007 रोजी सा.वाले क्र. 2 यांचेकडून ई-मेल मिळाल्यानंतर लगेचच तक्रारदार यांनी सा.वाले क्र.1 यांच्या क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटकडे चौकशी केली असता सा.वाले यांनी असे सांगितले की, अद्याप सा.वाले क्र. 2 यांचेकडून पैसे वळते करण्याची मागणी केलेली नाही व त्यांनी तक्रारदारांचा क्रेडिट कार्ड अचलीत ((De-active)),केलेला आहे.
5. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार त्यांनतर तक्रारदारांना सा.वाले क्र 1 यांचेकडून दि. 26 जून 2007 चे विवरणपत्र मिळाले. त्यामध्ये तक्रारदारांनी सा.वाले यांना क्रेडिट कार्ड अचलीत(De-active)),करण्याबद्दल व नमूद केलेले व्यवहारासंबधीचे रक्कम वजावट न करण्याबद्दल सूचना देऊनही सा.वाले क्र 1 यांनी तक्रारदारांच्या क्रेडिट कार्डद्वारे खात्यामधून रू.9,633/-रक्कमेची वजावट केली होती.
6. त्यानंतर तक्रारदार यांनी सा.वाले यांचेशी वारंवार संपर्क साधून केलेल्या रक्कमेची बेकायद्येशीर वजावट पुन्हा खात्यामध्ये जमा करावी याबद्दल विनंती केली व रिकव्हरी एंजटकडून होणारा त्रास थांबावा अशी विनंती केली.
7. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले क्र 1 यांनी सा.वाले क्र 2 यांचेशी संगनमत करून रक्कमेची वजावट न करण्याबद्दलची सूचना व क्रेडिट कार्ड अचलीत(De-active)),करण्याबद्दल सूचना देऊनही तक्रारदारांच्या खात्यातील रक्कमेची वजावट केली त्यामूळे तक्रारदार यांनी सा.वाले क्र 1 व 2 यांचेविरूध्द प्रस्तुत मंचासमोर तक्रार अर्ज दाखल करून रू.9,633/-,व्याजासह विलंब फी व सर्व्हिस टॅक्ससह पुन्हा तक्रारदारांच्या खात्यात जमा करावे व तसेच तक्रारदारांना झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल 11 लाख 40 हजार रूपये 18% व्याजदराने व्याजासह परत करावे. अशी मागणी केली.
8. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी नोटीस मंचाकडुन पाठविण्यात आली. सा.वाले यांना पाठविलेली नोटीस मिळाली त्याची पोचपावती अभिलेखावर दाखल आहे. नोटीस मिळूनही सा.वाले क्र 1 गैरहजर राहिले. व कैफियत दाखल केली नाही. म्हणून सा.वाले क्र. 1 यांचेविरूध्द तक्रार अर्ज एकतर्फा निकाली काढण्यात यावा असा आदेश पारीत करण्यात आला. नोटीशीस अनुसरून सा.वाले क्र. 2 यांनी पोस्टाद्वारे कैफियत मंचाकडे पाठविली.
9. सा.वाले क्र. 2 यांच्या म्हणण्यानूसार प्रस्तुत तक्रार या ग्राहक मंचाच्या भौगोलीक क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येत नाही. तक्रारीस कारण हे न्यू दिल्ली येथे घडले आहे. तसेच तक्रारदार हे ग्राहक नाही. कारण तक्रारदारांनी कोणतीही सेवा घेतलेली नाही. त्यांनी फक्त रूम बुकींग केले व रूम बुकींग रद्दबातालीबद्दल तक्रारदार हे मोबदला देण्यास जबाबदार आहेत. तसेच सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी घटना घडल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीनंतर तक्रार दाखल केली त्यामूळे तक्रार विलंबाने दाखल केलेली आहे. यावरील कारणावरून तक्रार अर्ज रद्दबातल करावा अशी मागणी केली.
10. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, अनुषंगिक कागदपत्रे, शपथपत्र व सा.वाले क्र 2 यांची कैफियत याची पडताळणी केली. करून पाहिली असता निकालासाठी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली आहे हे सिध्द करतात काय? | होय. |
2 | तक्रार अर्जात केलेल्या मागणीस तक्रारदार पात्र आहेत काय? | होय.अंशतः |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा
11. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदाराना दिल्ली ते मुंबई परत विमान प्रवासाने यावयाचे होते त्यावेळेस त्यांचे विमान प्रवासाचे तिकीट प्रतिक्षा यादीत होते. तिकीट निश्चित होण्याची शक्यता नव्हती म्हणून तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांचेकडे रूम बुक केले. रूम बुकींगच्या वेळी तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 यांना रूम बुकींग तात्पुरत्या स्वरूपाची असून ते तिकीट मिळण्यावर अवलंबून राहील याबद्दलची कल्पना दिली. व तक्रारदारानी सा.वाले क्र. 2 यांना फक्त क्रेडिट कार्ड नंबर कळविला परंतू CVV नंबर कळविला नाही. रूम बुक केल्यानंतर तीन तासातच तक्रारदारांचे प्रवासाचे तिकीट निश्चित झाले व त्यांनी लगेचच सा.वाले यांचेशी संपर्क साधून रूम बुकींग रद्द केले. परंतू त्यावेळेस सा.वाले क्र.2 यांनी रूम बुकींगबद्दल रू.9,633/-,याचा मोबदला घेतला जाईल असे तक्रारदारास कळविले. तक्रारदाराच्या म्हणण्यानूसार रूम बुकींग करतेवेळी बुकींग हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे असे कळवूनही व रूम न वापरताही सा.वाले क्र 2 यांनी रूम बुकींगचा मोबदला रू.9,633/-,एवढी रक्कम स्विकारावे ही गोष्ट तक्रारदारांना मान्य नव्हती. म्हणून तक्रारदार यांनी सा.वाले क्र 2 यांचेकडे हा मोबदला घेऊ नये अशी मागणी केली.
12. तक्रारदारांना सा.वाले क्र 2 हे रूम बुकींगचा मोबदला क्रेडिट माध्यमातुन घेतील याबद्दल शंका वाटल्याने ताबडतोब तक्रारदारांनी सा.वाले क्र.1यांचेकडे संपर्क साधून सा.वाले क्र.1 यांना झालेल्या घटनेची कल्पना देऊन क्रेडिट कार्ड अचलीत करणेसंबधी व सा.वाले क्र. 2 यांच्याशी झालेल्या व्यवहाराचे पैशाची वजावट न करण्याबद्दल सूचना दिली व त्यानंतर दि. 11 जून 2007 रोजी सा.वाले क्र. 1 यांचेकडे पुन्हा संपर्क साधून क्रेडिट कार्ड अचलीत करण्यासंबधी खात्री करून घेतली. दि. 13 जून 2007 रोजी सा.वाले क्र. 2 यांचेकडून तक्रारदारांना रू.9,633/-,चे ई-मेल व सही न केलेले चार्जस्लिप मिळाले. त्यांनतर तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 यांच्या कस्टमर क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटकडे संपर्क साधला असता सा.वाले क्र. 1 यांच्याकडून तक्रारदारांना त्यांचे क्रेडिट कार्ड अचलीत केलेले आहे व अद्याप सा.वाले क्र. 2 यांचेकडून रक्कम वजावटीची मागणी केली नाही असे सांगण्यात आले.
13. त्यानंतर तक्रारदारांनी दि. 26 जून 2007 रोजी क्रेडिट कार्डचे विवरणपत्र (Statement) मिळाले. त्यामध्ये रू.9,633/-,चा व्यवहार निर्देशीत केलेला होता. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले क्र.1 यांना सूचना देऊनही व CVV नंबर दिलेले नसतांना सा.वाले क्र.1 यांनी क्रेडिट कार्ड नंबर-4864103125065002 द्वारे रू.9,633/-,रक्कम तक्रारदारांच्या खात्यातुन वळते केले होते.
14. यावर सा.वाले क्र.1 यांनी हजर राहून तक्रार अर्जास म्हणणे दाखल केले नाही. व तक्रारदारांचे म्हणणे नाकारले नाही.
15. सा.वाले क्र. 2 यांचे म्हणण्यानूसार प्रस्तुत तक्रारीस कारण हे दिल्लीमध्ये घडले असल्याकारणाने प्रस्तुत तक्रार या ग्राहक मंचाच्या भौगोलिक क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येत नाही.तसेच तक्रार अर्ज हा एक वर्ष विलंबाने दाखल केलेला आहे.तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्या कलम 2(1)(d),नूसार ग्राहक नाही.सा.वाले यांचे असेही म्हणणे आहे की,सा.वाले यांनी व्यावसायीक नियमानूसार तक्रारदारांकडून रूम बुकींग रद्द झाल्यानंतरही मोबदला स्विकारला.सा.वाले यांनी रूम बुकींगच्या वेळी बुकींग तात्पुरत्या स्वरूपाची असून ती प्रवासाच्या तिकीटाच्या निश्चितीवर अवलंबून राहील असे कळविले होते ही बाब नाकारली.सा.वाले यांचे म्हणणेनूसार रूम बुकींग रद्द झाल्यानंतरही पूर्ण मोबदला घेण्यात येईल असे त्यांचे सेक्रटरी श्री.धूपकर यांना कळविले होते.ही बाब कळविल्यानंतरही त्यांनी सर्व क्रेडिट कार्डाबद्दलचे तपशिल कळविले. त्यानंतरच तक्रारदारांच्या नावे दि. 09.06.2007 रोजीचे बुकींग झाले. बुकींग रद्द करतेवेळी तक्रारदारांचे सेक्रेटरी यांनी संपूर्ण मोबदला न स्विकारण्याबद्दल काही करता येईल का?याबद्दल विचारणा केली असता तक्रारदारांना विशेष बाब म्हणून 25% सवलत देऊन 75% रक्कम रू.9,633/-,स्विकारली. सा.वाले क्र.2 यांचे म्हणणेनूसार तक्रारदारांनी रूम बुकींगच्या वेळीस संपूर्ण क्रेडिट कार्डचे तपशिल दिलेले होते. त्यामूळेच रूम बुकींग झालेले होते.
वरील बाबीवरून सा.वाले यांनी तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द करावा अशी मागणी केली.
16. क्रेडिट कार्डच्या व्यवहारातून सा.वाले क्र. 1 यांनी तक्रारदारांच्या खात्यातील रू.9,633/-,रक्कमेची वजावट ही आय.सी.आय.सी.आय बँक मुंबई येथून झालेली आहे. तसेच तक्रारदार यांनी रूम बुकींग फोनवरून अंधेरी-मुंबईहून केले होते. तसेच घटना मुंबई येथे घडली असल्या कारणाने देखील तक्रार प्रस्तुत मंचाचे कार्यक्षेत्रात येते.तक्रारीस कारण दि.09.06.2007रोजी घडलेले असून तक्रार अर्ज दि.15.07.2008 रोजी दाखल केलेले आहे. ग्राहक संरक्षण कायदा कलम 24(अ), नूसार तक्रार अर्ज दोन वर्षाच्या कालावधीत दाखल केलेली असल्याकारणाने तक्रार अर्ज हा मुदतीत दाखल केलेला आहे. तसेच सा.वाले क्र.2यांनी मोबदला घेऊन हॉटेलमधील रूम बुकींगची सेवा तक्रारदारांना दिली त्यामूळे सा.वाले क्र.2व तक्रारदार यांच्यामध्ये सेवा पुरविणारे व ग्राहक असे संबध निर्माण झाले त्यामूळे तक्रारदार सा.वाले क्र. 2 यांचे ग्राहक आहेत. तक्रारदारांनी शपथेवर दाखल केलेली तक्रार, सा.वाले क्र. 2 यांनी शपथेवर खंडन केले नाही. तसेच पुराव्याचे शपथपत्र दाखल केले नाही रूम बुकींगच्या वेळी तक्रारदारांनी क्रेडिट कार्डासंबधीचे आवश्यक ते तपशिल पुरविले होते. या कथनाच्या पृष्ठर्थ सा.वाले क्र 2 यांनी कोणतेही कागदोपत्री पूरावा दाखल केलेला नाही. म्हणून सा.वाले क्र. 2 यांचे म्हणणे नाकारण्यात येते व तक्रारदारांचे म्हणणे ग्राहय धरण्यात येते.
17. तक्रारदारांनी तक्रार अर्ज, शपथपत्रासह दाखल केलेले आहे. तक्रारदारांच्या कथनास त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरून पुष्टी मिळते. तसेच सा.वाले क्र. 1 यांनी तक्रारदारांचे म्हणणे नाकारले नसल्याकारणाने तक्रारदारांचे म्हणणे अबाधीत राहते.
18. सा.वाले क्र. 1 यांनी व्याजासह रू.9,633/-,व त्यावरील सर्व्हिस टॅक्स तसेच विलंब शुल्क पुन्हा तक्रारदारांच्या क्रेडिट कार्ड नंबर-4864103125065002 खात्यामध्ये जमा करावी. अशी तक्रारदारांनी मागणी केली आहे. तक्रारदारांच्या खात्यात रू.9,633/-,व्याजासह जमा करावेत. तसेच जर विलंब शुल्क व सर्व्हिस टॅक्स तक्रारदारांकडून वसूल केले असतील तर तीही रक्कम परत करावी.
तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार प्रस्तुत प्रकरणामूळे तक्रारदारांना बरचे आर्थिक नूकसान झाले. त्यामूळे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून 11,40,000/-,रूपये रक्कमेची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तक्रारदारांनी रू.11,40,000/-,चे नुकसान झाल्याबद्दलचे कोणतेही कागदीपत्री पुरावा दाखल केलेला नाही त्यामूळे तक्रारदारांची ही मागणी अमान्य करण्यात येते.
सा.वाले हे तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्च रू.5,000/-देण्यास जबाबदार आहेत.
19. वरील विवेचनावरून खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 385/2008 अंशतः मान्य करण्यातयेते.
2. सा.वाले यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना क्रेडिट कार्ड नंबर- 4864103125065002च्या खात्यामध्ये पुन्हा रू.9,633/-,दि.26.06.2007 ते पैसे देईपर्यंत 9% व्याजदराने व्याजासह जमा करावे. तसेच त्यावरील सर्व्हिस टॅक्स जमाव विलंब फी तक्रारदारांकडून घेतले असतील तर ती रक्कम जमा करावी. जर नमूद क्रेडिट कार्ड नंबर रद्द/अचलीत केला असेल तर सा.वाले क्र.1 यांनी वरील रक्कम रोखीने तक्रारदारांना द्यावी.
4. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना संयुक्तरित्या किंवा
वैयक्तीकरित्या रू.5,000/-तक्रार अर्ज खर्च द्यावा.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात
.